घरफिचर्सअबोल घुंगरांच्या वेदनेची गाथा

अबोल घुंगरांच्या वेदनेची गाथा

Subscribe

महादेव गोरख कांबळे यांचा ‘वेदनांकित घुंगरांचे संदर्भ’ हा दीर्घकवितेचा संग्रह महत्त्वाचा वाटतो. विठाबाई नारायणगावकर या तमाशा कलावंतिणीच्या असीम दु:खाची अबोल गाथा यातून उजागर झाली आहे. जात-वर्गाच्या चौकटीने केलेले शोषण आणि बाई म्हणून वाट्याला आलेली वेदना अशा दुहेरी दु:खाची कहाणी समर्थपणे कांबळे यांनी शब्दात उतरवली आहे.

पुरुषी व्याकरणाने घडवलेल्या सनातन विषमतेने भारतीय स्त्रियांचे पराकोटीचे दमन केले. स्त्रियांकडे मालमत्ता आणि भोगवस्तू म्हणून बघण्याच्या भारतीय मनोवृत्तीने स्त्रियांचे माणूसपण नाकारले. या माणूसपणाच्या हक्कासाठी आधुनिक काळात सामाजिक चळवळी आकाराला आल्या. साहित्यातून स्त्रियांच्या दु:खाच्या कळा मांडल्या गेल्या. भारतीय राज्य घटनेने कायद्याच्या माध्यमातून संरक्षण दिले. त्यामुळे स्त्रियांभोवतीचे फास काहीसे सैल झाले. ती मुक्तीच्या दिशेने प्रवास करू लागली. परंतु पुरुषी मानसिकता मात्र जागतिकीकरणानंतरही बदलायला तयार नाही. वारंवार तिचं ‘मादी’ असणंच ठळक होतं आहे. या ‘मादी’पणातून भारतीय स्त्रियांच्या वेदनेला अनेकमिती प्राप्त झाल्या आहेत. भारतीय स्त्रियांचे ‘स्री’ म्हणून असणारे दु:ख एकरेषीय नाही. ‘बाई’ म्हणून वाट्याला येणारा भोगवटा समान असला; तरी जात, धर्म, वर्ग आणि व्यवसायागणिक भारतीय स्त्रियांच्या वेदनेची भाषा बदलताना दिसते. या भाषेला सामग्र्याने मराठी साहित्याने कवेत घेतलेले दिसत नाही. साठोत्तरी काळात उदयाला आलेल्या मराठी स्रीवादी साहित्य चळवळीने स्त्री प्रश्नांची चर्चा घडून आणली; परंतु त्यातूनही बहुजिनसी-बहुस्तरीय भारतीय स्त्रियांच्या दु:खाचे अंत:स्तर समग्रपणाने उलगडलेले नाहीत. कदाचित पाश्चात्य स्रीवादाच्या नजरेतून भारतीय स्त्रियांच्या प्रश्नांकडे पाहिले गेल्याने असे झाले असावे.

मराठी स्त्री लेखिकांनी जे स्त्री संवेदन व्यक्त केले आहे, त्यात भावनेचे ओथंबलेपणच अधिक दिसते.अर्थात व्यवस्थेला जाब विचारणारे, स्रीदु:खाचा सूक्ष्म आविष्कार करणारे आणि स्री-पुरुष भेदनीतीचा बुरखा फाडणारे अल्पसे लेखन मराठीतील स्री लेखिकांनी केलेले आहे; परंतु ते पुरेसे नाही. पुरुष लेखकांचे स्रीभानाचे लेखन तर अत्यल्प असेच आहे. मराठीतील विविध वाङ्मय प्रकारातील काही ठळक कलाकृती सोडल्या; तर पुरुष लेखकांच्या लेखनातून येणारी स्री ही पुरूषसत्ताक व्यवस्थेचा भाग म्हणूनच येताना दिसते. या पार्श्वभूमीवर महादेव गोरख कांबळे यांचा ‘वेदनांकित घुंगरांचे संदर्भ’ हा दीर्घकवितेचा संग्रह महत्त्वाचा वाटतो. विठाबाई नारायणगावकर या तमाशा कलावंतिणीच्या असीम दु:खाची अबोल गाथा यातून उजागर झाली आहे. जात-वर्गाच्या चौकटीने केलेले शोषण आणि बाई म्हणून वाट्याला आलेली वेदना अशा दुहेरी दु:खाची कहाणी समर्थपणे कांबळे यांनी साक्षात केली आहे. ‘विठाबाई : कारूण्याचे वन’ आणि ‘आता विठाबाई बोलू लागलीय…’ अशा दोन भागांत विभागलेली ही कविता स्रीच्या आदिम दु:खाचा शोध घेत तिच्या अस्तित्त्वाचे रूदन व्यक्त करते.

- Advertisement -

चोवीस कवितांच्या पहिल्या भागात कांबळे यांनी स्व-समूह नि विठाबाईशी संवाद साधत घुंगरांच्या वेदनेचे अलक्षित जग साकारले आहे. बाई म्हणजे दु:ख,आणि दु:खाचे दुसरे नाव बाईच अशा स्री दु:खाला तोलून धरणार्‍या काव्य ओळींनी ही दु:खाची गाथा सजीव झाली आहे. विठाबाई म्हणजे तमाशा, आणि तमाशा म्हणजे विठाबाईच. ही विठाबाईची तमाशावरील निस्सीम निष्ठा आणि त्यामुळे तिच्या आयुष्याची झालेली परवड या कवितेने साक्षात केली आहे. कमरपट्ट्यात तिच्या बंद झाल्या कित्येक नजरा अशी नाचणार्‍या बाईकडे एक भोगवस्तू म्हणून पाहण्याच्या पुरुषी वृत्तीचे सत्य या कवितेतून उजागर होते. विठाबाईची होणारी फसवणूक, अवहेलना तिचा पैशासाठी केला जाणारा वापर, तिचा भुकेसाठी झालेला संघर्ष आणि ‘बाई’ म्हणून वाट्याला आलेल्या भोगवट्याचे चित्र या काव्यातून साकारते. तमाशाचे पहिले राष्ट्रपती पदक मिळवणारी विठाबाई देशाचे संरक्षण करणार्‍या सैनिकांचे मनोरंजन करण्यासाठी बर्फाळ प्रदेशात कार्यक्रम करते. म्हणून देशउभारणीच्या इतिहासात तुझ्या नावाची गणती झाली का? हा सवाल कवी उपस्थित करत व्यवस्थेनेही विठाबाईला कसे बेदखल केले होते, याचे वास्तव मांडतो. तमाशासाठी हयातभर दिव्यासारख्या जळणार्‍या विठाबाईच्या जगण्याचा तंतोतंत गाभा या कवितेतून मुखरित झाला आहे.

सांस्कृतिक संघर्षाचे संवेदन म्हणूनही या कवितेचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक आहे. भारतीय समाजातील वैविध्यपूर्ण सांस्कृतिक अंतर्विरोधाचे सूचन ही कविता करते. जनसामान्यांची अभिरूची घडवणार्‍या लोककला आणि लब्धप्रतिष्ठितांचा या कलांकडे बघण्याच्या दूषित दृष्टीचे ताणेबाणे या कवितेने विशद केले आहे. परंपरेने संस्कृतीच्या नावाने स्त्रियांभोवती जे सांस्कृतिक पीळ आणि पेच निर्माण केलेले आहेत त्याचेही अंत:स्तर ही कविता उघड करते. भारतीय संस्कृती ही कष्टकर्‍यांच्या नि तळसमूहांच्या घामातून निर्माण झाल्याचा निर्देश करत तिचा वारसा अधोरेखित करण्याचा प्रयत्न या कवितेने केलेला आहे. सांस्कृतिक मुक्तीच्या दिशेने प्रवास करणारी ही कविता परिवर्तनाची कविता आहे. पुरूषसत्ताक व्यवस्थेने निर्माण केलेल्या सांस्कृतिक रचिताला ठाम नकार देत स्त्री मुक्तीचा एल्गार पुकारणारी ही कविता आहे. या कवितेतली विठाबाई म्हणते,आपला छळ केलाय सगळ्याच धर्ममार्तंडांनी/देवाचं रूप देऊन/आपल्यावर अत्याचार केलाय/आता, आपण आपला ग्रंथ लिहूया/आपण आपले नवे वेद रचूया/आपण लिहूया/आपली नवी पोथीपुराणं. स्त्री दु:खाच्या विराट आशयाला सामावून घेत स्रीमुक्तीचा नवा मार्ग शोधणारी ही कविता म्हणूनच महत्त्वाची वाटते. एका पुरूष कवीची ही अभिव्यक्ती भारतीय स्रीवादाला बळकट करणारी आहे. या कारणानेही ही कविता मोलाची ठरते.

- Advertisement -

‘विठाबाई नारायणगावकर’ या तमाशा कलावंतीण स्रीला केंद्रस्थानी ठेवून आकारलेली ही कविता समस्त तमाशा कलावंतिणींच्या दु:खाचा चरित्रपट उलगडून सांगणारी आणि उपेक्षित स्री समूहाच्या वेदनेचा उच्चार शब्दबद्ध करणारी कविता आहे. तमाशा आणि त्याअनुषंगाने येणारा आशय मराठी साहित्यातून वैपुल्याने मांडला गेला आहे. पण इतक्या समर्थपणे पुरूष कवीने दीर्घकवितेच्या माध्यमातून तमाशातील स्रीविश्व प्रथमच मांडले आहे. एकाच विषयाला केंद्रवर्ती ठेवून सारख्या वजनाच्या काव्यबंधाची मांडणी करत दीर्घकविता साकारणे ही गोष्ट सहजसाध्य नाही, त्यासाठी कवितिक रियाज आणि नैसर्गिक प्रतिभेची जातीवंत कविवृत्ती असणे आवश्यक असते. ही काव्यप्रतिभा महादेव कांबळे यांच्याकडे असल्यानेच ते घुंगरांच्या अबोल वेदनेला संवेदनशीलपणे प्रकट करू शकलेले आहेत. म्हणूनच एका पुरूष कवीने मांडलेले स्रीदु:खाचे हे अरण्य मोलाचे वाटते. वाचकांना अस्वस्थ करत अंतर्मुख करणारी ही कविता जशी तमाशा कलावंतिणीचा प्रातिनिक उच्चार आहे, तशीच ती सर्व उपेक्षित, असहाय, हतबल, शोषित, पीडित स्त्रियांचेही मूकेपण मुखरीत करणारी आहे. म्हणूनच ती महत्त्वाची ठरते.

केदार काळवणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -