सुधा…!

गणपतीत आरतीला मालती आणि सुधाच्या घरी गेलो की, त्यांचे हात पटपट वेण्या, हार बनवत असतात. सुधाचा हात वेण्या बनवत असतो आणि तोंडात तिचे आवडीचे पान. "गो बायलानू, किती काम करशात. गणपतीक आरतीक तरी उभी रवा". सुधाचे पान गिळून उत्तर तयार, "रे, चाकरमान्या. तुझा बरा आसा. तुमका भर पगारी सुट्टे गावतत. आमका मिळनत नाय. पाऊस गिम काम करूचा लागता, तेवा दोन पैसे मिळतत. पण, गणपतीच्या कृपेनं आता बरा चललाहा. आरती झाल्यावर जाव नको. काळ्या वाटण्याची उसळ बनवलंय आसय, काजू घालून. बरोबर रेडकराचे चौकोनी पाव असत. चाय आसा".

Mumbai

गणपतीचे दिवस आले की वेंगुर्ल्यात गावाच्या घराबरोबर दोन माणसांशी हमखास आठवण येते… आणि त्यांना भेटायला मन धावते. एक मालती आणि दुसरी तिची बहीण सुधा. वेंगुर्ल्यात आमच्या परबवाडा गावात शिरताना मोठे तळे लागते. हे तळे म्हणजे निसर्गाने आमच्या गावावर दोन्ही हातांनी केलेली मुक्त बरसात होय. या तळ्यात विविध वनस्पती आणि त्यांच्या साथीने डोलणारी लाल, सफेद कमळे बघितली की मन प्रसन्न होते. अनेक प्रकारचे पक्षी, मासे, वेंगुर्ल्याला कुशीत घेऊन समुद्राकडे धावणारी मानसीची खाडी आणि पुन्हा समुद्राकडून भरतीचे पाणी घेऊन तळे भरून टाकण्याचा तिचा निसर्गक्रम नुसता बघत राहावा असा… फक्त माणसेच नाही तर मोरपिशी रंगाचा खंड्या पक्षीही जणूकाही हा निसर्ग उत्सव ध्यानस्थ होऊन पाहत असतो, असे हे दृष्य. या तळ्याच्या काठी मी अनेकदा बसून हा देखावा पाहिला आहे, पण गणपतीला येताना या तळ्यात आजही माझी नजर मालती आणि सुधाला शोधत असते. तळ्यातून जलपरीसारख्या बाहेर येऊन त्या मला कमळे देतील, असे आजही वाटते… आता त्या दोघी तळ्यात उतरत नाहीत, आपापल्या संसारात फुले आणि काटे कुटे वेचत त्या चालल्या आहेत… आणि ” रे संज्या, बरो असंय मा”, ही काही वर्षांपूर्वीची हाक माझ्या कानात अजून घुमत आहे.

आमच्या वाडीतच या दोघींचे घर. त्या तीन बहिणी आणि तीन भाऊ. घरची शेती आणि पोटापुरते आंबे आणि नारळ. बाकी वर खर्चासाठी घरातील प्रत्येक माणूस छोटी मोठी कामे करून जीवन जगवणारा. कोण पिठाच्या गिरणीवर, कोण मजुरी करणारा. आईही कोणाच्या शेतात कामाला. टुकटुक करून संसाराचा गाडा ओढण्यात सर्वांचा दिवस जाई. खरेतर आमच्या आजुबाजूच्या सर्व घरातील एक माणूस मुंबईला असल्याने त्या घरांना मोठा आधार असे, पण सुधाच्या घरातील एकही माणूस मुंबईत नसल्याने या घराला जगण्याला गावात राहून झुंजावे लागले. सुधाच्या सहा भावंडांपैकी एक महेंद्र पदवीधर होऊन बाहेर पडला आणि महाडला नोकरीला लागला इतकाच काय ते या घराला आधार, पण त्याला तिकडे जगताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने भावंडे सुखी झाली, असे दिसले नाही. मोठी बहीण वासंती कुठल्या तरी आजाराने तरुणपणीच वारली. मालती आणि सुधाने कमळे काढून वेंगुर्ल्याच्या बाजारात विकताना छोटा मोठा व्यवसाय करायचा याचे धडे गिरवले होते. दिवसभर कष्ट करण्याची तयारी असणार्‍या या बहिणी दिसायला बर्‍या होत्या, पण मालतीच्या तुलनेत सुधा सुंदर होती. वयानुसार या दोघींची लग्न व्हायला हवी होती, पण घरात पुढे होऊन त्यांची लग्ने करण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. स्कर्ट आणि शर्टवजा ब्लाऊज घालून डोक्यावर कमळांची टोपली घेऊन जगायला बाहेर पडलेल्या या बहिणी आपण आजुबाजूच्या मुलींसारखा संसार करण्याचे स्वप्न विसरल्या होत्या. मालतीचे लग्न होत नाही म्हणून दिसायला अभिनेत्री आशा काळेसारखी असूनही सुधा लग्न करायला तयार नव्हती. तिला आपणहून मागणी घालणारी खूप स्थळे येत होती, पण मालतीला सोडून तिला स्वतःला सुखाच्या गादीवर बसायचे नव्हते. गोरापान वर्तुळाकार चेहरा, हसरी जिवणी, टपोरे डोळे, लांबसडक केस, केसात सुरंगी, आबोली नाही तर बकुळीचा गजरा आणि लालचुटुक ओठ असणार्‍या सुधाला पान खायची सवय होती. पान खाल्यानंतर तिचे हे लालचुटुक ओठ आणखी लालसर होत…आम्ही खळ्यात गजाली मारताना ती दोन एक तासात सहज दोन तीन पाने खाई… तिचे ते पान खाणं बघितलं की मी बोलून जाई, ” गो, सुधग्या किती म्हशीसारखी पाना खातंय. घोवाकडे गेलंय की सासू वरात काढीत, इतकी पाना खालंय तर”. माझ्या या चिडवण्यावर गप्प बसेल ती सुधा कसली. ” रे संज्या, सासू काय माका बाहेर काढीत. मीच तिका माझ्याबरोबर पाना खावक नाय लावलंय तर नावाचा सुधग्या नाय”. खरे होते ते या दोघी बहिणी बाईमाणसे असूनही पुरुषालाही एक क्षण मागे टाकतील असा जगण्याचा खमकेपणा त्यांच्या अंगी होता…

वय उलटून गेल्यावर मालतीचे लग्न ठरले. परबवाड्यातील प्रत्येक घराला आनंद झाला. साध्या पद्धतीत लग्न झाले खरे, पण त्या लग्नात गावातील प्रत्येक माणूस आपल्या घरातील लग्न म्हणून सहभागी झाला. वेंगुर्ले बाजारातून मोठ्या संख्येने माणसे लग्नाला आली होती. स्कर्ट ब्लाऊजमधली मालती साडीत बघण्याचा आनंद सर्वांच्या चेहर्‍यावरून वाहत होता… मानसी खाडी समुद्राला भेटण्यासाठी ज्या आनंदाने धावत असते तो हा आनंद होता, पण तो फार काळ टिकला नाही, लग्नात कमळासारखी फुललेली मालती कोमजलेल्या गुलाबासारखी घरी परतली तेव्हा सर्वांच्या काळजाला चर्रर्र झाले… तिला विश्वासात घेऊन काय झालं अशी विचारणा केली तेव्हा तिने सांगितलेली कहाणी या पोरीच्या नशिबी कायम दुःख असावं का, या विचाराने डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. एका आश्रमात कामाला असणारा तिचा नवरा दिसायला बरा होता. घरची परिस्थितीही बरी होती. मालतीप्रमाणे त्याचे वयही उलटून गेले होते, पण तो तिच्याबरोबर नवर्‍यासारखा रहायला तयार नव्हता. एकदोनदा मालतीने त्याची समजूत काढली, आपण डॉक्टरला दाखवू असे सांगितलेही, पण तो तयार नव्हता. शेवटी तिचे भाऊ आणि आजुबाजूच्या लोकांनी तिच्या सासरी जाऊन झाला प्रकार त्यांच्या कानी टाकला, पण त्यांनी कानावर हात ठेवले. कदाचित त्यांनाही तो प्रकार माहीत नसावा. त्याच्या लग्नासाठी ते खूप आधीपासून मागे लागले होते, पण तो तयार नव्हता. शेवटी तो घरच्यांच्या दररोजच्या कटकटीला कंटाळून तयार झाला, पण तो मालतीचा नवरा होऊ शकला नाही. तो पुरुष नव्हता! मालती ही भलभळती जखम घेऊन माहेरी परतली. तिच्या जीवनात फरक पडला तो म्हणजे ती आता स्कर्ट ब्लाऊजऐवजी साडीत आली आणि कमळे विकण्याऐवजी तिने वेंगुर्ल्याच्या बाजारात फुलांचे दुकान सुरू केले.

माझ्या आधीच्या कथेत मालतीवर सविस्तर लिहिले आहे. या कथेच्या भागातही मालती येते त्याचे कारण म्हणजे सुधाच्या जीवनावर तिचा मोठा प्रभाव आहे. हताश न होता जगण्याच्या लढाईशी दोन हात कसे करायचे याचे तिला धडे मिळाले ते मालतीकडूनच. मालती मोडक्या संसाराची लाज टाकून ताठ मानेने बाजारात उभी राहिली तेव्हा मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटच्या धर्तीवर डचांनी उभारलेली वेंगुर्ले नगर परिषद मार्केटच्या इमारतीची मानही अभिमानाने उंचावली होती…
बाजारात मालतीबरोबर फुले विकता विकता सुधा महिला बचत गटात कार्यरत झाली होती. बचत गटांबरोबर वेगवेगळ्या गावांच्या जत्रांमध्ये, प्रदर्शनात घरगुती पदार्थांचे स्टॉल ती लावत होती. तिच्या हाताला चव होती. सुधाच्या हातचे बटाटेवडे, भजी, वडे सागोती आणि माशाचे तिखले ज्यांनी खाल्ले तो तिला नंतर शोधत येणारच… अशाच जत्रांमध्ये तिला तो भेटला. आमच्या वेंगुर्ल्याच्या शेजारच्या गावचा होडावड्याचा. त्याचे गावात चहा भजीचे दुकान होते. पण, तो वयाने मोठा होता. वयस्कर असला तरी मेहनती असल्याने सुधा लग्नाला तयार झाली. मालतीच्या संसाराचे स्वप्न पूर्ण झाले नाही, किमान सुधा तरी सुखी व्हावी, ही इच्छा आमच्या सर्वांच्या मनात होती. कदाचित नियतीने उशिरा का होईना सुखाचे दान सुधाच्या पदरात टाकले. सुधाबरोबर तिचा नवराही कष्टकरी असल्याने दोघेही रात्रंदिवस मेहनत करत होते. आता होडावड्याला जागा घेऊन सुधाने स्वतःचे स्वतंत्र घर बांधले, शिवाय बागायती केली. तिच्या संसार वेलीवर दोन मुलेही फुलली.

खरेतर सुधाच्या जागी दुसरी कोण असती तर ती समाधानी राहिली असती, पण गरिबीचा शिक्का तिला साफ पुसून काढायचा होता. गणपतीच्या दिवसात ती मालतीला मदत करायला येते. रात्री वेण्या, हार, गजरे बनवत दिवसभर ते विकण्याचे काम सुरू असते. गणपतीत आरतीला त्यांच्याकडे गेलो की मालती आणि सुधाचे हात पटपट वेण्या, हार बनवत असतात. सुधाचा हात वेण्या बनवत असतो आणि तोंडात तिचे आवडीचे पान. “गो बायलानू, किती काम करशात. गणपतीक आरतीक तरी उभी रवा”. सुधाचे पान गिळून उत्तर तयार, “रे, चाकरमान्या. तुझा बरा आसा. तुमका भर पगारी सुट्टे गावतत. आमका मिळनत नाय. पाऊस गिम काम करूचा लागता, तेवा दोन पैसे मिळतत. पण, गणपतीच्या कृपेनं आता बरा चललाहा. आरती झाल्यावर जाव नको. काळ्या वाटण्याची उसळ बनवलंय आसय, काजू घालून. बरोबर रेडकराचे चौकोनी पाव असत. चाय आसा”. एक वेळ अशी होती की सुधाच्या घरात बिन दुधाची फुटी चाय मिळत असे. आता मात्र या दोन बहिणींनी आपल्या घराला इतर घरांच्या जोडीला आणले आहे. खाऊन पिऊन हे घर सुखी असून मालतीने भावाच्या संसारात आपला अडथळा नको म्हणून वेगळी चूल मांडली असून आईच्या सोबतीने ती सुखाने राहते. घरात आई आणि बाहेर सुधा तिला मदतीला.

गणपतीनंतर सुधाची दुसरी हमखास घटकाभर भेटण्याची जागा म्हणजे आमच्या सातेरी देवीची जत्रा. जत्रेत सुधा चहा, भजीचे दुकान लावते. तिच्या हाताची चव आणि लोकांना आपलेसे करण्याच्या कलेने तिचे दुकान नेहमीप्रमाणे हाऊसफुल्ल असते. तिचे सासरचे आणि माहेरचे कुटुंब या दुकानात संध्याकाळपासून पहाटेपर्यंत उभे असते. भजी काढता काढता तिचे दुकानात प्रत्येकाकडे लक्ष असते. नावानिशी ती प्रत्येकाला ओळखते आणि बिन ओळखीचा माणूस आल्यानंतर ती उठून स्वतः ओळख काढणार, त्याला आपणहून भजी खायला घालणार आणि पान खाता खाता, “येवा हा दादानू पुढच्या येळेक. ईसरा नको”. गावची ओळख निघाली आणि त्या गावी सुधाचे दुकान असले तर त्या दादाला सांगणार, “माझा खानोलीच्या जत्रेतही दुकान असता. येवा हा”. तो आता ओळखीचा झालेला माणूस पुढच्या वेळेस सुधाला शोधत येणार म्हणजे येणार…मी जत्रेच्या दिवशी देवीची पालखी रात्री १२ ला निघाल्यावर आरामात थोडे दशावतार नाटक बघून रात्री एक दीडच्या सुमारास सुधाच्या दुकानात जाणार आणि “गो, सुधग्या”, अशी हाक द्यायची खोटी की ती “रे संज्या, ये मरे. दिसाक नाय तो. बस गरम भजी दितय”. असे सांगणार्‍या सुधाच्या बाजूला खुर्ची घेऊन बसलो की आमच्या गप्पांची मैफल दशावतार रंगत जाईल तशी रंगून जाई. तिला आपण करत असलेले कष्ट आणि त्याला येत असलेले फळ यावर भरभरून सांगायचे असते आणि मला तिच्या प्रचंड आशावादी स्वभावाचे कौतुक ऐकायचे असते. चुलाण्याच्या समोर बसून लालबुंद झालेला सुधाचा चेहरा कष्टकरी महिलेच्या यशाची प्रकाशमय कहाणी सांगणारा असतो. तिच्या अंगावर उंची साडी आणि भरपूर दागिनेही असतात, पण या बहरून आलेल्या यशाचा कैफ तिला चिकटण्याचे धैर्य करणारा नसतो. ती चुलीत लाकडे टाकते तेव्हाच तिने त्या कैफाला जाळलेले असते…

परिस्थितीशी दोन हात करताना माणसे हताश होतात किंवा सुखात लोळत असतानाही निराशेच्या खोल खाईत स्वतःला घेऊन जाणारी माणसे आजुबाजूला दिसतात. अशी जीवनाची लढाई हरलेली माणसे फास आवळून जगणे संपवतात त्यावेळी माझ्यासमोर सुधा उभी राहते. तिची मेहनत, गोड बोलणे, जीवन सुंदर आहे, हे तर सांगतेच, पण आपल्या अंगभूत देखणेपणाचा मस्तवालपणा तिच्या वागण्या बोलण्यातून कधी दिसत नाही. उलट, जीवन खूप सुंदर आहे हे तिच्याकडे बघताना मला नेहमी वाटते…