घरफिचर्सनिवृत्तीनंतरच्या ठोस नियोजनासाठी...

निवृत्तीनंतरच्या ठोस नियोजनासाठी…

Subscribe

सर्वसामान्यपणे निवृत्तीनंतरचा काळ सुखाचा जावा यासाठी तरुणपणापासूनच तरतूद करण्यास सुरुवात केली जाते. तरच हवी तेवढी रक्कम जमा होऊ शकते. भारतीयांच्या दृष्टीनं निवृत्तीसाठी किती बचत आवश्यक असेल त्याचं गणित मांडणं महत्त्वाचं ठरतं. ही रक्कम काढणं आणि आयुष्याच्या विविध टप्प्यांवरचा बचतीचा आदर्श आकडा काढणंही महत्वाचं ठरतं. यासाठी नेमकं कसं नियोजन करावं याविषयी.

सर्वसामान्यपणे २५ ते ५० ही भरपूर पैसा कमावण्याची वर्षं मानली जातात. या काळात घर, कार, मुलांचं शिक्षण यावर जास्त खर्च केले जातात. त्यानंतर निवृत्तीचे वेध लागतात. मात्र तेव्हा निवृत्तीसाठीची तरतूद करणं फारच चुकीचं ठरतं. कारण त्यावेळी पाच-सहा वर्षांमध्ये पुरेशा प्रमाणात बचत होऊ शकत नाही आणि गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्यासाठीही हा काळ पुरेसा नसतो. म्हणूनच नोकरी लागल्यापासूनच निवृत्तीसाठी तरतूद करण्यास सुरुवात करावी आणि हा निधी वेगळाच ठेवला जावा असं तज्ज्ञ सुचवतात. अमेरिकेतील ‘फिनान्शियल पोर्टल’नं तर सुचवलं आहे की, वयाच्या ३५ व्या वर्षी जेवढं वार्षिक उत्पन्न असतं, त्याच्या दुप्पट तुमची बचत असली पाहिजे. अर्थातच याची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवण्यात आली, कारण यात काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष झालं आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, आपला खर्च आणि बचत याचं गणित जुळवण्यात आपण कमी पडलो तर एवढी बचत करणं ही खूपच आश्चर्यजनक बाब वाटू शकते. अमेरिका आणि भारतातील वातावरणातही फरक आहे. त्यामुळे आपण भारतीयांच्या दृष्टीनं निवृत्तीसाठी किती बचत आवश्यक असेल त्याचं गणित मांडणं महत्त्वाचं ठरतं. यासाठी निवृत्तीसाठीची अंतिम रक्कम काढणं आणि आयुष्याच्या विविध टप्प्यांवरचा बचतीचा आदर्श आकडा काढणं या दोन बाबी कराव्या लागतात. व्यक्तीच्या गरजा, विविध खर्च, उद्दिष्टंही विचारात घ्यावी लागतील. कारण निवृत्तीनंतरची उद्दिष्टंही व्यक्तीपरत्वे भिन्न असतात. उदाहरणार्थ, काहीजण शांतपणे आयुष्य व्यतीत करावं असं ठरवतात; तर काहीजण आंतरराष्ट्रीय प्रवासाचं किंवा भारतातील काही ठिकाणांना भेटी देण्याचं नियोजन करतात. म्हणूनच सर्वांसाठी एकच एक असा नियम लागू करता येत नाही, असं भारतीय वित्त तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

याखेरीज प्रत्येकाची आर्थिक शिस्तही वेगवेगळी असते. उदाहरणार्थ, २५ वर्षांची व्यक्ती आपल्या पहिल्या नोकरीपासूनच उत्पन्नातील पाच टक्के वाटा निवृत्तीनंतरची तजवीज करण्यासाठी ठेवू शकते. उत्पन्नात वाढ झाल्यावरही ती आपल्या उत्पन्नाच्या पाच टक्केच रक्कम निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी ठेवू शकते. मात्र एवढं केलं तरीही दर वेळी आधीच्या रकमेत पुढील बचतीची रक्कम मिसळली जाऊन एकूण रकमेत वाढ होत जाणार असल्यानं निवृत्तीपर्यंत मोठी रक्कम जमा होऊ शकते. मात्र एखाद्या व्यक्तीनं चाळिशीपर्यंत निवृत्तीचा विचारच केलेला नसेल किंवा घरच्या जबाबदाऱ्यांमुळे करू शकला नसेल तर त्याने चाळिशीत आक्रमकपणे बचत सुरू केली पाहिजे. म्हणजेच मोठ्या प्रमाणात बचतीला प्राधान्य दिलं पाहिजे.

- Advertisement -

सर्वसामान्यपणे १९८० नंतर जन्मलेल्या पिढीतील लोकांमध्ये बचतीपेक्षा वायफळ खर्च अधिक करण्याची प्रवृत्ती दिसत असल्याचं जाणकारांचं मत आहे. त्यांची जीवनशैली महागडी असते. महागडी गॅजेट्स, बाहेर खाणं, भाडं, शैक्षणिक कर्जाचे हप्ते आणि ऐष आरामी जगणं अशी त्यांची जीवनशैली असते. निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी पैसा साठवण्याचा विचार त्यांच्या मनात सहसा येत नाही. अगदी सूज्ञ लोकही निवृत्तीचं वय खूप लांब आहे, असं मानून तत्कालीन गरजांवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करताना दिसतात. घर, कार आणि लग्नावर ते मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी त्यांच्याकडेही फारशी बचत नसते. म्हणून व्यवहार्य विचार करायचा झाला तर अमूक वयाच्या दुप्पट किंवा तिप्पट असा विचार न करता आपल्या वेतनाचा ठरावीक भाग निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी बाजूला ठेवलाच पाहिजे आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत हात लावता कामा नये. यासाठी वेतनाच्या किमान पाच टक्के बचत करणं ही बाब सहजशक्य असते आणि त्यामुळे कर्जाच्या हप्त्यांचा ताणही जाणवत नाही. याखेरीज तुमची बचत किती काळापर्यंत गुंतवणुकीत राहते त्यालाही महत्त्व असतं. म्हणूनच अल्प का असेना सुरुवातीपासून केलेली बचत निवृत्तीच्या वयापर्यंत मोठी रक्कम मिळवून देते.

मध्यमवयात जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे अर्थकारणावर मोठा ताण येतो. ३५ ते ४५ या वयोगटातील लोकांना पिअर प्रेशर म्हणजेच आपल्या सभोवतालच्या लोकांच्या गटाच्या दबावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे या गटातील लोकांची जीवनशैली ऐष आरामी असेल तर किमान त्यांच्या जवळपास जाणारी जीवनशैली त्यांना ठेवावी लागते, असं म्हटलं जातं. अर्थातच याला अपवाद असतात; परंतु बहुतेक लोक या पिअर प्रेशरला बळी पडतात. शिवाय तत्कालीन गरजांमुळेही निवृत्तीसाठीची बचत मागे ढकलली जाते. ३५ च्या आसपास वय असलेल्यांनी आपल्या वेतनाच्या १० टक्के रक्कम बाजूला ठेवावी. मात्र, चाळिशीनंतर ही बचत करणार असाल तर एकूण उत्पन्नातील ३५ ते ४० टक्के वाटा निवृत्तीसाठी ठेवावा लागेल, तरच निवृत्तीनंतरही नियमित जीवनशैलीत जगता येईल. अगदी पंचविशीत वेतनाच्या पाच टक्क्यांपासून बचतीला सुरुवात केली असेल तरी पस्तिशीत ती १० टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. ५० व्या वर्षांपर्यंत या बचतीची पातळी एवढीच राखावी. यात प्रॉव्हिडंट फंडात मालकाकडून आणि कर्मचाऱ्याकडून साठवल्या जाणाऱ्या रकमेचा समावेश होत नाही, ही बाब जरूर लक्षात ठेवावी.

- Advertisement -

खरं तर इन्क्रिमेंट मिळत असतात, बोनस मिळत असतो. तरीही निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी फक्त १० टक्के बचत सुचवली जाते, याचं कारण जीवनशैलीशी निगडीत आहे. घराचा-कारचा हप्ता, मुलांच्या फी, मुलांचं अतिमहागडं शिक्षण, महागड्या हॉटेलांमध्ये जेवणं आणि पर्यटन या गोष्टी अलीकडच्या काळात सर्वसामान्य बनल्या आहेत. त्यामुळे नियमितपणे याहून अधिक बचत करणं सगळ्यांनाच शक्य होत नाही. याखेरीज कर आणि आरोग्य विमा वगैरेंसारखे हप्तेही भरावे लागतात आणि पालकांसाठी करावा लागणारा वैद्यकीय खर्चही असतो. वेतनाच्या ३० टक्के रकमेची एकूण बचत करणं शक्य आहे असं गृहीत धरलं तरी वर दिलेल्या हप्त्यांच्या खर्चांपोटी यातील बराचसा भाग खर्च झालेला असतो. म्हणूनच २५ ते ४५ दरम्यानच्या वयामध्ये निवृत्तीनंतरच्या काळासाठी १० टक्क्यांहून अधिक रक्कम गुंतवणं थोडं अवघड जातं. परंतु यात थोडीफार तारेवरची कसरत करावी लागली तरी भविष्यकाळाचा विचार करता एवढी रक्कम तरी गुंतवणं आवश्यक असतं.


महेश देशपांडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -