घरफिचर्सरवींद्रनाथ टागोर - बहुआयामी विभूती 

रवींद्रनाथ टागोर – बहुआयामी विभूती 

Subscribe

रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, ते एक ब्रह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियातील पहिले नोबेलविजेते होते. अशा महान कवी, साहित्यिक, विचारवंत रवींद्रनाथ टागोर यांचे ७ ऑगस्ट १९४१ राजी त्यांचे निधन झाले.

बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व व रवींद्रोत्तर अशी विभागणी करण्यात येते; यावरून बंगाली साहित्यावरील रवीन्द्रनाथांचा प्रभाव लक्षात यावा. कोलकत्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी वयाच्या ८व्या वर्षी पहिली कविता लिहिली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या. शांतिनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय. रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांगला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.

- Advertisement -

१९०१ साली रवीन्द्रनाथ सियाल्दा सोडून शांतिनिकेतन येथे राहण्यास आले. एका आश्रमाची स्थापना करणे हा त्यांचा उद्देश होता. या आश्रमात त्यांनी एका प्रार्थना-गृहाची, प्रयोग-शील शाळेची, बागबगिचा व ग्रंथालयाची स्थापना केली. रवीन्द्रनाथांच्या पत्‍नीचा व दोन मुलांचा मृत्यू येथेच झाला. वडिलांचे देहावसान १९ जानेवारी १९०५ रोजी झाले व वारसदार म्हणून रवींद्रनाथांन नियमित मासिक उत्त्पन्न मिळू लागले. याशिवाय त्यांना त्रिपुराच्या महाराजांकडून आर्थिक साहाय्य, कौंटुबिक दागदागिने व पुरी, ओडिशा येथील बंगला विकून काही प्राप्ती झाली. या काळात त्यांचे साहित्य बंगाली व विदेशी वाचकांचे आधिकाधिक लक्ष खेचू लागले होते. नैवेद्य (१९०१) व खेया (१९०६) या रचना या काळात प्रकाशित झाल्या.  १४ नोव्हेबर १९१३ रोजी स्वीडिश अकादमीचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्याची बातमी रवीन्द्रनाथांना समजली. गीतांजली या रचनेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. गीतांजलीचे भाषांतर स्वतः रवीन्द्रनाथांनीच केले होते. १९१५ साली त्यांना ब्रिटिश सरकारने “सर” ही पदवी दिली. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली.

जीवनाच्या शेवटच्या दशकात रवींद्रनाथ पूर्णपणे जनसन्मुख होते. त्यांची लोकप्रियता विशेषतः बंगालमध्ये शिखरावर होती. १५-जानेवारी-१९३४ रोजी बिहारमध्ये झालेल्या भूकंपाची, महात्मा गांधींनी “दलित अत्याचाराचा परमेश्वराने घेतला सूड” अशी संभावना केली. या वक्तव्याचा रवींद्रनाथांनी निषेध केला.  अखेरच्या काळात विज्ञानात रवींद्रनाथांनी विशेष रस घेतला. यातूनच त्यांच्या विश्वपरिचय या निबंधसंग्रहाची निर्मिती झाली. जीवशास्त्र, भौतिकी व खगोलशास्त्राचा त्यांनी केलेल्या अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या कवितेवरही जाणवतो. त्यांच्या कवितेतून झळकणारा निसर्गवाद हा त्यांना वैज्ञानिक नियमांप्रती त्यांना असलेला आदर अधिरेखित करतो. विज्ञानाची प्रगती त्यांनी आपल्या विविध रचनांमधून मांडली आहे. रवींद्रनाथांच्या आयुष्यातील शेवटची चार वर्षे प्रदीर्घ व्याधी व आजारपणांनी व्यापली. १९३७ साली शुद्ध हरपून ते बराच काळ कोमात होते. पुन्हा १९४० सालचा कोमा जीवघेणा ठरला. या शेवटच्या काळात लिहिलेल्या काव्यरचना रवींद्रनाथांच्या काव्यरचनांत सर्वश्रेष्ठ मानण्यात येतात. त्यांचे मृत्युविषयक चिंतन या रचनांतून प्रकटते. ७ ऑगस्ट १९४१ रोजी रवींद्रनाथांचा कोलकत्याच्या त्यांच्या वडिलोपार्जित जोरशंका ठाकूर बाडी येथे मृत्यु झाला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -