घरफिचर्सक्वारंटाईन सेंटर की रेप सेंटर ?

क्वारंटाईन सेंटर की रेप सेंटर ?

Subscribe

कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनने महिलांचंही आयुष्य लॉक करून टाकलं. या काळात घरातील पुरुषांनी कधी जबरदस्ती करत तर कधी मारझोड करत घरातील महिलांचा मानसिक व शारिरीक छळ करत आपलं फ्रस्ट्रेशन काढलं. कोरोना काळ असल्याने पोलीसही त्यांची मदत करू शकले नाहीत. सगळंच बंद असल्याने नंतर तिनेही मदतीची अपेक्षा सोडली आणि आलिया भोगासी, म्हणत संसाराचं रहाटगाडगं पुढे चालू ठेवलं आहे. म्हणूनच मार्च-एप्रिलनंतर महिलांवरील अत्याचारांच्या घटना कोणीही ठळकपणे मांडल्याच नाहीत. त्यानंतर आता विकृतांनी थेट क्वारंटाईन सेंटरमध्ये एकट्या दुकट्या असलेल्या महिलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ही क्वारंटाईन सेंटर की रेपसेंटर आहेत, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनच्या या काळात जगभरात महिलांवर अत्याचार झाले. यातील सर्वाधिक अत्याचार हे महिलांवर घरातच जोडीदाराकडून झाल्याचेही समोर आले. कोरोना महामारीच्या संकटात महिलांवर आलेल्या या दुहेरी संकटाने सगळ्यांनाच अंतर्मुख केले. ते कमी म्हणून की काय आता क्वारंटाईन सेंटरमध्येही महिलांवर बलात्कार होऊ लागले आहेत. तर दुसरीकडे अमरावतीमध्ये कोरोना टेस्टच्या नावाखाली तरुणीच्या गुप्तांगामधून स्वॅब घेतल्याच्या भयंकर घटनेने कोरोना काळात समाजात वाढणार्‍या विकृतीचा कळस गाठल्याचे दिसत आहे. यामुळे घरात असो किंवा घराबाहेर महिला कुठेच सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे असतानाही या कायद्याच्या जरबेपेक्षा विकृतीच समाजात जास्त पसरत असल्याचे या घटनांवरून स्पष्ट होत आहे. जी समाजासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे. म्हणूनच प्रश्न पडतो, सरकारने क्वारंटाईन सेंटर उभारलेत की रेप सेंटर ?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 23 मार्चला देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं. हा लॉकडाऊन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जरी करण्यात आला असला तरी या घटनेने महिलांचही आयुष्य लॉक करून टाकलं. या काळात घरातील पुरुषांनी कधी जबरदस्ती करत तर कधी मारझोड करत घरातील महिलांचा मानसिक व शारिरीक छळ करत आपलं फ्रस्ट्रेशन काढलं. पण तीचं काय. कोरोना काळ असल्याने पोलीसही तिची मदत करू शकले नाहीत. सगळंच बंद असल्याने नंतर तिनेही मदतीची अपेक्षा सोडली आणि आलिया भोगासी, म्हणत संसाराचं राहाटगाड पुढे चालू ठेवलं आहे. म्हणूनच मार्च-एप्रिलनंतर महिलांवरील अत्याचारांच्या घटना कोणीही ठळकपणे मांडल्याच नाहीत. त्यानंतर आता विकृतांनी थेट क्वारंटाईन सेंटरमध्ये एकट्या दुकट्या असलेल्या महिलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

अशा प्रकारची धक्कादायक आणि लांच्छनास्पद घटना पनवेल क्वारंटाईन सेंटरमध्ये घडली. कोरोनाची लक्षणे असल्याने एका चाळीस वर्षीय महिलेला पनवेल येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. याच सेंटरमध्ये क्वारंनटाईन करण्यात आलेल्या एका 25 वर्षीय तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. कोरोना दहशतीच्या या वातावरणात क्वारंटाईनमध्ये बलात्काराची घटना घडल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. संसर्गाच्या भीतीने ज्या कोरोना रुग्णांपासून लोक चार हात लांब राहत आहेत त्यावर बलात्कार करणे ही हिडीस मानसिकता असून आजच्या काळातील ही भयंकर घटना आहे.

दरम्यान, पनवेल येथील बलात्काराच्या घटनेनंतर काही दिवसांपूर्वी पुण्यातही क्वारंटाईन सेंटरमध्ये महिला एकटी असल्याचे बघून एकाने स्टाफ असल्याचे सांगत एका कोरोनाग्रस्ताने तिच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने प्रसंगावधान दाखवत रुमचा दरवाजाच उघडला नाही. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यादरम्यान महिलेने मदतीसाठी पोलिसांच्या 100 क्रमांक डायल करत मदत मागितली. पण तुम्ही क्वारनटाईन सेंटरमध्ये आहात व आमच्याकडे पीपीई किट्स नाहीत. यामुळे मदत करण्यास असमर्थ आहोत असे पोलिसांकडून तिला सांगण्यात आल्याचे तिने नंतर तक्रारीत म्हटले आहे. ती संपूर्ण रात्र महिलेने प्रचंड मानसिक तणावाखाली काढली. दुसर्‍या दिवशी चुलत बहिणीला फोन करून तिने झालेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर बहिणीने धावाधाव करत तिला त्या क्वारनटाईन इमारतीमधून हलवण्याची विनंती केली. त्यानंतर तिला बाजूच्या इमारतीत हलवण्यात आले. पण आरोपी मात्र त्याच इमारतीमध्ये क्वारंटाईन होता.

- Advertisement -

तर दुसरीकडे दिल्लीत जगातील सर्वात मोठे क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले. याच क्वारंटाईन सेंटरमध्ये एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला व त्याचा व्हिडीओही काढला. नंतर मुलीने याबद्दल तक्रार केली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. जगातील भव्य क्वारंटाईन सेंटरमध्ये घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. तसेच भारतातील क्वारंटाईन सेंटरमधील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उमटले.

राजस्थानमधील सवाई माधोपुर येथेही क्वारंटाईन सेंटरमध्ये तीनजणांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली होती. राजस्थान पोलिसांनी 24 तासात आरोपींना अटक केली. पण या घटनेने महिलेला मात्र प्रचंड मानसिक धक्का बसला.

अशीच एक घटना 8 एप्रिलला बिहारमधील गया येथील मगध मेडिकल कॉलेजच्या क्वारंटाईन सेंटरमध्येे घडली होती. पीडित महिलेचा दोन महिन्यांचा गर्भपात झाला होता. यामुळे 25 मार्च रोजी ती पतीसह लुधियानाहून बिहारमधील गया येथे आपल्या मूळ गावी आली होती. तिला 27 मार्च रोजी येथील अनुग्रह नारायण मगध रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण 1 एप्रिल रोजी तिच्यात कोरोनाची लक्षणे दिसल्याने क्वारंटाईन वार्डमध्ये हलवण्यात आले. तिथे ती एकटीच होती. दोन दिवसांनंतर तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तिला डिस्चार्ज देण्यात आला. पण घरी आल्यानंतर तिची प्रकृती अधिक खालावली. ती प्रचंड घाबरलेली होती. याबद्दल तिला सासूने विचारले असता तिने एका डॉक्टरने आपल्यावर दोन रात्री सतत लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानंतर अतिरक्त स्त्रावामुळे 6 एप्रिल रोजी महिलेचा घऱातच मृत्यू झाला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

या आणि अशा अनेक भयंकर घटना देशातील क्वारंटाईन सेंटरमध्ये घडल्या आणि घडत आहेत. पण त्यातील काहीच समोर येत आहेत. कोरोनाशी लढताना विकृत व्यक्तींबरोबरही महिलांना हा लढा द्यावा लागत आहे. ही तर सरकारसाठीही शरमेची बाब आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य सुविधांबरोबरच सरकारने महिलांच्या सुरक्षिततेकडेही गांभीर्याने पाहायला हवे. कारण कोरोनाशी लढता येईल. आज ना उद्या त्यावर लसही तयार होईल. पण या विकृतीला इलाज नाही. त्यावर लसही नाही. कोरोनापेक्षाही भयंकर असलेला हा आजार फोफावतोय. त्याला वेळीच आवर घालावा लागेल. नाहीतर कोरोनानंतर विकृत माणसांचा नायनाट करणार्‍या लसीवर संशोधन करावे लागेल.

मागील लेख
पुढील लेख
Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -