घरफिचर्सS P Balasubramaniam : संगीतगंधर्व!

S P Balasubramaniam : संगीतगंधर्व!

Subscribe

दिग्गज गायक एस पी बालसुब्रमण्यम आज आपल्यात हयात नाहीत. यावर संगीतप्रेमींचा विश्वास बसत नाही. गेले पाच दशके ते आपल्या जीवनाचा एक भाग बनून गेले होते. पाच दशके संगीताच्या सर्वोच्च स्थानी विराजमान होणे सोपे नाही. पण त्यांनी तो मान मिळवला आपल्या फिरत्या गळ्याने, हरकतींनी, जादुई आवाजाने. जणू देवाने संगीतगंधर्व म्हणूनच त्यांना स्वर्गातून पृथ्वीवर पाठवले असावे. नाही तर इतकी असामान्य कामगिरी त्यांच्या हातून कशी झाली असती. मात्र, असामान्य कामगिरी एका माणसाच्या हातून होते तेव्हा आपले मन उगाचच त्याची ‘देव’ कामगिरीशी तुलना करत माणसाच्या कष्टांना कमी लेखते. लता मंगेशकर या देवाची बासरी असल्या तरी तो देवाचा गळा होण्यासाठी त्यांनी बालवयापासून घेतलेली मेहनत आपण विसरतो. खरेतर देवच लता यांच्या गळ्यातून आपल्यासारख्या मर्त्य मानवाला अजोड कामगिरी करण्यासाठी प्रोसाहित करत असतो. जी गोष्ट लता यांची, तीच एसपी यांची. या दोघांची तुलना करण्याचा हा प्रयत्न नाही. मात्र लता यांच्याप्रमाणे एसपी यांनी गाणे, रियाज यांच्यावर सतत मेहनत, कष्ट घेतले म्हणून ते एका मोठ्या स्थानावर गेले. नाही तर एका माणसाकडून एवढी मोठी कामगिरी कशी झाली असती? गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड होण्याइतकी. १६ भाषांमध्ये ४० हजार गाणी (महिलांमध्ये अर्थात सर्वाधिक गाण्यांचा विक्रम आहे तो लता मंगेशकर यांच्या नावावर).शिवाय सहा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव. हिंदीसह कन्नड, तेलगू, मल्याळम इत्यादी सहा विविध भाषांमधील गाण्यांसाठी.

दक्षिणेत राज्य करणाऱ्या एसपी यांनी १९८१ मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारली आणि त्याने मागे वळून बघितले नाही. आठवतो की नाही तो सिनेमा. आठवायलाच हवा. एक दुजे के लिए. कमल हसन आणि रती अग्निहोत्री या फ्रेश जोडीला घेऊन आलेल्या या चित्रपटाने रुपेरी पडद्याची चमक चमचमती केली. त्याला चार चांद लागले होते त्यातील गाण्यांनी. लता मंगेशकर यांच्या हुकमी आवाजाला साथ देण्यासाठी आणि कमलला सूट होईल असा तो आवाज होता एसपीचा. तेरे मेरे बीच में, मेरे जीवन साथी, हम तुम दोनो, हम बने तून बने…, अशी एकापेक्षा एक गाणी गाताना एसपींनी एकच धमाल उडवून दिली. सोला बरस की बाली उमर या को सलाम… अशा सप्त सुरात लताचा आवाज फिरत असताना एसपीचा दाक्षिणात्य बेस आवाज मनाला मोहून टाकत होता. त्यांच्या गायकीचे विशेष म्हणजे पडद्यावर जणू हे गाणे कमल गातो की काय असा भास होत होता. पण ते फक्त कमलचे शरीर होते आणि एसपीचा आवाज होता. या गाण्यांनी, चित्रपटाने तरुण तरुणींना नादावले होते. त्यांच्या जीवनाचा तो एक भाग बनला होता. कमल आणि रती, लता आणि एसपी याशिवाय दुसरे काही जगात शिल्लक राहिलेली नाही, असं नादावलेलं ते वातावरण होतं. एक दुजे के लिए सिनेमाची आणि गाण्याची जादू अशी काही भिनली होती की प्रेमिकांनी आपल्या असफल प्रेमाचा शेवट आपली जीवनयात्रा संपवून करताना कमल आणि रतीसारखे हात हातात घेतले होते आणि ओठावर गाणे होते : ‘हम बने, तुम बने एक दुजे के लिए’.

- Advertisement -

एसपी आणि कमल यांच्या आवाजात कमालीचा सारखेपणा होता. कमल बोलत असताना आपल्याला जणू एसपी बोलत असल्याचा भास होतो. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कमलबरोबरच रजनीकांत, चिरंजीवी, मोहनलाल, मामुटी अशा दिग्गज अभिनेत्यांचे आवाज एसपी झाले. त्याचवेळी एक देवळात बसून कोणी तरी एकतारी वाजवत गात असल्यासारखा सूर तनामनाला भारावून टाकत होता आणि तो आवाज होता येसूदास यांचा. यामुळे गंभीर आणि शास्त्रीय बाजाच्या अंगाने जाणारी गाणी येसूदास गात असताना उडती, फिरती अशी गाणी गाऊन एसपीने आपल्या आवाजाचा एक भवताल केला होता आणि त्यात सारी दाक्षिणात्य प्रदेश नादावून गेला. येसूदास आणि एसपी जणू या प्रदेशचे रफी, किशोर होऊन गेले होते.

विशेष म्हणजे ९० च्या दशकात अभिनेता सलमान खानच्या चित्रपटांमध्ये एसपी यांनी केलेले प्रार्श्वगायन तुफान गाजले. मैने प्यार किया, साजन आणि हम आपके है कौन या चित्रपटांमुळे सलमान स्टार पदावर विराजमान होत असताना एसपीच्या जादुई आवाजाची जादू पुन्हा पुन्हा आपल्याला एका वेगळ्या विश्वात फिरवून आणत होती. कमल यांच्याप्रमाणे सलमानचा आवाज म्हणूनही एसपी यांच्या नावाचा बोलबाला झाला. मैने प्यार कियामधली, आते जाते हसते गाते, कबूतर जा जा, दिल दिवाना, मैने प्यार किया, मेरे रंग में, आजा शाम होने आई, साजनची : देखा है पहिली बार, तुमसे मिलने कि तमन्ना है, जिये तो जीए कैसे, बहुत प्यार करते है आणि हम आपके है कौनमधील- पहिला पहिला प्यार, दीदी तेरा देवर दिवाना, मौसम का जादू, मुझसे जुदा होकर, हम आपके है कौन, वाह वाह रामजी, जुते दे दो… या सर्व गाण्यांनी नादावून सोडले.

- Advertisement -

आज एसपी आपल्यात नसले तरी त्यांचा लाडीवाळ, भावूक, गंभीर असा चतुरस्त्र आवाज आपल्या तनामनात कायम गुणगुणत राहणार आहे. जीवनगाणे होऊन…

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -