घरफिचर्सप्रत्यक्षाहून पोस्टर उत्कट !

प्रत्यक्षाहून पोस्टर उत्कट !

Subscribe

रंगवलेल्या पोस्टरमध्ये ‘हुकूमत’मधला धमेंद्र आहे त्यापेक्षा जास्त आक्रस्ताळी आणि हिंसक होता. फायटींगचा पिक्चर म्हटलं तर रंगवलेल्या पडद्यावर लाल रंग भरभरून ओतला जाई. हिरोच्या ओठाच्या नेमक्या डाव्या कोपऱ्यातून किंवा कपाळाच्या उजव्या बाजूला भुवईवरून खाली गालापर्यंत रक्ताची धार पडत असे. मग सिनेमात असा सीन असो किंवा नसो…त्यानं फरक पडत नव्हता. अमिताभ, जितेंद्र, गोविंदा, मिथुन असे धारदार हिरो त्यात आघाडीवर होते.

मुंबईतल्या झोपड्यांवर ताडपत्री टाकण्याचे प्रकार अलिकडचे. हार्बर लाईनने बांद्रयाहून सीएसएमटीकडे जाताना पुलावरून खालची तळागाळातल्या कामगारांची मुंबई पावसाळ्यात निळ्या, पिवळ्या, हिरव्या रंगांच्या विविधरंगाच्या प्लास्टिकने आच्छादली जात होती. काही झोपड्यांवर सिनेमाचं भलं मोठं कापडी पोस्टर टाकलं जात होतं. ही सिनेमांच्या पोस्टरवाली मुंबई काळाच्या ओघात नाहीशी झाली. आताच्या डिजिटल पोस्टरकाळात पांढऱ्या फटक प्रकाश झोतातले चकचकीत होर्डिंग्ज आले आणि सिनेमाची रंगवलेली पोस्टर्स चित्ररंगमंदिरांतून उतरवली ती कायमचीच… पडद्यावर नायक नायिकांना आहे त्यापेक्षा सुंदर करणारा मेकअप आर्टिस्ट होता. कॅमेरा, लाईट्स आणि फ्लॅशमधून पडद्यावर नायिकांच्या सौंदर्यावर रंगीत प्रकाशझोत टाकले जातात. मात्र, पोस्टर रंगवणाऱ्यांना अशी कुठलीही सवलत नव्हती. दादरच्या टायकलवाडीजवळच्या बिजली, बादल, बरखा टॉकिजांत २५ वर्षांपूर्वी तीन वेगवेगळी पोस्टर्स लागायची. मुंबईतत्या बहुतेक सगळ्याच थेटरासारखी तीसुद्धा हाताने रंगवलेलीच होती. वांद्रयाच्या गेईटी गॅलेक्सी जेमिनीला लागलेला शहंशाह अमिताभ उंच पोस्टरमुळे जास्तच उंच रंगवण्यात आला होता.

- Advertisement -

तर २५ पैशांची कागदी पोस्टर्स कपड्यावरही हक्काची जागा मिळवत होती. शाळेच्या पांढऱ्या शर्टाच्या खिशावर चित्रपटाच्या सुरुवातीलाच ट्रेनसोबत पळणारा ‘डॉन’मधला लहूलुहान अमिताभ उमटवला जात होता. स्टारमधला चॉकलेट हिरो कुमार गौरव, बेताबमधला सन्नीही खिशावर सुलटा छापला जात असे. २५ पैशाला सोरटवर मिळणारं हे पोस्टर ओलं करून गरम इस्त्रीनं कपड्यावर उतरवलं जात होतं. त्यानंतर शाळेतल्या बाईंनी असे पोस्टरबाज खिसे काढायला लावले होते.

रंगवलेल्या पोस्टवर नेहमीच ‘ड्रिमगर्ल’, ‘शालीमार’मधल्या हेमा मालिनीचे गाल गुलाबी तांबडे केले जात होते. त्यामागचं कारण कळलं नाही. तर तोहफामधल्या श्रीदेवीचे डोळे आहेत त्यापेक्षा मोठे काळेभोर होते. सिनेमात नसताना या हिरॉईनींच्या मागं फुलं, रंगीबेरंगी चकाकत्या चांदण्या का काढल्या जातात त्याचं कारण कधीच कळलं नाही. रंगवलेल्या पोस्टरमध्ये ‘हुकूमत’मधला धमेंद्र आहे त्यापेक्षा जास्त आक्रस्ताळी आणि हिंसक होता. फायटींगचा पिक्चर म्हटलं तर रंगवलेल्या पडद्यावर लाल रंग भरभरून ओतला जाई. हिरोच्या ओठाच्या नेमक्या डाव्या कोपऱ्यातून किंवा कपाळाच्या उजव्या बाजूला भुवईवरून खाली गालापर्यंत रक्ताची धार पडत असे. मग सिनेमात असा सीन असो किंवा नसो…त्यानं फरक पडत नव्हता. अमिताभ, जितेंद्र, गोविंदा, मिथुन असे धारदार हिरो त्यात आघाडीवर होते. पोस्टरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या हिरोला डाव्या बाजूला आणि उजव्या कोपऱ्यात बंदूक घेऊन असलेल्या दुसऱ्या हिरोला त्याच बाजूला चेहऱ्यावर एकाच ठिकाणी पोस्टवर मार आणि रक्त लावलं जाई. जितेंद्र, धर्मेंद्रच्या ‘धर्मवीर’चं पोस्टर असंच होतं.

- Advertisement -

फिरोज खानच्या सिनेमांच्या पोस्टरचं वैशिष्ट्य वेगळं होतं. महागड्या गाड्यांची नासधूस करण्याचे पडद्यावरचे सर्व हक्क फिरोजखाने स्वतःकडे ठेवले होते. ‘कुर्बानी’मध्ये त्यानं अमरीश पुरीसोबतच्या एका सीनमध्ये खरीखुरी नवी कोरी मर्सिडीज फोडली होती म्हणे. त्यामुळे त्याच्या सिनेमाच्या पोस्टर्सवर जळक्या गाड्यांचा आगडोंब उसळलेला असायचा. एफ.के. इंटरनॅशनलच्या अपराध, धर्मात्मा, कुर्बानी, जाँबाज, दयावान, हादसा पासून ते अगदी यलगारपर्यंत हा आगडोंब पोस्टवर रंगवला गेला.

यश चोप्रांच्या कभी कभी, दाग, नूरी या प्रेमपटांची पोस्टरं गुलाबी रंगात रंगवली जात. हा सिलसीला ‘चांदनी’ ते ‘डर’पर्यंत कायम होता. तर यश चोप्रांच्याच ‘विजय’सारख्या मल्टीस्टारर अ‍ॅक्शन इमोशनपटात अनिल, ऋषी, हेमा मालिनी, राजेश खन्ना सगळ्यांना पोस्टरवर सारखंच स्थान रंगवणाऱ्यांकडून दिलं जाई. राजकुमार कोहलींच्या मल्टीस्टारर सिनेमाच्या पोस्टरवर सगळेच हिरो… रांगेत हातात बंदुका घेऊन आता पाहणाऱ्यांवरच गोळ्या झाडतील, अशा अविर्भात होते.

रामसे भावंडांची पोस्टर्स भीती दाखवण्यासाठी भडक रंगात रंगवली जात. यातलं पुराना मंदिर, डाक बंगला, तहखाना, पुरानी हवेली या भयपटातल्या पेटीतून बाहेर येणारी भूतं सगळ्या पोस्टवर एकसारखीच रंगवली जात.
मराठीत चंदेरी, हिंदीत मायापुरी आणि इंग्रजीत स्क्रीनसारख्या काही मोजक्या चित्रपटाला वाहिलेल्या नियतकालिकांतून छापील पोस्टरं होती. इथं सिनेकलाकार आहेत तस्सेच दिसत होते. पोस्टर रंगवणाऱ्याला तिथं आपलं कौशल्य सिद्ध करण्याची गरज नसे. तर काही स्टिकर्सची पोस्टर्स मुंबईतल्या जुन्या इराणी हॉटेलातल्या काचेच्या अलमारीत लावली जात. अनिल कपूरचा तेजाब, ठिकाना, गोविंदाचा हत्या, मिथुनचा अग्नी, इलाका या काळातली पोस्टर्स दक्षिण मुंबईतल्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या उरलेल्या इराणी हॉटेलमध्ये आजही लावलेली पाहायला मिळतात.
शुक्रवारी वांद्रे पूर्वेकडच्या कलामंदिरचं पोस्टर बदललं जाई. ते पाहायला शाळा सुटल्यावर गर्दी होत असे. शोलेनं हिंदी पडद्यावर इतिहास घडवला. त्यानंतर सीप्पी फिल्म्सच्याच शानचं पोस्टर डिजिटक स्वरुपात करण्यात आलं होतं. त्यावेळी या पोस्टरचीही उत्सुकता होती.

दादारच्या प्लाझाचं पोस्टर उंच आणि आडवं आजही लागतं. तर रॉक्सी, नॉव्हेल्टी, इरॉस अशा थोड्या महागड्या सिनेगृहाची पोस्टर्स ऐंशीच्या दशकात रोजच्या रोज नव्याने रंगवली जात. वांद्रयाच्याच भारत नगरात राहाणारा इम्रान नावाच्या मित्राचे वडील ही पोस्टर्स रंगवण्याचे काम करत होते. त्यांच्या घरात रंगच रंग पडलेले होते. शाळा सुटल्यावर तो कलामंदिरचं पोस्टर दाखवायचा आणि…ये मेरे बाप ने बनाया, बोलायचा…तेव्हा त्याच्या या पोस्टरजगाविषयी लय भारी वाटायंच. १९८९ मध्ये नसिरुद्दीन शहाचा हिरो हिरालाल नावाचा सिनेमा आला. त्यातला हिरो सिनेमाची पोस्टर्स रंगवणाराच असतो. फटा पोस्टर निकला हिरो…चा तो काळ पोस्टरवर भरल्या जाणाऱ्या कलाकारांच्या रोजच्या जगण्यातील रंगांचा होता. आधुनिक काळात पोस्टर्स डिजिटल झाली. कापड जाऊन प्लास्टिक आलं. त्यासोबत या कापडाच्या पोस्टरचा पावसाळी ओलावाही नाहीसा झाला. पण दर्दी चित्रपट रसिकांच्या मनात रंगवलेल्या या पोस्टरचे ओले रंग जराही उडालेले नाहीत.


संजय सोनवणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -