घरफिचर्सउजव्यांदा उजवीकडे!

उजव्यांदा उजवीकडे!

Subscribe

उजव्या बाजूचे राजकीय पक्ष अगदी अशाच पद्धतीने लोकांना भुलवतात. दैनंदिन प्रश्नांकडून लक्ष वळवतात, एका अद़ृश्य मुद्याभोवती आपली भाषणे गुंफतात आणि मते जिंकतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘लेट अस मेेक अमेरिका ग्रेट अगेन‘ असे म्हणत विजय मिळवला. जणू अमेरिका आपले थोरपण गमावून बसलीय! काँग्रेसने भारताची मान खाली घातली असा प्रचार नरेंद्र मोदी यांनी केला. तो कसा केला, कधी केला, का केला, असे प्रश्न मात्र त्यांनी अर्धवट सोडले. लोकांनी पंतप्रधान जे बोलतात त्यावर विश्वास ठेवला आणि भाजपला मते दिली. या विश्वासाचा अर्थ काय?

समजा पोटात काही नाही, पण डोळ्यात धुंदी आहे, तेव्हा माणूस कसे वागतो? ते आता लोकसभा निवडणुकीत पाहायलात मिळाले. भारतीय मतदारांपैकी बहुसंख्याक मतदारांच्या डोळ्यात मोदी होते. म्हणजे मोदींची हवा कुठे दिसत नाही असा दाखला अनेक पत्रकार देत होते. गुरुवारी समजले की ती हवा बहुसंख्याकांच्या डोक्यात जाऊन बसलेली होती. आता हवाच म्हटल्यावर तिची नोंद कशी घ्यायची? ती घ्यायची असल्यास तिच्या प्रभावाने काय केवढी उलथापालथ झाली याचा तपास करायचा असतो. अद्याप भाजपला किती टक्के भारत अनुकूल होता हे समजायचे आहे. तरीही भाजपेतर भारतीय मतदार त्यापेक्षा नक्कीच जास्ती असणार. काँग्रेस पुन्हा बिचारी ठरली तरी आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पं. बंगाल, उडिसा, केरळ या राज्यांनी भाजपला थोपवून धरले आहे. म्हणजे मोदी हे भारताचे एकमुखी नेतृत्व नसून अन्य नेत्यांचाही प्रभाव खूप आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा हा की शेकडो योजना व उपक्रम जाहीर होऊन आणि त्यात अपयश येऊनही हातपोट रिकामे असलेला मतदार मोदी यांनाच का कवटाळून बसला?

- Advertisement -

एक गोष्ट स्पष्ट आहे की अवघे जग उजवा विचार पत्करून बसले असताना भारत वेगळा कसा राहील? अगदी याच आठवड्यात पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाच्या निवडणुकीतही उजव्या विचारांचा पक्षच विजयी झाला. त्यामुळे भारत गेली पाच वर्षे उजवा होता. १७ व्या लोकसभेत तो पुन्हा उजवा झाला. उजवा म्हणजे काय? तो भांडवलशाहीचा समर्थक असतो. श्रीमंत, जमीनदार, मध्यमवर्ग आणि गुंतवणूकदार यांच्या बाजूने तो राहतो आणि संमिश्र, गरीब, शेतकरी व दलित यांच्या विरोधात तो राहतो. त्याचा उत्तम दाखला म्हणजे नोटबंदी, जीएसटी, नोकरकपात, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची दिवाळखोरी, खाजगी क्षेत्राचा कर्जबाजारीपणा इ. समस्यांत उमटतो. शेतकर्‍यांच्या आत्महत्या भाजपच्या राज्यात वाढल्या.

शैक्षणिक, क्षेत्रात लाखो शिक्षक अर्धबेकार व कंत्राटी अवस्थेत आहेत. असंख्य इस्पितळे औषधांवाचून आणि डॉक्टर नर्सेस यांच्या कमी संख्येत जगत आहेत. महिलांवर आणि दलित जातींवर अत्याचार मोदी सरकारात वाढले. त्याचे कारण उजव्या विचारांत दडले आहे. हा विचार पुरुषसत्ताक, सशक्तांच्या बाजूचा आणि विषमतेचा पुरस्कर्ता असतो. दान, सवलती, आरक्षण यावर तो संशय घेतो. आता तर उजवा विचार असे ठसवू पाहतोय की सार्‍या समस्यांचे मूळ परधर्मी आणि परदेशी माणसे आहेत. त्यांचे स्थलांतर आणि देशाच्या उत्पन्नाचा मोठा वाटा हीच माणसे हडप करीत आहेत.

- Advertisement -

असेही ते सांगत राहतात. भारतामध्ये अशी माणसे म्हणजे मुसलमान आणि आरक्षणाचे लाभ घेणारे विविध जातीसमूह. या लोकांचा अनुभव म्हणजे तुष्टीकरण, जातीयवाद म्हणजे सवलती लाटणार्‍या जातींचा अनुनय आणि नकली धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्माचे सार्वजनिक जीवनातील स्थान न मानणे असे मुद्दे हा उजवा विचार ठासून सांगत राहतो. हे नवे राजकारण असून एकविसाव्या शतकातील राजकारणाचा अर्थच हा आहे असे नरेंद्र मोदी सांगतात. याचा अर्थ असा की सामाजिक न्यायाची व्याख्या भाजप आता ठरवणार. सवलती व आरक्षण यांचीही नवी सत्ता भाजप निश्चित करणार. याचे राजकारण म्हणजे मुसलमानांना तिकिट न देताही जिंकून दाखवणे. उत्तर प्रदेशात भाजपचा एकही मुसलमान आमदार नाही. आणि आता लोकसभेतही तो असण्याची शक्यता नाही. दलित जातींना न कुरवाळताही जिंकता येते हेच भाजपने दाखवून दिले.

तरीही स्वतः भाजपने जातींचे महत्त्व कमी लेखले नाही. एकट्या लखनौ शहरात भाजपने वेगवेगळ्या २० जातींचे मेळावे घेतले आणि त्या एकवटल्या. यादव व जाटव या जातींना शह देण्यासाठी अगदी छोट्या जाती एकवटण्याचे भाजपने ठरवले. म्हणजे भाजपचीही जातीयता आहे. मला ती ‘वेगळी’ आहे. भाजप असा दुटप्पी लोकांचा पक्ष मानला जातो. मंत्रिमंडळावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही असे मोदी म्हणतात. मात्र राफेल विमान खरेदीमधील तफावतीच्या संशयाचे निराकरण करीत नाहीत. एकीकडे गांधी-गोडसे वादात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरचा निषेध करायचा, मात्र तिच्यावर कारवाई काही करायची नाही. गरीबांसाठी आपण काम करू असे सांगायचे आणि प्रचारात झालेला हजारो कोटी रूपयांचा खर्च लपवायचा. उजव्या विचारांचे पक्ष असे पैशाच्या बाबतीत खळखळ करीत नसतात.

सभ्यता व संस्कृती यांचे आपणच रखवालदार असल्याचे भाजपने नेहमी सांगितले. पण मोदी व शहा यांनीच निवडणूक आचारसंहिता संपूर्ण प्रचारात मनमानी करत धुडकावली. निवडणूक आयोग या भागाकडे दुर्लक्ष करीत राहिल्याचा आरोप मग होत राहिला. निवडणूक झाल्यावर मतदान यंत्रांचा विषय कोणी काढला नाही. एक्झिट पोल बाहेर आल्यावर तसा संशय व्यक्त झाला. मात्र २३ रोजी ब्र ही कोणी काढला नाही. मुद्दा यंत्रांचा नव्हता, यंत्रे ज्या हातात होती ते हात संशयाच्या वेढ्यात सापडले होते. आता मतदान यंत्रांचा मुद्दा कायमचा गाडला जाईल. अशी आशा करू या. एक बाब कोणाच्याच लक्षात आली नाही. देश अनेक आर्थिक, सामाजिक समस्यांनी त्रस्त झाल्यावरदेखील राष्ट्रप्रेम, देशभक्ती, असुरक्षितता या प्रश्नांनी मते खेचली कशी हा पेच काही केल्या सुटत नाही.

पोटापाण्याचे प्रश्न निवडणुकीत महत्त्वाचे ठरतात असा इतिहास आहे. तरीही भावनिक आणि भासमान मुद्दे वरचढ ठरले. आणि त्यांनी भाजपला प्रचंड मोठा विजय मिळवून दिला. ‘आयडेंटिटी पॉलिटिक्स’ अर्थात अस्मितांचे राजकारण यंदा यशस्वी ठरले असे नक्की म्हणता येईल. उजवा विचार अशा अनेक अस्मिता वापरीत असतो. देशाचा मान, देशाची प्रतिष्ठा आणि देशाची ताकद या बाबतीत मोदी सरकारने खूप कार्य केले असा प्रचार झाला. या शब्दांचा नेमका अर्थ कोणी सांगू शकत नाही. कारण मान, प्रतिष्ठा, ताकद यांची मोजदाद करता येत नसते. उलट बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, मुस्लिमांच्या हत्या आणि शतेकर्‍यांच्या आत्महत्या यांनी भारताची मानहानी होईल की नाही? परंतु भारतीय मतदारांनी हे प्रश्न आपल्या परिचयाचेच आहेत, त्याऐवजी देशाचा स्वाभिमान मोदींनी कसा मजबूत केला आणि पाकिस्तानला कसा धडा शिकवला यातच जास्त आनंद मानला आणि मोदी यांना भरभरून साथ दिली.

उजव्या बाजूचे राजकीय पक्ष अगदी अशाच पद्धतीने लोकांना भुलवतात. दैनंदिन प्रश्नांकडून लक्ष वळवतात, एका अद़ृश्य मुद्याभोवती आपली भाषणे गुंफतात आणि मते जिंकतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘लेट अस मेेक अमेरिका ग्रेट अगेन‘ असे म्हणत विजय मिळवला. जणू अमेरिका आपले थोरपण गमावून बसलीय! काँग्रेसने भारताची मान खाली घातली असा प्रचार मोदी यांनी केला. तो कसा केला, कधी केला का केला असे प्रश्न मात्र त्यांनी अर्धवट सोडले. लोकांनी पंतप्रधान जे बोलतात त्यावर विश्वास ठेवला आणि भाजपला मते दिली. या विश्वासाचा अर्थ काय?

अर्थसत्य, अपप्रचार, अफवा, गैरसमज, असत्य करून आणि धूळफेक यांचा बेमालूम वापर मोदी व शहा यांनी प्रचारात केला. बडी माणसे जे बोलतात त्यांची शहानिशा करायची नसते असा भारतीय संस्कृतीला सांगावा असतो. आमच्यावर संशय घेऊ नका, कारण आम्ही इमानदार आहोत. खरे देशसेवक आहोत, काँग्रेसवाले नकली देशसेवक आहेत असे स्वतःच मोदी सांगत राहिले. त्याचा परिणाम असा झाला की भाजपला लोक खरे मानत राहिले आणि मते देत राहिले. आता या सांगण्याचा प्रतिवाद काँग्रेस कोठेच करू शकली नाही. त्याचा दुसरा अर्थ असा की काँग्रेससह विरोधी पक्ष प्रचारमाध्यमांनी दूर ठेवले होते. त्यामुळे खरे खोटे यांचा गोंधळ उडाला आणि मोदी साळसूदपणे जिंकले.

काँग्रेसची प्रतिमा रंगवताना मोदी, शहा व अन्य नेते फक्त काळाच रंग वापरत राहिले. त्याचा प्रभाव पडला. मोदींनी गेली पाच वर्षे आपली प्रतिमा त्यागी, निस्वार्थी, कर्मयोगी, फकीर आणि गरीबांचा प्रतिनिधी अशी स्वतःच बनवून ठेवली. जवळपास रोजच. त्यामुळे ज्यांना राजकारण म्हणजे भ्रष्टाचार, लबाड्या असेच वाटते त्यांना मोदी किती चांगले आहेत असे वाटले. त्यातच पुलावामा व बालाकोट येथील घटनांनी पाकिस्तान हेही निवडणूक प्रचारात अप्रत्यक्षपणे उतरले आणि मोदी किती साहसी, बेधडक असा विश्वास उत्पन्न झाला. या दोन्ही घटनांसंदर्भात कित्येक प्रश्न विरोधकांनी विचारले ते मोदी व शहा यांनी उलटवले आणि विरोधकांच्या देशप्रेमावर संशय उत्पन्न केला. लोकही त्याला भुलले.

आता मोदी व भाजप यांची बनवाबनवीची भाषा तपासून पाहू. जातीयेची व जातीच्या आधारावर चालणार्‍या राजकारणाची उपयुक्तता संपल्याचा मोदींनी आभाराच्या भाषणात उल्लेख केला. वास्तवात जातीविरुद्ध काहीही न करता फक्त तोंडी निषेध करणे म्हणजे शुद्ध बनाव असतो. भारतात जातीविरोधी आंदोलनाचा इतिहास आहे. तो संपलाच नाही. त्यामुळे मोदींचे म्हणजे निरर्थक आहे. जात तर वापरायाची पण तिचा जाहीर उल्लेख करायचा नाही हा एक भाग. दुसरा हिंदुत्वाच्या संघटनाआड जातीचे संघटन नेहमी येते. म्हणूनही जातीचा धिक्कार करत राहायचा हा संघाचा जुनाच कावा आहे.

सरकारचे असंख्य कार्यक्रम, योजना व विशिष्ट जातींसाठी असतात. जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी जातींचा वापर आणि जातींचा विकास करावा लागतो. भाजप हे करीत नाही काय? जागृत झालेल्या जातींना सभागृहांत प्रतिनिधीत्व द्यावे लागते. त्यासाठी जात हाच नियम असतो ना? समाजात दोनच जाती असतात. गरीबाची आणि गरीबी हटवू पाहणार्‍यांची. हा फसवा आणि भ्रामक दावा आहे. कारण भारतात जातीमुळे दारिद्र निर्माण होण्याचेच प्रमाण अधिक आहे. गरीबी हा सामाजिक अप्रितिष्ठेचा मुद्दा नसून कोण कोणत्या जातीचा असतो तो आहे. माणसाची मानहानी गरीब करीत नाही ती जातीची श्रेणी आणि जातीची संख्या तसेच मिळालेली सत्ता या गोष्टी करीत असतात.

असे खूप ‘जुमले’ म्हणजे भंकस मोदी-शहा करीत असतात व करीत राहतील. हिंदुत्व जागते ठेवायचे अन जात नाहीशी करायची बात सांगायची ही विसंगती नाही का? अंबानी व अदानी यांच्याशी मैत्री ठेवायची अन स्वतःला गरीबांचा सखा म्हणून घेत राहायचे हाही दुटप्पीपणा आहे. स्वतः मोदी आपल्यावर किती खर्च करतात तेही लपलेले नाही. त्यांचे कपडेच त्यांचा रोज किती खर्च होतो हे सांगतात. मुळात भाजप ना गरीबांचा पक्ष म्हणून जन्मला, ना वाढला ! त्याची धोरणे स्पष्टपणे व्यापारी, भांडवलवादी आणि उद्योगकेंद्री आहेत. व्यापार, भांडवल, उद्योग यामध्ये कोणत्या जाती आघाडीवर आहेत हे काय भाजपला माहीत नाही? तेव्हा यंदाच्या निवडणुकीचा सारांश असा की सरकार मजबूत मिळाले. पण आधीच कंगाल झालेला भारतीय मतदार मजबूत कोणत्या कारणाने होणार? कारण पोटात काही असेल तरच डोके काम करत असते. डोक्यातली नुसती हवा काही कामाची नाही.



लेखक जयदेव डोळे राजकीय विश्लेषक आहेत. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -