घरफिचर्सतत्त्वज्ञानी, न्यायदात्या अहिल्यादेवी होळकर

तत्त्वज्ञानी, न्यायदात्या अहिल्यादेवी होळकर

Subscribe

अहिल्यादेवी होळकर यांनी जनतेच्या, रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्यादेवींच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्यादेवींनी दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणार्‍यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला. शेतकरी सुखी तर जग सुखी या संकल्पनेतून शेतकर्‍यांना जाचक करातून मुक्त केले. अनेक ठिकाणी तलाव व विहिरी बांधल्या. शेतकर्‍यांना गोपालनाचे महत्त्व पटवून प्रजेला गाई देऊन मोठ्या प्रमाणात गोपालन घडवून आणले.

इंग्रजी लेखक लॉटेन्स यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली. अहिल्यादेवींचे कार्यकर्तृत्व असेच होते. त्या तत्त्वज्ञानी होत्या. न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. देशात-परदेशात त्यांच्या कार्याचे कौतुक झाले.

अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गाव होते. त्यांच्या मामांचे आडनाव मैंदाड होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते.

- Advertisement -

बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.

मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ.स. १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.
एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या “कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट” म्हटले आहे. इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे. इ.स. १७२५ – इ.स. १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ – इ.स. १७९५ ही भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या ‘तत्त्वज्ञानी राणी’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेले होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.

- Advertisement -

अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.
राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने उद्ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्याबाईंना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती. इ.स. १७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते. “चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करू शकता. तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा…..कूच करताना, मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा.”
पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्यादेवींनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्यादेवी सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपर्‍यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत, असे म्हणतात.

पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला, त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्यादेवींनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गार्‍हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्यादेवींनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदू मंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली. माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या. भारतीय संस्कृती कोशात अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे-काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे. अहिल्यादेवींस, सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ठ्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता, असे दिसते.

अहिल्यादेवींनी जनतेच्या, रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्यादेवींच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्यादेवींनी दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणार्‍यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला.

अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ, इंदूर येथील विश्वविद्यालयास त्यांचे नाव दिले आहे. तसेच त्यांचे नावाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे एक विद्यापीठ सोलापूरला आहे.अहिल्यादेवी होळकर या एक खरोखरीच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या. सन १७७२ मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ब्रिटिशांबरोबर हातमिळवणी करण्याबाबत एक ताकीद दिली होती. त्यांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्याजोगे असल्याचे त्यांनी नोंदले आहे : वाघासारखे इतर प्राणी हे शक्ती वा युक्तीने मारले जाऊ शकतात, परंतु अस्वल मारणे हे कठीण असते. सरळ त्याच्या चेहर्‍यावर वार केल्यासच ते मरते. एकदा त्याच्या मजबूत पकडीत सापडल्यावर ते त्याच्या शिकारीस, गुदगुल्या करून ठार मारते. असाच इंग्रजांचा मार्ग आहे. हे बघता, त्यांच्यावर मात करणे कठीण आहे.

अहिल्यादेवी यांनी त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्वांस चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिले. व्यापार्‍यांनी चांगल्या कपड्यांचे उत्पादन केले, व्यापार वाढला, शेतकरी हे शांततेत व दबावरहित होते. कोणतेही प्रकरण राणीच्या निदर्शनास आले की ते कडकपणे हाताळले जाई. अहिल्यादेवीना आपल्या प्रजेचा उत्कर्ष आवडत असे. तसेच ती प्रजा राजा हिसकावून घेईल म्हणून आपली संपत्ती उघड करण्यास घाबरत नाही, हे बघणे आवडत असे. दूरदूरपर्यंत, रस्त्यांच्या कडेला, दाट छायादार वृक्ष लावण्यात आले होते, विहिरी केल्या होत्या, पथिकांसाठी विश्रांतीगृहे. गरीब, घर नसलेले व अनाथ या सर्वांना त्यांच्या जरुरीनुसार, सर्व मिळत होते. बहुत काळापासून, भिल्ल लोक पहाडांतून सामानाची नेआण करत असताना लूटमार करीत असत. अहिल्याबाईंनी भिल्ल लोकांना त्यापासून मुक्ती मिळवून दिली व प्रामाणिकपणे शेती करण्याची संधी त्यांना देऊ केली. सर्व समाजाला अहिल्यादेवी आवडत असत आणि तो त्यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करी. त्यांच्या कन्येने तिचा पती, यशवंतराव फानसे यांच्या मृत्यूनंतर सती जाणे हे अहिल्यादेवींच्या आयुष्यातले शेवटचे सर्वात मोठे दुःख होते.

भारत स्वतंत्र झाल्यावरही पुढील अनेक वर्षे शेजारील भोपाळ, जबलपूर किंवा ग्वाल्हेर या शहरांपेक्षा इंदूर सर्व बाबतीत प्रगतिशील राहिले. याच्या मागे अहिल्यादेवीची दूरदृष्टी होती. अहिल्यादेवींच्या सन्मानाप्रीत्यर्थ व स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने २५ ऑगस्ट १९९६ या दिवशी एक टपाल तिकिट जारी केले. या अशा शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव “देवी अहिल्याबाई विमानतळ” असे ठेवण्यात आले आहे, आणि इंदूर विद्यापीठास “देवी अहिल्या विश्वविद्यालय” असे नाव देण्यात आले आहे”. महाराष्ट्रातील सोलापूर विद्यापीठाचे नवीन नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ आहे.

तत्त्वज्ञानी, न्यायदात्या अहिल्यादेवी होळकर
Sanjay Mahadikhttps://www.mymahanagar.com/author/sanjay-mahadik/
गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. प्रिंट, टीव्ही, डिजिटल मीडियाचा अनुभव. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -