घरफिचर्सपंकजांचे बंडच; पण फडणवीसांविरुद्ध

पंकजांचे बंडच; पण फडणवीसांविरुद्ध

Subscribe

बंड केले नसते तर शिवरायांना स्वराज्याची स्थापना करता आली असती का, असा प्रश्न करत पंकजा मुंडे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गोपीनाथ गडावरून बंडाचा झेंडा फडकावला. गोपीनाथ मुंडे यांनी कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. पण, सद्यस्थिती बघता आज बंडखोर नेत्यांचीच गरज आहे. तोंडाला झिप लावलेल्या नेत्यांची गरज नाही, असे सांगून पंकजा यांनी गेल्या पाच वर्षांतील खदखद अखेर बाहेर काढली. भाजप हा माझ्या बापाने वाढवलेला पक्ष आहे. त्यामुळे मी कशाला बंड करू, असा प्रतिसवाल करत त्यांनी काही दिवसांपासून सुरू असलेल्या माध्यमांमधील चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला खरा; मात्र या मेळाव्यातील त्यांचे एकूणच भाषण हे बंडखोरी जाहीर करणारेच होते. मूठभर लोकांतून जनसामान्यांपर्यंत पक्ष पोहोचवण्यात गोपीनाथ मुंडे यांचे सिंहाचे योगदान होते. मात्र, जनसामान्यांतून आता हा पक्ष पुन्हा मूठभर लोकांच्या हाती जात आहे, असे सांगून पंकजांनी मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला. गोपीनाथ गडावर होणार्‍या स्व. गोपीनाथ मुंडे जयंती मेळाव्याचे निमित्त साधून पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये भाजपचा नामोल्लेखही नसल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ काढले गेले. मुंडे यांनीही ही चर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, हे विशेष. मेळाव्याच्या आदल्या दिवशी पंकजा माध्यमांसमोर आल्या. आपण नाराज नसल्याचे सांगतानाच त्यांनी पक्षातील नेतृत्वाविषयी सूचक वक्तव्यही केले. त्यावेळीच या मेळाव्यात नक्की काय ऐकायला मिळणार याचा अंदाज राजकीय विश्लेषकांना आला होता. अपेक्षेनुसारच घडले. गोपीनाथ मुंडेंचे निकटचे सहकारी एकनाथ खडसे यांनी आपल्यावरील अन्याय कथन करताना फडणवीसांवर शरसंधान साधलेच, शिवाय आपण पक्षात आता फार काळ राहणार नसल्याचेच जणू जाहीर करून टाकले. याच वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीचेही गोडवे गायले. त्यामुळे खडसे नेमके कुठल्या वाटेवर आहेत हे स्पष्ट झाले. त्यानंतर पंकजा मुंडे भाषणासाठी उभ्या राहिल्या. त्यांनी आपण पक्ष सोडणार नसल्याचा प्रथमत: खुलासा केला. पण, पक्षाला आपण नको असेल तर तसेही आपल्याला सांगून टाकावे, असे स्पष्ट करतानाच कोअर कमिटीचाही राजीनामा दिल्याचे जाहीर केले. वरकरणी पंकजा यांचे भाषण पराभवानंतरची प्रतिक्रिया असल्याचे भासत असले तरीही प्रत्यक्षात त्यातून भाजपातील ओबीसी नेत्यांची पाच वर्षांतील मुस्कटदाबी व्यक्त झाली. मेळाव्यातील भाषणे ऐकता ओबीसी नेत्यांचा रोख अन्य कुणावरही नसून तो केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीसांवरच असल्याचे स्पष्ट होते. अर्थात, त्यांच्या या संतापात मोठे तथ्य आहे. पाच वर्षांच्या काळात फडणवीसांचा वारू असा काही उधळला होता की, जणू जग पादाक्रांत करायला निघालेला सिकंदरच. त्यामुळे ते पक्षातील कुणालाही मोजायला तयार नव्हते. आता आपला अश्वमेध कुणीही रोखू शकत नसल्याचा भ्रम झाल्याने त्यांची छाती अभिमानाने फुगण्याऐवजी अहंकाराने शिगोशिग भरली होती. मोदी आणि शहा यांचे अनुकरण करण्याच्या नादात फडणवीसांनी त्यांच्यातील हुकूमशहाला अंगीकारलेले दिसले. त्यामुळेच पाच वर्षांत भाजपमध्ये मोठे नेतृत्व पुढे आलेच नाही. किंबहुना, तसे न होण्याची जणू व्यवस्था करण्यात आली होती. म्हणूनच सत्ताकारण करताना जुन्या नेत्यांना कायमस्वरूपी संपवून टाकण्याची कुटनीती विधानसभा निवडणुकीत अवलंबण्यात आली. केवळ वैयक्तिक अहंकारापोटी खडसे, तावडे, मेहता, बावनकुळे, कांबळे हे आणि यांच्यासारख्या अन्य बहुजन नेत्यांना उमेदवारीपासून दूर ठेवले गेले. पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा काय व्यक्त केली तेथून त्यांची अधोगतीच जणू सुरू झाली. गोपीनाथ गडावर ही बाबही पंकजांनी आवर्जून बोलून दाखवली. मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न जर कुणी बघितले तर त्यात पाप काय, असा सवाल करत त्यांनी पाच वर्षांतील खदखद बाहेर काढली. विधानसभा निवडणुकीत आपल्याला पक्षातीलच काही मंडळींनी पराभूत केले, असा आरोप पंकजा खासगीत करतात. पंकजा समर्थकांकडून सातत्याने हा आरोप केला जातो की, फडणवीस केवळ धनंजय मुंडेंना पाठबळ देतात. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी धनंजय यांना रसद पुरवली. त्यामुळेच पंकजा यांचा पराभव झाला. पंकजा यांनीही या आरोपाला भाषणातून जणू दुजोरा दिला. आपले पहिलवान उपाशी ठेवले जातात आणि समोरच्या पहिलवानांना काजू-बदाम पोहोचवले जातात, असे सांगत पंकजा यांनी फडणवीसांवर शरसंधान साधले. काहीसा असाच आरोप खडसेंनीही केला. त्यांची कन्या रोहिणी खडसे यांचा पराभवही याच घरभेद्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच फडणवीसांविरोधात भाजपमधील एक गट आता पूर्ण ताकदीनिशी सक्रिय झाल्याचे या मेळाव्याने स्पष्ट केले. प्रकाश मेहतांचीही साथ पंकजांना मिळाली आहे. आगामी काळात अन्य नाराज नेतेही पंकजा यांना येऊन मिळतील. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी भाजपला समांतर व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला दिसतो. यातूनच पुढे दबावगट तयार केला जाईल. थेट पक्षाला सोडचिठ्ठी देण्यापेक्षा पक्षात राहून विद्यमान पदाधिकार्‍यांना धोबीपछाड देण्याची ही रणनीती असल्याचे दिसते. अर्थात, यापुढील काळात पक्षातील कोणतीही पदे घेणार नाही असेही पंकजा यांनी जाहीर केलेले नाही. त्यामुळे आगामी काळात त्यांना विधान परिषदेतील महत्त्वाचे पद दिले गेले तर बंडाची तलवार कदाचित म्यान होऊ शकते. पण, तोपर्यंत धुसफूस वाढून भाजपमधील ओबीसी नेत्यांची मोट बांधली गेलेली असेल, हे निश्चित! गोपीनाथ गडावरील मेळाव्याच्या निमित्ताने भाजपाश्रेष्ठींवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. अर्थात पक्षात ही वेळ प्रथमच आलेली आहे असेही म्हणता येणार नाही. ज्यावेळी विनोद तावडे, आशिष शेलारांकडे मंत्रिपदे दिली गेली, चंद्रकांतदादा पाटलांना प्रदेशाध्यक्षपद दिले गेले त्यावेळी हा पक्ष मराठा समाजाच्या बाजूने झुकत असल्याचे दावे केले गेले. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर पेशवाईपर्यंतचे आरोप करण्यात आले. तत्पूर्वी माधवचे समीकरण भाजपने सर्वदूर वापरले होतेच. यात माळी, धनगर आणि वंजारी हा ओबीसी समाज जोडण्याचे काम केले गेले. मात्र, याच समाजातील लोकांना डावलले गेले तेव्हा मात्र पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. खरे तर, अशाप्रकारचे मतभेद पुढे येणे हे पक्ष जिवंत असल्याचेच लक्षण आहे. त्यात वावगे असे काही नसते. पक्षशिस्तीच्या नावाने जी मुस्कटदाबी होते, त्यापेक्षा अशा उघड चर्चा या नेहमीच पक्षातील दोष दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. गोपीनाथ गडावरील भाषणे म्हणजे भूकंपाचे धक्के होते. भूकंप होऊच नये म्हणून आता भाजप श्रेष्ठींनी प्रयत्न करणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा पक्षाची वाताहात ही निश्चित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -