Saturday, August 8, 2020
Mumbai
27 C
घर फिचर्स …दास्ताँ!

…दास्ताँ!

एस.डी.बर्मन जराही न बिचकता, जराही न अडखळता म्हणाले, ‘ये रात, ये चांदनी फिर कहाँ, सुन जा दिल की दास्ताँ, हा आपल्या ह्या गाण्याचा साहिरनी लिहिलेला मुखडा आहे, ह्या मुखड्यातला शेवटचा शब्द आहे ‘दास्ताँ.’ हा दास्ताँ हा शब्द हेमंतकुमारच्या आवाजातलं रेशिम जास्त प्रभावीपणे आपल्या ह्या गाण्यातली दास्ताँ व्यक्त करील असं मला वाटतं.’ एस.डी.बर्मनचं हे गुरूदत्तना केवळ द्यायचं म्हणून दिलेलं उत्तर नव्हतं तर गुरूदत्तच्या का, कसं, केव्हा, कुठे अशा चिकित्सक सवालांना दिलेला सडतोड जबाब होता.

Mumbai

गुरूदत्त आणि राज कपूर, दोघांचंही एक वैशिष्ठ्य होतं. दोघांना संगीत ह्या विषयात जास्त दिलचस्पी होती. आपल्या सिनेमाचं संगीत मनमोहक व्हावं ह्याचा त्यांना ध्यास असायचाच, पण ते संपूर्णपणे आपल्या मनासारखं असावं असं त्यांना वाटायचं. त्यामुळे त्यांच्या सिनेमांच्या संगीतकारांवर एक प्रकारचं दडपण असायचं. कधी कधी संगीतकार त्यांना सुचलेली चाल ह्या दोघांकडे घेऊन यायचे. संगीतकारांना आपल्याला सुचलेली ती चाल केवळ अद्वितीय वाटलेली असायची. ते त्या आनंदाच्या आवेगात ह्या दोघांना भेटायला यायचे. दोघांना ती चाल ऐकवायचे. पण गुरूदत्त आणि राज कपूर, दोघं संगीतातले नुसते दर्दी नव्हते तर संगीताचे चिकित्सक होते. दोघं आपल्या सिनेमाच्या संगीतकाराकडून येणारा माल असा काही काटेकोरपणे निरखून-पारखून घ्यायचे की सोनाराच्या दुकानातलं गिर्‍हाईक लाजेल. संगीतकाराला ग्रेट वाटलेली चाल ह्या दोघांनीही ऐकली आणि त्यांना जर आवडली नाही तर ते तिथल्या तिथे त्या गाण्याची सगळ्या बाजूंनी कुंडली मांडायला बसत.

राज कपूरच्या सिनेमातल्या गाण्याचं रेकॉर्डिंग करताना खुद्द लता मंगेशकर राज कपूरना गंमतीन म्हणत की राजसाहेब तुम्ही कृपया बाहेर बसा, कारण तुम्ही गाण्यात सारख्या सुधारणा सुचवत राहता. गुरूदत्त तर सरळ सरळ संगीतकारांच्या चाली बदलायला सांगायचे. आपण प्राण ओतून तयार केलेली चाल गुरूदत्त नाकारताहेत हे पाहून संगीतकारांचं मन खिन्न व्हायचं. एका संगीतकाराने तर गुरूदत्तना आपली चाल खरंच खूप सुरेल असल्याचं खूप पटवून देण्याचा प्रयत्न केला. तीच चाल कायम ठेवावी म्हणून गुरूदत्तकडे त्याने गयावया केली. मग गुरूदत्तही थोडे मवाळ झाले, पण तरीही त्या संगीतकाराला ते म्हणाले, ‘मित्रा, तू केलेली चाल छान आहे. माझ्यापुरती म्हणशील तर मला ती आवडली आहे, पण ती आपला सिनेमा पहायला येणार्‍या लोकांना आवडेलच ह्याची मला खात्री नाही…आणि आपला सिनेमा पहायला येणारे लोक ते संगीत भलं की बुरं ते ठरवणार आहेत…ओके ?’ गुरूदत्तचं हे उत्तर त्या संगीतकाराने ऐकलं आणि चुपचाप आपली चाल बदलून आणली.

पण गंमत अशी की ‘जाल’मधलं ‘ये रात, ये चांदनी फिर कहाँ, सुन जा दिल की दास्ताँ’ हे गाणं तयार झालं तेव्हा त्या गाण्याची जातकुळी पाहून गुरूदत्तच्या नजरेसमोर तलत मेहमूद आले. त्या गाण्याला तलत मेहमूदशिवाय दुसरा पर्याय नाही आणि तलत मेहमूदच ह्या गाण्यातल्या भावनेला न्याय देऊ शकतील अशी गुरूदत्तची पक्की धारणा झाली. पण संगीतकार सचिन देव बर्मननी ह्या गाण्यासाठी गुरूदत्तच्या तोंडून तलत मेहमूदचं नाव ऐकलं तेव्हा ते आधी एकही शब्द बोलले नाहीत. गप्प बसले. त्यांच्या चेहर्‍यावर त्यांनी कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांचा कोरा चेहरा पाहून गुरूदत्तनाही काय बोलावं काही कळलं नाही. गुरूदत्त तसे हट्टी होते. त्यांना ते गाणं तलत मेहमूदच्या गळ्यातूनच आकाराला यावं असं वाटत होतं. आपलं हे म्हणणं संगीतकार एस.डी.बर्मनच्या गळी उतरावं म्हणून तलत मेहमूदच्या आवाजात हे गाणं कसं छान सजेल हे गुरूदत्त पुन्हा पुन्हा सांगत होते. पण तलत मेहमूदच्या नावाची इतकी जपमाळ ओढूनही एस.डी. बर्मन मात्र ढिम्म होते. त्यामुळे आपण सुचवलेल्या तलत मेहमूदच्या नावाला एस.डी.बर्मनचा होकार आहे की नकार, हे गुरूदत्तना कळत नव्हतं.
शेवटी न राहवून गुरूदत्तनी एस.डी.बर्मनना त्यांचा होकार की नकार आहे ते सरळ सरळ विचारूनच टाकलं.

एस.डी. बर्मननीही शेवटी सरळ गुरूदत्तना सांगून टाकलं की हे गाणं तलत मेहमूदच्या गळ्याला साजेसं आहे हे खरं आहे, पण त्याच्याहीपेक्षा हेमंतकुमारच्या आवाजात ते जास्त चांगलं वाटेल, हे गाणं मुळातच हेमंतकुमारचं आहे.

एस.डी.बर्मननी गुरूदत्तच्या पसंतीच्या तलत मेहमूद ह्या नावावर फुली मारली होतीच, पण आपली पसंंती म्हणून हेमंतकुमारचं नावही पुढे केलं होतं.

गुरूदत्तनी मग एस.डी. बर्मनना प्रश्न केला, ‘तलत मेहमूदही गाण्याला न्याय देऊ शकेल असं तुम्ही म्हणता आहात…पण हेमंतकुमार हे गाणं त्यांच्यापेक्षाही छान गाऊ शकतील असं जे म्हणता आहात ते कसं काय?’

एस.डी.बर्मननी मग संदर्भासह स्पष्टीकरण द्यायला सुरूवात केली. ते म्हणाले, ‘तलत मेहमूद आणि हेमंतकुमार ह्या दोघांचाही आवाज रेशमी आहे. पण हेमंतकुमारच्या आवाजातलं रेशिम हे वेगळ्या जातीचं आहे. त्यांच्या आवाजातलं रेशिम हे गाणं अधिक देखणं करून टाकेल.’

गुरूदत्तनी पुन्हा प्रश्न केला, ‘कसं काय अधिक देखणं करून टाकेल?’

एस.डी.बर्मनकडे त्याही प्रश्नाचं उत्तर होतं. ते जराही न बिचकता, जराही न अडखळता म्हणाले, ‘ये रात, ये चांदनी फिर कहाँ, सुन जा दिल की दास्ताँ, हा आपल्या ह्या गाण्याचा साहिरनी लिहिलेला मुखडा आहे, ह्या मुखड्यातला शेवटचा शब्द आहे ‘दास्ताँ.’ हा दास्ताँ हा शब्द हेमंतकुमारच्या आवाजातलं रेशिम जास्त प्रभावीपणे आपल्या ह्या गाण्यातली दास्ताँ व्यक्त करील असं मला वाटतं.’

एस.डी.बर्मनचं हे गुरूदत्तना केवळ द्यायचं म्हणून दिलेलं उत्तर नव्हतं तर गुरूदत्तच्या का, कसं. केव्हा, कुठे अशा चिकित्सक सवालांना दिलेला सडतोड जबाब होता.

गुरूदत्तनी त्यानंतर एस.डी. बर्मनना एकही प्रश्न विचारला नाही. एस.डी.बर्मननी ह्या गाण्यासाठी हेमंतकुमारचं नाव सुचवलं होतं त्याला ती मूक एनओसी होती. पुढे गाणं हेमंतकुमारच्या आवाजात रेकॉर्ड झालं. हेमंतकुमारनी त्या गाण्याचं सोनं केलं हे सांगायला नकोच!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here