घरफिचर्ससमकाळ, तरडे आणि डिसलाईक

समकाळ, तरडे आणि डिसलाईक

Subscribe

निर्माता दिग्दर्शक असलेल्या प्रवीण तरडेंच्या संविधानावर गणपती बसवण्याच्या कृतीने समाजमन ढवळून निघाले. वादाच्या ठिणग्यांनी सोशल मीडिया पेटून उठला आहे. माफिनाम्यापासून ते देशद्रोहाच्या खटल्यापर्यंत चर्चा सुरु झाली आहे. तरडे हे खरे तर खूप उत्तम दिग्दर्शक आहेत. त्यांच्या ‘मुळशी पटॅर्न’ची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. पण त्यांची ही कृती खूप निंदनीय म्हणावी लागेल. त्यांनी हे जाणतेपणाने केले की अजाणतेपणाने केले हे तेच सांगू शकतील. मात्र ही घटना आपल्या सामाजिक सलोख्याला बाधा आणणारी ठरली. स्वास्थ्य बिघडवणारी ठरली. मुळात संविधान आणि गणपती या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत.

सांप्रत काळ हा प्रचंड गोंधळाचा आणि भयाचा आहे. हे आता आपल्याला नाकबूल करता येणार नाही. कोरोनाने आपल्याला संपूर्ण जगण्याला एक मोठा वेढा दिला आहे. आपल्या जगण्या वागण्याच्या सार्‍या तर्‍हा वेगाने बदलत आहेत. सुमारे सहा महिन्यांपासून आपली दैनंदिनी विस्कळीत झाली आहे. रोज वाढत चाललेली रुग्णांची संख्या आणि त्याचबरोबर वाढत चाललेली बेफिकिरी हा विरोधाभासही आपल्याला नजरेआड करता येत नाही. सरकारी अनास्था, हतबलता आणि सामान्यांची अगतिकता असा एक त्रिकोण आज पाहायला मिळतो आहे. शासन नावाच्या व्यवस्थेला न जुमानता लोकांनी आपल्या जगण्याची दारं उघडी केली आहेत. अर्थात त्यावाचून पर्यायही नव्हता, हे खरे असले तरी किमान व्यक्तिगत स्तरावर जी काळजी घेतली जायला हवी, तीदेखील आता घेतली जात नाहीये. उत्सवांच्या काळातली ही बेसुमार गर्दी माणसांना मोठ्या संकटाकडे घेऊन तर जाणार नाही ना? अशी भीती वाटावी अशी परिस्थिती आहे.

ऑगस्ट महिना हा तर सण आणि उत्सवांचा. लोकांच्या धार्मिक भावना आणि श्रद्धेचा एक व्यापक पूर या काळात पाहायला मिळतो. तथापि, दरवर्षीप्रमाणे यावर्षी तसे काही होणार नाही असे प्रारंभी वाटत होते. मात्र लोक थांबले नाहीत. धर्माशी, अस्मितेशी लोकांचे इतके घट्ट जोडले जाणे अशा संकटकाळातही कायम आहे. माणूस जराही आपल्या भावनांपासून विभक्त होऊ इच्छित नाही. हे आश्चर्य वाटण्यासारखेच आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा रस्ते आणि बाजारपेठा माणसांनी आणि वाहनांच्या गर्दीने गजबजून गेल्या आहेत. आजूबाजूला सायरन वाजवत अ‍ॅम्ब्युलंस धावत आहेत. रोज रोज पॉझिटिव्ह-निगेटिव्हचे आकडे टीव्ही आणि मोबाईलवर येऊन आदळत आहेत. खर्‍या खोट्या डॉक्टरांच्या शेकडो अज्ञात टिप्स व्हायरल होत आहेत. ऑनलाईन शिकवण्यांनी मुलांचे कान बधिर झाले आहेत. म्हणजे जे जे यापूर्वी घडत होतं ते सगळं बिनदिक्कत घडत आहे. नकारात्मक गोष्टींची सवय होत जाणं ही गोष्ट फारशी बरी नाही, पण दुर्दैवाने तिच गोष्ट घडत आहे. म्हणजे मानवी अस्तित्वाची लढाई सर्वत्र सुरू असताना वादविवादांनाही खंड नाहीच.

- Advertisement -

निर्माता दिग्दर्शक असलेल्या प्रवीण तरडेंच्या संविधानावर गणपती बसवण्याच्या कृतीने समाजमन ढवळून निघाले. वादाच्या ठिणग्यांनी सोशल मीडिया पेटून उठला आहे. माफिनाम्यापासून ते देशद्रोहाच्या खटल्यापर्यंत चर्चा सुरु झाली आहे. तरडे हे खरे तर खूप उत्तम दिग्दर्शक आहेत. त्यांच्या ‘मुळशी पटॅर्न’ची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. पण त्यांची ही कृती खूप निंदनीय म्हणावी लागेल. त्यांनी हे जाणतेपणाने केले की अजाणतेपणाने केले हे तेच सांगू शकतील. मात्र ही घटना आपल्या सामाजिक सलोख्याला बाधा आणणारी ठरली. स्वास्थ्य बिघडवणारी ठरली. मुळात संविधान आणि गणपती या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. संविधान हा आपल्या भारतीय लोकशाहीचा पाया आहे. ते एक मूल्य आहे. आधुनिक भारताची उभारणी करणारे ते एक तत्त्व आहे. तो केवळ एक तांत्रिक मसुदा नाही. तर तात्त्विक मूल्य जोपासणारी ती एक वैश्विक संहिता आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक न्यायासह आचार विचार, धर्म, श्रद्धा यांचे स्वातंत्र्य आणि समानता देणारा तो एक प्रगतीशील आणि विवेकी विचार आहे.

तर गणपती ही पौराणिक हिंदू धर्मातील एक देवता आहे. या देवतेची पूजा पुरातन काळापासून केली जाते. विशेषतः महाराष्ट्रात तर गणपतीशिवाय कोणत्याही चांगल्या कामाचा, व्रतवैकल्याचा प्रारंभ होत नाही. अगदी लोककलेपासून ते विवाहविधीपर्यंत गणपतीची उपस्थिती अनिवार्य असते. म्हणूनच हिंदू धर्मात गणपतीचे स्थान खूप वरचे आणि पुष्कळच सर्वमान्य आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी लोकमान्य टिळकांनी (भाऊ रंगारी यांनाही हे श्रेय दिले जाते.) गणेशोत्सवाची सुरुवात केली. गणपतीचे हे सार्वजनिक रूप दिवसेंदिवस अधिक सार्वत्रिक होत आहे. अनेक ठिकाणी तर विविध धर्मीय लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. कारण अनेकांची या देवतेवर श्रद्धा आहे. तरडे यांचीही असावी, पण म्हणून थेट अगदी संविधानावरच गणपती बसवावा, हे मात्र त्यांच्या वैचारिक कोतेपणाचे लक्षण म्हणावे लागेल.

- Advertisement -

या घटनेच्या खोलात आता जायला नको, पण यानिमित्ताने हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे की, आजचा काळ हा आत्यंतिक संवेदनशील झाला आहे. कोणत्याही घटनेचे पडसाद उमटू शकतात. लोकांच्या भावना खूप तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे आपली एखादी व्यक्तिगत कृती सार्वजनिक करताना खूप काळजी घ्यायला हवी. विशेषतः सेलिब्रिटी आणि नेत्यांनी तर याबाबत अधिक सजग असायला हवे. आजच्या काळात कोणतीही गोष्ट खाजगी राहिलेली नाही. एखाद्याची कृती पटली नाही तर बघता बघता ट्रोलिंग सुरू होते. या ट्रोलिंगवर आता कुणाचेही नियंत्रण राहिले नाही. याचा अर्थच असा की आज कुणालाही गृहीत धरता येणार नाही. सांस्कृतिक क्षेत्रात तर याचे पडसाद लवकर उमटतात.

अगदी काही दिवसांपूर्वी महेश भट यांच्या ‘सडक-2’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाला. सुशांत सिंहच्या संशयास्पद मृत्यूच्या पार्श्वभूमीवर घराणेशाहीवर आरोप करत देशभरातल्या कोट्यवधी लोकांनी युट्यूबवर निषेधाचा अंगठा उमटवला. म्हणजे या ट्रेलरला कोट्यवधी लोकांनी ‘डिसलाईक’ केले. नापसंती दर्शवण्याची ही नवी परिभाषासुद्धा खूप अनोखी म्हणावी लागेल. हा निषेधाचा एक प्रतिकात्मक प्रकार पुढच्या काळात अधिक वाढत जाणार आहे. कारण बदलत्या काळाबरोबर माणसं अधिक संवेदनशील होत आहेत. आपल्या भूमिकांबाबत खूप आग्रही होत आहेत. आणि त्यातूनच ते अधिक ‘रिअ‍ॅक्ट’ होत आहेत. अशावेळी आपल्याकडून कोणतीही विवेकहीन कृती घडू नये याची काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा त्याचे परिणाम एकूणच आपल्या स्वास्थ्याला मारक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

=पी. विठ्ठल
-(लेखक नामवंत कवी असून नांदेड विद्यापीठात प्राध्यापक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -