घरफिचर्सपॉझिटिविटी मेंदू आणि माईकवाली !

पॉझिटिविटी मेंदू आणि माईकवाली !

Subscribe

हरिता पुराणिक –

मी रेडिओ जॉकी झाले त्यावेळी प्रत्येक शो नंतर लोकांचा प्रतिसाद मिळणं नव्या काळात अप्रुपाचं असायचं. ‘अमुक एक गाणं लावा’, ‘आवाज छान आहे’, ‘गाणी सुंदर लावलीत’, ‘कार्यक्रम चांगला होतोय’, अशी पावती दिली जायची.. गाणी लावल्यानंतर येणारे फोन कॉल्समध्ये हळूहळू वाढू लागले. काही जणं त्यांची दु:ख, नैराश्य, एकटेपण कमी करण्यासाठी माझ्यासमोर मोकळे व्हायला लागले. मी लावलेल्या गाण्यांमधून, माझ्या ऑनएअर मारलेल्या गप्पांमधून, गाण्यांमध्ये बोललेल्या शब्दांमधून सकारात्मकता शोधायला लागले….

- Advertisement -

मी एफएम गोल्ड रेडिओ चॅनलसाठी आरजे म्हणून काम करते त्याला आता पाचेक वर्षं झाली. हंड्रेड पॉइंट वॅन फ्रिक्वेन्सीवर वाजणारं हे चॅनल. या प्रवासादरम्यान अनेक हेलावून टाकणारे अनुभव वाट्याला आले. मी जशीजशी जुनी होत गेले तसं श्रोत्यांचं आपुलकीने बोलणं वाढलं. हे सगळं घडू लागलं तेव्हा शब्दांची मला खऱ्या अर्थाने बोलण्यातली ताकद कळायला लागली. असं वाटलं की, आपल्याला पाहिलंही नाही या लोकांनी मग त्यांना आपल्याशी बोलावसं का वाटतंय? उत्तर शोधताना कळालं की आपण आपले श्रोते म्हणून प्रत्येक माणसाशी आपल्या चौकटीत राहून प्रेमाने, आदराने, अदबशीरपणे बोलतो. त्यांचं ऐकून घेणारे दर्दी कान बनतो म्हणून यांना आपल्याशी बोलायचं असतं, आपल्याला ऐकायचं असतं. स्वगतातून मिळालेल्या या उत्तरानंतरच माझी स्वत:च्या बोलण्याकडे आणि कामाकडेही पाहण्याची नजर खूपच बदलली. फक्त ऑन एअर नाही तर स्टुडिओबाहेरही जास्त जबाबदारीने, सकारात्मकतेने बोलायला लागले. बोलणं सुंदर असतं आणि सुंदर बोलणंच गरजेचं असतं, हे तेव्हा प्रकर्षानं जाणवायला लागलं.

बोलणं सुंदर हवं… ते तोडणारं नाही
आजचं जीवन सतत वाढत्या हे दगदगीचं, ताणतणावाचं आहे. नवनवी आव्हानं, छोटी मोठी संकटं, त्यातून येणारा मनस्ताप हे सारं प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनलंय. अशा वेळी आनंदाचे, हास्याचे दोन क्षण देणारे बोलके शब्दच वेगळी जादू करून जातात, हे पटायला लागलं.. या बोलण्यालाही आपलं असं व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या स्वभावाचं, वृत्ती-प्रवृत्तीचं, वागण्याचं, जाणीवा-नेणीवांच ते प्रतिबिंब आहे. आपल्या बोलण्याच्या पद्धतीवरून, त्याच्या टोनवरून, वापरलेल्या शब्दांवरून लोकं आपल्याला कळत-नकळत जोखत असतात. आपल्याबद्दल अंदाज बांधत असतात, हे मनात पक्क झालं. म्हणूनच बोलणं सुंदर हवं.. कारण, ते तोडणारं नाही, तर जोडणारं माध्यम आहे, हे मनावर कोरलं गेलं.

- Advertisement -

या माध्यमाकडे पाहण्याची दृष्टी बदलली
आम्ही आरजे लोक आज आमच्या फक्त बोलण्यातून इतके मित्र जोडतो, त्यांच्यासाठी नवी उमेद देणारे बनतो. आपल्यामुळे कोणाला सकारात्मकता मिळते आहे या नुसत्या विचारानेच आमचा आमच्यातला आत्मविश्वास वाढतो, नवी ऊर्जा येते. फक्त सुंदर बोलल्याने आमचं आयुष्य बदलतं तर, बोलणं या माध्यमाकडे पाहण्याची दृष्टी इतरांनीही बदलली तर जगात किती बदल घडेल, नाही का?

आयुष्य जास्त सुटसुटीत होईल
मला असं कायम वाटतं की, आपण आपल्या राहणीमानाचा, पेहेरावाचा, दिसण्याचा जितका विचार करतो तितका विचार आपल्या बोलण्याचा, त्याच्या टोनचा, आवाजाचा कधीच करत नाही. सुंदर बोलणं हे बोलण्याच्या क्षेत्रातल्या व्यक्तींसाठीच गरजेचं आहे, असं अगदी गृहीत धरून चालतो. पण, जर आपल्या आजुबाजूचं प्रत्येक जण एखाद्या आरजेसारखं आपुलकीने ऐकून घेणारं, जमेल तितकं सकारात्मक बोलणारं, शब्दन्शब्द उर्जेनं भारलेलं.. बोलण्यातून क्षणाचं सुख देणारं झालं तर? तसं झालं तर, आपलं आयुष्य आत्तापेक्षा जास्त सुटसुटीत होईल, प्रत्येकाच्या आयुष्याचा पोत किंचितसा का होईना पण बदलेल, लहानमोठ्या प्रश्नांकडे पाहण्याची, त्यांना हाताळण्याची पद्धत बदलेल.. नैराश्याचं प्रमाण काही अंशी का होईना कमी होईल. सकाळी सकाळी ऑफिसला जाण्यासाठी मनाने तयार नसणाऱ्यांना.. रिक्षेची शोधा-शोध.. बसची शोधा-शोध करून चिडचिडे झालेल्यांना.. सकाळ खराब झाली, ट्रेन मिस होणार, रोजची बस जाणार, असं म्हणत रोज वैतागणाऱ्यांना… ओरडत, भांडत ट्रेनमध्ये उभं राहू पाहणाऱ्यांना लागणारी उमेद पुरवण्यासाठीचे शब्द अनेकांकडे तयार असतील. शेवटी जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला परत मिळणार हा सृष्टीचा नियम आहे, जसा धवनी तसे त्याचे अंतांत प्रतिध्वनी उमटतात. त्यामुळे आपण सुंदर बोललो, सकारात्मक बोललो तर ते परत आपल्यापर्यंत अनेक पटींनी येणारच आहे. आपल्याही आनंद मिळवण्याच्या गरजा इतरांच्या बोलण्यातून येणार आहेत.

वाईटातूनही सौंदर्य शोधा
आपल्या मेंदू आणि समोर असलेल्या अदृश्य माईकवरून सतत आनंदी बोलत राहूया.. दु:ख तर आहेच, असायलाच हवी, पण, थोडं सुखातलं बोलूया.. इतरांना न रुचणारं, टाळता येणारं बोलणं वगळूया आणि हवंहवंसं वाटणारं, सुखावणारं बोलणं मिळवूया.. सगळ्यांना कनेक्ट होणारी तार छेडूया.. अदृश्य का होईना पण, माईक आहे समोर तर, स्वत:ला खूश राहण्याची सवय लावूया.. वाईटातूनही सौंदर्य शोधूया.. हारण्यातलंही जिंकणं शोधूया.. नसण्यातलं असणं पाहूया.. दु:खातले आनंदी सोबती बनुया आणि अनन्य साधारण दुर्लक्ष केली गेलेली आपल्यातलीच ही एक गोष्ट म्हणून बोलण्याकडे पाहूया.. तिच्याकडे नव्याने वेगळ्या दृष्टीने पाहणं ही प्रक्रिया अवघड असेल कदाचित.. पण, जर ते साध्य करू शकलो तरच आपण आपल्या वैयक्तिक आयुष्याचे ‘रेडिओ जॉकी’ होवू शकू, खूप काही हवंहवंसं ऐकणारे, ऐकवणारे !

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -