निवडणुकीच्या पलीकडचा नेता!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतात अनधिकृतरित्या राहणार्‍या पाकिस्तानी आणि बांगलादेशी लोकांना त्यांच्या देशात माघारी पाठवण्याची मागणी करण्यासाठी नुकताच गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढला. आझाद मैदानावरील प्रचंड सभेत त्यांनी केंद्र सरकारने केलेल्या सीएए आणि एनआरसीमध्ये काय गैर आहे, असा सवाल करत या कायद्याच्या विरोधकांना तंबी देताना जशाच तशा उत्तराचा इशारा दिला. राज ठाकरे यांच्या पक्षाला सध्या निवडणुकांमध्ये यश मिळत नसले तरी त्यांच्या सभांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहिल्यावर हे निवडणुकीच्या पलीकडचे नेतृत्व आहे, असेच म्हणावे लागते.

Mumbai
राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा प्रचंड मोर्चा काढून पुन्हा एकदा जनमानसावर आपला किती जबरदस्त पगडा आहे ते दाखवून दिले आहे. भारतात अनधिकृतपणे राहणार्‍या पाकिस्तानी आणि बांगलादेशींना त्यांच्या देशात पाठवायला हवे, असे आवाहन करण्यासाठी राज ठाकरे यांनी हा मोर्चा काढला होता. या मोर्चाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तसे पाहू गेल्यास राज ठाकरे यांच्या पक्षाकडे तशी सत्तापदे नाहीत. कारण ती असली की, मोठे मोर्चे काढण्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर करता येतो, पण इथे राज ठाकरे यांच्या आवाहनला प्रतिसाद देऊन हजारोंच्या संख्येने सर्व महाराष्ट्रातील प्रामुख्याने तरुणाई मुंबईत आली होती. देशात सध्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने संसदेत मंजूर करून घेतला. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) यांच्या विरोधात प्रामुख्याने या देशातील मुस्लीम आणि मागासवर्गीय रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. त्यांना काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. देशातील प्रादेशिक पक्षांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. दिल्लीत केजरीवाल यांचा नुकताच दणदणीत विजय होऊन त्यांनी मुख्यमंत्रीपदाची हॅट्ट्रिक केली आहे. त्यांच्या विजयाला जसा दिल्लीतील विकासकामांचा हात आहे, तशीच शाहीनबागेत सुरू असलेल्या रात्रंदिवस जागराचीही साथ आहे.

राज ठाकरे यांनी २००6 साली शिवसेनेतून बाहेर पडून वेगळा पक्ष स्थापन केल्यावर सुरुवातीला त्यांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला, पण नंतर मात्र त्यांच्या निवडून येणार्‍या उमेदवारांची संख्या ओसरत गेली. अलीकडे तर त्यांच्या उमेदवारांची डिपॉझिट्स वाचवणेही कठीण होऊन बसले. राज ठाकरे यांना निवडणुकीत मते मिळत नसली तरी राज्यात त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. विशेषत: तरुणाईला राज यांची भाषणे भारावून टाकतात. इतकेच नव्हे तर जेव्हा राज ठाकरे यांची सभा असेल तर सगळ्या टीव्ही चॅनेल्सवर फक्त आणि फक्त राजच दिसतात. कारण त्यांना माहीत आहे की, राज ठाकरे यांच्यामुळे आपला टीआरपी वाढतो. प्रिन्ट मीडियाही राज ठाकरे यांच्या सभेची बातमी पहिल्या पानावर घेत असते. कारण राज ठाकरे यांनी बोललेले लोक वाचतात, राज ठाकरे यांच्या बोलण्याविषयी लोकांना कुतूहल असते. राज ठाकरे यांच्या पक्षाला निवडणुका जिंकण्यात अपयश येत असले तरी त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे, ही त्यांची जमेची बाजू आहे. प्रचंड मोठा चाहतावर्ग असणे हेच त्यांचे बलस्थान आहे. त्यामुळे चाहनेवाले बहुत होते हैं, तब तकदीर का दरवाजा खोलने का इंतजार करना पडता हैं, तशीच स्थिती राज ठाकरे यांची झालेली आहे.

महाराष्ट्र हे देशातील प्रमुख राज्य आहे. त्यातही पुन्हा मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे देशाचे शक्तीस्थळ आहे. त्यामुळेच या महाराष्ट्रात जी घटना घटते त्यांचे पडसाद केवळ देशभरात नव्हे तर जगभर पडत असतात. पाकिस्तानातील अतिरेक्यांच्या म्होरक्यांचा डोळा म्हणूनच मुंबईमध्ये घातपात घडविण्याकडे असतो. मग ते १९९३ चे मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट असोत, नाही तर 26 नोव्हेंबर २००८ साली कसाब टोळीने केलेला मुंबईवरील हल्ला असो. मुंबई हे या देशाचे नाक आहे, त्याच्यावर हल्ला केला की, तो आपला मोठा विजय होत असतो, कारण त्याचे पडसाद जगभर पडत असतात, त्यांना विश्वास असतो. त्यामुळेच अशा हल्ल्यांसाठी पाकिस्तानातील यंत्रणा कार्यरत असतात. भारतातील स्थानिक मुस्लिमांना धर्म आणि जिहादच्या नावावर आपल्याकडे वळवतात. प्रामुख्याने हिंदू धर्मीय आणि त्या विचारसरणीचे असलेले लोक यांना धडा शिकवण्याचा त्यांचा हेतू असतो. कारण पाकिस्तानातून त्यांना जिहादच्या नावाखालीच हिंदुस्तानात पाठविले जाते.

आझाद मैदानावर २०१२ साली रझा अकादमीने आसाम आणि राखीने येथे झालेल्या उद्रेकाच्या विरोधात मेळावा आयोजित केला होता. पण त्यानंतर या मेळाव्यातील लोकांनी हिंसक रुप धारण करून जाळपोळ सुरू केली. पत्रकारांवर हल्ले केले. प्रसारमाध्यमांची ओबी व्हॅन जाळली. पोलिसांना मारहाण केली. महिला पोलिसांचा विनयभंग केला. आझाद मैदान परिसरात असलेल्या महत्वाच्या स्थळांची नसधूस केली. त्यावेळी त्या जमावाला आवर घालणार्‍या पोलिसांनाच त्यावेळच्या पोलीस आयुक्तांनी दम दिला होता. त्यामुळे पोलिसांचे मनोबल फारच खालावले होते. आझाद मैदानात झालेल्या या प्रकारानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी रझा अकादमीच्या मानहानीकारक कृत्याचा निषेध करत असे प्रकार करणार्‍यांना सज्जड दम दिला होता. सध्या महाराष्ट्रासह देशभरात सीएए आणि एनआरसी यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. त्यात प्रामुख्याने मुस्लिमांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी घेतलेल्या जाहीर मेळाव्यात सीएए आणि एनआरसी यांचे त्यांनी जोरदार समर्थन केले. या दोन गोष्टींमध्ये काय चुकीचे आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. पाकिस्तान आणि बांगलादेशातील लोक आम्ही का म्हणून पोसायचे असा सवाल त्यांनी केला. तसेच देशविरोधी कृत्य करणार्‍यांना जशाच तसे उत्तर दिले जाईल, असा सज्जड दम दिला.

राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी जमते. नुकताच त्यांनी आझाद मैदानात जो मेळावा आयोजित केला, त्यावरून त्यांच्या लोकप्रियतेची पुन्हा एकदा प्रचिती आली. त्यांच्या भाषणांना गर्दी जमते, पण ती मतमेटीत का उतरत नाही, याविषयी बरेच तर्कवितर्क केले जातात. पण एक गोष्ट मात्र खरी आणि ती सगळ्यांना मान्य करावी लागले. इतक्या मोठ्या प्रमाणात फक्त एकट्याच्या जीवावर इतका जनसमुदाय जमविण्याची आजघडीला ताकद केवळ राज ठाकरे यांच्याकडेच आहे. बर्‍याच लोकांचे म्हणणे आहे की, लोक केवळ टाईमपाससाठी त्यांचे भाषण ऐकण्यासाठी येतात. फक्त टाईमपाससाठी ऐकालयला येत असतील तर मग त्यांना त्यांची भाषणे टीव्हीवर पाहता येतील, सभास्थानी येण्याची काय गरज आहे ? पण तरीही त्यांचे भाषण ऐकण्यासाठी लोक मोठ्या संख्येने सभेला येतात.

आपली अशी तुफानी क्रेझ निर्माण करण्याचे सामर्थ्य फार मोजक्या माणसांमध्ये असते. राज ठाकरे हे त्यापैकी एक आहेत. सचिन तेंडुलकर जेव्हा खेळतो ते फक्त पाहण्यासाठी मॅच पाहणार्‍यांचा एक मोठा वर्ग होता. त्यांना मॅच जिंकणे किंवा हरणे यात फार रस नसायचा, त्यांना सचिनला खेळताना पहायचे असायचे.आपल्या खेळातून पाहणार्‍यांना जय आणि पराजयाच्या पलीकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य सचिनकडे होते. हाच त्या खेळाडूचा मोठेपणा आहे. तसेच राज ठाकरे आपल्या भाषणातून जे मुद्दे आणि ठाम विचार मांडतात, ते अनेकांना पटतात. राज यांच्या पक्षाला निवडणुकीच्या राजकारणात सध्या फारसे यश मिळत नसले, तरी त्यांच्या सभांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि त्यांचा चाहता वर्ग पाहिला की, हा निवडणुकीच्या पलीकडेचा नेता आहे, असेच वाटू लागते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या परखड आणि ठाम विचारांसाठी ओळखले जात. त्यांचा एक दरारा होता. त्यांच्या आवाजाची देशभर दखल घ्यावी लागायची. राज ठाकरे यांची एकूणच वाटचाल पाहिली तर बाळासाहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. सत्तेत नसतानाही आपल्या आवाजाची जरब ठेवण्याचे सामर्थ्य राज ठाकरे यांच्याकडे आहे, मोर्चाला मोर्चानेच उत्तर दिले जाईल, या त्यांच्या इशार्‍याने त्यांनी ते दाखवून दिले आहे. निवडणुकांमध्ये हार-जीत होत असते; पण त्यापलीकडे काही गोष्टी असतात, त्या राज ठाकरे यांच्याकडे नक्कीच आहेत. हेच त्यांच्या लोकप्रियतेतून वारंवार दिसून येत असते.