घरफिचर्सदोन ओसाड एक वसेचिना

दोन ओसाड एक वसेचिना

Subscribe

बुधवारी कर्नाटकची राजधानी बंगलोर येथे जनता दल सेक्युलर पक्षाचे नेते कुमारस्वामी यांचा त्या राज्याचे चोवीसावे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला. तोच मुहूर्त साधून बिगर भाजप किंवा प्रामुख्याने मोदीविरोधी पक्षांनी जे ऐक्याचे प्रदर्शन मांडले, त्याने अनेकांचे डोळे दिपलेले आहेत. त्याहीपेक्षा शपथविधी संपल्यावर बहुतांश नेत्यांनी एकमेकांचे हात गुंफून उंचावल्याने अनेकांना भाजप 2019 सालात शंभरीही गाठू शकणार नसल्याची खात्री पटलेली आहे. हात उंच उंचावले आणि पाय जमिनीवर नसले मग यापेक्षा वेगळे काही होऊ शकत नाही. कारण ज्या विरोधी मतांची बेरीज हे गणितज्ञ मांडत आहेत, ती कुठल्या राज्यात होणार व भाजपला कसा शह मिळणार, याची जमिनी वस्तुस्थिती त्यापैकी अनेकांच्या गावीही नाही. जितके नेते त्या मंचावर जमलेले होते आणि त्यांनी एकजुटीची ग्वाही दिलेली असली, तरी त्यांच्या एकत्र येण्याचा भाजपवर काय परिणाम होऊ शकतो, याचे गणित कोणी मांडलेले नाही. मागल्या लोकसभेत भाजपने 282 जागा जिंकल्या व मित्रपक्षांनी आणखी पन्नास जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी भाजपच्या जितक्या जागा आहेत, त्यात विरोधकांच्या एकत्र येण्याने काय फटका बसू शकतो? कुठल्या राज्यात धक्का बसू शकतो? बारकाईने अभ्यास केला तर विरोधकांच्या एकजुटीने एक उत्तरप्रदेश सोडला तर भाजपला जवळपास अन्य कुठल्याही राज्यात धक्का बसण्याची बिलकूल शक्यता नाही, ही वस्तुस्थिती आहे. किंबहुना उत्तरप्रदेश सोडल्यास भाजपच्या कुठल्याही प्रभाव क्षेत्रात मंचावरील नेते व पक्षांचा काडीमात्र प्रभाव नाही. आपल्या प्रभाव क्षेत्रात काँग्रेसच भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी आहे आणि उर्वरित राज्यात काँग्रेस हाच उपस्थित पक्ष व नेत्यांचा खराखुरा प्रतिस्पर्धी आहे. हे अतिशय बारकाईने व आकडेवारीने समजून घेता येऊ शकते. अर्थात स्वप्नरंजनातून बाहेर पडायची इच्छा असली तर!

मायावती व अखिलेशचा पक्ष एकत्र आल्यास 
मायावती व अखिलेशचा समाजवादी पक्ष हे उत्तरप्रदेशातील मोठे पक्ष आहेत आणि त्यांच्या मतांची बेरीज भाजपला आव्हान दोऊ शकते. पण त्यासाठी त्या पक्षांनी एकदिलाने व परस्पर समजुतीने मोदीविरोधात एकवटले पाहिजे. त्यात काँग्रेसही सहभागी झाली तर भाजपाला मोठा दणका देऊ शकतात. कारण तिथल्या 80 पैकी 73 जागा भाजपने जिंकलेल्या होत्या. त्यापैकी पन्नासहून अधिक जागी भाजपला धोका होऊ शकतो. थोडक्यात 282 वरून भाजप थेट सव्वादोनशे इतका खाली घसरू शकतो. हा उत्तरप्रदेश सोडला तर भाजपचे प्रभाव क्षेत्र असलेली राज्ये कोणती? आसाम, बिहार, गुजरात, हरयाणा, हिमाचल, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड व दिल्ली. या राज्यांत असे कोणते दांडगे पक्ष कालच्या शपथविधीला उपस्थित होते आणि त्यांच्याशी हातमिळवणी केल्यास भाजपला पाणी पाजता येऊ शकेल? तिथे हात उंचावून उभे असलेल्या एकेका नेत्याची व त्याच्या पक्षाच्या प्रभावक्षेत्राची झाडाझडती काय आहे? अशा उत्सवात अगदी हुरळल्यासारखे सहभागी होणारे सीताराम येच्युरी 2008 पासून अनेक मंचांवर असेच हात उंचावत राहिले आहेत. पण दरम्यान दहा वर्षांत त्यांनी दोन राज्यातील सत्ता गमावलेली आहे आणि तिथे त्यांचे नामोनिशाण उरलेले नाही. बंगालमध्ये आज त्यांना तोंड दाखवायला जागा नाही आणि तिथल्याच मुख्यमंत्री ममता मंचावर हजर असताना येच्युरींकडे ढुंकून बघायला राजी नव्हत्या. बंगालमध्ये आता भाजप दुसèया क्रमांकाच पक्ष होत चालला आहे. ओडिशाची स्थिती काहीशी तशीच आहे. पण त्या राज्याचे प्रभावी नेते नविन पटनाईक या कुंभमेळ्याला हजर राहिले नव्हते. बाकी जे कोणी उपस्थित होते, त्यांच्या राज्यात भाजप त्यांचा प्रतिस्पर्धी नाही तर काँग्रेस त्यांचा विरोधी पक्ष आहे. मग अशा बेरजेचा उपयोग तरी काय?

- Advertisement -

वाघ मारण्याचा आव कशाला
आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, ओडीशा व बंगाल अशा राज्यांतून कुठल्याही मतविभागणीचा लाभ उठवून भाजपला मागल्या लोकसभेत इतक्या जास्त जागा मिळाल्या नव्हत्या. तर आज मतविभागणी टाळून वाघ मारण्याचा आव कशाला आणला जात आहे? आंध्रप्रदेश 2, तेलंगणा 1, ओडिशा 1, बंगाल 2, तामिळनाडू 1 आणि केरळ 0; अशा जागा भाजपने जिंकलेल्या होत्या. या सहा राज्यांतून लोकसभेत 165 सदस्य निवडून जातात आणि भाजपने मिळवल्या अवघ्या 7 जागा. त्यातल्या दोन पुन्हा चंद्राबाबूंच्या कृपेने आंध्रातल्या आहेत. लोकसभेच्या 543 जागांपैकी 378 जागांतून भाजपने आपल्या 275 जागा जिंकलेल्या आहेत आणि त्याला भाजपचे प्रभावक्षेत्र म्हणता येईल. त्यामुळे नामशेष झालेले मायावती, अखिलेश, अजितसिंग, शरद पवार, येच्युरी वा देवेगौडा अशा लोकांनी चंद्राबाबू वा ममताशी हात गुंफले, म्हणून त्या 378 जागी किती फरक पडणार आहे? उत्तरप्रदेशात पवार काय करू शकतात? गुजरातला ममता काय दिवे लावणार? थोडक्यात हात उंचावून मंचावर मिरवणाऱ्यांना भाजप जिथे लढू शकत नाही वा त्याची ताकदच नाही, तिथे मोदींना लोळवायचे आहे. तसे 2014 च्या लढतीमध्येही भाजप व मोदी त्या क्षेत्रात जमिनदोस्तच झालेले होते. तिथे भाजपाने बहुतांश जागी अनामत रक्कमही गमावलेली होती. म्हणजेच हात उंचावणारी टोळी जिथे मोदी आधीच पराभूत झालेले आहे, तिथेच नेस्तनाबूत करायचे मनसुबे रचून बोलत आहेत. अपवाद फक्त उत्तरप्रदेशाचा आहे. तिथे काही जागा तरी भाजपला मतविभागणीमुळे झालेला लाभ आहे आणि म्हणूनच त्या मंचावरच्या अखिलेश-मायावतींच्या एकत्र येण्याला महत्व आहे. बाकी सगळा कचरा होता. त्यांना मोदींशी लढण्याचे कारण नाही की त्यांची मोदींशी राजकीय लढाईच नाही.

भाजपची क्षमता 

- Advertisement -

मुद्दा आहे तो भाजपाचे 378 प्रभावक्षेत्र असलेले मतदारसंघ आणि त्यात अशा हात उंचावणाèयांची मते मिळवण्याची क्षमता! यापैकी म्हणजे 165 मतदारसंघांत मागल्या चार वर्षांत भाजपने अमित शहांच्या मेहनतीने संघटना उभारली आहे. ज्या पद्धतीने बंगालमध्ये ममता व केरळात डावी आघाडी भाजपच्या कार्यकर्त्यांशी हिंसक संघर्ष करते आहे, त्याअर्थी या दोन राज्यांतील किमान 30-40 जागी भाजपाने आपला प्रभाव वाढवलेला आहे. त्याखेरीज ओडिशामध्ये भाजपाने काँग्रेसला मागे टाकून दुसèया क्रमांकावर झेप घेतली आहे. अनेक जिल्ह्यात नविन पटनाईक यांच्या पक्षाला मागे टाकणारे यश स्थानिक संस्था मतदानात मिळवलेले आहे. म्हणजे एकत्रित केल्यास 2014 मध्ये आपल्या आवाक्यात नसलेल्या आणखी 60-70 जागी भाजपाने आपला प्रभाव नव्याने निर्माण केला आहे. याच चार वर्षांत हात उंचावणाèया टोळीतील नेत्यांनी आपले प्रभावक्षेत्र टिकवण्यासाठी काही नवे केले आहे काय? नुसत्या मोदी विरोधाला प्रोत्साहन देताना ममता बॅनर्जी व डाव्यांनी बंगाल व केरळात हिंदू धृवीकरणाला हातभार लावून भाजपला नवा मतदार मात्र मिळवून दिला आहे. भाजपाचे आधीचे 378 मतदारसंघांतील प्रभावक्षेत्र व नव्याने त्यांनी शिरकाव केलेल्या 60-70 जागा येथे लढाई महत्वाची आहे. तिथे काँगेस कितपत समर्थपणे लढणार आणि त्यात हात उंच करणाèयांचा किती हातभार लागू शकतो, याला निर्णायक महत्त्व आहे. अशा जागा 430 पर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत आणि आपले प्रभावक्षेत्र भाजप विस्तारत असताना हात उंचावणारे मात्र शिळोप्याच्या गप्पा मारीत महागठबंधनाचे प्रवचन करीत फिरत राहिले आहेत. अशा दोन डझन प्रवचनकार व माध्यमातील त्यांच्या किर्तनकारांच्या मदतीने मोदी वा भाजपला कसे रोखता येणार? या शुद्ध गणिताला महत्त्व आहे. त्याचे साधे समिकरणही मांडायची अशा दिवाळखोरांना गरज वाटलेली नाही. आपल्यातून असेच हात उंचावणारा नितीशकुमार का निघून गेला, त्याचाही विचार करायची या दिवट्यांना गरज वाटलेली नाही. हा सगळा तमाशा बघून संत ज्ञानेश्वराचे भारूड आठवले.
काट्याच्या अणीवर वसली तीन गावे, दोन ओसाड एक वसेचिना !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -