घरफिचर्सखाकीतलं राजकारण!

खाकीतलं राजकारण!

Subscribe

पोलीस दलात राजकारण नवे नाही. ते ठराविक वेळेने उफाळून येत असते. पोलीस आणि राजकारणी एकमेकांना पूरक असतात. प्रत्येक जण आपल्या फायद्यासाठी दुसर्‍याचा वापर करत असतो. एकाची सत्ता गेली की महत्त्वाच्या जागेवरचे जसे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी बदलतात, तसेच महत्त्वाच्या पदावरील पोलीस अधिकार्‍यांच्याही बदल्या होत असतात. वर्षानुवर्षे हे चालत आले आहे. जिसकी लाठी उसकी भैस! आपल्या मर्जीतील पोलीस अधिकार्‍यांची क्रीम पोस्टवर नियुक्ती करत सत्ताधारी आपल्याला हवी तशी सत्ता गाजवू शकतात. मुख्य म्हणजे आपल्या विरोधकांवर अंकुश मिळवण्यासाठी सत्ताधीश पोलिसांच्या ताकदीचा वापर करून घेत आलेले आहेत. यामुळे प्रसंगी हव्या त्या बातम्या तर त्यांना मिळतात, पण कुठे चाप लावला पाहिजे आणि कुठे सोडला पाहिजे, हा खेळ सत्ताधारी बेमालूमपणे खेळू शकतात. आपल्या विरोधातील आंदोलनात खाकीविरहित पोलीस सोडून जनमताचा अंदाज सत्ताधारी घेत असतात, वर पोलीस बळाचा वापर करून ते प्रसंगी मोडून कसे काढायचे, यासाठीही पोलिसांचा वापर केला जातो. यात फक्त राजकारणीच स्वार्थी असतात असे नव्हे, जर आपला उपयोग केला असेल तर आपणही मागे राहायचे नाही, असे ठरवून पोलीस अधिकारीही आपले साम्राज्य निर्माण करतात. राजकारण्यांच्या हातात हात घालून तुम्हाला पुढे जाता येत नसेल तर मग त्यांचे संजय पांडे होतात. प्रचंड हुशार, कर्तव्यदक्ष आणि भ्रष्टाचारमुक्त असूनही पांडे यांना महत्त्वाच्या जागांवर नियुक्ती मिळाली नाही, त्यांना वेळोवेळी प्रमोशन डावलण्यात आले. टाळी जशी एका हाताने वाजत नाही, तसे पांडे यांच्या हातूनही काही चुका झाल्या. मात्र, त्या खूप गंभीर नव्हत्या. आज पांडे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी असते तर त्यांनी आपल्या धडाकेबाज कामगिरीने पोलीस खात्याची प्रतिमा नक्कीच बदलली असती. हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे निवृत्त पोलीस अधिकारी राकेश मारिया यांचे नुकतेच आलेले आत्मचरित्र पुस्तक ‘राकेश मारिया- लेट मी से इट नाऊ.’ हे पुस्तक अद्याप लोकांच्या हातातही आलेले नाही, पण सध्या चर्चेचा विषय बनले आहे. सरकारी सेवेत असताना प्रशासकीय अधिकार्‍यांना जाहीरपणे बोलता येत नाही, आपली मते मांडण्यास त्यांना प्रतिबंध असतात. मात्र, निवृत्त झाल्यावर त्यांना अशी काही बंधने नसतात. आपल्याला आधी काही व्यक्त होता आले नव्हते, किमान आता तरी आपली मन कि बात सांगायला हवी, असा काहींचा प्रयत्न असतो. त्यातून मग आत्मकथा लिहिल्या जातात. पण, आत्मकथा म्हणजे फक्त आपली बाजू नाही तर तो स्वतःलाही दाखवलेला आरसा असावा लागतो. मुख्य म्हणजे आपल्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्या प्रामाणिकपणे सांगता आल्या पाहिजेत. तेव्हाच त्या आत्मचरित्राला झळाळी असते, पण येथे प्रत्येकजण काही थोर विदुषी दुर्गा भागवत नाहीत. प्रांजळ आणि प्रखर मत मांडायला… राकेश मारिया यांनी आपल्या आत्मचरित्रात असे खुलासे केले आहेत, जे खाकी वर्दी परिधान करून ते कधीही बोलू शकले नाहीत. शिवाय राकेश मारियांनी दोन बड्या पोलीस अधिकार्‍यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यापासून ते पोलीस विभागात राजकीय हस्तक्षेपाबाबत राकेश मारिया यांनी आपले अनुभव लिहिले आहेत. यातील एका भागामुळे वादाचे ढग तयार झाले आहेत. मारिया यांनी बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडात मुंबई पोलीस दलातील आपले सहकारी असलेल्या तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेन भारती यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्याबद्दल चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली. शीना बोरा बेपत्ता झाल्याबाबत मी जेव्हा पीटर मुखर्जीला विचारलं तेव्हा पीटरने आपण याबाबतची माहिती देवेन भारती यांना दिली होती, असे सांगितले. शीना बेपत्ता झाल्यासंदर्भात तक्रार किंवा आकस्मिक मृत्यूची नोंद का झाली नाही, याबद्दल जेव्हा चर्चा केली तेव्हा देवेन भारती गप्प बसले. यानंतर मी देवेन भारती यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं. विशेष म्हणजे मारिया यांनी देवेन भारती यांना लक्ष्य करत स्वतः नामानिराळे होण्याचा प्रयत्न केला असला तरी या प्रकरणात आजही संशयाची एक सुई मारिया यांच्याकडे आहे. यामुळे आधीही वादळ उठले होते. त्यातच आत्मकथेतील मारियांचे आरोप भारती यांनी फेटाळताना आपला आधीचा रागही काढून घेतला. राकेश मारिया अशा कुटुंबांशी संलग्न आहेत, ज्याचा संबंध बॉलिवूडशी आहे. त्यामुळे त्यांच्यावर पटकथा लेखनाचा प्रभाव असावा. पुस्तकाची विक्री आणि वेब सीरिज बनवण्याची ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, असा आरोप भारती यांनी केला आहे.गृहसचिवांनी मेसेजच्या माध्यमातून आपली तत्काळ बदली केल्याचं राकेश मारिया यांनी आत्मकथेत पुढे लिहिलं आहे. माझ्यानंतर अहमद जावेद यांना पोलीस आयुक्तपदी नेण्यात आलं. अहमद जावेद आणि शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी यांची चांगली मैत्री होती. अहमद जावेद आपल्या घरातील ईदच्या पार्टीसाठी पीटर मुखर्जीला बोलावत असत. त्यामुळे शीना बोरा हत्याकांड प्रकरणावर परिणाम होणारच, असा दावा करत मारिया यांनी भारती यांच्यानंतर अहमद जावेद यांना टार्गेट केले. जावेद यांनीही अपेक्षेप्रमाणे हे आरोप फेटाळले आहेत. मारिया यांचे आरोप बिनबुडाचे आणि आश्चर्यकारक आहेत. यामध्ये त्रुटी, चुकीची माहिती, अतिशय वाईट तथ्य आहेत, जे दिशाभूल करणारे आहेत. अधिकृत माहितीवरूनच याला दुजोरा मिळू शकतो. इतकंच काय तर राकेश मारिया यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार, असाही टोला जावेद यांनी मारला आहे. आता यात राकेश मारिया खरे सांगत आहेत की अहमद जावेद तसेच देवेन भारती प्रामाणिक आहेत, हे कळायला मार्ग नाही. मात्र, राजकारणी लोकांमध्ये वावरताना पोलीस अधिकारीही तयार झालेले असतात. त्यांना कधी आणि केव्हा बोलायचे, कधी गप्प बसायचे, आपला फायदा कशात आहे, हे बरोबर कळलेले असते. आपल्या फायद्यासाठी मर्जीतील अधिकारी कसे गोळा करायचे आणि नको त्यांना बाजूला कसे दूर करायचे, यात सर्व माहीर असतात. हेच तर खाकीचे राजकारण आहे. येथे कोण समाजसेवा करायला आले आहेत? या खाकीच्या राजकारणाने मारिया यांचे पुस्तक वादग्रस्त ठरले असले तरी यातील २६/११ च्या दहशतवादी हल्लाचा एक भाग वेगळी माहिती देणारा आहे. या हल्ल्याप्रकरणी जिवंत अटक केलेला एकमेव दहशतवादी अजमल आमीर कसाबवर ही माहिती प्रकाश झोत टाकते. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने २६/११ चा हल्ला हा हिंदू दहशतवाद दाखवण्याचा प्रयत्न केला होता. १० हल्लेखोरांना हिंदू सिद्ध करण्यासाठी त्यांच्यासोबत बनावट ओळखपत्रे पाठवली होती. कसाबकडेही एक ओळखपत्र मिळालं होतं, त्यावर समीर चौधरी असं नाव लिहिलं होतं. समीर चौधरीच्या घराचा पत्ता बंगळुरू लिहिला होता, तसेच तो हैदराबादच्या दिलकुशनगरमधील एका कॉलेजचा विद्यार्थी असल्याचा उल्लेख त्यावर होता. हल्ल्याच्या रात्री मुंबई पोलिसांचं पथक तपासाठी बंगळुरूलाही रवाना झालं होतं. कसाबशी संबंधित माहिती गोपनीय ठेवणं मोठं आव्हान होतं. मीडियाला त्याची माहिती मिळू नये, असा प्रयत्न पोलिसांनी केला होता. खटल्याच्या वेळीही पाकिस्तानचा मुखवटा फाटत होता, त्यामुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगला कसाबला मारण्याची सुपारी मिळाली होती, एकूणच मारिया यांच्या या पुस्तकाने बाजारात येण्याआधी आपल्या नावाचा भलाबुरा डंका वाजवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -