शक्तिशाली भारताची हतबलता!

आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव आल्यानंतर पाकिस्तानने मुंबई हल्ल्यामागील मास्टर माईंड हाफिज सईद याला अटक केली. अर्थातच, ही पाकिस्तानची नौटंकी आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या कुलभूषण जाधव यांना फाशी देऊ नये, असा आदेश दिला आहे. पाकिस्तानपेक्षा अनेक पटीने शक्तिशाली असलेला भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर असे किती दिवस हात पसरत राहणार आहे, हे कळेनासे होते.

Mumbai

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर फुटिरतावादी मुस्लीम नेत्यांनी अट्टाहासाने पाकिस्तानची निर्मिती केल्यापासून केंद्रात आलेल्या भारत सरकारांनी पाकिस्तानचा नेहमीच बाऊ केलेला आहे. त्यामुळे गेल्या सत्तर वर्षांत पाकिस्तान हा मुठीएवढा देश भारतासाठी कृष्णविवर होऊन बसला आहे. कारण भारताची बरेचशी शक्ती पाकिस्तानशी लढण्यात वाया जात आहे. भारताला वेगाने प्रगती करताना पाकिस्तान हा स्पिड ब्रेकर होऊन बसलेला आहे. खरे तर हा स्पिड ब्रेकर उखडून टाकणे भारतासाठी अवघड नाही, पण भारतीय नेतृत्वामधील हिमतीचा अभाव पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या नेहमीच पथ्यावर पडत आलेला आहे. आपण काहीही केले तरी भारतीय राज्यकर्ते आपले फार काही नुकसान करणार नाहीत, याची कल्पना पाकिस्तानी राज्यकर्त्यांना पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच आलेली आहे. कारण पाकिस्तानने काश्मीरवर अचानक हल्ला करून अर्धा भाग व्यापल्यानंतर त्यावेळी लष्करी कारवाई करून पाकिस्तानला हुसकावून लावणे शक्य होते; पण त्यावेळी भारत हा प्रश्न घेऊन संयुक्त राष्ट्रात गेला. त्यापासून आजतागायत हा प्रश्न भिजत पडून आहे. काश्मीरच्या मुद्यावरून पाकिस्तान गेली सत्तर वर्षे लढत आहे.

काश्मीरच्या निमित्ताने पाकिस्तान भारतात घुसखोरी करत असून अनेकांच्या हत्या घडवत आहे. त्यात सैनिकांसह सामान्य नागरिकांची समावेश आहे. भारताच्या भूमीचे क्षेत्रफळ पाकिस्तानपेक्षा मोठे आहे. भारताचे सैन्य पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. भारत हा पाकिस्तानपेक्षा अधिक आधुनिक आहे. इतके सगळे असताना पाकिस्तान भारताला उघड धमक्या देतो. भारतात अतिरेकी घुसवून घातपात करतो. थेट किंवा छुप्या युद्धाच्या माध्यमातून भारताला जेरीस आणतो. हे सगळे पाहिल्यावर सर्वसामान्य भारतीयाला हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही की, भारतासारखा मोठा देश पाकिस्तानला वठणीवर का आणू शकत नाही ? भारतापेक्षा सर्व बाबतीत छोटा असूनही पाकिस्तानमध्ये इतकी मुजोरी आणि भारताला आव्हान देण्याची वृत्ती कशी काय आहे? पाकिस्तानला भारताचा दरारा का वाटत नाही ? आपल्या राजकर्त्यांचे पाणी पाकिस्तानने जोखले आहे का? भारतीय राज्यकर्ते आपल्याला थेट उत्तर न देता संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयांचे दरवाजे ठोठावत राहतील, याची पाकिस्तानला खात्री वाटत असल्यामुळेच ते बिनधास्त आहेत, असेच दिसून येते.

लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि कसाब टोळीला भारतात पाठवून मुंबईवर हल्ला करून हाहा:कार उडवून देणारा हाफिज सईद याला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. त्याला २०१७ साली अशीच अटक करण्यात आली होती. पण त्याला अल्पावधीतच सोडून देण्यात आले. आता आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव आल्यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानात अझर मसूद नावाचा दुसरा एक अतिरेक्यांचा म्होरक्या आहे. भारताच्या संसदेवर हल्ला घडवण्याच्या कटाचा तो सूत्रधार आहे. तोही पाकिस्तानात सुखनैव जीवन जगत आहे. मुंबईत १९९३ साली साखळी बॉम्बस्फोट घडून जीवित आणि मालमत्तेची अपरिमित हानी करणारा दाऊद इब्राहिम हादेखील पाकिस्तानात असल्याचे अनेक पुरावे पुढे येत असतात; पण तो आमच्याकडे नाहीच, असेच पाकिस्तानकडून वारंवार सांगण्यात येते. २६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईवर हल्ला करणार्‍या कसाब टोळीतील नऊ जणांना मुंबई पोलीस आणि एनएसजी कमांडोंनी ठार केले. या सगळ्यांचे मृतदेह पाकिस्तानने स्वीकारले नाहीत. हे सगळे पाकिस्तानातून आले होते, हे सिद्ध झाल्यानंतरही पाकिस्तानने ‘ते आमचे नव्हेत’, अशीच भूमिका घेतली होती.

भाजपने विरोधात असताना नेहमीच पाकिस्तानाविषयी बोटचेपे धोरण घेतल्याची टीका काँग्रेसवर केलेली आहे. आजही करत आहेत. पाकिस्तानविरोधात काँग्रेसने कठोर धोरण घेतले असते तर पाक इतका शेफारला नसता, अशी टीका भाजप नेहमीच करत आलेला आहे. पण भाजप आणि मित्र पक्षांचे सरकार पहिल्यांदा केंद्रात सत्तारुढ झाल्यानंतर मात्र भाजपची पकिस्तानविरोधाची धार अशी काही बोथट झाली की, काँग्रेसवर टीका करणारे हेच का ते भाजपवाले असे विचारण्याची वेळ आली. ‘लाथो का भूत बातों से नही मानता,’ असे वेळोवेळी काँग्रेसला सुनावणारे भाजपवाले, नव्या दमाने पाकिस्तानशी चर्चा करण्यासाठी सज्ज झाले. शेवटी चर्चेचा सगळा फुगा इतका फुगवला गेला की, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी बससेवा सुरू करून बसने पाकिस्तानला गेले. जंग न होने देंगे, अशी कविता त्यांनी आपल्या भाषणातून गायली; पण दुर्दैव असे की, त्याच वेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी भारतीय हद्दीत पंधरा किलोमीटर आतमध्ये घुसखोरांचे बुरखे घालून सैन्य घुसवले. खंदक खणून बरीच शस्त्रसामुग्री आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जमा करून ठेवला.

आपला वेळोवेळी विश्वासघात होत आलेला आहे, असे भारतीय राज्यकर्त्यांना माहीत असूनही भारत पुन्हा पुन्हा पाकिस्तानवर विश्वास कशासाठी ठेवत आहे, हे एक आजवर न सुटलेले कोडे आहे. ही भारतीयांच्या मनोवृत्ताची समस्या आहे का, यावर विचार व्हायला हवा. कारण या भारतीय वृत्तीला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘सद्गुण विकृती’ असे म्हटले आहे. एका बाजूला आपण ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी,’ असे संताचे वचन अभिमानाने सांगत असतो. पण जेव्हा नाठाळांच्या माथी काठी हाणायची वेळ येते तेव्हा त्यांना आपली लंगोटी सोडून देण्याचा उदारपणा कशासाठी दाखवत आहोत, हेच सर्वसामान्य भारतीयांना कळेनासे होते.

नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता केंद्रीय सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानला जरब बसेल असे काही तरी घडेल असे वाटत होते; पण त्यांनीही केक डिप्लोमसी सुरू केल्यामुळे लोकांचा मोठा अपेक्षाभंग झाला. भाजप विरोधात असताना इस्त्राईलच्या लढाऊपणाचे उदाहरण सत्ताधारी काँग्रेसला देत असे; पण स्वत: सत्तेत आल्यानंतर त्यांच्या हातातील ती जाज्वल्य देशभक्तीची शस्त्रे कशामुळे गळून पडली आहेत, याचा आता त्यांनीच विचार करण्याची वेळ आली आहे. भारताला संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय न्याय मिळवून देऊ शकणार नाही, तो स्वबळावरच मिळवावा लागेल. कारण कुलभूषण जाधव यांची फाशी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगित करण्याचा निर्णय दिला असला तरी त्यांच्या जीवनाची दोरी ही पाकिस्तानच्याच हातात आहे, हे आपण लक्षात ठेवायला हवे.

भारतात हल्ले घडवणार्‍या अतिरेक्यांचे म्होरके हे पाकिस्तानात आहेत, हे जगदुनियेला माहीत आहे. पाकिस्तान हा अतिरेक्यांचा अड्डा झालेला आहे, असे बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या समारोपाच्या भाषणात सांगितले होते. पाकिस्तानच्या घातपाती वृत्तीचा भारताला वारंवार अनुभव येत आहे, तरीही त्यांना सडेतोड उत्तर न देता भारत त्यांचा बाऊ कशासाठी करत आहे, हा खरे तर जगाला पडलेला प्रश्न आहे, असेच म्हणावे लागेल.