कोविड-१९: आपण कधी गांभीर्याने घेणार?

गेल्या काही वर्षापासून जर्मनीतील म्युनिक शहरात आम्ही स्थायिक आहोत. तेथे आम्ही मेडिकल फील्डमध्ये कार्यरत आहोत. माझे पती युनिव्हर्सिटीमध्ये सायंटिस्ट आहेत. १ एप्रिलपर्यंत जर्मनीत करोना बाधितांचा आकडा ७६ हजार ५४४ इतका होता. ८५८जण मृत झालेत. वैद्यकीय क्षेत्रात अतिशय प्रगत असलेल्या जर्मनीची ही स्थिती असेल तर आपल्या देशात भविष्यात काय होईल?

Nashik
गेल्या काही महिन्यांपासून सारखे एक नाव कानी येतेय ते म्हणजे ‘कोरोना व्हायरस’! डिसेंबरमध्ये चीनच्या वुहानमधील सीफुड आणि मीटमार्केटमधून आलेल्या ह्या व्हायरसमुळे जगभरात कहर झाला आहे. पण आपल्यापैकी किती जण त्याला गांभीर्याने घेत आहेत? खरंतर क्वचितच घेतले जात आहे.काही लोक बिनधास्तपणे वावरत आहेत जसे की एखादा इव्हेंटला ही मंडळी हजेरी लावत आहेत. का म्हणून आपण सगळे गंभीरपणे विचार करत नाहीत? कोरोना व्हायरस हा जरी साधा रोग वाटत असला तरी तसे  प्रत्यक्षात नाही. वय वर्षे साठच्या पुढील आणि ज्यांना हृदयाचे विकार, श्वसनाचे विकार, डायबेटीस किंवा इतर काही धोकादायक आजार असतील त्यांच्यासाठी हा एक गंभीर रोग आहे. १ एप्रिलपर्यंत जगभरात एकूणच तब्बल ९ लाख १२ हजार ९८ रुग्ण पॉझिटीव्ह होते. शिवाय ४५ हजार ५४० पेशन्ट मृत झाले.. तसा अजूनही परिपूर्ण असा आकडा कोणाला ही माहिती नाही. परंतु यात अजून भर पडण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती एकदा १९१८ मध्ये ‘स्पॅनिश फ्लू पँडेमिक इन्फ्लुएंझा’मुळे आली होती आणि त्यामुळे काही कोटी लोक जगभरातून मृत्युमुखी पडले होते. जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार आज अमेरिकेमध्ये कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत. पण गंभीर समस्या इटलीत आहे. तीही निव्वळ दुर्लक्ष केल्यामुळे. आज तिथे खूप लोक मृत्यू पावत आहेत. ह्या बाबत जर त्यांनी सतर्कता पाळली असती तर इटलीमध्ये परिस्थिती आटोक्यात आणता आली असती. ३१ जानेवारी २०२० रोजी पहिले दोन चिनी पर्यटक रुग्ण रोममध्ये पॉझिटीव्ह आढळले. दुसर्‍या आठवड्यात एक इटालियन नागरिक चीनमधून इटलीत परतला.तो तिसरा कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण होता. तेव्हाच त्यांच्या सरकारने सांगितले, कोणीही कारण नसताना बाहेर पडू नये. पण त्यांच्या हलगर्जीपणामुळे तिसर्‍याच आठवड्यात एकूण ६० रुग्ण आढळले. तेथील लोकांनी सरकारचे आदेश पाळले नाहीत आणि जेव्हा दोनतीनच पेशन्ट्स होते त्यामुळे इटलीतील लोकांनी गांभीर्याने घेतले नाही. म्हणून त्यांना आज ह्या परिस्थितीस सामोरे जावे लागतेय आणि असा निष्काळजी पणा आपल्या देशात तरी होऊ नये. मी ही परिस्थिती फार जवळून पाहतेय. त्यामुळे मला माझंही मत ‘आपलं महानगर’ आणि माय महानगरच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडावेसे वाटते आहे. मी आणि माझे यजमान आम्ही मूळचे नाशिकचे रहिवासी पण गेल्या काही वर्षापासून म्युनिक येथे स्थायिक आहोत. आम्ही मेडिकल फील्डमध्ये कार्यरत आहोत आणि माझे पती युनिव्हर्सिटीमध्ये सायंटिस्ट आहेत. सध्या त्यांच्या क्लिनिकमध्ये कोरोनाचे ६७ रुग्ण दाखल आहेत. तरीही येथील स्थितीमध्ये खूप तणाव नाहीये.याचे कारण येथे चाचण्या आणि तपासण्या कटाक्षाने केल्या जात आहेत.
  १ एप्रिलपर्यंत जर्मनीत करोना बाधितांचा आकडा ७६ हजार ५४४ इतका होता. ८५८जण मृत झालेत. हीच स्थिती संपूर्ण युरोपात आहे आणि दिवसें दिवस हा आकडा वाढतोच आहे. पण ह्या लोकांकडे सोयी-सुविधाही मोठ्या प्रमाणात आहेत. जर्मनीची लोकसंख्या ८.२७९ करोड आहे आणि इथे जर्मनीत प्रत्येकी १ लाख लोकांमागे ४० इंटेन्सिव्ह केअर बेड्स आणि व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत आणि येणार्‍या संकटाची ते युद्धपातळीवर तयारी करत आहेत. पण हाच विचार जर आपल्या भारताच्या बाबतीत केला तर आपण तेवढे सक्षम आहोत का? जर आपल्याकडे असाच आकडा वाढला तर? भारताची लोकसंख्या १३० करोड आहे आणि प्रत्येकी १ लाख लोकांसाठी २.८ इंटेन्सिव्ह केअर बेड्स आहेत. त्यातील दोन- तृतीअंश आधीच बुक असतात. दुर्देवाने जर आपल्या देशात हा आकडा वाढला तर काय परिस्थिती असेल याची कल्पनाही करवत नाही. आपल्याकडे अजूनही पुरेशा सोयी सुविधा नाहीत. अशी परिस्थिती असताना देखील काही लोक खुशाल प्रवास करताय. अगदी जे कोरोना इन्फेक्टड आहेत ते सुद्धा. गेल्या काही दिवसात काही बातम्या वाचल्या, ज्या ऐकून खरंच थक्क व्हायला झाले आहे. परदेशातून भारतात येण्यार्‍या काही लोकांनी गंभीरपणे चेकिंग करून घेतली नाहीत आणि  स्वतःला क्वारंटाइन करून घेतले नाही. सरकारने सांगितलेल्या सूचनांचे पालन केले नाही. मुळातच परदेशी  स्थायिक लोकांनी भारतात घाई -घाईने परतण्याचे कारणच उमजत नाही. जगातील प्रत्येक सरकारने सोशल डिस्टंनिंगचा सल्ला दिलाय. मग घाईगडबडीत भारतात जाऊन काय साध्य होणार आहे? या परदेशी स्थायिक लोकांनी भारतात गर्दी केल्यानेच आपल्या देशात कोरोना व्हायरसची लागण झाली. अन्यथा आपल्याकडे अशी समस्या उद्भवलीच नसती. तरीही जे भारतात रहिवासी आहेत त्यांनी तरी सतर्कता बाळगायला हवी. पण तेही असेच चुकीचे वागत आहेत.
 जर कोरोनाबाधित असतील तर लपवतात याचे कारण तरी काय? जणू काही त्यांना एड्स झालाय. खरे तर एड्स संसर्गजन्य नाही. त्यामुळे तो लपविला तर ठिक आहे. परंतु कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे, मग का तो का लपवला जातो? याच वेळी एकदा आपल्या कुटुंबीयांचा पण विचार करून बघा. जसे आपल्या घरात आई – वडील, आजी – आजोबा असतात त्यांचेही वय ५० च्या पुढेच. त्यापैकी बर्‍याच लोकांना डायबेटिस वा हृदयाचे विकार किंवा इतर काही आजार असू शकतात.अशा अवस्थेत जर आपण इन्फेक्शन घेऊन गेलोत तर आपल्यामुळे घरचे देखील आजारी होणार. वेगवेगळ्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, एक बाधित सामान्यपणे १२ लोकांना बाधित करतोे. त्यामुळे काळजी न घेतल्यास भविष्यात आपल्या देशात परिस्थिती किती बिकट होऊ शकते याचा प्रत्येकाने विचार करावा. परदेशातून भारतात येणार्‍यांनीही किती नियम पाळले यात शंका आहे. अनेकांनी वैद्यकीय चाचण्या चुकवण्यासाठी ताप आलेला असताना औषधे घेऊन तात्पुरत्या स्वरुपात ताप उतरवला होता. विमानातून उतरण्याआधीच ही ‘काळजी’ घेण्यात आल्याने त्यांच्या शरीराचे तापमान लक्षात आले नाही. केवळ सरकारच्या नावाने टीका करण्यापेक्षा काळजी घेण्याचे कर्तव्य प्रत्येकानेच पाळणे गरजेचे आहे. किंबहुना हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असेच प्रत्येकाने समजावे.
corona
सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोनाच्या रुग्णाला सांभाळण्यासाठी सगळीकडे इलेक्टीव्ह ओपीडी बंद करण्यात आली आहे. ज्यामुळे, नुकतेच निदान झालेले आजार उदारणार्थ – मधुमेह, कॅन्सर, हृदय विकार आणि इतर आजारांच्या काही रुग्णांना तात्काळ निदान होणार नाही. अन्य आजारांच्या उपचारांकडे जर्मनी आणि इतर युरोपियन देशांमध्ये बघितलेच जात नाही. ही परिस्थिती इतक्या प्रगत देशांची आहे तर विचार करा आपली कशी असेल?
देशभरात आज १ हजार ६३७ रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. अजूनही यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केलेय. शिवाय त्यासाठी आपली जागतिक आरोग्य संघटना व आपले सरकार सतर्कतापूर्ण काम करत आहेत. त्यांच्यानूसार सर्व नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग पाळणे म्हणजेच १-२ मीटर किंवा तीन फुटांचे अंतर एकमेकांमध्ये ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून जर समोरची एखाद्या व्यक्तीस खोकला आला किंवा शिंक आली तर त्यांच्यातून निघणार्‍या सुक्ष्म थेंबातून तुम्हाला संसर्ग होणार नाही. प्रशासन सध्या लोकांनी सोशल डिस्टंन्सिंगचा अवलंब करावा यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. कारण त्यामुळे गर्दी टाळण्यास मदत होऊ शकते. सोशल डिस्टंन्सिंग केल्याने जास्तीत जास्त लोक एकमेकांच्या संपर्कात येण्याचे टळेल. शिवाय त्यामुळे विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यास मदतही होईल. या संकटाशी सामना करण्यासाठी प्रशासन रात्रंदिवस काम करत आहे.
coronavirus indian army
प्रातिनिधिक छायाचित्र
इतर देशांच्या परिस्थितीतून धडा घेऊन तरी सतर्क होणे गरजेचे आहे. या देशांतील नागरिकांनी जी चूक केली ती आपण तरी करू नये. आता आकडेवारी कमी आहे, मी सुदृृढ आहे किंवा माझी प्रतिकारशक्ती चांगली आहे. त्यामुळे मला आजार होणार नाही अशा भ्रमात राहणे धोकेदायक आहे.
एकूणच इटली देशाची लोकसंख्या ६ कोटी आहे. त्यातील तब्बल १३ हजार १५५ लोक आता मृत्यूमुखी झाले. महाराष्ट्राची लोकसंख्या १३ कोटीच्या आसपास आहे. सगळीकडे कर्फ्यू पाळतोय म्हणून सुखरूप आहोत. पण इटलीत लॉकडाऊन नंतर ही १ लाख १० हजार ५७४ इतके रुग्ण आहे. हे कशामुळे? तर आपल्यासारख्या निष्काळजीपणामुळे. आता तरी सर्वानी शहाणे होऊयात आणि स्वयंशिस्तीने वावरुयात. काळजी घेऊयात. कुठेही गर्दी करू नका भाजीसाठी वगैरे काही नसेल तर घरात असेल त्यानुसार भागवा. काही बिघडत नाही. जर तुम्हाला कुठलेही लक्षण जाणवले तर ताबडतोब चाचणी करून घ्या आणि उपचार घ्या. घरातील कोणतीही औषधे डॉक्टरांना न विचारता घेऊ नका. जर तुम्ही कोरोना पॉझिटीव्ह असाल तर खरं बोला, इतरांसारखी लपवाछपवी करू नका आणि स्वतःहून लांब रहा. नाहीतर जे कोणी लोक मृत्यूमुखी पडतायेत त्यांच्यासाठी आपण जबाबदार ठरु. तेव्हा हे सगळे थांबवा. इंग्रजीत एक म्हण आहे ‘Precaution is always better than cure.’ याचा विचार करा बस्स !
-प्रणाली उज्वल पाटील- महाजन
(लेखिका जर्मनीस्थित फार्मासिस्ट आहेत.)

एक प्रतिक्रिया

Comments are closed.