घरफिचर्सनवजागरणाचे अग्रदूत

नवजागरणाचे अग्रदूत

Subscribe
आधुनिक भारताचे महान तत्ववेत्ता तसेच तरुणांचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद यांचा आज स्मृतिदिन. १२ जानेवारी १८६३ मध्ये कोलकातामधील एका कायस्थ कुटुंबात विवेकानंदांचा जन्म झाला. लहानपणी ते नरेंद्रनाथ दत्त या नावाने ओळखले जात. स्वामी विवेकानंदांचे वडील विश्वनाथ दत्त कोलकातामधील उच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील होते. विश्वनाथ दत्तांवर पाश्चात्त्य संस्कृतीचा पगडा होता. त्यामुळेच पुत्र नरेंद्रनाथला (विवेकानंदांना) इंग्रजी भाषेतून शिक्षण देत पाश्चात्य संस्कृतीवर मार्गक्रमण करावा अशी त्यांची इच्छा होती. मात्र विवेकानंदांची आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक विचारांच्या होत्या.
लहानपणापासूनच नरेंद्रनाथांची बुद्धी तल्लख होती. लहान नरेंद्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात विवेकानंदांनी विशेष आवड दाखवली. त्यांना शास्त्रीय संगीताचीदेखील जाण होती आणि त्यांनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये विवेकानंद लहानपणापासून भाग घेत असत. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्यांनी लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इत्यादी छंद होते.
१६ व्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी कोलकातामधून एन्ट्रन्स परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे कलकत्ता विश्वविद्यालयातून ते पदवीधर झाले. १८८१ मध्ये नरेंद्रनाथांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. यावर्षी स्वामी रामकृष्ण परमहंसांशी त्यांची भेट झाली. रामकृष्णांच्या आंतरिक, आध्यात्मिक, आश्चर्यकारक शक्तींनी नरेंद्रनाथ प्रभावित होऊन ते त्यांचे प्रमुख शिष्य बनले. रामकृष्णांचे विचार जगभर पोहोचविण्यासाठी विवेकानंदांनी आजीवन प्रयत्न केले. १ मे १८९७ मध्ये कोलकातामध्ये स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन आणि ९ डिसेंबर १८९८ मध्ये कोलकाताजवळ गंगा नदी किनारी बेलूर या ठिकाणी रामकृष्ण मठाची स्थापना केली. ज्यावेळी जग भारताला कमी लेखत होता अशा वेळी ११ सप्टेंबर १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागोमध्ये आयोजित विश्व धर्म संमेलनात “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो” अशी भाषणास सुरुवात केली. यावेळी सभेसाठी जमलेल्या सुमारे सात हजार लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विवेकानंदांच्या भाषणाला दाद दिली.
विवेकानंदांच्या वक्तृत्वाने अमेरिकेतील वृत्तपत्रेही प्रभावित झाली. त्यांनीसुद्धा विवेकानंदांच्या वक्तृत्वकलेची प्रशंसा केली. यामध्ये अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क क्रिटिक’ने विवेकानंदांबद्दल लिहिले की “ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीरगंभीर उद्गार देखील त्यांच्या भगव्या वस्त्रात शोभून दिसणार्‍या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत.” तर न्यूयॉर्क हेराल्डने सुद्धा विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाची स्तुती केली. त्यांनी लिहिले की, ‘‘धर्म परिषदेत विवेकानंद सर्वात महान व्यक्ती असण्यात कोणताही संशय नाही. त्यांना ऐकून असे वाटते की, भारतासारख्या बुद्धिमान देशात इसाई धर्माच्या प्रचारासाठी प्रचारक पाठवणे किती मूर्खपणा आहे.’’ अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये विवेकानंदांनी वेदांत आणि योग या विषयावर जाहीर तसेच खासगी व्याख्याने दिली. त्याचप्रमाणे या देशांमध्ये त्यांनी वेदांत सोसायटीचीदेखील स्थापना केली.
तरुणांचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंदांनी तरुणांना आवाहन करताना म्हटले की, ‘‘उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.’’ भारतीय संस्कृतीच्या प्रसारासाठी विवेकानंदांनी जगभर भ्रमंती केली. भारतीय तरुणांमध्ये आत्मसन्मान जागृत करत त्यांच्यामध्ये आशेचा एक नवीन किरण निर्माण करण्याचे कार्य विवेकानंदांनी केले. भारतीय नवजागरणाचे अग्रदूत स्वामी विवेकानंदांचे जीवन आणि विचारांपासून भारतीय तरुणांनी प्रेरणा घेणे गरजेचे आहे. १९८४ पासून १२ जानेवारी हा विवेकानंदांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. ४ जुलै १९०२ रोजी बेलूरच्या रामकृष्ण मठात ध्यानमग्न अवस्थेमध्ये विवेकानंदांनी आपल्या प्राणाचा त्याग केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -