घरफिचर्सआधुनिक भारताचे न्यूटन!

आधुनिक भारताचे न्यूटन!

Subscribe

पोलखोल

जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही प्रधान देशाचे म्हणजे स्वतंत्र भारताचे करते सवरते प्रधानसेवक श्रीमान नरेंद्र दामोदरदास मोदी आता नव्या भूमिकेत अवतरले आहेत. त्यांना आता देशाचे आधुनिक न्यूटनमोदी असं हवं तर संबोधूया. असे काही शोध ते वयाच्या अडसष्टीत लावतात की आजवरचे सगळ्याच शास्त्रज्ञांनी त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायला हरकत नाही. जे या दुनियेत नाहीत ते शास्त्रज्ञ स्वर्गातून आपल्या या आधुनिक नव्या शास्त्रज्ञापुढे हात जोडत असावेत. नवे शास्त्रज्ञ इतके वाक्बगार आहेत की आपण कसलंही संशोधन केलं आणि ते गैर असलं तरी भक्तांचा गट त्यांना खोटं पडू देत नाहीत. भक्तांवर त्यांची पुरती खात्री आहे, देशाचे प्रधानसेवक म्हणजे आता चौकीदार झाल्यापासून जे काही म्हणतील ते उचलून धरण्याचा प्रामाणिकपणा त्यांच्या भक्तांनी प्रामाणिकपणे दाखवला आहे. म्हणूनच त्यांचा धीर चेपला आहे. यातूनच हरएक गोष्ट ते खुलेआम जगाच्या माथी मारत आहेत. आता तर ते इंटरनेट आणि रडार यंत्रणेच्या संशोधनाचे बादशहा बनले आहेत. कधी ते क्रांतीकारक भगत सिंग, बटुकेश्वर दत्त यांचा तुरुंगातल्या भेटीचा शोध लावतात तर कधी त्यांना राजीव गांधींच्या चोरीची आठवण येते. आता तर त्यांनी जेव्हा जगात अस्तित्वात नव्हता तेव्हा इंटरनेटचा आणि डिजिटल कॅमेराचा वापर केल्याचा हवाला देऊन टाकला आहे. 1988मध्ये त्यांनी म्हणे डिजिटल कॅमेर्‍याने काढलेले फोटो इंटरनेटद्वारे लालकृष्ण अडवाणींना पाठवले होते.

ज्या रडार यंत्रणेसंबंधी आपल्या न्यूटनने तारे तोडले त्या रडारविषयी त्यांचं आकलन दहावी शिकलेल्या विद्यार्थ्यालाही नसेल इतकं मोघम आहे, याची जाणीव या निमित्ताने जगाला झाली. अवकाशात वावरणार्‍या जलदगतीच्या वायूयान, जलयानासारख्या वस्तूंच्या सुक्ष्म लहरींचा शोध घेणार्‍या या यंत्रणेचा वापर ढगातून बचाव करण्यासाठी आमच्या न्यूटनने लावला आहे. रडारमधून निघणार्‍या सुक्ष्म लहरी आधुनिक न्यूटनने ढगात अंतर्धान करून टाकल्या. अमेरिकेच्या नौदलाने या यंत्रणेचा शोध 1940मध्ये लावला. रेडिओ डिटेक्शन अ‍ॅण्ड रेंजिंग या नावाने ही यंत्रणा कार्यान्वित झाली. रडार यंत्रणेचा उगम हाही एका लढाईचा परिपाक होय. दुसर्‍या महायुध्दात जर्मनी विमानांच्या आणि जहाजांच्या ताफ्यातून बचाव करण्यासाठी ब्रिटिशांनी ही यंत्रणा सर्वाधिकअवगत करून घेतली. क्रिस्तिआन हुल्समेअरने या संशोधकाने ही यंत्रणा 18 मे 1904 मध्ये प्रथम सादर केली. तिला टेली मोबिलोस्कोप असं पहिलं नाव दिलं. दुर्दैवाने हुल्समेअरला पुढे प्रायोजक मिळाला नाही, यामुळे या यंत्रणेला त्याचं नाव मिळू शकलं नाही. पुढे रॉबर्ट वॉट्सन वॅट यांनी यात अधिकची प्रगती गाठली. आणि परावर्तीत लहरी या कॅथॉड रेट्यूबचा वापर करत त्याने यंत्रणेतून बाहेर पडणारे संदेश पटलावर दृष्य स्वरुपात दिसू लागले. आपलं स्वत:चं संशोधन नाही, हे लक्षात घेऊन वॉटसन यांनी हुल्समेअरने ठेवलेलं रडार हे नाव तसंच ठेवलं. इतकी मोठी माणसं या संशोधनात पुढे आली. पाऊस असो की वादळवारा अशा कठीण समयी ही यंत्रणा अतिजलद अशा विमानांचा शोध घेत त्यांना मार्गस्थ करण्याचं काम करतं. दाट धुक्यात मार्ग देण्याचं महत्कार्य ही यंत्रणा देत असते. अन्यथा प्रचंड पाऊस आणि धुक्यात सारी यंत्रणाच ठप्प झाली असती, आमच्या न्यूटनना त्याची काय कल्पना? त्यांनी अतिवेगाने शोध घेतला आणि रडारपासून वाचवण्याचा शोध जाहीर करून टाकला.

- Advertisement -

एक खोटं पचलं की अनेक खोट्या गोष्टी पचवायला फार वेळ लागत नाही. रडार यंत्रणेला आपल्या गतीत चालवण्याच्या आधुनिक न्यूटनच्या हो ला मनीष अवस्थींनी हो दिल्यावर हे न्यूटन अधिकच बेफाम झाले आणि त्यांनी आणखी एक शोध याच मुलाखतीत लावला तो म्हणजे इंटरनेट आणि डिजिटल कॅमेर्‍याचा. ज्या काळात आधुनिक न्यूटनने डिजिटल कॅमेर्‍याचा वापर केला तो काळ साधारण 1988चा. या काळात निकॉन कंपनीने डिजिटल कॅमेरा अस्तित्वात आणला होता. तेव्हा त्याची अमेरिकेतील किंमत सुमारे 40 हजार इतकी असावी. तो काळ आमच्या न्यूटनच्या संघ प्रचाराचा. हाच धागा पकडून अवस्थींनी न्यूटनना मनीपॉकेट कोणता वापरता, असा सवाल केला तेव्हा त्याच उत्तरात त्यांनी मी तर फाटका होतो. माझ्याकडे कुठे आलेत पैसे. तर मनीपॉकेट असेल? म्हणजे जेव्हा या कॅमेर्‍याची किंमत 40 हजारांहून अधिक होती तेव्हा न्यूटन मोदींकडे पैसेच नसायचे. प्रचारक म्हणून कार्यकर्त्यांकडेच त्यांची गुजरात असायची. अशावेळी त्यांनी इतके पैसे आणले कुठून? असा प्रश्न त्यांना कोणी विचारू नये. तो मनिष अवस्थींनीही विचारला नाही. याच मुलाखतीत अवस्थींनी न्यूटनमोदींना कविता करण्याची आवड असल्याचा प्रश्न केला. तेव्हाही खोट्याचं खरं करून मोदींनी कमालच करून टाकली. मोदींच्या हातात असलेली कविता संगणकावर टाईप केलेली होती. या कवितेवरून जो प्रश्न विचारायचा तो न्यूटनमोदींच्या हातातल्या या छापील कवितेवरही जसाच्या तसा पाहायला मिळाला. सारं कसं अजबच होतं.

पण माझ्यापुढे प्रश्न आहे तो देशातल्या तमाम वैज्ञानिकांचा. देशात सुरू असलेल्या लोकसभेच्या प्रचारादरम्यान होत असलेल्या खोट्या प्रचाराला कोणी आक्षेप घेतला की त्याला सोलून काढणारी जमात सुध्दा न्यूटनमोदींच्या बचावासाठी तैनात आहे. देशातल्या जाणकार कलाकारांनी देशात अहिष्णूतेच्या वाढत्या वातावरणाचा जाब सत्ताधार्‍यांना विचारला तेव्हा त्याहून अधिक संख्येतल्या न्यूटन भक्तांनी या कलाकारांचं म्हणणं खोडून काढलं. यात अनुपम खेर, परेश रावल, विवेक ऑबेरॉय असल्या लाचार मंडळींचा समावेश होता, हे सांगायची आवश्यकता नाही. पुढे सैन्यातल्या माजी अधिकारी कर्मचार्‍यांनी न्यूटनमोदींकडून सैन्य दलाचा घेत असलेल्या गैरफायद्यावर आक्षेप नोंदवला तेव्हा आणखी लाचार सैनिक न्यूटनच्या संरक्षणार्थ पुढे आले. सुदैवाने या आधुनिक न्यूटनच्या मदतीला खरे वैज्ञानिक धावले नाहीत. हे भारतातल्या तमाम तरुण वैज्ञानिकांचं नशिबच म्हटलं पाहिजे. नाहीतरी असे वैज्ञानिक उभे करायला भाजप मागेपुढे पाहणार नाही. भाजपच्या आयटीसेलमध्ये काय चालतं, याचा उलगडा नुकताच राजस्थानमधील महादेव नावाच्या या सेलमधून बाहेर पडलेल्या कलाकाराने करून दिला होता. प्रसंगी कोणाला मुस्लीम बनवायचं आणि कोणाला हिंदू, कोणाला सैनिक बनवायचं आणि कोणाला सैनिक अधिकारी. हा खेळ खेळण्यात भाजपच्या आयटीसेलचा हात कोणी धरू शकणार नाही. किमान या सेलचे म्होरके या निमित्ताने वैज्ञानिक झाले नाहीत, याचंच नवल वाटतं.

- Advertisement -

या आधुनिक न्यूटनला सल्ले तरी कोण देतं, हाच सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. आजवरच्या घटना या देशातल्या सामान्य घटनांशी संबंधित होत्या. पण रडार आणि इंटरनेट व्यवस्थेबाबत आधुनिक न्यूटनने तोंड उघडल्याने सार्‍या जगात भारताची छी थू झाली. हा प्रकार कोण्या येर्‍यागेर्‍याने केला असता तर एकवेळ वेळ मारून नेता आली असती. कोण्या वर्तमानपत्रात ते छापून आलं असतं तरी ‘माझ्या तोंडी घातलं’ म्हणून खोटं बोलता आलं असतं. पण वाहिनीच्या मुलाखतीतच हे सगळं न्यूटन ओकल्याने ‘माझ्या तोंडी घातलं’, असं आधुनिक न्यूटन सांगू शकत नाहीत. असले तारे तोडण्याचा हा काही पहिला प्रकार नाही. याआधीही त्यांनी गटारात गॅसचा पाईप टाकण्याचा प्रताप लोकांना ऐकवला होता. तेव्हा या न्यूटनला खूप कोणी गांभीर्याने घेऊ नये, अन्यथा होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही.

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -