घरफिचर्सशरद पवारांच्या स्वप्नात पंतप्रधानपदाची खुर्ची!

शरद पवारांच्या स्वप्नात पंतप्रधानपदाची खुर्ची!

Subscribe

पंतप्रधानपदाच्या खुर्चीपर्यंत जाण्यासाठी आधी पवारांनी महाराष्ट्रात खुंटा बळकट करून घेतला. माढा मतदारसंघात दोन उमेदवारांचा वाद झाला असे चित्र निर्माण करण्यात आले. मग कार्यकर्त्यांनी शरद पवार हेच निवडणुकीला उभे राहिले पाहिजेत, अशी इच्छा लावून धरली. स्वतः मग जाहीर सभेत प्रफुल्ल पटेल यांनी पवार निवडणुकीला उभे राहणार आहेत, असे जाहीर केले. पटेल यांच्यानंतर भाषण करत हे माझे नाही, आमच्या नेत्यांचे मत आहे, अशी मखलाशी केली आणि शेवटी तो मी नव्हेच, असा बेमालूम अभिनय करत आता पवार निवडणुकीला उभे राहणार आहेत… काय टायमिंग आहे. मस्त!

जेथे कमी तेथे शरद पवार, असे भारतीय राजकारणात बोलले जाते. आताही देशात निवडणूकरुपी कुरुक्षेत्रावर अस्थिरतेची परिस्थिती असताना विरोधकांची मोट बांधून बारामतीकर भाजपला सत्तेवरून खाली खेचायला निघाले आहेत. ‘नरेंद्र मोदी हटाव’चा नारा देत ते नवी दिल्लीतील ६, जनपथवर मुक्काम ठोकून आहेत… नको नको म्हणत ते माढा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहणार आहेत. २०१४ ला मी आता कुठलीही निवडणूक लढवणार नाही, अशी राणा भीमदेवी थाटात शपथ घेणारे पवार आता राज्यसभेतून लोकसभेत उतरतील. पवारांची ही चाल नेहमीप्रमाणे सरळ नाही. मोदीरुपी सुनामी समोर दाखवून ते विरोधकांना एकवटत असले तरी त्यांच्या स्वप्नात आहे ती ‘पंतप्रधानपदाची खुर्ची’. आतापर्यंत कधी पूर्ण न झालेले देशाच्या सर्वोच्च पदाच्या खुर्चीचे स्वप्न त्यांना साकारायचे आहे. मराठी माणसांना त्याचा नक्की आनंद होईल. पण, विश्वासार्हतेचे काय करायचे? ती कुठून आणणार…?

- Advertisement -

२०१४ साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ वर्षांच्या भ्रष्टाचारी सरकारला जनतेने सत्तेवरून खाली खेचले. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आणि या सरकारला न मागता राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला. कशासाठी? सत्तेशिवाय पवार आणि त्यांचा पक्ष राहू शकत नाही, हेच ही घटना दाखवत होती. न झालेल्या सिंचनाचे हजारो कोटी खाऊन (गेले पाच वर्षे या आरोपाचे बैलगाडीभर पुरावे शोधून काढत अजित पवार आणि सुनील तटकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणे प्रयत्न करत आहेत.)

ढेकरही आलेला नसताना पुन्हा सत्तेसाठी हपापलेपण दाखवणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस हा कुठलाच तत्व असलेला पक्ष नाही. ना उजवी, ना डावी, ना समाजवादी कसलीच भूमिका नाही. यांची एकच भूमिका सत्ता. सत्तेतून पैसा, पैशातून राजकारण आणि पुन्हा तेच. आताही मोदींचा हुकुमशाही चेहरा दाखवून शरद पवार आणि त्यांच्या पक्षाला सत्ता मिळवायची आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात पुलोद सरकार स्थापन करताना कुठलाच विधिनिषेध न बाळगता वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोद सरकार स्थापन करत स्वतः मुख्यमंत्री झालेल्या पवारांचे राजकारण देशातील जनता आज ओळखत नाही. सोनिया गांधी यांनी काँग्रेसची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्या परदेशी असल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसपासून वेगळी चूल मांडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणार्‍या पवारांचे सत्तेचे राजकारण काँग्रेस ओळखून आहे. आतापर्यंत राहुल गांधी हे परिपक्व राजकारणी नाहीत, असा सूर लावत त्यांची पप्पू म्हणून होत असलेल्या हेटाळणीत अदृश्य हातभार लावणार्‍या पवार यांना गेल्या काही महिन्यांत अचानक राहुल हे जाणते राजकारणी कसे काय वाटू लागले? ही सगळी सत्तेच्या जवळ जाण्याची गणिते आहेत. एक त्यातल्या त्यात बरे आहे की गांधी परिवार पवारांच्या राजकारणाची पक्की नस ओळखून आहे.

2012 साली महाराष्ट्रात सत्तेतील संस्थानिकांसाठी सत्ता राबविणार्‍या राष्ट्रवादीला वेसण घालण्यासाठी शेवटी सोनिया यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्रात पाठवले आणि पवारांच्या पक्षाची कोंडी केली. भले काँग्रेसला सत्ता गमावण्याची शिक्षा भोगावी लागली, पण त्यांनी राष्ट्रवादीला धडा शिकवला. यासाठी सोनिया आणि पृथ्वीराज यांचे महाराष्ट्रातील जनता आभारी राहील.

शरद पवारांवर विश्वास कोणी आणि कधी ठेवायचा. मोदी त्यांचे काही महिन्यांपूर्वी मित्र असतात. त्यांचा सल्ला घेऊन चाललात आणि आता अचानक त्यांचे राजकारण हुकूमशाही असल्याचे दिसते. याआधी पवारांना ते दिसले नव्हते. गुजरातमध्ये 1992 नंतर मोदी यांनी जे काही झाले होते ते पवार मैत्रीच्या नावाखाली विसरले होते की काय? भूमिका स्पष्ट असावी. उजवी किंवा डावी. मैत्रीच्या नावाखाली भूमिकेशी तडजोड करता येत नाही. पण, सत्तेसाठी तडजोड हेच पवारांच्या राजकारणाचे सूत्र आहे आणि देशात आगामी लोकसभा निवडणुकीत त्रिशंकू अवस्था असेल तर आपल्याला पंतप्रधान मिळवणे, सोपे जाईल असा पवारांचा अंदाज आहे. आणि सध्या तरी सत्तेचा सर्वात प्रथम वास येणारा या देशात पहिले राजकारणी असतील तर जाणता राजा…शरद पवार!

पंतप्रधानपदाच्या खुर्चीपर्यंत जाण्यासाठी आधी पवारांनी महाराष्ट्रात खुंटा बळकट करून घेतला. माढा मतदारसंघात दोन उमेदवारांचा वाद झाला असे चित्र निर्माण करण्यात आले. मग कार्यकर्त्यांनी शरद पवार हेच निवडणुकीला उभे राहिले पाहिजेत, अशी इच्छा लावून धरली. स्वतः मग जाहीर सभेत प्रफुल्ल पटेल यांनी पवार निवडणुकीला उभे राहणार आहेत, असे जाहीर केले. पटेल यांच्यानंतर भाषण करत हे माझे नाही, आमच्या नेत्यांचे मत आहे, अशी मखलाशी केली आणि शेवटी तो मी नव्हेच, असा बेमालूम अभिनय करत आता पवार निवडणुकीला उभे राहणार आहेत… काय टायमिंग आहे. मस्त! कार्यकर्ते आणि नेत्यांची इच्छा आहे म्हणून पवार निवडणूक लढवत आहेत, असे कारण पक्षाकडून देण्यात येत असले तरी ते मुळीच पटणारे नाही. पवारांच्या इच्छेनुसार राष्ट्रवादीत इकडची काडी तिकडे हलणार नाही. मग तो माढातील उमेदवारीचा वाद असो की तटकरेंच्या घरातील वाद असो की सातार्‍यातील दोन राजेंमधील वाद असो…पवारच सर्व सूत्रे हलवणार!

आपल्या घरच्या मैदानावर काम फत्ते केल्यानंतर पवार दिल्लीतून पंतप्रधानपदाच्या पेरणीसाठी विरोधकांच्या एकत्रीकरणाच्या कामाला लागले आहेत. हे काम करत असताना कोण कोणाच्या विरोधात आहे, याचा ते अंदाज घेत आपल्या खुर्चीचे पाय बळकट करून घेत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे विळ्या भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. मात्र पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला दोघेही हजर होते. काँग्रेसचे नेतृत्व मान्य करण्यास प्रादेशिक पक्ष तयार नाहीत आणि ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू या प्रादेक्षिक पक्षांच्या नेत्यांची महत्त्वाकांक्षा वाढली असली तरी काँग्रेस त्यांना महत्त्व देण्यास तयार नाही, हा आणखी एक गुंता आहे.

दुसरी गुंतागुंत आहे ती मायावती आणि अखिलेश यादव यांची. या दोघांना उत्तर प्रदेशमध्ये दबल्या गेलेल्या काँग्रेसला पुन्हा जिवंत करायचे नाही. हे दोघे काँग्रेसला वार्‍यावर सोडून आघाडी करून मोकळे झालेत. या दोघांना पवारांच्या कानाला लागून बोलायला आवडते. पण, राहुल यांच्याबरोबर मोकळेपणाने चर्चा करता येत नाही. डाव्या पक्षांच्या नेत्यांबरोबर पवारांचे मधूर संबंध. पण, हेच डावे ममता यांना डाव्या डोळ्यांनी बघून घेत नाहीत, अशी गोची झालीय… चंद्राबाबू नायडू हे सध्या पवारांच्या उजव्या कानात बोलतात, तर देवेगौडा डाव्या कानाला लागून आहेत. पवारांना त्यांचा सर्वात आवडता राजकारण हा खेळ खेळण्याची संधी बर्‍याच वर्षांनी चालून आली आहे आणि तीसुद्धा दिल्लीत.

निकालानंतर कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसेल तर १९९६ साली निर्माण झाली तशी परिस्थिती होऊ शकते. विशेष म्हणजे आघाड्यांच्या राजकारणात कुणी विचार करू शकत नाही, अशा व्यक्ती पंतप्रधान झालेल्या आपण पहिल्या आहेत. १९९६ साली जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी. देवेगौडा आणि १९९७ मध्ये इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान झाले होते. पंतप्रधानपदासाठी पुरेसे संख्याबळ नसताना हे दोघे पंतप्रधान झाले. आताची परिस्थिती 22 वर्षांपूर्वीसारखी असल्याचे पवारांना दिसत आहे आणि हे अस्थिरतेचे पोषक वातावरण आपल्याला पंतप्रधानपदाच्या खुर्चीपर्यंत घेऊन जाऊ शकते, यासाठी केरळपासून ते काश्मीरपर्यंतच्या प्रत्येक नेत्याला पवार भेटत आहेत. आता आपलेच राज्य येणार आहे, असे सांगत आहे. तुम्ही कामाला लागा, मी मागे उभा आहे… असा सूर लावत आहेत. कारण आता या घडीला निवडणूकपूर्व आघाडी आणि त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी तडजोडी करण्याकरिता जी काही बार्गेनिंग पॉवर लागते ती पवारांकडे पुरेपूर आहे… पंतप्रधानपदाची खुर्ची स्वप्नात यायला लागल्यापासून पवारांची ही पॉवर वाढत चालली आहे.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -