घरफिचर्सव्यक्तिगत मैत्री आजही अबाधित

व्यक्तिगत मैत्री आजही अबाधित

Subscribe

तो काळ सन 1989 – 90 चा असावा, त्यावेळी मी डोंबिवलीत राहायचो आणि काँग्रेसच्या एनएसयूआय विद्यार्थी संघटनेचे डोंबिवलीचे काम पाहायचो. तर जितेंद्र आव्हाड हे एनएसयूआयचे ठाण्याचे काम पहायचे. त्यावेळी कॉलेजमधील विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांमध्ये आम्ही दोघेही सक्रिय असायचो. कारण विद्यापीठावर संघटनेचा झेंडा फडकवण्यासाठी अधिकाधिक यु. आर. आम्हाला जमा करायला लागायचे. कॉलेजमधील या निवडणुकांच्या निमित्तानेच माझी व जितेंद्र आव्हाड यांची पहिली ओळख झाली.

त्यानंतर 1992 साली मी डोंबिवलीतून ठाण्यात राहायला आलो. त्यावेळी माझे पाचपाखाडी येथील ओपन हाऊस शेजारी ऑफिस होते. जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान आणि मी असे तिघे मित्र आम्ही आज ऑफिसमध्ये गप्पांचे फड रंगवायचो. जितेंद्र आव्हाड यांना त्यावेळीही राष्ट्रीय आणि राज्यातील राजकारणात अधिक स्वारस्य असायचे. तर मनोज प्रधान आणि मी ठाण्यातील राजकारणावर चर्चा करायचो.

- Advertisement -

राष्ट्रीय नेत्यांबाबत तसेच राज्यातील बड्या नेत्यांबाबत जितेंद्र आव्हाड यांना त्यावेळीही आकर्षण होते. अर्थात जितेंद्र आव्हाड यांचे आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब हेच प्रमुख आदर्श होते. त्यावेळी जनसंपर्काची माध्यमे एवढी मजबूत आणि विस्तारलेली नव्हती. त्यामुळे बर्‍याच वेळा जितेंद्र आव्हाड आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांना पत्रे लिहून आपली भावना व्यक्त करायचे. त्यावेळी ते कोरस कंपनीत नोकरीला होते. त्यामुळे आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. मात्र तरीही ते कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करायचे. हळूहळू त्यांनी पाचपाखाडी मध्ये नरवीर तानाजी मंडळाची स्थापना केली आणि गणपती उत्सव तसेच दहीहंडी उत्सव जोमाने सुरू केला. जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष पद मिळावे यासाठी आम्ही म्हणजे मी आणि मनोज प्रधान यांनी जोरदार लॉबिंग केले होते. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तसेच त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आम्ही त्यावेळी कोरस कंपनीतील एसटीडी फोनचा उपयोग करायचो.

जितेंद्र आव्हाड यांना शरद पवार साहेबांविषयी प्रचंड आकर्षण होते. त्यामुळे पवारसाहेब मुंबई बाहेरील कार्यक्रमासाठी जेव्हाही मुंबई बाहेर पडत तेव्हा ठाण्याच्या नाक्यावर अगदी पहाटे सहा वाजता देखील जितेंद्र आव्हाड हे एकटे पवार साहेबांच्या स्वागताला उपस्थित असायचे. पवार साहेबांवरही त्यांचे सुरुवातीपासून अत्यंत निस्सीम प्रेम होते.

- Advertisement -

मध्यंतरीच्या काळात कोणत्यातरी निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार यांचा दोन महिन्यांचा महाराष्ट्र दौरा होता. त्यावेळी पवार साहेब हे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होते आणि त्यांच्या या दौर्‍याच्या नियोजनाची जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीवर होती. या दोन महिन्यांच्या दौर्‍यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना पवार साहेबांचा कार्यकर्ता तसेच पी ए म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि या दोन महिन्यांच्या पवार साहेबांच्या सानिध्यातील संधीचे जितेंद्र आव्हाड यांनी सोने केले.

त्यानंतर 1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये जाण्यास ठाण्यात फारसे कोणी इच्छुक नव्हते. मात्र, जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून मी मनोज प्रधान तसेच दुधावडे असे तीन नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करते झालो. ठाण्यातील बाकीची मंडळी ही त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आली.

हळूहळू बडे नेते राष्ट्रवादीत आल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी मजबूत झाली. आणि त्यानंतरचे राजकारण हे सर्वांनाच ज्ञात आहे. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी आम्ही कौटुंबिक आणि व्यक्तिगत संबंधांमध्ये कधीही कटुता येऊ दिली नाही. याचे बरेचसे श्रेय जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक आणि मनोज प्रधान यांच्या सौभाग्यवतींना जाते. माझ्या दोन्ही मुलांच्या विवाह सोहळ्यात जितेंद्र आव्हाड आनंदाने सहभागी झाले होते. तर जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशाही मला माझ्या चिरंजीवांइतकीच प्रिय आहे.

मध्यंतरी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती अस्वस्थ होती. कोरोनाच्या काळात त्यांनी प्रचंड मदतकार्य केले. मात्र, स्वतःची पुरेशी काळजी न घेतल्यामुळे त्यांना त्रास झाला. त्यावेळी मी रोज सकाळ-संध्याकाळी फोर्टिस हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल पंडित यांच्या सतत संपर्कात राहून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत असे.
राजकारणात मतमतांतरे होत असतात. मात्र, अशा मतमतांतराचा कोणताही परिणाम आमच्यातील व्यक्तिगत आणि कौटुंबिक संबंधांवर कधी झाला नाही. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना माझे एकच सांगणे आहे की त्यांनी स्वतःच्या प्रकृतीची अधिक काळजी घ्यावी.

आव्हाड साब आप जिओ हजारो साल…..
…साल के दिन हो पचास हजार.. !

-प्रताप सरनाईक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -