नदी वाहते…नदी परिसंस्था आणि कृत्रिम पूर !

पश्चिम महाराष्ट्रने आपलं पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या शहराभोवती मोठमोठी धरणे बांधून पाणी अडवून धरले आहे. खाली मराठवाडा कोरडा. आमच्या भागात पडलेल्या पाण्यावर आमचा हक्क असं आपल्या धरणांमागची भूमिका. पण यामध्ये नदी अडवली जाते. जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा हीच धरणे शहरासाठी धोक्याची वाटू लागतात. मग धरणाचे दरवाजे उघडले जातात. अचानक मोठ्या गतीने सोडलेल्या पाण्यामुळे लगतची गावे संपूर्ण पाण्याखाली जातात. नदीला पूर येतो. त्या अर्थाने हा कृत्रिम पूर आहे. हा जरी कृत्रिम पूर असला तरी, पूर हीदेखील नदीची एक अवस्था आहे, ते कधी तरी येणार हेही आपण विसरता कामा नये.

Mumbai

आपला देश नदीला प्रचंड पवित्र मानणारा देश आहे. वर्षातून अनेकदा नदीची पूजा केली जाते, आरती उतरली जाते. तीर्थ म्हणून नदीतील पाणी प्राशन केले जाते. नदीतील विशेषत: संगम असलेल्या ठिकाणच्या आंघोळीतून आपली सर्व पापे धुऊन जातात, असा जनमानसात दृढ समज आहे. पण ही नदी किती आणि कोणकोणती पापे पोटात घेणार? धार्मिक भाषेतच बोलायचे झाले तर, नदीचाही एक धर्म असतो. मुक्तपणे वाहते ती नदी. म्हणून तर अनेकदा एखाद्या व्यक्तीला नदीसारखा प्रवाही हो, असे सल्ले दिले जातात. या अशा मुक्त वाहणार्‍या नदीच्या प्रवाहावर आपण नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहोत. नदीच्या प्रवाहाचा आवाका आणि दिशा निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहोत. विशेषत: शहरंही या कामात पुढे आहेत. शहरी वाहतूक व्यवस्थेला लेनची शिस्त पाळण्याबद्दल आपण जितके आग्रही नसतो, त्याहून जास्त शिस्तीत राहावे ही आपली नदीकडूनची अपेक्षा.

गेल्या आठवडाभरात अनेकांनी आपली व्यथा मांडली. काहींनी सामाजिक माध्यमावर तर काहींनी मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रातून. माझ्या घराभोवती तळं साचलंय!, आमच्या घरात नदी घुसलीय! अशा शब्दात अनेकांनी आपली अवस्था जगजाहीर केली. ज्यांना-ज्यांना या गेल्या आठवडाभरात त्रास झाला, जीवापाड मेहनत करून मिळवलेल्या, जपलेल्या वस्तू गमवाव्या लागल्या. संसार उघड्यावर पडलं. कुसुमाग्रजांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे, होतं नव्हतं ते सर्व गेलं. अनेक ठिकाणी तर मोठी जीवितहानी झाली. बीबीसी मराठीच्या वृत्तानुसार कोल्हापूर या एका जिल्ह्यात, गेल्या चारपाच दिवसात सोळा लोकांचे जीव गेले. या सगळ्याप्रती सहानुभूती आहेच. त्यांचे पुनर्वसन होईल, त्यांना मदत केली जाईल, हे सर्व आपली सामाजिक जबाबदारीच आहे. या पलीकडे अशा घटनांचा विचार करावा लागेल. नदी आपल्या घरात आली का आपण नदी पात्रात आपली घरे बांधली किंवा घेतली? आपल्या घराभोवती तळे झाले की तळ्याच्या जागेत आपण घर घेतले किंवा बांधले? या प्रश्नांचा विचार करावा लागेल.

नदी किनार्‍यापासून ५०० मीटर पट्टा ना विकास क्षेत्र असतो, त्यात वृक्षारोपण करून हरित पट्टा तयार करावा. ५०० ते ७५० पर्यंतच्या पट्ट्यात हरित व नारंगी उद्योग यांना परवानगी असते. त्यानंतर ७५० मीटर नंतरच्या पट्ट्यात कोणतेही उद्योग उभारता येतात. मात्र त्या उद्योगामधून निघणारे सांडपाणी, कचरा यांचे रीतसर व्यवस्थापन त्या उद्योगाने करणे अपेक्षित असते. उद्योगांची प्रदूषण क्षमतेनुसार रंगांमध्ये वर्गवारी केलेली आहे. ती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आपापल्या शहरातील, गावातील नद्यांवरील निकषांनुसार किती खरे ठरते हे तपासून पाहिल्यास निराशाच हाती लागेल.

काही दिवसांनी पूर ओसरेल. नदी आपल्या ‘मूळ अवस्थेत’ जाईल. मूळ अवस्थेत जाईल म्हणजे? नदीचा पूर काही वेळा महापूर या ही तिच्या अवस्था आहेत. नदी जेव्हा आपण आखून दिलेल्या चाकोरीत वाहू लागेल, तेव्हा काहीच दिवसात आपण तिच्या या वेगवेगळ्या अवस्थांचा विसर पडेल. मग आपली नदीकाठावरील तथाकथित विकासकामे सुरू होतील.
तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपण नदी परिसरातील बांधकामे, विकासकामे, कारखाने, याबद्दलचे नियम बनवितो. वेगवेगळ्या शासन निर्णय, उद्योगांच्या मान्यता मार्गदर्शिका, पर्यावरणीय मान्यता यामध्ये ते ठळकपणे लिहिलेल्या असतात. मात्र प्रत्यक्ष जमिनीवर, अंमलबजावणीच्या पातळीवर त्यांची काय स्थिती असते. किती नियम पाळले जातात? याबद्दल महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतातील अवस्था सारखीच आहे.

माझा शोध निबंध पुन्हा वाचा. गेल्या पाच हजार वर्षांत कोणती महानगरं टिकली आहेत? महानगरं उद्ध्वस्त व्हायला कुर्‍हाडी न् रथ कशाला लागतात? ऐतखाऊ नागरी समाज आधीच स्वतःच्या आतल्या हिंसेच्या भुसभुशीत पायावर उभा असतो. शिवाय कच्चा माल येणं थांबलं, पाणी बंद झालं, पेट्रोल, गॅस संपले, व्यापार कोसळला, निसर्गाचा कोप, नदीनं पात्र बदलवलं, की हे फुग्यासारखे फुटतात. फाट फाट (पान- १०) हे हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबरीमधील खंडेरावची मांडणी आहे. अर्थात ही कादंबरी आहे. यातील शहरं उद्ध्वस्त होण्याची कारणे अतिशयोक्तीपूर्ण आहेत. तरीही सध्याच्या आपल्या शहरी विकासाची दिशा आणि पद्धती याबद्दलचे सूचक संकेत देणारी ही मांडणी आहे.

नदीकडे निव्वळ वाहणारे पाणी म्हणून बघून चालत नाही. नदीची एक परिसंस्था असते. परिसरातील छोटी मोठी तळी, डोंगर, डोंगरावरील झाडे, ओढे, घळी, शिवाय नदीकाठची व नदीमधील गवत, शेवाळ, मासे, पक्षी, कीटक या सर्वांची मिळूनची समृद्ध जैवविविधता असं खूप काही नदीच्या परिसंस्थेतील घटक असतात. नदी परिसरातील टेकड्यांवरील झाडांची संख्या कमी होऊन पाणी मुरण्याचे प्रमाण कमी कमी होऊ शकते. शहरातील, शहरालगतच्या गावामधील टेकडी आपल्याला अनेकदा बिनकामी किंवा अडचणीच्या वाटतात. कधी एकदाची ही टेकडी फोडून तिथे भव्य इमारती उभ्या करायच्या हे त्या-त्या शहरातील बिल्डरचे स्वप्न असते. छोट्या मोठ्या रकमेच्या लालचेतून अधिकारी, लोकप्रतिनिधी अशा बांधकामाला परवानग्या देऊन मोकळ्या होतात. मग सुरू होतं एक मोठं विकासकाम. हे विकासकामच नदी परिसंस्थेवरील पहिला आघात असतो. बांधकामासाठी वाळू परत नदीमधून उपसली जाते. एकीकडे सिमेंटच्या काँक्रीट घरासाठी लागणार्‍या प्रचंड वाळू उपस्यामुळे नदीपरिसंस्था धोक्यात येते, तर दुसरीकडे अशा घरामुळे घरातील उष्णतेत पाच ते दहा डिग्रीने वाढ होते. आता पर्यायी घरांचे मॉडेल्स, पद्धती यांची चर्चा होत आहे.

प्रत्येक जीवाचा मूलभूत स्रोत हे पाणी आहे. आपलं पाणी सुरक्षित करण्यासाठी आधुनिक माणूस प्रचंड खटाटोप करीत आहे. मात्र त्याचे प्रयत्न हे फक्त त्याच्यापुरते विचार करणारे आहेत. माणसाने संपूर्ण जीवसृष्टीचा विचार करावा, ही खूप दूरची गोष्ट आहे. माणूस म्हणून आपण सर्वांचा कुठे विचार करतोय. एकीकडे राष्ट्रीय एकात्मतेच्या गप्पा करताना, आपली देशभक्ती ओसंडून वाहताना, प्रांताप्रांतातील पाण्याचे प्रश्न, संघर्ष साफ दुर्लक्षिलेले असतात. पश्चिम महाराष्ट्र आपलं पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या शहराभोवती मोठमोठी धरणे बांधून पाणी अडवून धरली आहेत. खाली मराठवाडा कोरडा. आमच्या भागात पडलेल्या पाण्यावर आमचा हक्क असं आपल्या धरणांमागची भूमिका. पण यामध्ये नदी अडवली जाते. जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा हीच धरणे शहरासाठी धोक्याची वाटू लागतात. मग धरणाचे दरवाजे उघडले जातात. अचानक मोठ्या गतीने सोडलेल्या पाण्यामुळे लगतची गावे संपूर्ण पाण्याखाली जातात. नदीला पूर येतो. त्या अर्थाने हा कृत्रिम पूर आहे. हा जरी कृत्रिम पूर असला तरी, पूर हीदेखील नदीची एक अवस्था आहे, ते कधी तरी येणार हेही आपण विसरता कामा नये.

आपण माणूस सोडून इतर सर्व जीवसृष्टी आपल्यासाठी निव्वळ संसाधन समजतो. भौतिक आणि एकरेषीय विकासाचे भूत मानगुटीवर बसलेल्या समाजात, माणूस हा निसर्गाचा, जीवसृष्टीचाच एक घटक आहे, हे पटवणं अवघड आहे. ते काम एक दिवस सृष्टीकडून निश्चितच होईल. तूर्तास आपण संसाधन म्हणून विचार केला तरी, त्याचा शाश्वत वापर करण्याचा प्रयत्न व्हावा. वेगवेगळ्या शाश्वत पद्धती शोधायला हव्या. जीवनावश्यक पाण्याचे काळजीपूर्वक वापर करायला हवं. टेकडी, डोंगर, झरे, ओढे, छोटी नदी, मोठ्या नद्या, नदी लगतची तळी, या सर्वांमध्ये असलेली झाडे, झुडपे, गवत, पशु, पक्षी, कीटक, वाळू, रेती, माती ही नदीची परिसंस्था आहे. यातील एक एक कडी तोडून आपण नदीला धोक्यात आणतो. तेव्हा आपण आपले भविष्य धोक्यात आणत असल्याचे थोडाही विचार करीत नाही. नदीला मग आपल्या घरात येऊन याची जाणीव करून द्यावी लागते.

-बसवंत विठाबाई बाबाराव: (लेखक ‘पर्यावरण शिक्षण’ विषयाचे अभ्यासक आहेत.)