घरफिचर्सप्रतिकिया ...

प्रतिकिया …

Subscribe

कसं व्हायचं आपल्या देशाचं?
देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील एकूण रागरंग पाहता सहज प्रश्न पडतो तो, कसं व्हायचं आपल्या देशाचं? आजवर विरोधी पक्षांकडून अशा कृती केल्या जायच्या. आज सत्ताधारीच यात पुढे असल्याने कोणाकडून काय अपेक्षा कराव्यात? आपले पंतप्रधानच खालची पातळी गाठत असतील आणि तेच केदारनाथला जाऊन ‘ध्याना’ला बसत असतील, तर अजबच म्हटलं पाहिजे. ‘सौ चुवे खा के बिल्ली चली हज’ असाच तोरा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होता. मालकच असा बेफिकीर निघाल्यावर इतरांनी काय म्हणून मागे राहावं? साध्वीसारखे उडपटांग वाट्टेल ते बोलू लागले तरी त्यांना राजदरबारी मानाचं स्थान मिळत असेल, तर न्याय कोणाकडे मागायचा? असंच वातावरण राहिलं तर देशाचं काही खरं नाही.
-संदिप हरिश्चंद्र पाटील,अलिबाग, रायगड

फुटपाथवरच्या लाद्या कुठे आहेत?
मध्यंतरी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी यापुढे फुटपाथवर पेव्हरब्लॉक बसवले जाणार नाहीत, असे जाहीर करून टाकले होते. आयुक्तांच्या या आदेशानंतर काही ठिकाणी असलेले आणि चांगल्या स्थितीतील पेव्हरब्लॉक काढण्यात आले. खरे तर ज्या ठिकाणी नव्याने काम करायचे त्याच ठिकाणी काँक्रीटचा वापर व्हायला हवा होता. त्याऐवजी पालिका असलेले पेव्हरब्लॉक काढण्याच्या मागे लागले आहे. चांगल्या स्थितीतील पेव्हरब्लॉक काढून ते कुठे नेतात याचा उलगडा अजून होत नाही. बरे, आता नव्याने उभारण्यात येत असलेल्या फुटपाथच्या उंचीला जराही नियम राहिलेला नाही. एक फुटपाथ उंच तर दुसरा खोलीत असल्याने अनेकदा चालणार्‍यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. महापालिकेने यावर तातडीने उपाय शोधावेत अन्यथा आजारापेक्षा उपचार महाग ठरायची भीती आहे.
-विशाल सुर्यवंशी,माहीम, मुंबई

- Advertisement -

वाहिन्यांची कमालच झाली
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या एक्झिट पोलमधून सत्ताधारी भाजपसाठी भारतातल्या तमाम वाहिन्यात ज्या प्रकारे आग ओकत आहेत, ते पाहता या वाहिन्या सत्ताधार्‍यांचे बटिकच बनल्या असल्याचे दिसते. बहुतांश वाहिन्यांना भाजपचे सरकार येईल, असे वाटणे स्वाभाविक आहे. २०१४ची स्थिती आणि आजची स्थिती यात जमीनअस्मानाचा फरक आहे. असे असताना २०१४ हून मोठे यश मिळेल, असे सांगणार्‍या वाहिन्या सत्ताधार्‍यांची चाकरी करत असाव्यात असेच वाटते. कारण एक्झिट पोल सुरू झाले तेव्हा एका वाहिनीने भाजपच्या वाट्यात १८० खासदार विजयी होतील असे म्हटले होते. अर्धा तास जात नाही तोच या वाहिनीने तो आकडा १८०वरून २८०वर नेला. हे पाहून काय म्हणावे, तेच कळत नाही. एका वाहिनीने तर ५४३ जागांपैकी भाजपच्या वाट्याला चक्क ५५६ जागा देऊन टाकल्या होत्या. याला आता त्या वाहिन्या प्रिंट मिस्टेक या नावाने गणतील; पण प्रत्यक्षात लोकांची मानसिकता तयार करण्यासाठीच हा खेळ वाहिन्या खेळत असाव्यात, असेच वाटते.
-राजन साठे,विठ्ठलवाडी, उल्हासनगर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -