पब्जीवाले

पब्जी गेमने भारतालाच नव्हे तर जगालाही हेलावून सोडले आहे. आज जगभरात ‘पब्जी’चे 40 कोटी खेळाडू आहेत. भारतात मोबाईल किंवा ऑनलाइन गेम खेळणार्‍यांमध्ये ‘पब्जी’वाल्यांचे प्रमाण 70 टक्के आहे. यावरून या खेळाच्या लोकप्रियतेची किंवा वेडाची व्याप्ती लक्षात येते. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने या खेळाबाबत चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही ‘शिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात एका पालकाने पब्जी गेम भारतातून हद्दपार करण्याचे आवाहन केले.

Mumbai
pubg addiction
पब्जी गेम

मुले नाहक चिडचिड करू लागले, त्यांच्यात हिंसक वृत्ती वाढीस लागली, बंद खोलीत अधिकाधिक वेळ व्यतीत करू लागले, त्यांना जेवणा-खाण्याचे भान राहिले नाही, त्यांच्या शैक्षणिक गुणांमध्ये अचानक मोठी तफावत दिसू लागली अथवा त्यांची शैक्षणिक प्रगती खालावली तर समजावे की त्यांना पब्जीचा नाद लागला आहे. एकाच वेळी शंभर लोकांबरोबर खेळता येणारा हा गेम तसा खूपच इंट्रेस्टिंग. पण तो अल्पावधीत खेळून संपत नसल्याने मुले त्यात गुंतत जातात. वास्तविक, पब्जी किंवा अन्य गेम हे अतिरंजक असतात. ते मुलांना आभासी जगात नेतात. त्यात रमताना त्यांच्या भावनांचा निचरा होतो. नेमकी हीच बाब या खेळांमुळे व्यसनाधीन विद्यार्थ्यांना आवडते. या गेमने भारतालाच नव्हे तर जगालाही हेलावून सोडले आहे. आज जगभरात ‘पब्जी’चे 40 कोटी खेळाडू आहेत. भारतात मोबाईल किंवा ऑनलाइन गेम खेळणार्‍यांमध्ये ‘पब्जी’वाल्यांचे प्रमाण 70 टक्के आहे. यावरून या खेळाच्या लोकप्रियतेची किंवा वेडाची व्याप्ती लक्षात येते. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने या खेळाबाबत चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही ‘शिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात एका पालकाने पब्जी गेम भारतातून हद्दपार करण्याचे आवाहन केले.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका विद्यार्थ्याच्या आईने पब्जीविषयी विचारलेला प्रश्न समाजमाध्यमांवर अजूनही गाजतो आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ या विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधणार्‍या कार्यक्रमात आपला मुलगा अभ्यासात अजिबात लक्ष देत नाही, सतत मोबाइलवर गेम खेळत असतो, अशी तक्रार आईने केली. त्यावर पंतप्रधानांनी ‘पब्जीवाला है क्या?’ अशी विचारणा केली आणि सभागृहात हशा पिकला. पण त्यानंतर ‘पब्जी’वाला है क्या’ फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर ‘मेम’चा विषय बनला. अहद निझाम या 11 वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्या वकील असलेल्या आई-वडिलांद्वारे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात पब्जीवर बंदी आणण्याची मागणी केल्याने या गेममुळे होणार्‍या दुष्परिणामांचे गांभीर्य भारतीयांना कळले. भारतात हा गेम वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे तो पाच-दहा हजार रुपयांच्या स्मार्ट फोनवरही खेळता येतो. इंटरनेट स्वस्तात उपलब्ध झाल्याने गेम खेळणारेही त्यामुळे वाढलेत. अतिशय कमी डेटाचा वापर करूनही आकर्षक ग्राफिक्स, उत्कंठावर्धक टप्पे आणि एकाच वेळी अनेकांसोबत गेम खेळण्याचा पर्याय यामुळे अल्पावधीतच ‘पब्जी’ लोकप्रिय झाला. आता तर हा केवळ खेळ उरलेला नाही तर, ‘पब्जी’ खेळणार्‍यांच्या व्यावसायिक स्पर्धा आता भारतात होऊ लागल्या आहेत.

लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे असलेल्या या स्पर्धेसाठी मुले कसून सराव करत आहेत. या बक्षिसांच्या लोभापायी ‘पब्जी’वाल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडते आहे. आजकाल कॉलेजच्या कट्ट्यावर केवळ पब्जीचाच खेळ रंगलेला दिसतो. एरवी लोकल ट्रेनमध्ये, रेल्वे स्थानकात, बिल्डिंगच्या पायर्‍यांवर किंवा पॅसेजमध्ये, कॉलेजच्या कट्ट्यावर किंवा वायफाय ‘फ्री’ मिळत असेल तिथे घोळके करून मोबाइलमध्ये गुंतलेली मुले पाहिली की, यांचं कसलं ‘चॅटिंग’ चाललंय, असा प्रश्न पाहणार्‍याच्या मनात येत असे. पण ही मुलं प्रत्यक्षात ‘पब्जी’त रमलेली असतात, हे आता लक्षात येऊ लागलं आहे.

‘प्लेअर अननोन्स बॅटल ग्राऊंड्स’ असा फुलफॉर्म असलेला पब्जी गेम अ‍ॅड्रॉइड फोनवर विनामूल्य खेळता येतो. अर्थात तो खेळण्यासाठी इंटरनेटवर पैसा खर्च होतच असतो. एकावेळी जगभरातील शंभर लोक एकत्रितरित्या हा गेम खेळू शकतात. पॅराशूटमधून एका प्रदेशात उतरल्यानंतर या प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी दडवून ठेवलेली शस्त्रे, साधने, संरक्षक कवच पटकावत समोर दिसेल त्या प्रतिस्पर्ध्याचा त्या शस्त्रांनिशी खातमा करणे आणि शेवटपर्यंत टिकून राहणे, हे या गेममधील प्रत्येक खेळाडूचे ध्येय असते. यादरम्यान त्या भूप्रदेशावरील ‘सेफ एरिया’ आक्रसत जातो आणि त्या ‘सेफ एरिया’त राहण्याचे प्रयत्न प्रत्येक खेळाडूला करावे लागतात. असा एकूण ‘पब्जी’चा व्याप आहे. यातील प्रत्येकावर 99 खेळाडूंना ठार करण्याचे आव्हान असते. या 99 खेळाडूंना मारण्याच्या नादात वेळेचा मोठा अपव्यय होतोच; शिवाय मुलांमध्ये हिंसक वृत्ती वाढीस लागते.

अँड्रॉईड मोबाईलवर अगदी सहजपणे डाऊनलोड होणार्‍या या गेममुळे मुलांमध्ये व्यसनाधिनतेसारखीही लक्षणे दिसतात. पालकांनी काही कामे सांगितली तरीही मुले चिडचिड करुन त्यास नकार देतात, शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष देत नाहीत, गेमच्या विरोधात बोलणार्‍या शिक्षकांशी ते उध्दट बोलतात. त्यामुळे पालकांबरोबर शिक्षकांसाठीही आता हे गेम डोकेदुखी ठरत आहेत. खेळताना मुले गेममध्ये इतका रस घेतात की, आजूबाजूला काय घडतेय याचेही त्याला भान राहत नाही. इतकेच नव्हे तर मुलगा जेवणा-खाण्याच्या वेळादेखील पाळताना दिसत नाही. मध्यंतरी ‘पब्जी’ आणखी मोठ्या आणि वेगवान मोबाइलवर खेळता यावा, यासाठी नव्या मोबाइलची मागणी करणार्‍या मुलाने हट्ट पूर्ण न झाल्याने आत्महत्या केल्याची घटना मुंबईत घडल्याची चर्चा आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी आंतरराष्ट्रीय आजारांची वर्गवारी (आयसीडी) जाहीर करण्यात येते. या वर्गवारीमध्ये ‘गेमिंग डिसऑर्डर’चा मानसिक आजारात समावेश करण्यात आला आहे. गेमिंगचे व्यसन तरुणांचे मानसिक संतुलन खराब करू शकतो, हे दाखवणार्‍या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत. ‘प्रतिस्पर्ध्याला ठार करण्यासारख्या आक्रमक गेमचे व्यसन तरुणांना अधिक लागते,’ असे मानसोपचारतज्ज्ञही सांगतात.

मानसरोगतज्ज्ञ डॉ. नीलिमा मुळे यांच्या सांगण्यानुसार त्यांच्याकडे गेल्या महिन्यात पब्जीमुळे मुलांवर विघातक परिणाम होत असल्याची तक्रार करणार्‍या 10 केसेस आल्या. मुलांचे नुकसान हे डोळ्याने दिसू लागल्यानंतर पालक भानावर आले आणि त्यांनी डॉ. मुळेंकडे धाव घेतली. मात्र, हा गेम म्हणजे व्यसन आहे, याची समजच नसलेल्या पालकांची संख्याच मोठी आहे. त्यामुळे आपले मूल हे एखाद्या व्यसनात अडकतेय याची जाणीवदेखील त्यांना आज नाही. परंतु असेच दुर्लक्ष भविष्यातील मोठ्या संकटाची चाहुल देऊन जाते. या गेमविषयी बोलताना सायबरतज्ज्ञ तन्मय दीक्षित यांनी सांगितलं की, ऑनलाईन गेम सुरू असताना वारंवार फ्लॅश जाहिराती येत असतात. या जाहिराती पॉर्न साईटकडे वळविणार्‍या असतात. त्यामुळे गेम खेळताना पॉर्न साईटकडे वळणार्‍या तरुणांची संख्याही वाढलेली दिसते. भविष्यात ही मोठी सामाजिक समस्या होऊ शकते. मुलांकडे मोबाइल सर्रासपणे असल्याने अजाण वयात त्यांना नको ते बघायला मिळाले तर त्याचे परिणाम वाईटच होतील. त्यातून बलात्कार आणि विनयभंगासारख्या घटनाही वाढण्याची शक्यता वर्तविली जाते.

या खेळामुळे मुलांच्या मनात हिंसाचाराची भावना वाढत असून सायबर गुन्हेगारीलाही प्रोत्साहन मिळतेय. पब्जीवर केवळ चिंता वाहत बसण्यापेक्षा त्यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी काय करावे याचाही विचार होणे क्रमप्राप्त आहे. लंडनमध्ये ऑनलाइन खेळाच्या व्यसनातून सुटकेसाठी व्यसनमुक्ती केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. या खेळाचा कर्ता असलेल्या चीनने अवघ्या दोन आठवड्यांतच या खेळावर बंदी घातली आहे. भारतात गुजरात, जम्मू-काश्मीर आणि इतर काही राज्यांत शाळेच्या आवारात या ऑनलाइन खेळण्यावर बंदी आहे. पण बंदीतून या समस्येपासून मुक्तता होईल असे म्हणणंही वेडेपणाचे ठरेल. पब्जीच्या आधी स्नेक, टेम्पल रन, कॅण्डी क्रश, सबवे सर्फर, काउंटर स्ट्राइक, चिकन डिनर अशा असंख्य गेमनी आबालवृद्धांना वेड लावले होते. त्यामुळे आज जे गारूड ‘पब्जी’ने निर्माण केले आहे, ते उद्या आणखी एखादा गेम निर्माण करणार नाही, याची हमी देणे कठीण आहे.

मुलांना सहजासहजी मोबाईल आणि इंटरनेट उपलब्ध करुन दिल्यामुळे ही समस्या अधिक वाढली आहे. त्यातून मुक्तता मिळविण्यासाठी मुलांकडून थेट मोबाइल काढून न घेता गेम खेळण्याचा कालावधी हळूहळू कमी कसा होईल, यावर भर देणे गरजेचे आहे. सुरुवातीला दोन दिवसांतून एकदा त्यानंतर आठवड्यातून एकदाच गेम खेळण्यास परवानगी देण्याचा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ देतात. याच दरम्यान, मुलांचे मन मैदानी खेळाकडे वळवावे, जेणेकरुन त्यांची उर्जा या खेळांमध्ये खर्ची होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here