घरफिचर्समागे सोडलेलं नातं

मागे सोडलेलं नातं

Subscribe

सगळं हाताशी असूनसुद्धा आपल्याला विश्वासानं कोणाशी तरी बोलता येईल असं आयुष्यात कोणीतरी हवं असतं. जोडीदार आणि मित्र या दोन स्टेशन मधला थांबा अर्थात दुवा आपण शोधत असतो. जिकडे मैत्रीचा निखळ विश्वास असेल, जिकडे त्या छान वाटणार्‍या भावनाही असतील. जिकडे आधार देणारा खांदा असेल आणि जिकडे आपल्या भावना हक्काने सांगण्याचं व्यासपीठ असेल.

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक भूतकाळ असतो. काही जण तो मनाच्या कोपर्‍यात साठवून पुढील आयुष्य जगतात, तर काही जण त्याच भूतकाळात रमून भविष्यही खराब करतात. अर्थात हे प्रत्येकाच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतं. खरं तर एक नातं आपल्या आयुष्यात ते असतं जे आपण मागे सोडतो अर्थातच ‘मागे सोडलेलं नातं’. प्रेम आणि प्रेमभंग यांचं नातं नाण्याच्या दोन बाजूंसारखं असतं. प्रेम म्हणजे प्रेम असले तरी प्रत्येकाचं सेम मात्र नक्कीच नसतं. बर्‍याच अंशी माणूस आपलं नातं एका वळणावर मागे सोडून पुढे निघून जातो. पण त्याच्या खुणा मात्र तशाच राहतात. काही व्यक्ती आयुष्यात अशा असतात, ज्यांना आपण आयुष्यात कितीही पुढे आलो तरी ज्या वाटेवर त्यांच्याबरोबर चालत आलो त्यांना विसरत नाहीत. जुन्या तात्पुरत्या सुखासाठी मनाचं भांडवल केलं जातं आणि मेंदूच्या बाजारात क्षणभंगुर आनंद लुटला जातो.

मुळात बर्‍याचदा मनात विचार येतो की, हे नातं दोन्हीकडून का मागे सोडलं गेलं. काही नाती आयुष्यात व्यक्त करता येत नाहीत. कारण ती आपल्यालाच नीट समजलेली नसतात तर आपण समोरच्याला आपल्याला काय वाटते ते नक्की कसं सांगणार हा गोंधळ मनात सुरु असतो. आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर अनुभव घेतल्यावर एक परिपक्व नातं असावं वाटतं. दोन वैचारिक पातळीतील फरक खरं तर एका परिपूर्ण नात्याला आकार देतो त्याला स्थैर्य देत असतो. पण ही जी तारेवरची कसरत आहे, ती खूप कमीजण निभावून नेऊ शकतात.

- Advertisement -

सगळं हाताशी असूनसुद्धा आपल्याला विश्वासानं कोणाशी तरी बोलता येईल असं आयुष्यात कोणीतरी हवं असतं. जोडीदार आणि मित्र या दोन स्टेशन मधला थांबा अर्थात दुवा आपण शोधत असतो. जिकडे मैत्रीचा निखळ विश्वास असेल, जिकडे त्या छान वाटणार्‍या भावनाही असतील. जिकडे आधार देणारा खांदा असेल आणि जिकडे आपल्या भावना हक्काने सांगण्याचं व्यासपीठ असेल. पण त्याचे वेळी भावनिक गुंतवणूक ही मर्यादेत हवी असते. पण या सगळ्या अपेक्षांमध्ये समजून घेणारं माणूस असलं तरच नातं टिकू शकतं. पण समजूतदारपणा नसेल तर एका वळणावर हे नातं हातातून सुटून मागे सुटतं.

कोणत्याही अपेक्षेशिवाय, आपल्या आयुष्यातील कर्तव्ये आणि जबाबदार्‍या पूर्ण करून समोरच्यालादेखील तितक्याच विश्वासाने तोलून ठेवणार्‍या या नात्यासाठी सर्वात महत्त्वाचा द्यावा लागतो तो वेळ आणि संवाद. वेळेपासून ते समजून घेण्यापर्यंत दोघांनाही संयम ठेवावा लागतो. आपल्याला ऐकून घेणारं, आपल्याशी संवाद साधणारं, आपल्याला काही सांगणारं असं आपलं माणूस असणं हीच तर प्रत्येकाची इच्छा असते. मात्र या सगळ्यात दोन विविध माणसांमध्ये तफावत येत जाते आणि ते नातं पूर्णत्वाला जातंच असं नाही. त्या सुटलेल्या नात्याविषयी नेहमीच मनात भावना राहतात. कदाचित आज ती महत्त्वाची व्यक्ती आपल्या आयुष्यात असती तर, असं झालं असतं वा तसं झालं असतं. अर्थात ते चांगलंही असू शकतं आणि काहींच्या बाबतीत ती गोष्ट वा ते नातं वाईटही असू शकतं. प्रत्येक मागे सुटलेलं नातं चांगल्या वळणावर सुटतंच असं नाही. त्यामध्ये कडवटपणादेखील येतो जो एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर धडा तर शिकवून जातोच. पण काही व्यक्ती या नात्यातील कडवटपणा आपल्या पुढील आयुष्यातदेखील तसाच पुढे घेऊन जातात आणि आपलं आणि समोरच्या व्यक्तीचं आयुष्य खराब करतात.

- Advertisement -

नातं मागे सुटण्यासाठी प्रत्येकवेळी नातं कमजोर असणं हेच एक कारण आहे असं नाही. बर्‍याचदा भोवतालची अथवा घरची परिस्थितीदेखील कारणीभूत असते. त्यावेळी हे दोन्ही व्यक्तींनी समजून घेऊन आपल्यातली असणारी मैत्री जरी जपली तरीही आयुष्य सुंदर होऊन जातं. अर्थात यामध्ये समाज कदाचित आडवा येत असेल. पण दोन्ही व्यक्तींच्या मनात भावना योग्य आणि स्पष्ट असतील तर यामध्ये समाजाचा विचार न करता आपली मैत्री कायमस्वरुपी नक्कीच जपता येईल. पण त्यासाठी नातं मागे सोडण्याची गरज नक्कीच भासणार नाही. माणूस पुन्हा प्रेमात पडू शकतो. त्या प्रेमात आकंठ बुडू शकतो. पण अगदी मरेपर्यंत काही क्षण असे येतातच ज्यामध्ये, मागे सुटलेल्या किंवा सोडलेल्या नात्यांची आठवण येऊ शकतेच. पण त्या नात्यामध्ये किती वाहवत जायचं आणि किती स्थिर राहायचं हे ज्याचं त्यानं ठरवलं तरच आयुष्य सुंदर होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -