घरफिचर्सप्रदूषणमुक्त जगण्याची शाश्वत जीवनशैली

प्रदूषणमुक्त जगण्याची शाश्वत जीवनशैली

Subscribe

आपण वेगवेगळ्या वस्तूंचे किती अर्थपूर्ण वापर करतो. आपण एखादी वस्तू टाकून नवीन घेताना ती खरीच टाकाऊ झाली आहे का? नवीन वस्तूची गरज आहे का? या गोष्टींचा किती विचार करतो. एखादी गोष्ट निव्वळ विकत घेणे परवडते किंवा नाही यावरून वस्तू विकत घेणे ही जीवनशैली किती उपयोगाची आहे. अशा रोजच्या लागणार्‍या ज्या वस्तू आपण वापरत असतो, त्यातून आपण कार्बन फुटप्रिंट आणि एकॉलोजीकल फुटप्रिंटमध्ये भर घालत असतो. कार्बन फुटप्रिंटमध्ये आपण ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जित करणार्‍या किती गोष्टी वापरतो याचे मोजमाप केले जाते. इकॉलोजिकल फुटप्रिंटमध्ये एकूणच सृष्टीला, निसर्गाला आपले जगणे शक्य करण्यासाठी किती काम करावे लागते, आपण त्यासाठी किती जागा आपण व्यापतो याचे मोजमाप केले जाते.

आपण कशा स्वरूपाच्या घरात राहतो? सौर उर्जा वापरतो की विद्युत उर्जा ? प्रवास पायी, सायकलने, बस-ट्रेनने करतो की खासगी वाहनातून इत्यादी. आपण वापरत असलेल्या सर्व वस्तू बनविणे, आपल्यापर्यंत वाहून आणणे या सर्वासाठी निसर्गाला किती वेळ काम करावे लागते. यासाठी भूभाग किती व्यापला जातो, याचे मोजमाप फूटप्रिंट मध्ये केला जातो. आपण वस्तूंचे अधिक अधिक अर्थपूर्ण वापरून आपले फूटप्रिंट कमी करू शकतो. सार्वजनिक धोरणेदेखील लोकांचे फूटप्रिंट कसे कमी करता येईल याचा विचार करून आखले जातील यासाठी आपण पुढाकार घेऊ शकतो. निव्वळ उलाढाल वाढवून बाजारव्यवस्था चालू ठेवणे हे धोरण ठेऊन भावी पिढीचे भवितव्य आपण धोक्यात घालू.

- Advertisement -

ही गोष्ट महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू होण्याआधीची आहे. घरी पाच सहा पाहुणे आले होते. जेवण करण्यासाठी पुरेशा प्लेट्स नव्हत्या. शिवाय इतक्या सार्‍यांच्या प्लेट्स धुवायच्या म्हणजे कुणा एकावर जास्तीचे ताण येणार. त्यासाठी दुकानातून पत्रावळी आणण्याचे ठरले. जवळच्या दोन तीन दुकानांचा धांडोळा घेतल्यानंतर चौथ्या दुकानात झाडांच्या पानाच्या पत्रावळी मिळाल्या.

बाकी सर्व दुकानात नाना प्रकारचे प्लास्टिक व थर्माकोलचे पत्रावळी, प्लेट्स, वाट्या होत्या.चौथ्या दुकानात झाडाच्या पानाच्या पत्रावळी पाहून आनंद झाला. पत्रावळी आणि द्रोण हवे होते म्हणून त्यांच्या किमतीची चौकशी केली. नव्वद रुपयाला शंभर पत्रावळी व साठ रुपयाला शंभर द्रोण. हे घेत असतांनाच सहज प्लास्टिकच्या द्रोण आणि प्लेट्सची चौकशी केली. आश्चर्य म्हणजे, ते पानाच्या पत्रावळी द्रोणापेक्षा अगदी निम्म्या किंमतीत होते. मी कितीही शाश्वत जीवनशैलीने जगणारा असेल, पर्यावरणाचा कितीही काळजी वाहणारा असेल तरीही एक क्षण विचार येऊन जातो की इतकी दुप्पट किंमत देऊन ही पत्रावळी का घेऊ? पैशाचा मोह आवरून मी पानाच्या पत्रावळी व द्रोण घेऊन घरी आलो. घरी सर्वांचे म्हणणे, प्लास्टिकचेच प्लेट्स आणायला हवे होते. या पत्रावळी व द्रोण गळतात. जास्त किंमत मोजून, घरच्यांचे ओरड खाण्याचा गाढवपाणा करण्याचे धाडस कोण करेल बरे?

- Advertisement -

खेड्यात लग्न म्हटलं की गावजेवण असतेच. साधारण १९९०-९५ पर्यंत गाव जेवणात पानाच्या पत्रावळीच असायची. गावात कोणते कार्यक्रम म्हटले की सात-आठ घरची लोकं एकत्र जमायचीच. कार्यक्रम ज्यांचं आहे त्या घरचे एक-दोनजण पहाटे लवकर जाऊन रानातूनन दोन चार पोती पळसाची पाने आणून ठेवीत. ओसरीत मोठी सतरंजीवर पळसाच्या पानासोबत मुरमूर्‍यांचा खमंग चिवडा ठेवलेला असायचा. गावातील जमलेली लोकं, पाहुणे-रावळे या सतरंजीवर गोल रिंगण करून बसून मनसोक्त चिवडा खात. मग पत्रावळी शिवायला घेत. ऐंशी आणि नव्वदीच्या दशकात गावात पत्रावळी शिवायला न येणारे लोकं क्वचितच असत. दहा पंधरा लोकं मिळून दीड दोन तासात पाचशेच्या वर पत्रावळी शिवत. ही लोकं पाय मोकळं करायला उठली की परत दुसरी पंधरा वीस लोकं जमायची. असे करून दीड-दोन हजार पत्रावळी व द्रोण दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत तयार झालेेले असत.

जेव्हा प्रत्यक्ष जेवणं सुरू व्हायच्या तेव्हा पंगत बसून उरलेली लोकं वेळ घालविण्यासाठी म्हणून परत पत्रावळी शिवत. लग्नानंतर दहा-बारा दिवस जमलेल्या पाहुण्यांना, घरच्यांना लागतील इतके पत्रावळी शिल्लक राहायच्या. गावातील जेवणाची भांडी ज्यांच्याकडे भाड्यांने मिळत त्यांच्याकडेच पाणी पिण्यासाठी स्टीलचे ग्लास उपलब्ध असत. जेवून झालेली पत्रावळी उकिरड्यात टाकून त्याचे खत तयार होत असे. गावातील कार्यक्रमातून कचरा तयार होणे ही भानगडच नव्हती. गावातील थोडे श्रीमंत, पाटील, सावकार लोक पहिल्यांदा प्लास्टिक प्लेट्स व वाट्या गावात घेऊन आले. ती बाब इतरांना प्रतिष्ठेची वाटू लागली. मग हळू हळू २००१ नंतर गावातील बहुतेक लोक प्लास्टिक पत्रावळी आणू लागेल. गावातील वापरून झालेल्या पत्रावळी हळू-हळू उडून गावशिवारभर पसरू लागल्या.

कुमुदिनी पंचभाई या पिंपरी चिंचवडमध्ये राहायला आहेत. त्या नव्वदीच्या दशकातील, म्हणजे प्लास्टिक नुकतेच प्रचलित होत होते. त्या काळातील अनुभव सांगत होत्या. दुध काचेच्या बाटलीतून आणायच्या. ज्या बाटलीत ते नेहमी दुध आणायच्या ती बाटली दोनचार वर्षापूर्वीपर्यंत आठवण म्हणून जपून ठेवली होती. गोडेतेल कॅनमध्ये, खोबरेल तेल बीटको दंत मंजनच्या काचेच्या बॉटलमध्ये आणायच्या. किराणा माल हे कागदाच्या पाकिटामध्ये भरून मिळायचे. १९८५ शहरात जवळपास सगळ्या वस्तू प्लास्टिकमध्ये मिळू लागल्या होत्या. याच काळात गावामधील दुकानांचे चित्र कसे होते? दुकानात गोणपाटाच्या पोत्यामध्ये साखर, शेंगदाणे, रवा, पोहा, इत्यादी साहित्य मांडलेली असायची.

मुलांचे खाऊ म्हणून गोळ्या काचेच्या बरणीमध्ये असायच्या. सामान नेण्यासाठी येणारे प्रत्येकजण घरून पिशवी, बाटली, कॅन असे आवश्यक किरणाप्रमाणे साहित्य सोबत घेऊन यायचे. दुकानात तराजूच्या जवळपास दोरींची गुंडाळी लटकविलेली असायची. कागदाच्या पुड्या सुटू नये म्हणून त्यावरून ही दोरी गुंडाळली जायची. हा सर्व माल घरी आणल्यानंतर एक एक पुढी घेऊन आतमध्ये काय आहे हे ओळखण्याचा एक क्विझ सुरु व्हायचा. आई एका एका पुडीची दोरी बोटांना गुंडाळून पुढी उघडून आमचा अंदाज खरे खोटे चुकला का बरोबर सांगायची. तो कागद आणि दोरी दोन्ही पुन्हा वापरात यायच्या.

२३ जून २०१८ पासून महाराष्ट्रात एकवेळ वापर(single use) असलेल्या प्लास्टिकवर बंदी लागू झाली. भारतात महाराष्ट्रापूर्वी १७ राज्यांमध्ये अंशतः किंवा पूर्णतः प्लास्टिक बंदी होती. महाराष्ट्र हे १८ व्या क्रमांकाचे राज्य ठरले. महाराष्ट्रात बंदी करण्यापूर्वी शासनाच्या एका अभ्यासमंडळाने प्लास्टिक बंदी असलेल्या चार राज्यांना भेटून त्यांचा अभ्यास केला. प्लास्टिक बंदीसाठी कोणकोणती उपाययोजना केली आहेत? लोकं बंदी पाळतात का? नियम न पाळणार्‍या नागरिकांना कोणत्या स्वरूपाचा दंड आकारला जातो याचा अभ्यास करून या मंडळाने महाराष्ट्राच्या बंदीची नियमावली बनविली होती. २३ जून ते ३१ ऑगस्ट २०१८ या कालावधीमध्ये एकट्या मुंबई महानगरपालिकेने प्लास्टिक बंदीच्याविरोधी केलेल्या कारवाईमध्ये एकूण १७०८४ किलो इतके प्लास्टिक जप्त केले. प्लास्टिक बाळगणार्‍यांकडून गोळा केलेली एकूण रक्कम ९७ लाख ७५ हजार इतकी आहे.

बाहेरच्या राज्यांत जाऊन अभ्यास मंडळाने काय अभ्यास केला माहिती नाही. या मंडळाने महाराष्ट्रातील लोक जीवन, प्लास्टिक पूर्वी वापरत असलेले पर्याय, त्यांची सध्याची स्थिती यांचा थोडा अभ्यास करायला हवा होतं. कारण प्लास्टिकलेट पेक्षा पानांची पत्रावळी दुपटीने महाग कशी? प्लास्टिकच्या प्लेट्सची किंमत इतकी कमी कशी? यामध्ये शासनाची भूमिका काही आहे का? या बाबींची या अभ्यास मंडळांनी दखल घायला हवी होती. जूट, कापड, बांबू, सुपारीचे पाने, केळी पाने, मोहाची पाने, पळसाची पाने, लोखंड व स्टीलची भांडी, कागद-पुठे या गोष्टींकडे पर्याय म्हणून पाहणे, त्यामध्ये गुंतवणूक करणे, यातून नागरिकांना शाश्वत गोष्टी वापरण्याची प्रेरणा मिळू शकते व ते वापरणे शक्य होऊ शकते. निव्वळ मोठ मोठे दंड आकारून, कायदे करून शाश्वत जीवनशैली लोकांच्या गळी उतरवू शकत नाही.

बसवंत विठाबाई बाबाराव
(लेखक पर्यावरण शिक्षण विषयाचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -