Saturday, August 8, 2020
Mumbai
27 C
घर फिचर्स सानियाची ‘तिसरी मुलगी’

सानियाची ‘तिसरी मुलगी’

आधुनिक काळातील भारतीय स्त्रीचे दुःख आणि सामर्थ्य नेमकेपणाने टिपणार्‍या लेखिका म्हणून सानिया सर्वदूर पोचलेल्या आहेत. एका अर्थाने आपण भले त्यांना मराठी लेखिका मानत असू, पण त्यांच्या साहित्याचा अपील ‘अखिल भारतीय’ आहे. एका लेखात हा अपील उलगडता येणारा नाही. परिणामी एक उदाहरण म्हणून ‘तिसरी मुलगी’ ही कथा पाहू. अर्थात कथेचं शीर्षक म्हणून मी तिला ‘तिसरी मुलगी’ म्हणतोय खरा; नाहीतर तिचं खरं नाव मालविका. शोभना आणि शरदची मुलगी. तिसर्‍या क्रमांकाला जन्माला आलेली. तिच्या जन्माची सिच्युएशन भलती भारी होती. मालविकाचा जन्म ‘नकोशी’ च्या कॅटेगरीत झाला.

Mumbai

काही पेच माझ्यापुढे कायम राहिलेले आहेत. वैज्ञानिक की साहित्यिक? कोणाचे निष्कर्ष प्रमाण मानायचे? हा त्यापैकीच एक.

आता हेच पाहा ना, ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ हे दोघे जणू युद्धभूमीवरील शत्रुपक्ष आहेत,असे मानून त्यांची ‘घडण’ मेदूंच्या उत्क्रांतीवर असल्याचे विविध पाहण्यांच्या आधारे सांगणारे एक पुस्तक मागे वाचण्यात आले : ‘मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम व्हिनस’, लेखक जॉन ग्रे.1992 मध्ये आलेलं हे पुस्तक. स्त्री आणि पुरुष या दोघांच्या विचारप्रक्रियेत इतका ‘प्रचंड’ फरक असतो की जणू कांही ते दोन वेगळ्या ग्रहांवरून आले आहेत,असे वाटावे. हे पुस्तक आणि यातले निष्कर्ष खूप लोकप्रिय झाले. रमा मराठे यांनी त्याचा मराठीत ‘तो आणि ती’ या नावाने अनुवादही केला.

‘स्त्री ही जन्मतः ‘स्त्री’ नसते; तर ती ‘घडवली’ जाते’ हे सांगण्याचे काम ‘स्त्रीवादी साहित्य’ करत होते आणि त्याच वेळी जॉन ग्रे यांच्यावरील मांडणीचा आधार घेऊन पाश्चात्त्य विचारविश्वात ‘व्हाय मेन लाय अँड विमेन क्राय’, ‘व्हाय मेन नेव्हर रिमेंबर अँड विमेन नेव्हर फरगेट’…… अशा नवनिष्कर्ष मांडणार्‍या पुस्तकांची लाट आली होती.

…आणि यातूनच डोक्यात द्वैत जन्माला आले. नेमके काय प्रमाण मानायचे? ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ यांची विचार-आचारप्रक्रिया हा मेंदूच्या उत्क्रांतीचा भाग मानणारे मनोविश्लेषण? की ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ यांची घडण हा सामाजिकरणाचा परिणाम असे मानणारे साहित्य? या पेचात अडकलेला असताना सानियाची ‘तिसरी मुलगी’ माझ्या मदतीला धावून आली.

आधुनिक काळातील भारतीय स्त्रीचे दुःख आणि सामर्थ्य नेमकेपणाने टिपणार्‍या लेखिका म्हणून सानिया सर्वदूर पोचलेल्या आहेत. एका अर्थाने आपण भले त्यांना मराठी लेखिका मानत असू, पण त्यांच्या साहित्याचा अपील ‘अखिल भारतीय’ आहे. एका लेखात हा अपील उलगडता येणारा नाही. परिणामी एक उदाहरण म्हणून ‘तिसरी मुलगी’ ही कथा पाहू.

अर्थात कथेचं शीर्षक म्हणून मी तिला ‘तिसरी मुलगी’ म्हणतोय खरा; नाहीतर तिचं खरं नाव मालविका. शोभना आणि शरदची मुलगी. तिसर्‍या क्रमांकाला जन्माला आलेली.

तिच्या जन्माची सिच्युएशन भलती भारी होती. शोभना तिसर्‍यांदा गरोदर राहिली तेव्हा सगळ्यांनीच भाकीत केलं होतं: ‘दोन मुलींनंतर आता मुलगाच होणार. घरातल्या सगळ्यांचीच अतीव इच्छा होती-मुलगा व्हावा म्हणून. याची तीव्रता अशी ‘च’ च्या पटीत गेलेली. म्हणून डिलेव्हरी झाल्यावर जेव्हा डॉक्टर शोभनाला म्हणाल्या की ‘लक्ष्मी’ आहे म्हणून तेव्हा शोभनाच्या चेहर्‍यावर ओशाळलेपण, शरदच्या आश्चर्य आणि माधुरी-मानसी या तिच्या मोठ्या बहिणींच्या चेहर्‍यावर निराशा दाटून आली होती.

मालविकाचा जन्म असा ‘नकोशी’ च्या कॅटेगरीत झाला.

बरं हे केवळ जन्मापुरतं मर्यादित राहिलं नाही. मुलगी, तीही तिसर्‍या क्रमांकाची; मग तिचं काय कौतुक करायचं? या निरिच्छेतून अपत्यजन्मानंतरच्या कितीतरी गोष्टी बाद झाल्या, अगदी बारशापासून ते आंघोळ घालणार्‍या बाईपर्यंत.

भले तिच्या जन्माचा आनंद झाला नसला तरी तिला ‘नकोशी’ म्हणून वाळीत टाकणारे हे घर नव्हते. हळूहळू मालविका मोठी होत होती. खरेतर तिला कुणी उपाशी ठेवत नव्हते की मुद्दामहून तिच्याकडे दुर्लक्षही करत नव्हते. हाँ, पण तिचे स्थान मात्र परिघावरचे होते. तिला मध्यवर्ती मानून घरात कांही घडत नव्हते. पण तिचा पहिला वाढदिवस आला, एक घटना घडली आणि हे सारे चित्र पालटले.

शरद-शोभनाने घरगुतीच केला तिचा वाढदिवस. पण तरीही काही नातेवाईक भेटायला आले. शरद-शोभनाला तिसर्‍यांदा ‘मुलगाच’ होणार, असे वाटणारे यातले काही नातेवाईक, म्हणून बाहुली, खेळणी वगैरे काही न आणता त्यांनी ‘बाबासूट’ आणलेला. तो पाहून पहिल्यांदा शोभनाला वाईट वाटले आणि रागही आला. पण पुढे काही दिवसांनी सहज गंमत म्हणून तिने मालविकाला बाबासूट घातला; आणि ती एकदम लोकप्रिय चित्रातल्या बालकृष्णाप्रमाणे दिसायला लागली. गुबगुबीत गाल, कुरळे केस आणि निरागस लाडीक भाव. इतके दिवस मुलाचे भाव मनी घेऊन वावरलेल्या शोभनाला अगदी भरून आले. ‘माझा लाडका राजा तो’ म्हणून तिने मालविकाला हृदयाशी कवटाळले आणि त्या क्षणापासून मनोमन ठरवून टाकले, ‘हा आपला मुलगाच आहे!’

बस्स अगदी तेव्हापासून मालविकाला मुलगा म्हणून वाढविण्याचा तिने जणू चंगच बांधला. फ्रॉकऐवजी तिच्यासाठी शर्ट-चड्ड्या आणल्या. म्हणजे तिचा पेहराव बदलला. तिला बोलताना ‘माझा मुन्ना, माझा कान्हा, माझा कृष्ण’ असेच संबोधायला सुरुवात केली. पोरींना दटावून सांगितले की ‘त्याला’ त्रास द्यायचा नाही.

घरीतर असे वाढवणे सुरु होते, पण बाहेरही कुणी तिला या वेषात पाहून ‘अरे मुलगा दिसतोय हा!’ असे म्हणायला सुरुवात केली. आणि पाहतापाहता घरात, बाहेर, पुढे शाळेत, अन्य मुलांसोबत खेळताना अशा सगळ्या ठिकाणी ‘मुलगा’ म्हणूनच मालविका वाढत गेली. भले ती जैविकदृष्ठ्या ‘मुलगी’ म्हणून जन्मली आली असेल पण तिचे सामाजीकरण मात्र ‘मुलगा’ म्हणून झाले. अर्थात पुढे वयात आल्यानंतर तिला आपला वेष बदलावा लागला, मुलांसोबत खेळणे थांबवावे लागले; पण ‘आपण आपल्या बहिणींप्रमाणे मुलगी नाही’ हे मात्र तिच्या मनात पक्के होत गेले. म्हणून तर पुढे तिने केस वाढविले, पंजाबी ड्रेस,साडी…असा पोशाख घातला आणि पुढे ‘लग्न’ करणार नाही असा निर्णयही जाहीर करून टाकला. पण हे सारे काही तिने स्वतःच्या मर्जीने केले. निर्णय घेतले आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे घेतलेल्या निर्णयांची जबाबदारीही घेतली.
हा तिच्या सामाजिकरणाचा परिणाम होता.

ती एवढ्यावरही थांबली नाही.

ज्या ज्या गोष्टींमुळे आपल्या स्वातंत्र्यावर बंधने येतात, त्या सगळ्या गोष्टी तिने अगदी ठामपणे नाकारल्या आणि आपले ‘स्वत्व’ अबाधित राखून ज्या गोष्टी करता येतात, त्या ती मजेने करत राहिली.
म्हणजे तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला, आई-वडिलांसोबत न राहता स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला, हे यासाठी की ‘एक बाई’ इतकी मर्यादित ओळख देऊन ते तिला बंधनात अडकवत होते…याउलट ज्या पुरुषाशी आपले ‘मोकळे मैत्र’ जुळले तो विवाहित असूनही मालविका त्याच्यासोबत कम्फर्टेबल होऊन राहिली.

इकडे तिच्या दोन्ही बहिणींची लग्ने झाली, एकीला मुलेबाळे होऊन तिच्या संसाराचा व्याप विस्तारत गेला तर दुसरीला मूल न झाल्याने, तिच्या नवर्‍याचा बाहेरख्यालीपणा आणि ‘वांझ स्त्री’ म्हणून तिला होणारा त्रासही वाढत गेला.

स्वतःहून ‘चांगली स्थळे’ पटकावली म्हणून सुरुवातीच्या संसारात बेहद्द खूश असणार्‍या या दोघींची नंतर मात्र गोठ्यात खुंट्याला बांधलेल्या गाईची गत झाली. दोघींची लग्ने झाली आणि दोघी आपल्या नवर्‍यासोबत आहेत म्हणून समाजाच्या दृष्टीने त्या ‘गृहिणी’ होत्या. उलट स्वतंत्र घरात राहून, परपुरुषासोबत ‘मोकळे मैत्र’ ठेवणार्‍या मालविकाचे स्वातंत्र्य मात्र लोकांच्या डोळ्यांत खुपत होते. तिच्याबद्दल लोकांच्या वाग्बाणांनी घायाळ झालेल्या शोभनाने जेव्हा याबद्दलची काळजी व्यक्त केली तेव्हा मालविकाने दिलेले उत्तर ती ‘स्त्री’ किंवा ‘पुरुष’ म्हणून नव्हे तर माणूस म्हणून कसा विचार करत होती, याचे द्योतक होते. ती म्हणाली,

‘लोकांना हवं, तसं जगायचं, असं मी ठरवलेलं नाही…आणि ‘लोक’ म्हणून काही एक माणूस असत नाही.शंभर लोकांच्या शंभर तर्‍हा…मी त्यांना फारसं महत्त्व देत नाही.’

हे ती बोलायचे म्हणून अचानक बोलून गेलेली नाही. लहानपणापासून लोकांचा रवैय्या तिने पाहिलेला आहे. वयात येईपर्यंत तिला मुलगा म्हणून संबोधलेल्या लोकांनी पुढे तिच्या वेगळेपणावर कसे टोचे मारले, हे तिने अनुभवलेले आहे. म्हणून ‘लोकांच्या नजरे’तून स्वतःकडे पाहणे तिला पसंत नाही.

म्हणून तर ती स्वतंत्र राहिली पण वडिलांच्या आजारपणाच्या काळात त्यांचा आर्थिक भार उचलणे असेल अथवा आईची मनोभावे काळजी घेणे असो, यात तिने कधीही कसूर केला नाही. दोन बहिणी फक्त ‘माहेरवाशीण’ म्हणून चार-आठ दिवस येऊन पाहुणचार घेऊन आपापल्या विश्वात परत जात होत्या. पण मालविका मात्र स्वातंत्र्याइतकेच आई-वडिलांच्या जबाबदारीचेही निष्ठेने निर्वाहन करत होती.

पुढे तिने स्वतःचा लहानसा व्यवसाय सुरु केला, धाडस आणि मेहनत यातून त्यातही यश मिळवून ‘कर्तबगार स्त्री उद्योजक’ पुरस्काराची मानकरी झाली. आभाराच्या भाषणात तिने ‘आई-वडिलांच्या’ योगदानाचा आवर्जून उल्लेख केला…वंशाच्या दिव्याचा अभिमान वाटावा तसा शरद-शोभनाला मालविकाचा अभिमान वाटत राहिला.

जन्माला आल्याबरोबर जिच्याबद्दल ‘मुलगी’ म्हणून निराशा, पुढे काळजी आणि त्याहून पुढे चिंता अशा भावनांचे काहूर शरद-शोभनाच्या मनात दाटलेले राहायचे, त्यांचा उर अभिमानाने भरून आला.

म्हणजे ते तिला मुलगा,‘वंशाचा दिवा’ म्हणून स्वीकारू लागले; पण मालविका मात्र हट्टाने स्वतःला ‘स्त्री’ मानत राहिली. फक्त ती माधुरी, मानसी या आपल्या बहिणी किंवा आपली आई यांच्यासारखी ‘लोकांच्या नजरेने’ आपली वाट निवडणारी नव्हती. तर स्वतःच्या दृष्टीने आपला मार्ग घडविणारी होती.

पुरुषसत्ताक दृष्टीकोणाच्या ती विरोधात होती, पण समस्त पुरुषजातीला तिचा विरोध नव्हता. उलट त्यातील अनेकांशी तिचे मोकळे मैत्र होते. म्हणजे ती पुरुषाला युद्धभूमीवरील ‘शत्रूपक्ष’ मानत नव्हती. विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आणि तो निभावून नेण्याची जबाबदारी उचलायची, हे तसे ‘पुरुषी मेंदूचे’ पारंपारिक काम, पण ते करण्यात तिचे ‘स्त्री’ असणे आडवे आले नाही, तसेच भोवतीच्या सामाजीकरणाने अगोदर तिला ‘मुलगा’ आणि पुढे ‘बाई’ बनविण्याचे बेहद्द प्रयत्न केले, परंतु हे नाकारून तिने आपले ‘स्त्रीत्व’ आणि ‘सत्व’ कायम राखले.

म्हणजे मनोविश्लेषण की सामाजीकरण हे द्वैत आभासी आहे, या धुक्याच्या पलीकडे दूर कुठेतरी सत्याची अंधुकशी पायवाट असते. म्हणजे शास्त्र असो साहित्य कुणाचेही निष्कर्ष प्रमाण मानून कर्कश्श व्हायचे नाही…उलट स्वतःला सतत तपासत राहायचे, हे सानियाच्या या ‘तिसर्‍या मुली’ने मला शिकवले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here