घरफिचर्सपॅरासाईट ते की आपण?

पॅरासाईट ते की आपण?

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादेतून ज्या रस्त्याने जाणार होते त्या रस्त्यावर एक भली मोठी भिंत बांधण्यात आली. कारण रस्त्यालगत झोपडपट्टी होती. आपण आपल्या देशातल्या बहुसंख्य लोकांच्या मूलभूत गरजांची अद्यापही पूर्तता करू शकलेलो नाही. ट्रम्प यांच्या दौर्‍याच्या वेळी आपण आपली गरिबी लपवून ठेवली. भिंतीच्या पलीकडचे ते सर्व लोक आपल्या दृष्टीने ‘पॅरासाईट’ आहेत. त्यांची जबाबदारीही आपण कधी ना कधी घ्यायला हवीच ना! मला राहून राहून प्रश्न पडतोय की, ‘पॅरासाईट’ ते आहेत की आपण?

अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच भारत दौरा केला. त्यांच्या दौर्‍यामुळे आपले राजकीय विश्व ढवळून निघाले.
अमेरिका हा जागतिक महासत्ता असलेला मोठा देश. त्यामुळे या देशाच्या प्रमुखाने कोणत्याही देशाला भेट देणे या घटनेला अनेक अर्थ असतात. त्यांच्या स्वागताला अहमदाबादमध्ये लक्षावधी लोकांनी जो उत्साह दाखवला तो अभूतपूर्व होता. या दौर्‍याकडे अनेक अर्थाने बघितले गेले. आपल्या शेजारी देशाचा लष्करी आणि आर्थिक प्रभाव वाढत चाललेला असताना अमेरिकेशी आपली जवळीक महत्त्वाची ठरणारी आहे. याशिवाय, व्यापार, संरक्षण, सुरक्षा, दहशतवाद यासह अनेक मुद्यांची चर्चादेखील यावेळी झाली, तर ते असो. या दौर्‍याच्या वेळी ट्रम्प अहमदाबादेतून ज्या रस्त्याने जाणार होते त्या रस्त्यावर एक भली मोठी भिंत बांधण्यात आली. कारण रस्त्यालगत झोपडपट्टी होती. भारताचे दारिद्य्र अमेरिकेला दिसू नये ही त्यामागची भावना असावी. या घटनेची माध्यमात उलट सुलट चर्चा झाली, पण वास्तव हे आहे की, आपण आपल्या देशातल्या बहुसंख्य लोकांच्या मूलभूत गरजांची अद्यापही पूर्तता करू शकलेलो नाही.

भारतात हे सगळे घडत असतानाच फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात ऑस्कर पुरस्कारांची घोषणा झाली. ‘पॅरासाईट’ या बिगर इंग्रजी चित्रपटावर या पुरस्काराची मोहोर उमटली आणि एकूणच सांस्कृतिक जगतात भिन्न – भिन्न स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. उत्सुकतेने मीही हा सिनेमा पाहिला. ऑस्करचे लेबल असल्यामुळे काहीएक पूर्वग्रह मनात ठेवून हा सिनेमा पाहिला, पण तरीही या सिनेमाने एक कलाकृती म्हणून मला मोठा आनंद दिला. अर्थात, या सिनेमावर मागच्या दोन तीन आठवड्यात पुष्कळ लिहून आले आहे. चर्चा झाली आहे. तरीही ट्रम्प यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाविषयी मला बोलावं वाटतंय. एक तर हा सिनेमा दक्षिण कोरियाचा. म्हणजे उत्तर कोरियाच्या बाजूला असूनही लोकशाहीवादी असणारा हा देश. सांस्कृतिकदृष्ठ्याही महत्त्वाचा आहे. स्वतःची भाषा, स्वतःची संस्कृती जपत या देशाने हॉलीवूडवर आपली मोहोर उमटवली.

- Advertisement -

‘पॅरासाईट’ म्हणजे परजीवी. शालेय विज्ञानात परजीवी या शब्दाचा आपल्याला परिचय झालेला असल्यामुळे या शब्दाचा अर्थ शोधण्याची गरज भासत नाही. दुसर्‍या जीवाच्या पोषकद्रव्याचे शोषण करणारा तो परजीवी, हे आपल्याला पक्कं ठाऊक असतं, पण हे जीव म्हणजे निसर्गातले छोटे-मोठे जीवजंतू अशीच आपली धारणा बनलेली असते, तर ‘पॅरासाईट’ हा सिनेमा या धारणेला धक्का देतो आणि आपल्याला एका नव्या जगाची, वास्तवाची ओळख करून देतो. कोरिया एक प्रगत देश आहे, पण त्याचवेळी त्याची एक नकारात्मक बाजूसुद्धा आहे. ती बाजू तो अधोरेखित करतो.

‘पॅरासाईट’ बघताना ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या दोन वर्गाची तुलना अपरिहार्य ठरते. सोल या महानगरातल्या एका गरीब कॉलनीत राहणार्‍या किम कुटुंबाची ही कथा आहे. अर्थात ही कथा केवळ एका कुटुंबाची नाही. या कुटुंबाच्या कथेत अनेक उपकथा आहेत. आजच्या काळात इंटरनेट ही आपली अनिवार्य गरज आहे. मोबाईलला रेंज नसेल, व्हॉट्सअ‍ॅप बंद असेल तर माणसं अस्वस्थ होतात. या कुटुंबाचीसुद्धा इंटरनेट ही एक गरज आहे. ते रेंजच्या आणि फ्री वायफायच्या शोधात आहेत. घरातल्या टॉयलेटवर चढल्यानंतर त्यांना रेंज मिळते. यावेळी त्यांची अगतिकता, हताशपणा आणि परिस्थितीशरणता स्पष्ट दिसते. घरात किटकनाशकाची फुकट फवारणी करून घेणारे हे कुटुंब तसे खाऊन पिऊन सुखी आहे. त्यांचे अस्तित्व लक्षात न घेता त्यांच्या घराच्या खिडकीजवळ लोक घाण करतात. तरीही त्यांची फारशी तक्रार नसते. गरिबांना परिस्थिती तक्रारही करू देत नाही, तर असे हे किम कुटुंबीय जगभरातल्या अभावग्रस्तांचे एक प्रातिनिधिक चित्र आहे. छोट्याशा घरात अंग चोरून राहणारे किम कुटुंबीय आणि त्याच शहरात अत्यंत अलिशान, भव्य अशा बंगल्यात उंचावर राहणारे पार्क कुटुंब. या दोघातल्या मानसिक संघर्षाची ही कथा आहे. मात्र, या संघर्षाला आधुनिक भांडवली प्रवृत्तीची किनार आहे.

- Advertisement -

गरीब आणि श्रीमंत हा आपल्या सामाजिक रचनेचाच एक भाग आहे. ज्याच्या मागे कमालीची आर्थिक विषमता आहे. या विषमतेची मूलभूत चिकित्सा करणारा हा सिनेमा अनेक गोष्टींवर कळत नकळत भाष्य करतो. श्रीमंतांची संस्कृती, गरिबांची संस्कृती यातली भेदरेषा ठळक करतो. विनोदाच्या अंगाने घटना घडामोडी घडत जातात आणि अचानक हा चित्रपट आपल्याला एका अनपेक्षित अशा वळणावर आणून ठेवतो. प्रेक्षकांना अंतर्मुख करतो. किम आणि पार्क या दोन्ही कुटुंबात प्रत्येकी चार सदस्य आहेत. मात्र, दोघांच्या जगण्यात कमालीचा अंतर्विरोध आहे. गरिबी आणि अत्युच्च श्रीमंती असा एक सुप्त संघर्ष यात आहे. पार्क या श्रीमंत कुटुंबात किम कुटुंबीय नोकरीच्या निमित्ताने प्रवेश करतात. पार्क कुटुंबीय सहलीच्या निमित्ताने बाहेर गेल्यानंतर त्या अतिभव्य, अलिशान बंगल्यात ऐसपैस राहण्याची, खाण्याची मौजमजा लुटतात. ‘पॅरासाईट’ सारखे जगतात. त्यांचा इथला प्रवास अर्थातच सोपा नसतो. आधीच्या सगळ्या नोकरांना विविध क्लुप्त्या योजून ते नोकरीतून काढायला भाग पाडतात आणि त्यांची जागा बळकावतात. स्वतःची कौटुंबिक ओळख लपवून ते पार्कच्या श्रीमंतीचा उपभोग घेऊ पाहतात. अशातच एकदा आधीची मोलकरीण त्यांच्या घरी येते आणि एका भयानक वास्तवाला आपण सामोरे जातो. पार्कच्या घरातल्या भव्य तळघरात या मोलकरणीचा नवरा राहत असतो. (अर्थात हे सगळं पडद्यावरच पाहणं ठीक) बाहेर गेलेले पार्क कुटुंबीय अचानक घरी आल्यामुळे ‘स्वतःला’ लपवण्याचा त्यांनी केलेला आटोकाट प्रयत्न आणि त्यातून घडत गेलेले नाट्य रंजक नाही, तर ते कमालीचे सुन्न करणारे आहे. पार्क कुटुंबियाच्या लहान मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत झालेला विस्फोट अंगावर येतो.

गरिबांच्या अंगालाही एक विशिष्ट प्रकारचा वास असतो, ही श्रीमंती मानसिकता अनुभवताना आपलाच मेंदू बधिर होतो. सामाजिक स्तरावर सगळे छान छान सुरू आहे, असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात तसं नसतं. गरिबांविषयी मोठा द्वेष अतिश्रीमंतांच्या मनात असतो. त्यांचे जगणे त्यांना किळसवाणे वाटत असते. वर्गसंघर्षाची तीव्र जाणीव करून देणारा हा सिनेमा खर्‍या अर्थाने वैश्विक सिनेमा आहे.

कोरियातील शहरात सिनेमाची कथा घडत असली तरी ती केवळ त्याच देशापुरती मर्यादित राहत नाही. या चित्रपटातले किम कुटुंबीय पार्क कुटुंबाचा विश्वासघात करून त्यांची फसवणूक करीत आहे. त्यांच्याच श्रीमंतीवर ते स्वतःच्या स्वप्नांचे इमले रचत आहेत, पण पार्क कुटुंबीय हे अशा एका सामाजिक संरचनेचा भाग आहेत जे त्यांच्याही नकळत हजारो किमसारख्या लाखो गरिबांचे शोषण करत आहेत. त्यांच्या श्रमातून यांनी मिळवलेली श्रीमंती ही भांडवली व्यवस्थेचाच एक भाग असते. समाज व्यवस्थेतला हा अंतर्विरोध, विसंगती दिग्दर्शकाने प्रतिकात्मक रीतीने इथे मांडली आहे. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून हा सिनेमा उलगडत जातो. धुंवाधार पाऊस पडल्यानंतर किम कुटुंबांची होणारी तारांबळ आणि त्यामुळे त्यांचे झालेले हाल ही घटनासुद्धा आपल्याला सामाजिक परिप्रेक्ष्यातून समजून घ्यायला हवी. भौतिक साधनसामुग्रीचा संपूर्ण अभाव असणार्‍या वर्गाला आहे त्याच गोष्टीत सुख मानावे लागते, पण त्याचबरोबर आपल्याला अधिक काही मिळावं ही त्याची सुप्त इच्छाही असतेच. ते मिळवण्यासाठी त्याला पहिला संघर्ष हा समदु:खी असलेल्या शोषितांशीच करावा लागतो. हे एक वास्तव आहे.

श्रीमंत कुटुंबात कुत्र्यांनाही उच्च प्रतीचे आणि वेगवेगळ्या प्रकारची महागडी बिस्किटे मिळतात. त्यांच्या घरात पाण्याचेही निरनिराळे प्रकार असतात. कल्पनातीत अशा असंख्य सोयीसुविधा असतात आणि ‘दुसर्‍या’ वर्गाकडे मात्र जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टीही नसतात. हा दुसरा वर्ग स्वतःच्या आत्मसन्मानासाठी झगडत राहतो. त्याच्या जगण्याचा नि भुकेचा प्रश्न त्याला छळत राहतो. श्रमिकांबद्दल, वंचितांबद्दल कोणतीच आस्था उच्च वर्गात नसते. हा सिनेमा अशा अनेक मानवी प्रेरणा प्रवृत्तीचे दर्शन घडवतो. आपल्या संवेदनांना जागे करतो. समाजातल्या आर्थिक विषमतेवर उपहासात्मक भाष्य करतो.

ट्रम्प यांच्या दौर्‍याच्या वेळी आपण आपली गरिबी लपवून ठेवली. भिंतीच्या पलीकडचे ते सर्व लोक आपल्या दृष्टीने ‘पॅरासाईट’ आहेत. त्यांच्या जगण्याला, त्यांच्या अंगाला विशिष्ट वास आहे. तो वास महासत्तेला कळू नये याची आपण काळजी घेतली, पण ही काळजी आपण किती दिवस घेणार? त्यांची जबाबदारीही आपण कधी ना कधी घ्यायला हवीच ना! मला राहून राहून प्रश्न पडतोय की, ‘पॅरासाईट’ ते आहेत की आपण?

पी. विठ्ठल 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -