घरफिचर्सप्रतिसाद ...

प्रतिसाद …

Subscribe

एकमेकांची तोंडं पाहू नका…
यावर्षी पावसाळा लवकर सुरू होईल, असे संकेत आहेत. तो मोठ्या प्रमाणात होईल, असेही अनुमान आहेत. याचा अर्थ मुंबईकरांसाठी तो अधिक तापदायक असेल, हे सांगायला नको. मुंबईची तुंबई होण्यापासून या शहराला वाचवण्याचा प्रयत्न अनेकजण करतात; पण ज्यांची सर्वाधिक जबाबदारी असते त्या मुंबई महानगरपालिकेचा कारभार अजून सुस्तीतून बाहेर आलेला दिसत नाही. या शहराचे प्रमुख म्हणजे पालिका आयुक्त म्हणून अजोय मेहता यांनी सर्वाधिक काळ या पालिकेत भूषवला. त्यांच्या या काळात गाळात रुतलेले शहरातील नाले अधिक स्वच्छ होतील, अशी अपेक्षा होती; पण काहीही झाले नाही. शहराची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेच्या व्यवस्थेचा कारभार हा उफराटा आहे. भरपूर पाऊस होतो तेव्हा रेल्वेसेवा विस्कळीत होते, हे नित्याचेच आहे. यावर मात करण्यासाठीच आपत्कालीन यंत्रणा असते. पण ही यंत्रणा सातत्याने ढेपाळते असा कायमचा अनुभव असतो. शहरातल्या या प्रमुख दोन यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव हेच याला कारण आहे. दोन्ही यंत्रणांमधले अधिकारी प्रसंग आल्यावर एकमेकांकडे बोट दाखवतात. हा अनुभव यावेळी येऊ नये इतकी अपेक्षा करूयात. -सचिन भोसले,कन्नमवार नगर, मुंबई

मोदींनी निराशा केली
निवडणुका असोत की देशावरील कुठला प्रसंग असो. प्रमुख पदावरील म्हणजे पंतप्रधान पदावरील व्यक्तीने त्या पदाची गरीमा ठेवली पाहिजे. या पदावरील व्यक्तीने खाजगीवर येऊ नये, अशी अपेक्षा असते. आजवरच्या पंतप्रधानांनी याबाबतचा कटाक्ष राखला. पण आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तो ठेवता आला नाही. ते ज्या पक्षाचे नेते आहेत, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही त्यांच्या वागणुकीविषयी आदर राहिलेला दिसत नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी अनेकदा वस्तुस्थिती सोडून वक्तव्यं केली. ती इतकी बेजार होती की पंतप्रधानांसारख्या व्यक्तीने ती करावीत, याचे आश्चर्य वाटते. इतकंच नाही तर त्यांनी राजीव गांधींबाबत केलेल्या वक्तव्यावर तर मोदी यांनी सारी लाज रस्त्यावर आणली. दिवंगत असलेल्या व्यक्तीविषयी प्रत्येकाने संहिता बाळगणे आवश्यक असताना मोदींनी नेहरुंपासून राजीव गांधींपर्यंतच्या नेत्यांवर जी चिखलफेक केली ती पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने प्रथमच केली. ती करून मोदींनी ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही त्यांची खूप निराशा केली. -रविंद्र मणकईकर,वाशी, नवी मुंबई

- Advertisement -

नथुराम, विकृत मानसिकतेची कीड
‘महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता,’ असे विधान दाक्षिणात्य सुपरस्टार आणि मक्कल निधी मियाम या पक्षाचा प्रमुख कमल हसन याने केले. कमल हसन याने केलेले वक्तव्य हे लौकीकार्थाने धर्मकारणाशी जोडणारे आहे. मात्र, तरीही त्या पार्श्वभूमीवर नथुराम गोडसेच्या कृत्याचे समर्थन करणारी जमात आजही उजळमाथ्याने समाजात वावरते, ही खेदाची बाब म्हणावी लागेल. नथुरामभक्ती आणि तिचं समर्थन ही आपल्या समाजाला लागलेली विकृत मानसिकतेची कीड आहे. अलीकडे ती जोरात फोफावते आहे, ही अतिशय चिंताजनक बाब आहे. नथुरामच्या मृत्यूबरोबरच या विकृत मानसिकतेचा अंत व्हायला हवा होता. मात्र, तसे झाले नाही. महात्मा गांधींच्या या खुन्याला आणि त्याच्या विकृत मानसिकतेला जिवंत ठेवणारे दोन प्रकारचे लोक समाजात आहेत.

पहिल्या प्रकारातील लोकांना महात्मा गांधींची जयंती, पुण्यतिथी आली की नथुरामची आठवण येते आणि त्याच्या शौर्याचे, विद्वत्तेचे गोडवे गाण्यास सुरुवात केली जाते. नथुरामाचे उदात्तीकरण करताना ते महात्मा गांधींवर हीन पातळीवर जाऊन टीका करण्याचा सपाटा लावतात. दुसर्‍या प्रकारच्या लोकांना नथुरामशी काहीही देणेघेणे नाही. ते तथाकथित पुरोगामी आहेत. त्यांना हिंदूंवर, हिंदुत्वावर टीका करण्यासाठी नथुराम हवा आहे. त्यासाठीच निवडणुकीच्या काळात आवर्जून नथुरामाचे स्मरण करतात, अशी वाढती विकृती समाजाला केवळ बदनाम करत नाही, तर समाजात कायमस्वरुपी द्वेषाची पेरणी करते. हिंसेचे समर्थन करते. म्हणूनच तिचा जितका निषेध करता येईल.तितका निषेध करायला हवा. त्यासाठी आधी नथुरामरूपी विकृती कायमची संपवली पाहिजे. -रघुवीर सावंत,सिडको, नाशिक

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -