घरफिचर्सपर्यावरणाला जपा, पर्यावरण तुमच्या हृदयाला जपेल!

पर्यावरणाला जपा, पर्यावरण तुमच्या हृदयाला जपेल!

Subscribe

करोनामुळे आज संपूर्ण जग संकटात आहे. मानवी जीव, मानवाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यावरणाशी, निसर्गाशी मानवाने जो खेळ केला त्याची ही परतफेड निसर्ग करत आहे. माणसाने अजूनही सावध झालं पाहिजे, आपल्याला निर्माण करणार्‍या प्रकृतीचे रक्षण केले पाहिजे, असे मत ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संजय तारलेकर यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केले. पर्यावरणाला जपा, पर्यावरण तुमच्या हृदयाला जपेल, त्याची काळजी घेईल, असा सल्ला देखील डॉ. संजय तारलेकर यांनी यावेळी दिला.

डॉ. तारलेकर पुढे म्हणाले, पृथ्वीवर अनेक संकट येतात. पर्यावरणाचा समतोल ढासळतो. याला माणूस जबाबदार आहे. वाढत्या प्रदूषणामुळे मानवाचे शरीर कमजोर बनलंय. मानवी शरीर ज्या हृदयामुळे चालते, जिवंत राहते, त्या आपल्या हृदयाला शुद्ध ऑक्सिजन देखील आपण देऊ शकत नाही. सिमेंटची जंगलं उभी करायला झाडांची कत्तल केली जाते. विकास हवाय, तोडलेल्या झाडांच्या बदल्यात नवी झाडे कोण लावणार? लावलेली झाडे कोण वाढविणार? गतिमान जीवनात माणूस आरोग्य आणि आयुष्य हरवलाय. तो कशासाठी धावतोय, कसे जगतोय याचे त्याला भान राहिलेले नाही. करोनासारख्या महामारीला आपणच कुठे तरी खतपाणी घालत असतो, याचे गांभीर्य माणसाने ओळखले पाहिजे, असे डॉ. संजय तारलेकरांनी नमूद केले.

- Advertisement -

दोन श्वासातील अंतर म्हणजे मानवाचे आयुष्य. ज्या क्षणाला श्वास बंद होतो, तिथे आयुष्य संपते. पण, या आयुष्यासाठी, हृदयासाठी, त्याच्या स्वास्थ्यासाठी आपण सतर्क आणि जागृत नाही. आपल्या चुकीच्या सवयींमुळे जगात, देशात हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. हृदयविकाराची समस्या आणि त्यात करोनाच्या भयाने हृदयावर होणारा आघात, असे दुहेरी संकट हृदय सध्या पेलत आहे, असे डॉ. तारलेकर यांनी नमूद केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. संजय तारलेकर यांनी हृदय रोग्यांसाठी विशेष सल्ला दिला आहे. हृदयाची सुरू असलेली पूर्वीची औषधे नियमित घ्यावीत, असा सल्ला सुप्रसिद्ध ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ तथा शुश्रूषा हार्टकेअर सेंटर अ‍ॅण्ड स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय तारलेकर यांनी दिला आहे. करोनाच्या संकटात आपले मनोबल टिकवून ठेवले पाहिजे, हृदयावर ताण पडेल असा मानसिक तणाव घेऊ नये, असे देखील डॉ. तारलेकर यांनी नमूद केले.

डॉ. संजय तारलेकर पुढे म्हणाले, ज्या व्यक्तींना हृदयाचा विकार आहे, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत, ज्यांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत, त्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर आणि नित्याने घ्यायला पाहिजेत. ती कोणत्याही परिस्थितीत बंद करू नयेत, असे आवाहन ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ, शुश्रूषा हार्टकेअर सेंटर अ‍ॅण्ड स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. तारलेकर यांनी केले.

- Advertisement -

डॉ. तारलेकर म्हणाले, हृदयाच्या रुग्णांनी टीव्हीवर करोनाच्या बातम्या मर्यादित पाहाव्यात. सतत बातम्या पाहण्याने हृदयावर दडपण येते व हृदयाचे ठोके वाढतात. कोणत्याही प्रकारचा तणाव हृदय रुग्णाने घेऊ नये. तणावामुळेही हृदयावरचे दडपण वाढते. हृदय रुग्णांनी आहारात भाजीपाल्याचा वापर जास्त करावा. वनस्पती तेल डालडा वापरलेले पदार्थ खाऊ नयेत. योग्य प्रकारे व्यायाम घरी करावा. हृदय रुग्णाला त्रास वाटल्यास त्याने त्वरीत हृदय रोगाची औषधे ज्या डॉक्टरांकडे सुरू आहेत, त्यांच्याशी संपर्क साधावा. त्यांनी दिलेली औषधे सुरू ठेवावीत. करोना हा वटवाघूळ प्राण्यापासून निर्माण झालेला विषाणू आहे. यापूर्वी 2002 साली अशाच प्रकारचा विषाणू मांजरापासून तर 2012 साली उंटापासून विषाणू निर्माण झाला होता. संसर्ग टाळणे हाच या रोगावरील रामबाण उपाय आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी पाळली, झाडं लावली, वाढवली, पर्यावरणाचा समतोल राखला तर आपल्या हृदयाला शुद्ध ऑक्सिजन मिळेल. माणसाची प्रतिकारशक्ती वाढेल, त्यामुळे संसर्ग रोखायला मदत होते, आपली, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहन डॉ. संजय तारलेकर यांनी शेवटी केले.

-डॉ. संजय तारलेकर हृदयरोगतज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -