घरफिचर्ससत्ता मेव जयते!

सत्ता मेव जयते!

Subscribe

सत्ता कोणाला नको असते? ती मिळावी म्हणून सारी शक्ती एकवटणारे होत्याचं नव्हतं करतात आणि सत्तेची खुर्ची आपल्याकडे घेण्याच्या आटोकाट प्रयत्नात लागतात. सत्ताच ती, ती मिळावी म्हणून काहीही करणारे, कुठलाही मार्ग आत्मसात करणारे देशात कमी नाहीत. त्यांच्यावतीने जेव्हा इतर नेते बोलतात तेव्हा आसुया हा काही खेळ नाही, असं सहज वाटून जातं. राज्यात भाजपची सत्ता गेल्यापासून त्या पक्षाच्या नेत्यांना आणि स्वत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेची कायम स्वप्न पडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुक्रवारच्या दिल्ली भेटीनंतर ज्या गतीने सत्ता बदलाची चर्चा झाली ती पाहता कोणीही स्वत:ला रोखू शकत नाही, हेच दिसनू आलं. उद्धव यांनी मोदींची भेट काय घेतली आणि नको त्या चर्चांना उधाण आलं. एकूण एक वाहिन्यांनी आपल्या स्वप्नांना उजाळा दिला आणि होत्या नव्हत्या त्या सार्‍या शक्यतांचा बाजार मांडला.

आता माध्यमांनाच स्वप्न पडू लागल्यावर भाजपचे नेते कसे मागे राहणार? त्यांनी स्वत:चं समाधान करून घेतलं. आजवर ही स्वप्नं भाजप नेत्यांना पडायची. आता ती भाजपचा पालकसंघ असलेल्या संस्थेला म्हणजे संघाला ती पडू लागलीत. सत्ता गेली म्हटल्यावर किमान उसंत घ्यावी, सत्तेतल्या मंडळींना सहा महिने ती राबवायची संधी द्यावी, असंही या नेत्यांना वाटत नाही. सत्तेची ही घाई भाजपच्या नेत्यांना झोपू देणार नाही, हे उघड सत्य आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या तेव्हा ‘पुन्हा येणार’चा नारा देणार्‍या देवेंद्र फडणवीस यांचा हिरमोड झाला. शक्य नसलेली विभिन्न विचारांची मंडळी सत्तेवर बसतील, असं स्वप्नातही दिसत नसलेलं सत्य प्रत्यक्षात अवतरल्याचा धक्का भाजपच्या नेत्यांना अजूनही स्वस्थ बसू देत नाही. सत्ता मिळाली नाहीच उलट नको त्या अपेक्षेपायी विरोधी पक्षात बसण्याची वेळ फडणवीस यांच्यावर ओढवली.

- Advertisement -

इतरांसाठी खड्डा खणता खणता स्वत:च खड्ड्यात पडण्यासारखी गत फडणवीस यांची झाली. खरं तर यावेळी राज्यात सत्ता सहज शक्य होती. भाजप आणि शिवसेना युतीचं यश अधोरेखित होतं. ते इतकं अंगवळणी पडलं की विरोधी पक्ष मोजायलाही नसतील आणि शरद पवारांना घरं भाड्याने घ्यावी लागतील, अशी दर्पोक्तीची भाषा भाजपचे नेते करत होते. सत्तापदाच्या लालसेने भाजपला आंधळेपण आणलं आणि होणार तर मीच मुख्यमंत्री या हट्टाने सारं काही हातचं घालवण्याची वेळ ओढवली.

दृढ विश्वास कशाला म्हणतात हे भाजपच्या नेत्यांना आजही कळलेलं दिसत नाही. महाविकास आघाडीचं सरकार अपघाताने निर्माण झालं हे खरं असलं तरी ज्या कुरबुरी भाजपबरोबरील सत्तेवेळी होत्या तशा त्या आज तिसर्‍या महिन्यात गेलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधल्या मंत्र्यांमध्ये दिसत नाहीत, हे भाजपचे कोणी नेते मान्य करणार आहेत की नाहीत? सत्ता होती तेव्हा सेनेच्या मंत्र्यांच्या निर्णयांचा अंमल करण्यापासून त्या मंत्र्यांच्या दौर्‍यांवरही नजर ठेवण्याचा अर्धवटपणा भाजपने केला. संधी मिळेल तेव्हा शिवसेनेवर कुरघोडी करायची, हा शिरस्ता भाजपच्या नेत्यांनी अखेरपर्यंत सोडला नाही. हा अनुभव पुढच्या सत्ता स्थापनेच्या कृतीत होणं स्वाभाविक होतं. म्हणूनच मग ताकही फुंकून पिण्याची आवश्यकता सेनेला पडली. सत्ता स्थापन करताना दिल्या शब्दाला जागायचं नाही, हा भाजपचा शिरस्ता ऐन सत्तेवेळीही कायम राहिला आणि मुख्यमंत्री होईन तर मीच, या घोषणेला अंत उरला नाही. याचे परिणाम व्हायचे ते झाले.

- Advertisement -

महाआघाडीने सरकार स्थापलं तरी भाजप नेते स्वप्नातून बाहेर पडायचं नाव घेत नव्हते. जो तो महिन्या दोन महिन्याचा अवधी घेत होता. आता तिसरा महिना उगवला तरी हे नेते स्वप्नातून बाहेर येत नाहीत. सत्ता जणू आपल्याच पदराखाली होती, असा त्यांना भास होतो आहे. आजवर ही वक्तव्यं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील इत्यादींसारख्या नेत्यांकडून केली जायची. आता ती संघाच्या नेत्यांकडूनही होऊ लागल्याने संघ नेतेही सत्तेसाठी किती लाचार आहेत ते दिसून येतं. संघाचे सर कार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी केलेलं वक्तव्य याच पठडीतलं आहे. देवेंद्र फडणवीस फार काळ विरोधी पक्षनेते राहणार नाहीत, असं वक्तव्य करताना आपण विद्यमान सत्तेचा आणि लोकशाहीचाही अवमान करत आहोत, याचाही भैय्याजींना विसर पडलेला दिसतो.

याआधी भाजपच्या नेत्यांनी महाआघाडीच्या सत्तेची शाप देऊन आणि जनाधार नसलेलं सरकार म्हणून हेटाळणी केली. जनाधार जर भाजपला मिळाला असेल तर या जनाधारात तो पक्ष शिवसेनेला मोजणार आहे की नाही, हा प्रश्न आहे. हे दोन्ही पक्ष निवडणुकीत एकत्रित लढले होते. या लढतीत सेनेला जसा भाजपचा फायदा झाला तसा तो भाजपलाही झाला. तेव्हा आपणच काही उपकार केले असं मानण्याचं अजिबात कारण नाही. असं असताना जनाधाराच्या गप्पा मारणं भाजप नेत्यांना अजिबात शोभत नाही. जनाधाराची इतकीच काळजी होती तर सेनेला दिलेला शब्द पाळून सत्ता स्थापन करण्यात हशील होतं; पण ती हाती घेताना पुन्हा सारा मलिदा आपल्याकडेच राहिला पाहिजे, ही आसक्ती आड आली. तसं नसतं तर सेनेला अडीच वर्षांचा काळ देऊन सत्तेचा गाढा चालवता आला असता. आता हाती धुपाटणं यावं तशी गत पक्षाची आणि नेत्यांची झाली आहे. भैय्या यांच्या या वक्तव्यांना सहज म्हणून स्वीकारता येणार नाही.

भाजपने देशभर सत्तेचं दर्शन इतक्या उघडपणे घडवलं की लोकशाहीचे तीन तेरा वाजवले. देशातून काँग्रेसला हद्दपार करू पाहणार्‍या या पक्षाने त्याच पक्षाच्या आमदारांचा आसरा घेतला. गोव्यात सर्वाधिक आमदार काँग्रेसकडे असूनही पैसे चारून सत्ता काबीज करण्यात आली. कर्नाटकात सत्तेसाठी कोट्यवधींची खिराफत देण्याचा आरोप याच भाजपवर झाला. तिथेही काँग्रेसच्या आमदारांची संख्या सर्वाधिक होती. हद्दपारीच्या काँग्रेसचाच हात घेण्याची वेळ त्या पक्षावर आली. राजकारणाचा घोळ करून सत्ता मिळत असताना सरळमार्गे महाराष्ट्रात सत्ता नाही म्हणजे काय? असं नेत्यांना झालं असल्यास नवल नाही. हातची सत्ता घालवण्याची तयारी कोण दाखवेल. याकरताच देता येतील तेवढी आश्वासनं विरोधी आमदारांना दिली. मंत्रिपदाची लालूच दाखवली गेली. तरी सत्तेची दारं उघडू शकली नाहीत. याची सल बोचू लागली आणि अखेर त्याचे बोल बाहेर आले. सत्ता मेव जयते, असं का म्हणतात ते भाजपच्या नेत्यांना यासाठीच विचारावं. लोकशाहीच्या मार्गाने प्राप्त झालेल्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी सांभाळण्याची अपेक्षा असताना पुन: पुन्हा पुन्हा येईन, पुन्हा येईन, चा नारा देत हा पक्ष स्वत:चं हसं करतो आहेच; पण नेत्याचंही हसं करून घेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -