घरफिचर्सचांगला हिंदू आणि वाईट हिंदू

चांगला हिंदू आणि वाईट हिंदू

Subscribe

कालबाह्य जुन्या राष्ट्र वा देश या संकल्पनेतून, समजुतीतून आपल्याला बाहेर पडण्याची गरज आहे. त्या समजुती विविध शब्द व व्याख्यांमध्ये दबा धरून बसलेल्या आहेत. उदाहरणार्थ कुणालाही बॉम्बस्फोटाने अकारण निरपराधांना मारणारा हा घातपाती असतो, ही आता कालबाह्य व्याख्या झालेली आहे. आपोआपच जीव धोक्यात घालून देशाच्या शत्रूशी दोन हात करणारा संरक्षक असतो, ही व्याख्याही बदलून जाते? एखाद्या मुलीवर बळजबरी करणारा हा गुन्हेगार नसतो तर तिच्या शीलरक्षणासाठी झगडणारा अंगरक्षक असतो. त्यासाठीच तो तिच्या देहाचा कब्जा घेत असतो, हे थरूरी तर्कशास्त्र समजून घेण्याची गरज आहे.

तुम्हाला आठवत असेल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाच राज्यांतील विधानसभा जिंकण्यासाठी प्रत्येक महत्त्वाच्या अशा स्थानिक मंदिरांना भेटी व देवदर्शनाचा सपाटा लावला होता. आपला पक्ष हिंदूविरोधी नसून हिंदुहिताची फिकीर करणारा आहे, असा आभास त्यांना निर्माण करायचा होता. कारण चार वर्षांपूर्वी त्यांच्या पक्षाचा लोकसभेत जो दारूण पराभव झाला, त्याला हिंदूविरोधी प्रतिमा कारणीभूत झाली, असा निष्कर्ष काँग्रेसच्याच अ‍ॅन्थोनी समितीने काढलेला होता. तो समजायला राहुल गांधींना तीनचार वर्षे लागली. राहुल हिंदूंचे तुष्टीकरण कशाला करीत होेते. त्याचा थांगपत्ता बुद्धीमान काँग्रेस नेते शशी थरूर यांना २०२४ सालात लागला. त्यांनी चांगला हिंदू आणि वाईट हिंदू असल्या पाश्चात्य व्याख्या केल्या.

एका समारंभात बोलताना त्यांनी सांगितले, की जो अयोध्येत मंदिराची मागणी करीत नाही, तो चांगला हिंदू असतो. मग त्यांच्याच व्याख्येनुसार वाईट हिंदू कोण असू शकतो? तर जो कोणी मंदिराची मागणी करील किंवा तशी मागणी करणार्‍याच्या समर्थनाला कंबर कसून उभा राहील, तो वाईट हिंदू असे त्यांना सुचवायचे होते. त्या तर्कशास्त्रानुसार बाबर हाच खरा हिंदू असला पाहिजे किंवा सोमनाथ मंदिर कित्येकदा फोडून लुटून नेणारा महंमद घोरी खरा चांगला हिंदू असला पाहिजे ना? जो कोणी अयोध्येतील मंदिराच्या विरोधात सर्वशक्तीनिशी उभा ठाकतो, तो चांगला हिंदू असणार ना? परिणामी कोर्टमध्ये जाऊन मंदिराच्या विरोधात लढणारा प्रत्येकजण चांगला हिंदू होऊन जातो. विरोधाभास इतकाच, की त्यातला कोणीही हिंदूधर्माची महत्ता मानणारा नाही.

- Advertisement -

शशी थरूर यांच्या तर्कानुसार चांगला हिंदू शोधायला गेल्यास प्रथम तो हिंदू म्हणून जे काही असेल त्याचा निषेध करणारा, त्याला विरोध करणारा वा हिंदू हे नावही पुसून टाकायला कटीबद्ध असला पाहिजे. थोडक्यात तो हिंदूच नसला पाहिजे, तरच त्याला चांगला हिंदू मानता येईल. उदाहरणार्थ राहुल गांधी कसे निवडणुका आल्या मग आपण शिवभक्त असल्याचे प्रदर्शन मांडतात. ते जनेयुधारी म्हणजे जानवेधारी ब्राह्मण असल्याचे फलक झळकवले जातात; पण त्यांनी कधी दिवाळी दसरा साजरा केल्याचे आपल्याला ऐकायला मिळत नाही. दर नाताळात आजोळी जाऊन आजीच्या सहवासात ते ख्रिसमस साजरा करतात. ही उत्तम हिंदू असल्याची निशाणी असते. उलट आपण वाईट हिंदू असतो. आपण अगत्याने घरोघरी गणपतीची मूर्ती आणून पूजा करतो. दसरा नवरात्री साजरी करतो. हनुमानजयंती वा रामनवमी साजरी करतो. कुठे मंदिर बांधतो वा अयोध्येत मंदिर व्हावे, अशी अपेक्षा बाळगतो.

हिंदू म्हणून जे काही धर्माचे सोपस्कार आहेत, त्याचे पालन करायला जातो. ही सर्व वाईट हिंदू असल्याची लक्षणे असतात. हे नवे तर्कशास्त्र समजून घेतले, मग बुर्‍हान वाणी, मन्नन वाणी, अफजल गुरू हे कट्टर देशभक्त कशाला असतात, हे सहज लक्षात येऊ शकते. देशाचे सैनिक काश्मिरात हिंसाचार करतात आणि जैश वा तोयबाचे लढवय्ये देशाचे कसे उत्तम रक्षण करीत असतात, त्याचा बोध होऊ शकतो. पंतप्रधान हाच देशाचा सर्वात मोठा शत्रू का आहे, त्याचा उलगडा होऊ शकतो. मग अमेरिकन राजदूताला राहुल गांधी हिंदू दहशतवादाचा धोका कशाला समजावून सांगत होते, त्याचाही खुलासा होऊ शकतो. एकदा हे थरूरी तर्कशास्त्र समजून घेतले पाहिजे. मग भारताला भारतीयांपासून किती धोका आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो आणि भारतीयांपासून या देशाला वाचवण्यासाठी रोहिंग्या वा बांगलादेशी लोकांची वाढती संख्या कशी उपयुक्त आहे, तेही समजू शकते.

- Advertisement -

कालबाह्य जुन्या राष्ट्र वा देश या संकल्पनेतून समजुतीतून आपल्याला बाहेर पडण्याची गरज आहे. त्या समजुती विविध शब्द व व्याख्यांमध्ये दबा धरून बसलेल्या आहेत. उदाहरणार्थ कुणालाही बॉम्बस्फोटाने अकारण निरपराधांना मारणारा हा घातपाती असतो, ही आता कालबाह्य व्याख्या झालेली आहे. आपोआपच जीव धोक्यात घालून देशाच्या शत्रूशी दोन हात करणारा संरक्षक असतो, ही व्याख्याही बदलून जाते? एखाद्या मुलीवर बळजबरी करणारा हा गुन्हेगार नसतो तर तिच्या शीलरक्षणासाठी झगडणारा अंगरक्षक असतो. त्यासाठीच तो तिच्या देहाचा कब्जा घेत असतो, हे थरूरी तर्कशास्त्र समजून घेण्याची गरज आहे. अजमल कसाब किंवा त्याच्यासोबत आलेली दहा जिहादींची टोळी मुंबईकरांना पोलीस, कायदा व राष्ट्रवादाच़्या जाचातून मुक्त करायला आलेली मुक्तीसेना असल्याचा साक्षात्कार आपल्याला होऊ शकतो.

हे चांगला वाईट यातले भेदाभेद सुक्ष्मपणे समजून घेता आले पाहिजेत. मग जगणे सोपे होऊन जाईल. कारण मरण्यालाच जगणे मानावे लागणार ना? नक्षली हिंसाचाराला वैचारिक अधिष्ठान देण्यातला परमार्थ समजू शकेल. अघोषित आणिबाणीचे धागेदोरे सापडू लागतील. पुरस्कार वापसीची गंमत लक्षात येईल. आणिबाणी लादणारी काँग्रेस स्वातंत्र्यवादी व आणिबाणीत तुरुंगात खितपत पडलेले तत्कालीन भाजपावाले हे कसे फॅसिस्ट; त्यातली गुंतागुंत समजायला मदत होऊ शकेल. प्रत्येक शस्त्रास्त्र खरेदीत लपवाछपवी करणारी काँग्रेसच धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आणि कुटुंबाला सत्तेचा कुठलाही लाभ उकळू न देणारा नरेंद्र मोदी आकंठ कसा भ्रष्टाचारात बुडालेला आहे, त्याचेही आकलन होऊ शकते.

वरवरा राव किंवा अन्य नक्षलींना एक दिवसही पोलीस कोठडीत पाठवण्याने मानवी हक्कांची पायमल्ली कशाला होते आणि नऊ वर्षे कुठल्याही पुराव्याशिवाय साध्वी वा कर्नल पुरोहितांना जामीन नाकारून नऊ वर्षे गजाआड सडवणे, कसा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असतो, ते समजू शकते. मागल्या चार वर्षांत देशातले शब्दकोष वा कोषातल्या शब्दांचे अर्थही कसे आमूलाग्र बदलून गेलेले आहेत ना? पाच पिढ्या सत्ता व जनतेच्या पैशावर ऐष करणार्‍या नेहरू खानदानाचा त्याग नजरेत भरणारा आहे; पण पंतप्रधानाचे तमाम कुटुंबिय सामान्य नागरिकासारखे जगण्यातली लूटमार नव्या शब्दकोषामुळेच कळू शकेल. त्यामुळे मोहरम ईदीच्या दिवशी विणलेली टोपी परिधान करून नमाजाला इफ्तार पार्टीला हजेरी लावणारा चांगला हिंदू आपल्याला बघता येईल. कुणा फादर बिशपने धर्मसेविकांवर बलात्कार केल्यास त्याला पुण्याई समजण्याची अक्कल आपल्याला येऊ शकते. तरूण तेजपालने सहकारी मुलीचे लैंगिक शोषण केल्यावर त्यातले पुरोगामी पवित्र कार्य आपले डोळे दीपवून टाकायला मदत होईल.

अशा अनेक गोष्टी अगदी सोप्या सुटसुटीत होऊन जातील. सवाल शब्दकोष बदलण्याचा आहे. राहुल गांधींपासून शशी थरूर व अनेक पुरोगामी विचारवंत नव्या युगाचे नवे शब्दकोष विश्वकोष तयार करण्यात सध्या गर्क आहेत. थरूर यांनी चांगल्या हिंदूची केलेली व्याख्या त्यातूनच आलेली आहे. देशातल्या हिंदूंना दिलेली प्रकाशनपूर्व सवलत आहे. संघाशी संवाद नाकारणे हा संवाद असतो आणि जिहादींशी बंदुकीने बोलणे हा संवाद असतो, हे त्यामुळे लक्षात येणारे रहस्य होईल. अशा पुरोगामी जगात सूर्याला सूर्य समजणे गुन्हाच नाही काय? अयोध्येत श्रीरामाचे मंदिर मग कोणी सच्चा हिंदू मागणार नाही. तो मक्केत कृष्णाचे मंदिर मागू शकेल वा वाराणशीत होली वॉटर शिंपडायला सांगू शकेल. काय करणार? शब्द त्यांचे अर्थ पुरोगामी होत चालले आहेत ना?

आता या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिराला होणारा विरोध किंवा त्यामुळे सुरू असलेले राजकारण पहा. विचार करा. मग कळेलही मंदिराला का विरोध होतोय. नेमका विरोध कोण करतोय. मग त्यासाठी तत्त्वज्ञानाचा मुलामा चढवला जातो. मंदिरापेक्षा हॉस्पिटलची गरज प्रामुख्याने पुढे केली जाते. कोरोनाला मध्ये टाकले जाते. मुळात प्रश्न हा चांगले हिंदू आणि वाईट हिंदू असण्याचा आहे. काँग्रेसच्या शब्दकोशानुसार, तुम्ही मंदिराला विरोध केला म्हणजे तुम्ही चांगले हिंदू आहेत आणि मंदिराची पायाभरणी, पूजा अशाबाबत बोलला की वाईट हिंदू. मग तुम्ही हिंदू असाल तर आता तुम्हालाच ठरवायचे आहे की तुम्ही वाईट हिंदू आहात की चांगले. चांगले हिंदू होण्यासाठी तुम्हाला राम मंदिराच्याविरोधात बोलावेच लागेल. त्याला कोणताही पर्याय नाही.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -