घरफिचर्सप्रतिसाद पत्र...

प्रतिसाद पत्र…

Subscribe

श्रमसंस्कार शिबिरात मुलांचा सहभाग हवा

उन्हाळी सुट्टीला सुरुवात झाली असून, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. वर्षभर मुलांना शाळा, खासगी क्लासेस आणि अभ्यासामुळे मैदानी खेळ खेळता येत नाहीत. सामाजिक संस्थांतर्फे सुट्टीनिमित्त मुलांच्या शारीरिक, मानसिक विकासासाठी श्रमसंस्कार शिबिरे आयोजित केली जात आहेत. या शिबिरांमध्ये उत्स्फूर्तपणे मुलांना पालकांनी सहभागी करावे. ही शिबिरे म्हणजे बिनभिंतीची शाळा असून, चौफेर सामान्यज्ञान शिबिरांमधून मुलांना मिळते. शिबिरात मुलांना साहसी खेळ शिकवले जातात, त्यातून मुलांची जडणघडण होते. स्पर्धेच्या युगात मुलांनी शारीरिक व बौध्दिकदृष्ठ्या सक्षम असणे गरजेचे आहे, त्यासाठी पालकांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ३ दिवस, साप्ताहिक किंवा १५ दिवसांच्या शिबिरात मुलांना सहभागी करावे. -शांताराम पठाडे-पाटील गंगापूर, नाशिक

- Advertisement -

वाहने पार्क कोठे करायची?

नवीन पंडित कॉलनी व जुनी कॉलनी रस्त्यावर शहर वाहतूक शाखेने एकेरी वाहतूक सुरू केली. हा प्रयोग अयशस्वी झाल्यानंतर वाहतूक शाखेने या रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरू केली. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे पंडित कॉलनीच्या परिसरात रस्ते अरुंद व असल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. दुचाकी व चारचाकी वाहनचालक कामानिमित्त हॉटेल व दुकानासमोरील रस्त्याच्या कडेला वाहने उभे करतात. मात्र, तितक्यात वाहन टोईंग करण्यासाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी येतात व थेट वाहन टोईंग करतात. त्याचा मनस्ताप वाहनचालकाला होत असून, वाहने कुठे पार्क करायची? असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. पंडित कॉलनीतील रस्त्याच्या कडेला पार्किंग ठिकाण घोषित केल्यास वाहनचालकांना वाहने पार्क करतील. -गणेश वाघ पंडित कॉलनी, नाशिक

- Advertisement -

तरुणांनी संघटित होऊन अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा द्याव

एकवीसाव्या शतकाचा आधुनिक युगात टेंभा मिरवित असतांनाच कंजारभाट समाज मात्र अजूनही कालबाह्य अतार्किक प्रथांना तिलांजली देण्यास तयार नाही. याची प्रचिती वारंवार येत आहे. या समाजातील नवतरुण – तरुणींनी या विरूद्ध आवाज उठवला आहे. मात्र आता त्यांनाच विरोधाचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागात देखील या समाजात अजुनही अशा रुढींचे पालन व्हावे, नक्कीच शोभनीय नाही. कालानुरूप बदल करून घेण्याची अजुनही या समाजाची मानसिकता का तयार होत नाही हे अनाकलनीय आहे. या समाजातील सुशिक्षित तरुण – तरूणींनी या प्रथांविरूद संघटितपणे एकत्र येऊन लढा दिलाच पाहिजे. -अनंत बोरसे,शहापूर जिल्हा ठाणे

वृक्षसंवर्धन काळाची गरज

१५ मे रोजी विश्व विशेष सदरात प्रसिद्ध झालेला राष्ट्रीय वृक्ष दिन लेख वृक्ष संवर्धनाची गरज अधोरेखित करतं. रस्ता रुंदीकरणासाठी गरज, उपयोग नसताना राज्य सरकारने वृक्ष तोडीच्या घेतलेल्या निर्णयाला हैद्राबादकरांनी विरोध केला. हैद्राबादकरांच्या या कृतीचे खरोखरच कौतुक. आज देशात, राज्यात विकासाचे वारे वाहत आहेत. मात्र मोठे मोठे प्रकल्प राबविताना पर्यावरणाच्या संवर्धनाकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मेट्रो रेल्वे, रस्ता रुंदीकरणासारखे प्रकल्प राबविताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. एवढेच नाही, तर पावसाळापूर्वी नालेसफाईच्या काम करतानाही आजूबाजूच्या परिसरातील वृक्षांची कोणतीच काळजी घेतली जात नाही. परिणामी कालांतराने ही वृक्षे उन्मळून पडतात. सरकार तसेच स्थानिक प्रशासनाने विकासाची कामे राबविताना वृक्षांना हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी. अनेकदा प्रकल्प राबविताना वृक्षतोडीवर उपाय म्हणून सरकारकडून वृक्षांचे पुर्नरोपण करण्यात येते. मात्र त्या पुर्नर्रोपित वृक्षांचे संवर्धन होत नसल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. राज्याचा, देशाचा विकास होणे जेवढे गरजेचे आहे. तेवढेच वृक्षसंवर्धन होणे ही सुद्धा काळाची गरज आहे. -गौरव गावडे, चेंबूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -