घरफिचर्समहाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल.

Subscribe

लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक पु. ल. देशपांडे यांची आज ८ नोव्हेंबर रोजी जयंती. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. ८ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबईतील गावदेवी या भागात पु. ल. देशपांडे यांचा जन्म झाला. जोगेश्वरीतील सारस्वत कॉलनीत त्यांचे बालपण गेले.

लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक पु. ल. देशपांडे यांची आज ८ नोव्हेंबर रोजी जयंती. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. ८ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबईतील गावदेवी या भागात पु. ल. देशपांडे यांचा जन्म झाला. जोगेश्वरीतील सारस्वत कॉलनीत त्यांचे बालपण गेले. पार्ले टिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात त्यांनी पुढील शिक्षण घेतले. देशपांडे लहानपणापासूनच धष्टपुष्ट होते. वयाच्या दुसर्‍या वर्षी ते पाच वर्षांच्या मुलाएवढे दिसत होते. ते हुशार होते आणि सतत काही ना काही करत असत. त्यांना स्वस्थ बसण्यासाठी घरचे लोक पैसा देऊ करायचे, पण हे त्यांना जमले नाही. आजोबांनी लिहून दिलेले आणि पु. लं. नी पाठ केलेले दहा-पंधरा ओळींचे पहिले भाषण पु. लं. नी वयाच्या ५ व्या वर्षी त्यांच्या शाळेत हावभावासहित खणखणीत आवाजात म्हणून दाखवले. सात वर्षे अशी भाषणे केल्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षांपासून पु. ल. देशपांडे स्वतःची भाषणे स्वतःच लिहायला लागले आणि इतरांनाही भाषणे आणि संवाद लिहून देऊ लागले. पु. लं. ना घरात खूप वाचन करायला आणि रेडिओवरील संगीत ऐकायला मिळाले. त्यांच्या घरी संगीताच्या बैठकाही होत असत. ते घरीच बाजाची पेटी शिकले. टिळक मंदिरात एकदा बालगंधर्व आले असताना पु. लं. नी त्यांना पेटी वाजवून दाखवली. बालगंधर्वांनी शाबासकी दिली आणि भावी कलाजीवनासाठी शुभेच्छा दिल्या. लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी हेरून पु. ल. त्या लोकांच्या नकला करायचे, म्हणून घरी कुणी आले असताना पुरुषोत्तम जवळ नसलेलाच बरा असे आईला वाटे. देशपांड्यांची आई कारवारी, वडील कोल्हापूरचे आणि बहीण कोकणात दिलेली, त्यामुळे घरात भोजनात विविधता असे. यातूनच पु. ल. खाण्याचे शौकीन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर देशपांडे गाण्याच्या, पेटीच्या व अन्य शिकवण्या करू लागले. ते शाळेत असल्यापासूनच भावगीते गायचे आणि गीतांना चाली लावायचे. कॉलेजात असताना त्यांनी राजा बढे यांच्या माझिया माहेरा जा या कवितेला चाल लावली. आज ते गाणे मराठी भावसंगीतातील अनमोल ठेवा समजला जातो. ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या आणि भीमसेन जोशींनी गायलेल्या ‘इंद्रायणी काठी’ला पु. लं. नी चाल लावली होती. हेही गाणे अजरामर झाले. कॉलेजमध्ये असताना पु. ल. गायकांना साथ करीत. पु. ल. पेटी वाजवत, त्यांचा भाऊ रमाकांत तबला आणि मधुकर गोळवलकर सारंगी वाजवीत. मिळालेले १५ रुपये तिघेही वाटून घेत. पार्ले टिळक विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पु. ल. देशपांडे मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजातून इंटर व सरकारी लॉ कॉलेजमधून एलएल.बी. झाले आणि कलेक्टर कचेरी व प्राप्तीकर विभागात काही काळ नोकरी करून पुण्याला आले. त्यापूर्वी ते पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये कारकून आणि ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक होते. पुण्याला आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए.आणि नंतर एम.ए. केले. १९३७ पासून नभोवाणीवर पु. ल. देशपांडे छोट्या मोठ्या नाटिकांत भाग घेऊ लागले. त्या वर्षी त्यांनी अनंत काणेकरांच्या ‘पैजार’ या श्रुतिकेत काम केले. १९४४ साली पु. लं. नी लिहिलेले पहिले व्यक्तिचित्र – भट्या नागपूरकर – अभिरुची या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. याचदरम्यान त्यांनी सत्यकथामध्ये ‘जिन आणि गंगाकुमारी ही लघुकथा लिहिली. १९४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ शाळेमध्ये शिक्षक होते. १९४६ साली ते सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले. १९४७ ते १९५४ या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. ‘वंदे मातरम्’, ‘दूधभात’ आणि ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटांत त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. गुळाचा गणपती या चित्रपटांत कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पु. लं. चे होते. १९४८साली पु. ल. देशपांडे यांनी ‘तुका म्हणे आता’ हे नाटक आणि ‘बिचारे सौभद्र’ हे प्रहसन लिहिले. १९५५ मध्ये पु. ल. देशपांडे ‘आकाशवाणी’त (ऑल इंडिया रेडिओत) नोकरीला लागले. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. 19५६-५७ मध्ये ते आकाशवाणीवर प्रमुख नाट्यनिर्माता झाले. बदलीवर दिल्लीला गेले असताना त्यांनी व सुनीताबाईंनी ‘गडकरी दर्शन’ नावाचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमातूनच ‘बटाट्याची चाळ’ चा जन्म झाला. बटाट्याच्या चाळीला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली. १९५८मध्ये पु. लं. ना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले. १९५९ मध्ये पु. ल. देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. दिल्ली दूरदर्शनवर सुरू झाले त्यावेळचा पहिला कार्यक्रम पु. लं. नी निर्मिला होता. दूरदर्शनवरील बिरजू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम होता. संथ गतीत सुरू झालेल्या नृत्याची लय वाढत वाढत चौपट झाली. अशा वेळी त्या द्रुतगतीतही तबला वाजवून पु. लं. नी आपले तबला प्रावीण्य दाखवून दिले. दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पु. लं. हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते. गुळाचा गणपती, या सबकुछ पु. ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु. ल. देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले पु. ल. देशपांडे यांचे १२ जून २००० रोजी पुण्यात निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -