घरफिचर्स‘पांडुरंग सांगवीकर इज माय फेवरेट हिरो!’

‘पांडुरंग सांगवीकर इज माय फेवरेट हिरो!’

Subscribe

‘जे आहे ते पटत नाही आणि जे असायला हवे ते निर्माणही करता येत नाही’ या अटळ, अपरिहार्य प्रवासात जी अस्वस्थता, बेचैनी असते, पांडुरंग तिचा प्रतिनिधी आहे. म्हणून तर कोणत्याही कालखंडातील तरुण पिढीचा ‘आयडेनटीटी क्रायसिस’ आपणाला पांडुरंगमध्ये पाहायला मिळतो. परंतु हा क्रायसिस समजून घेण्याची निकड आणि सवड आपल्यापाशी नाही. यामुळे मराठी समीक्षाव्यवहाराने पांडुरंगला निहिलीस्ट, अराजकतावादी, बालिश, भ्रमिष्ट ठरवून त्याच्यावर ‘न-नायकाचा’ शिक्का मारला आहे. मग असा हा पांडुरंग ‘न-नायक’ असूनही साडेपाच दशकानंतरच्या तरुणाईला आपला ‘फेवरेट हिरो’ का वाटतो?

उत्तर ऐकल्यावर मी हादरलोच !

‘तुमचा आवडता नायक कोण ?’ हा प्रश्न तसा प्रत्येकच बॅचला विचारतो मी. या वर्षीच्या बॅचलाही विचारला. वरुण,रणवीर,सिद्धार्थ,शाहिद,सलमान,शाहरुख,आमीर,आयुष्यमान,रितेश,अक्षय अशी काही स्टिरिओटाईप उत्तरे आलीही; पण तेवढ्यात नुकतेच मिसरूड फुटलेला एक चुणचुणीत पोरगा खणखणीत आवाजात उत्तरला :
‘पांडुरंग सांगवीकर इज माय फेवरेट हिरो !’

- Advertisement -

ग्रामीण भागातून, सर्वसाधारण शेतकरी कुटूंबातून उत्तम गुणांनी बारावी उत्तीर्ण होऊन शहरात शिकायला आलेला हा अठरा-एकोणीस वर्षांचा पोरगा. माझ्या समजुतीप्रमाणे एकवेळ त्याने मकरंद, भरत, अमेय, प्रथमेश यांना फेवरेट म्हणून निवडायला हरकत नव्हती. पण माझ्या रूढ धारणेला धाब्यावर बसवत त्याने सत्तावन्न वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका मराठी कादंबरीतील व्यक्तिरेखेला आपला ‘नायक’ म्हणून निवडले.

1963 मध्ये प्रकाशित झालेली ‘कोसला’ ही मराठी कादंबरी- 24 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 1963 अशा अठरा दिवसांत अक्षरशः झपाटून जाऊन लिहिलेली! भालचंद्र नेमाडे हे तिचे लेखक तर पांडुरंग सांगवीकर ही त्यातली मध्यवर्ती व्यक्तिरेखा.(म्हणजे सत्तावन्न वर्षांपूर्वी नेमक्या याच कालखंडात ‘कोसला’ ही कादंबरी आणि पांडुरंग हा नायक आकाराला येत होता.)

- Advertisement -

तुमच्यापैकी अनेकांनी ही कादंबरी वाचली असेल. रूढार्थाने विचार करता ‘कोसला’ ही कमालीची रुक्ष, रटाळ आणि कंटाळवाणी कादंबरी आहे. म्हणजे अन्य कादंबर्‍यांप्रमाणे तिला आकर्षक कथानक नाही. वेगळी, वेधक, कलरफुल पार्श्वभूमी नाही. खिळवून ठेवणारे समरप्रसंग नाहीत की आकर्षून घेणारे शृंगारप्रसंग नाहीत. थोडक्यात ‘पैसा वसूल’ असे तिच्यात काहीच नाही. तरीही जागतिकीकरणाच्या दौरमध्ये जन्मलेल्या या कोवळ्या पोराला ही कादंबरी वाचावीशी वाटावी, आवडावी, याला कारण काय?

याचे उत्तर आहे, कादंबरीचा नायक- पांडुरंग सांगवीकर! आता त्याला नायक तरी कसे म्हणावे हा प्रश्नच आहे. कारण आपल्या भारतीय समाजमनाला आवडतो तसा तो नायक नाही; म्हणजे तो दिसायला राजबिंडा नाही, कर्तृत्वाने रांगडा नाही. दहा गुंडांना एकसाथ लोळविण्याची आणि लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची किमयाही त्याच्यामध्ये नाही. म्हणजे ना तो स्वप्नपुरुषासारखा आहे ना वाचकांच्या स्वप्नाळूपणाचे प्रतिनिधित्व करणारा. थोडक्यात पारंपारिक भारतीय नायकांसारखा तो उच्च कुलोत्पन्न, नम्र, प्रेमळ, उदार, क्रियाशील, वाक्चतुर, हुशार, सुंदर असा काहीही नाही. संपूर्ण कादंबरीत ‘लार्जर दॅन लाईफ’ अशी त्याची प्रतिमा नाही. उलट तो अगदीच सर्वसामान्य आहे. माणूस म्हणून आपल्यात जशा शेकडो मर्यादा असतात, तशा मर्यादांनी युक्त असा तो ‘आम आदमी’ आहे.

ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत बांदिवडेकर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘अशा या पांडुरंगला कोणत्याही प्रकारचे साचे मान्य नाहीत. मग ते भाषेचे असोत, विचारांचे असोत, व्यवहाराचे असोत की वाड्मयाचे असो; असे साचे वा संकेत स्वीकारणे म्हणजे स्वातंत्र्याची कक्षा मर्यादित करून घेणे, संवेदना व अनुभव यातील वैविध्य नाकारणे…..म्हणून त्याचे म्हणणे आहे की स्वतंत्र प्रतिभेच्या माणसाने असे संकेत व साचे स्वीकारु नयेत किंवा स्वत: तयार करू नयेत.’

‘एक बात साफ थी
उसकी हर आदत
दुनिया के व्याकरण के खिलाफ थी ’

साठीच्या दशकातील बंडखोरीचे ‘जीन्स’ जणू पांडुरंगमध्ये उतरलेले.
यामुळे पांडुरंग गाव सोडून शिक्षणासाठी पुण्यात येतो; पण पुण्यात रमत नाही. विद्यापीठात गमत नाही. प्रेमात पडत नाही. टेकड्यांवर भटकत राहतो. मात्र पुढे तो टेकड्यांपासूनही दुरावतो. गावाकडे परततो. धर्म, पंथ, तत्त्वज्ञान अशी मुशाफिरी करतो. विरक्तीच्या वाटेला जातो. तिथेही रिकामाच राहतो आणि अखेर कुठे म्हणजे कुठेच रुजता येत नाही हे लक्षात आल्यावर बोहल्यावर चढण्याची तयारी दाखवून तडजोड स्वीकारतो. दुनियेचे व्याकरण नाकारता नाकारता स्वखुशीने (?)त्याचे दोरखंड गळ्यात अडकवून घेतो.

‘जे आहे ते पटत नाही आणि जे असायला हवे ते निर्माणही करता येत नाही’ या अटळ, अपरिहार्य प्रवासात जी अस्वस्थता, बेचैनी असते, पांडुरंग तिचा प्रतिनिधी आहे. म्हणून तर कोणत्याही कालखंडातील तरुण पिढीचा ‘आयडेनटीटी क्रायसिस’ आपणाला पांडुरंगमध्ये पाहायला मिळतो.

परंतु हा क्रायसिस समजून घेण्याची निकड आणि सवड आपल्यापाशी नाही. यामुळे मराठी समीक्षाव्यवहाराने पांडुरंगला निहिलीस्ट, अराजकतावादी, बालिश, भ्रमिष्ट ठरवून त्याच्यावर ‘न-नायकाचा’ शिक्का मारला आहे.

मग असा हा पांडुरंग ‘न-नायक’ असूनही साडेपाच दशकानंतरच्या तरुणाईला आपला ‘फेवरेट हिरो’ का वाटतो?

……सत्तावन्न वर्षे उलटून गेली आहेत. सातपुड्यातल्या डोंगरसांगवी नावाच्या खेड्यातला पंचवीस वर्षे वयाचा पांडुरंग ज्या गावाबद्दल, शहराबद्दल, जगाबद्दल आणि जगण्याबद्दल बोलत होता, ते सारे आमूलाग्र बदलले आहे. अक्षरश: सगळे काही उलटेपालटे होऊन गेले आहे. अशावेळी खरेतर पांडुरंग विस्मृतीच्या कोषात जायला हवा होता; पण तसे झालेले नाही. तत्कालीन जगाचे रूप आणि त्याने विचारलेल्या प्रश्नांचे प्रारूप बदलले असले तरी तपशिलाचा फरक वगळता तरुणाईपुढचा तिढा जसाच्या तसा आहे.

म्हणून साठीच्या दशकातील पांडुरंगची जी खंत आहे; तीच खंत नव्या सहस्त्रकातील तरुणाईचीही आहे. हा तिढा, ही खंत कायमच असल्याने अठरा-एकोणीस वर्षांचा तरुण पोरगा सत्तावन्न वर्षांपूर्वीच्या तरुण पांडुरंगाशी अद्यापही ‘रिलेट’ करू शकतो.

‘चांगले साहित्य जुने होत असेल, पण ते कधीही शिळे होत नसते; काळ बदलतो तसे काही तपशील बदलतात, संदर्भही बदलतात; परंतु साहित्याचा एकंदर जीवनाशी असलेला अन्वय अबाधित राहत असतो.’

एका बाजूने विचार करता तरुण पिढीचे ‘अभिजात साहित्या’कडे वळणे आपणाला आशादायी वगैरे वाटेल. वाचनसंस्कृतीची वाताहत होत असतानाच्या काळात इतक्या वर्षानंतरही ‘कोसला’ची वाचनीयता आणि पांडुरंगची वाचकप्रियता टिकून असणे ही मराठी साहित्यप्रेमींच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. परंतु यात एक असमाधानही लपलेले आहे. तिढ्यात अडकून पडलेल्या आजच्या तरुणाईला आपले प्रतिबिंब पाहण्यासाठी सत्तावन्न वर्षांपूर्वीच्या कादंबरीकडे जावे लागते. याचा अर्थ वर्तमानातील साहित्य त्यांच्या भावविश्वाशी रिलेट होत नाही. एकवेळ समकाळातील सिनेमा, नाटक यातील नायक त्यांना आपले वाटतील पण कथा-कविता-कादंबर्‍यातील नायकांशी त्यांचे ‘सोशल डिस्टन्सिंग’ वाढत चालले असेल तर ही चिंता वाढविणारी गोष्ट आहे.

एका दृष्टीने हे जसे मराठी कादंबरीचे मोठे अपयश आहे तसेच ‘श्रेष्ठ कालभान असलेले लेखक’ मानल्या गेलेल्या भालचंद्र नेमाड्यांचेही अपयश आहे. कारण कादंबरी लेखनाची बाराखडी गिरवत असताना त्यांनी घडवलेला पांडुरंग हा पहिला नायक तरुण पिढीला जसा ‘आपला’ वाटतो. तसे अन्य नायकांच्या बाबतीत घडलेले नाही. पस्तीस वर्षांपूर्वीचा ‘चांगदेव’ असो वा बहुप्रतीक्षेनंतर प्रचंड गाजावाजा करून अवतरलेला ‘खंडेराव’ असो या नायकांशी वाचकांचे सूर जुळू शकलेले नाहीत. भले आज आपण ‘हिंदू’ या बहुप्रतिक्षेनंतर अवतरलेल्या कादंबरीच्या दशकपूर्तीची चर्चा उच्चरवात करत असू पण अजूनही नेमाडे म्हटले की ‘कोसला’ आणि ‘पांडुरंग’ आठवत असेल तर याचा अर्थ काय घ्यायचा? वाचक म्हणून आपण ‘इव्हॉल्व्ह’ झालो नाहीत की लेखक म्हणून नेमाडेच पुढे ‘लेखकराव’ होत गेले?

तटस्थ राहून विचार करता या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपणाला गोंधळात टाकणारी आहेत. एका दृष्टीने मराठी समाज म्हणून हे आपले साहित्यिक आणि सांस्कृतिक अपयश आहे.

खरेतर भालचंद्र नेमाडे हे जसे मराठीतील श्रेष्ठ कादंबरीकार आहेत तसेच त्यांचे कवितेतील कर्तृत्वही मोठं आहे. त्यांनी निवडक पण महत्त्वाचं समीक्षालेखनही केलं आहे. कादंबरी, कविता आणि समीक्षा या तीनही प्रांतातले ‘रूढ संकेत’ नाकारून त्यांनी आपल्या प्रतिभेचा स्वतंत्र आविष्कार घडवला आहे. यासाठी ‘साहित्य अकादमी’, ‘पद्मश्री’, ‘ज्ञानपीठ’ अशा महत्त्वाच्या सन्मानांनी त्यांचा गौरवही झालेला आहे.

म्हणजे इतके बहुआयामी कर्तृत्व असतानाही या सगळ्यांची बेरीज ‘कोसला’ आणि पांडुरंगच्या बरोबरीची नाही. स्वतः नेमाडेंनीही हे मान्य केले आहे.‘कोसला’मुळे माझी दुसरी कितीएक क्षेत्रांतली जीव लावून केलेली महत्त्वाची कामं सगळीच दुय्यम-तिय्यम आणि काही तर किरकोळ समजली गेली…कविता, अध्यापन, संशोधन, प्रकाशन, भाषांतर, शैक्षणिक आणि सामाजिक वगैरे उद्योग…मलाच ही (कामं) सांगावी लागताहेत, हे त्याहून वाईट.’ ‘कोसला’च्या सुवर्णमहोत्सवी आवृत्तीच्या वेळी नेमाडेंनी ही खंत व्यक्त केली आहे.

साडेपाच दशकांपूर्वी ‘पंचवीस वर्षांचा अपयशी विद्यार्थी’ म्हणून नेमाडेंनी जे गिचमिडगुंते अनुभवले, ते ज्या प्रश्नांना सामोरे गेले-ते कुणीतरी ‘स्टॅच्यू’ केल्यासारखे अद्यापही तसेच असतील तर मग 2020 मधील तरुणाईने कोणती उमेद बाळगून ‘हीरकमहोत्सवी महाराष्ट्राचे’ गोडवे गायचे?

महासत्ता होण्याच्या बाता वगैरे मारतो; पण जिच्या खांद्यावर हा भार सोपवायचा आहे त्या तरुण पिढीचा क्रायसिस आपण समजून घेऊ शकत नाही किंवा ते ज्याच्याशी रिलेट होवू शकतील असे ‘नवे नायक’ही देऊ शकत नाही. म्हणून तर तरुण पोराने ‘फेवरेट’ म्हणून पांडुरंगला निवडल्यानंतर मी मुळापासून हादरलो.

ठवडा उलटून गेला असेल या घटनेला घडून…तरी हादरण्याचा कंप अद्याप कायम आहे !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -