सनातनी नाही; महाराष्ट्र पुरोगामीच

पुरोगामी विचारांचा वारसा हा आपल्याला संतांनी दिला आणि समाजसुधारकांनी तो पुढे नेला. आज महाराष्ट्र भारतात इतर राज्यांपेक्षा विचारांनी आणि कृतीने मोठे का आहे, याचे सार या पुरोगामी संचितात मिळते. हा वारसा पुढे नेण्याचे मोठे काम आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे. भले आज दिवस सनातन्यांसाठी पोषक असतील, पण तसे दिवस तर याआधीही होते... आणि म्हणूनच आपले संत आणि समाजसुधारक यांचे कार्य काळ्याकुट्ट अंधारात उजळून निघाले. पुरोगामी विचारांची थट्टा उडवली जाण्याच्या या काळात जागोजागी समाजात विष पेरणारे भेटतील, पण त्यांना ओलांडून पुढे जाण्याचे कार्य आपण सर्वांनी हातात हात घालून पुढे न्यायचे आहे.

Mumbai

दोन महिन्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सहा वर्षे पूर्ण होतील. आजही त्यांच्या मारेकर्‍यांना शिक्षा झालेली नाही. मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेवर जोरदार ताशेरे मारल्यानंतर सीबीआयने तपासाचा वेग वाढवून हत्येचे कोडे सोडवण्यासाठी पावले उचलली आहेत आणि हे पाऊल म्हणजे अंधारात पणती पेटल्याचे समाधान देणारे आहे. आता या केसचा निकाल कधी लागतो ते बघूया. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या आयुष्यभर पुरोगामीत्व जपणार्‍या विचारवंतांच्या हत्या करणार्‍या मारेकर्‍यांनाही अजून शिक्षा झालेली नाही. परिस्थिती फार आशादायक नसली तरी अजूनही आशेचा किरण कायम आहे. महाराष्ट्र पुरोगामी राहावा आणि पुढे जावा यासाठी धडपड करणारी माणसे अजूनही आजुबाजूला आहेत आणि ती आपापल्या परीने काम करतायत.

आताच्या सोशल मीडियाच्या जमान्यात त्यांची कामे ब्रेकिंग न्यूज नसल्याने लोकांच्या समोर ती प्रकर्षाने येत नाहीत, एवढेच काय ते… आता लोकांना तैमुर सैफ अली खान शी शी करतो का सू सू यात रस असेल तर त्यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे. तो कोण बिचकुले का फिचकुलेसारख्या भंपक माणसाचे माकडचाळे लोक आपला दिवसाचा तासभर वाया घालवून बघणार असतील तर मला बिचकुलेची दया येत नाही तर त्याला बघणार्‍यांच्या अकलेचे बारा वाजले म्हणावेसे वाटते. मेंदू गहाण ठेवून ‘बिग बॉस’सारखे कार्यक्रम बघणारी पिढी महाराष्ट्रात तयार होते, हे दुर्दैव असले तरी अविनाश पाटील, श्याम मानव, डॉ. प्रकाश आमटे कुटुंबीय, डॉ. अभय बंग परिवार, मेधा पाटकर, उल्का महाजन, सुरेखा दळवी, सुबोध मोरे, प्रतिभा शिंदे, अनिता पगारे, प्रभाकर नारकर, सत्यजित चव्हाण, प्रवीण मोते, बिलाल खान आणि शांतपणे गावाकुसात खेडोपाड्यात काम करणारे असंख्य कार्यकर्ते हे महाराष्ट्राचे संचित आहे. सनातनी नाही, महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि तो राहणार…

मी हे का म्हणतोय. मला विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात अविनाश पाटील भेटले. दाभोलकर यांचे कार्य ते पुढे नेत आहेत. डॉक्टरांनी तयार केलेला हा धुळ्याचा कार्यकर्ता पायाला भिंगरी लावल्यासारखा फिरत आहे. चांदा ते बांदा अशा उभ्या आडव्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम पुढे नेत आहे. लवकरच तो एक मोठा कार्यक्रम घेऊन संघटना सक्षम करणार आहे. सदरा, लेंगा, साधी चप्पल आणि खांद्याला शबनम पिशवी असा अविनाशचा साधा वेष, राहणी आणि त्याचे पुरोगामी प्रगत विचार आपल्या राज्याच्या परंपरेला पुढे नेणारे आहेत. पस्तीसीचा सत्यजीत चव्हाण पर्यावरण वाचवण्यासाठी करत असलेला आक्रोश नवीन कार्यकर्त्यांना उत्साह देणारा आहे. मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, सुरेखा दळवी, उल्का महाजन, अनिता पगारे श्रमिकांचे, कष्टकर्‍यांचे आवाज बुलंद करण्याचे आंदोलन पुढे नेत आहेत. सत्यजीतप्रमाणे बिलाल खान हा युवा कार्यकर्ता माहुल आंदोलनातून पुढे आला असून, त्याच्याकडून खूप भरीव काम होईल. प्रभाकर नारकर, सुबोध मोरे यांचा संघर्ष आजही कायम आहे.

या सार्‍याची मुळे आपल्या पुरोगामी परंपरेत आहेत. आजुबाजूला अंधार असताना कोण तरी एक पणती पेटवण्यासाठी पुढे होतो आणि नंतर हजारो पणत्यांच्या प्रकाशात लाखो लोकांचे जीवन लखाखून निघते… शिवछत्रपती शिवाजी महाराज पुरोगामी होतेच. ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागू देऊ नका’ अशी सक्त ताकीद ते आपल्या मावळ्यांना द्यायचे. लोककल्याणकारी राज्याची, तेव्हाच्या काळात अनपेक्षित अशी भूमिका आणि कृती, शिवाजी महाराजांनी आयुष्यभर केली. अनेक वर्षांची गुलामगिरी संपवून आपल्यातला एक जण स्वतंत्र राजा होतोय याने आनंदी होण्याऐवजी अशा राजाच्या राज्याभिषेकाला तत्कालीन सनातनी शक्तींनी जातीपातीच्या मुद्यावर विरोध केला होता. नंतरच्या काळात संभाजीराजे आणि ब्राह्मणी अष्टप्रधान हा संघर्ष अधिक टोकदार झाला आणि टप्प्याटप्प्याने सनातनी शक्ती शिरजोर होत गेल्या. राजाराम महाराजांची कारकीर्द, त्यांचे सल्लागारांवर अवलंबून असलेले राजकारण, नंतर शाहू महाराजांची कारकीर्द आणि त्यामध्ये पेशवाईची सुरुवात हा घटनाक्रम आपल्यासमोर आहेच. डोंगराएवढ्या कर्तृत्ववान बाजीरावालाही प्रतिगाम्यांनी छळलंच. उत्तर पेशवाईत जातीपातींचा आणि कर्मकांडांचा अतिरेक झाला. काही लोकांना अस्पृश्य मानून कंबरेला झाडू आणि गळ्यात मडकं अडकवण्याची सक्ती केली गेली. या उलट ब्रिटिशांनी त्याच अस्पृश्यांच्या कंबरेला मानाची तलवार आणि छातीवर शौर्य पदकं लावली आणि पेशवाईचा पराभव केला. आधी स्वातंत्र्य का आधी समाज सुधारणा या वादात टिळकांनी आगरकरांच्या विरुद्ध भूमिका घेतली. शाहू महाराज आणि सनातनी यांच्या वेदोक्त का पुराणोक्त या वादात टिळकांच्या समोर सोन्याच्या ताटात पेश केलेली, पुरोगामी भूमिका घेण्याची ऐतिहासिक सुसंधी आली होती. टिळकांची त्याकाळची राजकीय आणि सामाजिक ताकद पाहता त्यांनी जरी शाहू महाराजांच्या बाजूने बहुजनवादी भूमिका घेतली असती तरी त्यांना विरोध झाला नसता, पण टिळकांनी त्यांच्या प्रवृत्तीधर्माला अनुसरून सनातन्यांची बाजू घेतली. मग शाहू महाराज आणि टिळक आयुष्यभर भांडत राहिले.

गांधीजी-राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हे धार्मिक होते, पण त्याहूनही जास्त ते मानवतावादी होते. गांधीजी हे पुरोगामी हिंदू असून, सनातनी धर्माला आतून पोखरून टाकतील याची अट्टल सनातन्यांना मोठी भीती होती. त्यातच गांधीजींची अस्पृश्यता निवारणाची चळवळ, मुस्लीम अनुनयाचं राजकारण, फाळणी, मुस्लिमांचे अत्याचार असे ठपके ठेऊन शिक्षा सुनावून त्यांचा खून करण्यात आला. राष्ट्रपित्याचा खून करून गोंधळ माजवून देऊन त्या धुरळ्यात नवजात भारतवर्षाचा ताबा घ्यायचा असे सनातन्यांचे व्यापक कारस्थान होते, असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे, पण गांधीजींवर या देशातील जनता करत असलेले अपरंपार सच्चे प्रेम सनातन्यांना दिसू शकले नाही.

पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी संघर्षातील अजून एक अध्याय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करून सनातन्यांनी लिहिलाय. तुम्ही डोक्यात विचार घालता आणि ते आम्हाला पटत नाही म्हणून आम्ही तुमच्या डोक्यात गोळी घालू आणि तुम्हालाच संपवून टाकू, असा हा उफराटा तर्क आहे. सनातन्यांचे इतरांचा बुद्धीभेद करण्याचे तंत्र चांगले आहे, पण ते धार्मिक उन्माद आणि भावनेवर आधारित आहे. शंभर वर्षांपूर्वी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा कायदा राजर्षी शाहू महाराजांनी केला होता. महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंनी अस्पृश्यता नष्ट करायला आयुष्य खर्ची घातले. दलिताला चहाचं दुकान काढून देऊन तिथे चहा प्यायला राजर्षी शाहू महाराज जात असत. शाळा, घरे, शिक्षण, पाणी, शेती आणि पुरोगामी विचार असा हा जाणता राजा होता. देवळात पुजार्‍याचे पोट राहते सांगणार्‍या गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांनी लोकांमध्ये कीर्तन परंपरा पुढे नेत प्रत्यक्ष लोकांमध्ये काम करून बोले तैसा चाले हे आपल्या वागण्यातून दाखवून दिले. साने गुरुजींनी अवघ्या जगाला माणुसकीच्या प्रेमाचा धडा दिला आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी सनातन्यांना ठोकून काढत पुरोगामी विचारांची पताका फडकवत ठेवली.

मानवी प्रवृत्तींमधील पुरोगामी आणि प्रतिगामी हा झगडा चिरंतन आहे. आहार, निद्रा आणि मैथुन या जैविक प्रेरणांच्या पातळीवर असलेल्या आदिम मनुष्यप्राण्यांमध्येही असा झगडा असणं शक्य आहे. ज्ञात मानवी इतिहासात आपल्याला स्पष्टपणे हा झगडा दिसतो आणि दिसत राहील. पुरोगामी म्हणजे वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असणारे लोक. सर्वसाधारणपणे पुरोगामी हे प्रगतीवादी, प्रयत्नवादी, सुधारणावादी, समतावादी, गतीवादी, सर्वसमावेशक विचार करणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, पुढे बघून चालणारे, सहिष्णू, परोपकारी आणि धर्मनिरपेक्ष असतात. साहजिकच पुरोगामी विचारांचे लोक दैववादी, मनुवादी, धर्मवादी, कर्मविपाकसिद्धान्तवादी, शब्दप्रामाण्यवादी आणि कट्टर धार्मिक नसतात. अखिल मानवजातीचं अधिक भलं कसं होईल, या दृष्टीने पुरोगामी लोक विचार करतात. त्यांना हे माहीत असतं की, या जगात ‘बदल’ हीच एक शाश्वत गोष्ट आहे. या उलट प्रतिगामी व्यक्ती सर्वसाधारणपणे सनातनी विचारांच्या, मागे बघून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार्‍या, असहिष्णु, कट्टर धार्मिक, दैववादी, शब्दप्रामाण्यवादी, धर्मग्रंथवादी, मनुवादी, संकुचित विचारांच्या, आपल्याच कंपूचं फक्त कसं भलं होईल हे पाहणार्‍या, स्थितिवादी, सतत भूतकाळाचे दाखले देणार्‍या असतात.
एखादी व्यक्ती बालपणातून तरुणपणात प्रवेश करताना पुरोगामी विचारधारेची का व कशी होते आणि त्याच परिस्थितीतील दुसरी व्यक्ती सनातनी कशी होते, हे पाहणं मानसशास्त्रज्ञांच्या संशोधनाचा विषय असू शकतो, पण सामान्यपणे आपल्याला असं म्हणता येईल की, व्यक्तीचं बालसंगोपन, आरोग्य, बौद्धिक आणि भावनिक क्षमता, अभ्यास, आकलन यातून व्यक्तीची भूमिका ठरत असते.

प्रत्यक्ष युद्धातील जय-पराजय जसे ऐतिहासिक आणि राजकीय बदल घडवतात, तसेच हे संघर्ष सामाजिक बदल घडवतात. समाजमन कूस बदलतं, वैचारिक ध्रुव बदलतात. नंतरच्या काळात हा संघर्ष संत ज्ञानेश्वर यांनी केला. सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी संन्यासधर्म सोडून परत गृहस्थ बनलेल्या ज्ञानदेवांच्या मातापित्यांना तत्कालीन सनातन्यांनी एवढा जीव नकोसा करून टाकला की, त्यांनी कोवळ्या वयाच्या चार तेजस्वी पोरांना पोरकं करून नदीत आत्महत्या केली. सनातन्यांचं वैर पिढीजात होतं. त्यांनी मुलांना पण वाळीत टाकलं. या पार्श्वभूमीवर तत्कालीन देववाणीत म्हणजे संस्कृत भाषेत असलेलं ज्ञान ‘परि अमृताते पैजा जिंके’ अशा प्राकृत मराठी लोकभाषेत आणण्याचं बंडखोर कार्य ज्ञानदेवांनी केलं. वेदांचं सार असणार्‍या श्रीमत्भगवतगीतेचं भावार्थदीपिकेत म्हणजेच ज्ञानेश्वरीत रूपांतरण हे त्यांनी जनसामान्यांसाठी केलेलं एक मोठंच कार्य होय. अशा ज्ञानदेवांनी अकाली समाधी घेतली, पण त्यांनी स्थापन केलेला समतावादी भागवत वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात सर्वदूर पसरला. याच विचारांच्या अधिक बंडखोर तुकोबांनी प्रस्थापित व्यवस्थेला जोरदार हादरे दिले. याच संप्रदायातील स्वतः निरक्षर असलेल्या गाडगेबाबांनी महाराष्ट्रात बुद्धिप्रामाण्यवादाची सुरुवात केली.

पुरोगामी विचारांचा वारसा हा आपल्याला संतांनी दिला आणि समाजसुधारकांनी तो पुढे नेला. आज महाराष्ट्र भारतात इतर राज्यांपेक्षा विचारांनी आणि कृतीने मोठे का आहे, याचे सार या पुरोगामी संचितात मिळते. हा वारसा पुढे नेण्याचे मोठे काम आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे. भले आज दिवस सनातन्यांसाठी पोषक असतील, पण तसे दिवस तर याआधीही होते… आणि म्हणूनच आपले संत आणि समाजसुधारक यांचे कार्य काळ्याकुट्ट अंधारात उजळून निघाले. पुरोगामी विचारांची थट्टा उडवली जाण्याच्या या काळात जागोजागी समाजात विष पेरणारे भेटतील, पण त्यांना ओलांडून पुढे जाण्याचे कार्य आपण सर्वांनी हातात हात घालून पुढे न्यायचे आहे. पांडुरंगाच्या भेटीसाठी जिवाच्या ओढीने पंढरपूरला जाणारा कष्टकरी आठवा… त्याला कुठली अशी ओढ लागली आहे. मुळात त्याला काही नको आहे. नवस बोलून त्याला बा विठ्ठलाला कोणतीही लाच द्यायची नाही… वर्षभर मी जे काही कष्ट करेन त्यासाठी मला ताकद दे, एवढेच तो मागतो आहे. आपणही आपापल्या जागी राहून तेच करायचे. बुद्धीची आणि मनाची कवाडे उघडी ठेवून पुरोगामी विचारांचा वारसा पुढे न्यायचा आहे. सनातनी नाही, महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि तो राहणार!