घरफिचर्स'संजय राऊत' मातोश्रीचा तिसरा डोळा...!

‘संजय राऊत’ मातोश्रीचा तिसरा डोळा…!

Subscribe

सत्ता आल्यानंतर राज्य सरकारने ज्यांना विशेष सुरक्षा दिली त्यामध्ये तीन व्यक्तींचा समावेश होता. त्यातील एक व्यक्ती होती स्व.जयंत जाधव जिला स्वत: बाळासाहेबांनीच मानसपुत्राचा दर्जा दिला होता, दुसरे होते चंद्रकांत वैद्य अर्थात चंदूमामा (स्व.मीनाताईंचे बंधू) आणि तिसरे गृहस्थ होते संजय राऊत. शिवसेना सत्तेत असली तिचा रिमोट कंट्रोल बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती असला तरी त्या रिमोटचा सेन्सर मात्र संजय राऊत हेच होते.

बाबरी मशीद उध्वस्त झाल्यानंतर मुंबईत दंगल उसळली. ही दंगल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये कव्हर होत होती. पण त्यातही मुंबईतल्या नवाकाळ आणि सामनामध्ये दंगल कव्हर करण्यासाठी विलक्षण चुरस होती. ही संपूर्ण दंगल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मातोश्रीत बसून नियंत्रित करत होते. मुंबई धुमसत होती, घरं-दारं उध्वस्त होत होती. घड्याळाच्या काट्यावर चालणारं शहर भयभीत झालं होतं आणि या भयभीत होण्याचं वृत्तांकन सामनामधून विशेष पद्धतीने सुरू होतं. मुंबई महाराष्ट्राच्या भागा-भागांत सुरू असलेलं शिवसैनिकांचं तांडव आणि शिवसेनाप्रमुखांची अग्रलेखातून धडाडणारी तोफ यामुळे सामनाने आपल्या खपाची लक्ष – लक्ष भरारी घेतली होती. नव्वदच्या दशकाच्या सुरवातीला ‘सामना’च्या कार्यकारी संपादक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हिंदू-मुस्लीम दंगल हे संजय राऊतांसाठी सगळ्यात मोठं मिशन होते. तेव्हा राऊत हे फक्त कार्यकारी संपादक होते, ते शिवसेना नेते किंवा खासदार नव्हते तर ते फक्त बाळासाहेब ठाकरे यांचे कान आणि डोळे होते.

sanjay raut with balasaheb thackeray
सामनाची संपादकीय भूमिका ठरवताना स्व. बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत

राज्यभरात आणि देशभरात राजकीय- सामाजिक जे जे घडेल ते जसंच्या तसं शिवसेनाप्रमुखांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही राऊत यांची होती. ती त्यांनी चोख पार पाडली. इतकी की तासातासाला दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख फोन करून राऊतांकडून माहिती घेत होते. त्या माहितीवरच शिवसेनाप्रमुखांचे शिवसैनिकांना आदेश जात होते. शिवसेनाप्रमुख त्यांची मातोश्री आणि शिवसेना याठिकाणी राऊत त्यांच्या शब्दाला विलक्षण किंमत होती. सेना- भाजप यांचे अनेक नेते, मंत्री, फिल्मी तारे, उद्योगपती मातोश्रीत ताटकळत बसले असले तरी राऊतांना प्रतीक्षा करावी लागत नसे. शिवसेनाप्रमुखांची क्षणार्धात भेट होऊन त्यांचं काम मार्गी लागे. १९९५ साली युतीची सत्ता आल्यानंतर राऊत यांचा भाव आणखीच वधारला. सत्ता आल्यानंतर राज्य सरकारने ज्यांना विशेष सुरक्षा दिली त्यामध्ये तीन व्यक्तींचा समावेश होता. त्यातील एक व्यक्ती होती स्व.जयंत जाधव जिला स्वत: बाळासाहेबांनीच मानसपुत्राचा दर्जा दिला होता, दुसरे होते चंद्रकांत वैद्य अर्थात चंदूमामा (स्व.मीनाताईंचे बंधू) आणि तिसरे गृहस्थ होते संजय राऊत. शिवसेना सत्तेत असली तिचा रिमोट कंट्रोल बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती असला तरी त्या रिमोटचा सेन्सर मात्र संजय राऊत हेच होते. ते कधीही पेज थ्री पार्ट्या, पंचतारांकित मैफिली, आणि लक्ष्मीपुत्रांच्या जेवणावळी याला उपस्थित राहत नव्हते. त्यामुळेच शिवसेनाप्रमुखांच्या नोंदी राऊत यांचं वेगळं स्थान होतं. जोडीला त्यांचं खणखणीत काम होतं. शिवसेनाप्रमुखांच्या तोंडून निघणारे शब्द अगदी त्याच स्टायलीत सामनामधील अग्रलेखात उतरवण्याचा विशेष हातखंडा राऊतांनी पुरता समजून घेतला होता.

- Advertisement -
sanjay raut with thackeray family
राऊत यांचे ठाकरे कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध

संजय राऊतांना सामनामध्ये आणण्यामागे ‘राज’

२००५ साली नारायण राणे यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर सेनेत पक्षीय महाभारत घडलं. त्यातला ‘संजय’ही राऊतच होते. प्रभादेवीच्या नागू सयाजीच्या वाडीत राणेंनी आपली सभा लावली होती. या सभेच्यावेळी राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये धुमशान झालं. या सभेमध्ये राणेंनी राऊतांवर जोरदार टीका केली. राणे सेना सोडून गेल्यानंतर राज ठाकरे सिंधुदुर्गाच्या दौर्‍यावर गेले होते. मात्र सुरक्षेच्या कारणामुळे हा दौरा राज ठाकरेंना अर्धवट सोडावा लागला, राज मुंबईत परतले. राज यांचं परत येणं बाळासाहेब ठाकरेंना रुचलेलं नव्हतं. त्याहीपेक्षा उद्धव यांना ते पसंत नव्हतं. राणेंना टक्कर देत हा दौरा सुरू ठेवायला हवा होता, अशी उद्धव यांची भूमिका होती. त्यामुळेच सामनातून राज यांच्यावर टीका झाली. ही टीका राज यांच्या जिव्हारी लागली. खरंतर संजय राऊत सामनात येण्यामागे राज यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता. कारण त्याआधी ते ’लोकप्रभा’ मध्ये होते. मात्र आपल्या मित्रानेच आपल्यावर कसोटीच्या वेळी टीका केल्यामुळे राज दुखावले होते. २००६ साली राज ठाकरे सेवेतून बाहेर पडल्यावर राऊत यांचा प्रयत्न दोन्हीकडच्या बाजू सांभाळून घेण्याचाच होता. कारण त्यांच्या साठी एकीकडे राज नावाचा जिगरी दोस्त आणि दुसरीकडे बाळासाहेब नामक श्रध्दास्थान… त्यांच्या या दुहेरी भूमिकेला मनसेचे कार्यकर्ते डबल ढोलकी म्हणत होते. कारण संजय राऊत यांच्या लिखाणाने दुखावल्यामुळे राज यांनीही राऊतांवर निशाणा साधला. राज म्हणाले, हा मुंबईत असला की मातोश्रीवर असतो दिल्लीत असला की, सहा जनपथ वरील पवारांच्या बंगल्यावरच असतो. त्यामुळेच राज समर्थकांना राऊत शकुनी मामा वाटत होते.

अशाच एका दिवशी संजय राऊत राज यांच्या घरी गेले असता त्यांची ‘स्कोडा’ही गाडी कृष्णकुंज बाहेर राज यांच्या समर्थकांनी फोडून टाकली. नुसते फोडून राज यांचे कार्यकर्ते गप्प बसले नाहीत तर त्यांनी ती कार चक्क रस्त्यावर उलटी करून टाकली. यावरुनच राज हे संजय राऊतांमुळे किती दुखावले होते याचा प्रत्यय येऊ शकतो. शिवसेनेतून राणेंपाठोपाठ राज असे दोन खंदे नेते बाहेर पडले आणि उद्धव यांचा भविष्यात सेनाप्रमुख पदावर विराजमान होण्याचा रस्ता मोकळा झाला. त्यामध्ये राऊत यांच्या लिखाणाची महत्त्वाची भूमिका होती. अर्थात त्याच्या जोडीला उद्धव यांचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या चाणक्य नीतिचाही मोठा वाटा होता. मिलिंदशी राऊत यांचे संबंध फार घनिष्ट नसल्याचे शिवसैनिकांमध्ये दबक्या आवाजात बोलले जात होतं. पक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या जवळ सल्ल्यासाठी आपल्याशिवाय दुसरा कोणी असूच नये, असा आग्रह राऊत यांचा नेहमीच होता. मात्र दरम्यानच्या काळात नार्वेकर हे उध्दव यांच्या विलक्षण जवळ गेले होते. नार्वेकर यांचे राऊत यांच्याशी सख्य नव्हते आणि राज, राणे आणि पक्षातील रावते-कदम यासारख्या अनेकांनी नार्वेकर यांच्या तक्रारी केल्या. पण उद्धव या तक्रारींना केराची टोपली दाखवतात हे लक्षात आल्यावर राऊतांनी सुभेदारी निःशब्दपणे वाटून घेतली.

- Advertisement -

युती तुटण्यामागे संजय राऊत

२०११ साली राऊतांना लागोपाठ दुसर्‍यांदा खासदारकी मिळाली जोडीला शिवसेना नेतेपदही. २०१७ मध्ये तिसर्‍यांदा राऊतांना खासदारकी मिळणार नाही, अशी जोरदार चर्चा शिवसेनेत सुरू होती. कारण दिल्लीतील अनेक ज्येष्ठ खासदार राऊतांच्या अतिमहत्त्वाकांक्षेमुळे नाराज होते. त्यातच शिवसेनेत तिसर्‍यांदा खासदारकी कुणालाच मिळालेली नाही. तरीही संजय राऊत यांना तिसर्‍यांदा खासदारकी मिळाली. ते राज्यसभेतले सेनेचे नेते झाले नियमाला अपवाद असतो तसाच हा प्रकार होता. त्यामुळे राऊतांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला होता. अशातच २०१४ साली युती तुटण्यासाठी जे घटक कारणीभूत ठरले त्यात राऊत एक होते. केबिनमध्ये बसून डावपेच लढवणारे राऊत ‘ऑन द फिल्ड’ मात्र अपयशी ठरलेत. मग नाशिक असो की गोवा. यश त्यांच्यापासून कोसो मैल दूर राहिलंय.

सामानातून भाजपवर अंकुश, राऊतांची किमया

२०१४ साली महाराष्ट्रात युतीची दुसर्‍यांदा सत्ता आली, पण राजकीय गणितं बदललेली होती. भाजपने सेनेला दुय्यम खाती तर दिलीच, पण कुठल्याही महत्वाच्या निर्णयांमध्ये सेनेला स्थान नव्हते. सत्तेत असून नसल्यासारखी स्थिती होती. त्यामुळे युती तोडण्याची गरज आहे, असा घोषा लावण्यामध्ये जी मंडळी त्यात राऊत आघाडीवर होते. सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी अत्यंत जिव्हारी लागेल अशा शब्दांमध्ये टीकाही केली. रामविलास पासवान, लालूप्रसाद यादव, नितीशकुमार, मायावती, ममता बॅनर्जी आणि दक्षिणेतील नेत्यांकडे ठाकरे आणि त्यांची मातोश्री यांचं वजन अधोरेखित करून सांगण्यामध्ये राऊत यांनी गेल्या काही वर्षांमध्ये मेहनत घेतली आहे. हे करत असताना ‘सामना’ त्यांनी गेली ३० वर्षे यशस्वीपणे चालवला आहे. अनेक वृत्तपत्रे अडचणीत आली तसा, सामनाही संकटांशी झुंजतोय पण तो समर्थपणे वाटचाल करतोय. हे त्यांचं महत्वाचं यश आहे. वेळोवेळी बदलणारा मोदीविरोध मातोश्रीवर जसाच्या तसा पोहोचवण्याचं काम संजय राऊत यांनी केलं असलं तरी उद्धव यांनी देखील अनिल देसाईंसारखा स्वतःच्या विश्वासातला माणूस दिल्लीत पाठवलाच होता. देसाई देखील आपलं काम इमानेइतबारे करत होते (तोच त्यांचा युएसपी आहे) आणि त्यामुळेच राऊत यांची भूमिका, त्यांचे हेतू, त्यांची मतं त्यातून शिवसेनेला होणारा फायदा-तोटा त्यांचा इतर पक्षांशी असलेला संपर्क-संबंध या सार्‍यांचं मूल्यांकन मातोश्रीवर स्वतंत्रपणे होऊ लागलं होतं.

uddhav thackeray and sanjay raut
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू

या सगळ्या काळात पक्षप्रमुखांनीही राऊत, देसाई, नार्वेकर असो वा रामदास कदम त्या प्रत्येकाची उपयुक्तता जाणून त्याला त्या त्या भूमिकेत फिट बसवले होते. याचवेळी भाजपबरोबर असलेली युती राऊत यांच्या सल्ल्याने तोडण्याचा प्रयत्न अनेक ज्येष्ठ नेत्यांना मान्य नव्हता. युतीचे विरोधक असलेले राऊत हे राज्यसभेवर जातात प्रत्यक्ष निवडणुकीशी त्यांचा संबंध नाही आणि त्यामुळेच त्यांनी युतीबाबत आगलावेगिरी करू नये, असं भाजप आणि सेनेकडच्या नेत्यांना वाटत होते. मात्र जी जबाबदारी उद्धव यांनी राऊत यांच्याकडे सोपवली होती ती स्वतःच्या शैलीत अधिक आक्रमक करत राऊत सामनातून मांडत होते. त्यांनी भाजपला पुरतं दबावाखाली ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. उद्धव यांची ती गरज होती, मात्र या सगळ्या प्रकारात भाजपने दुखावून युती तोडली तर सेनेला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, अशी भीती देखील शिवसेनेतल्या एका मोठ्या वर्गाला वाटत होती. शिवसेनेकडे भाजपला दबावतंत्राखाली घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि म्हणूनच उद्धव यांनी त्यांना मोकळीक दिली होती. राऊत यांनी केलं जे उद्धव यांना अपेक्षित होतं, पण ते सेना-भाजपच्या नेत्यांना मान्य नव्हतं. त्यामुळेच राऊत हेच खलनायक वाटतं होते. भाजपला सोडणे योग्य ठरणार नाही, याची नेमकी कल्पना सुभाष देसाई, अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर या मंडळींनी उद्धव यांना दिली होती. जोडीला अनेक आमदार – खासदारांचा रेटा होता. तरीही उद्धव यांनी राऊत यांना भाजपवर जहरी टीका करण्याची मुभा दिली होती. शेवटी शिवसेना आणि भाजप या दोघांनी सध्याची गरज लक्षात युती केली.

राऊत ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीच्या कामी येणार?

युती तोडण्याची भाषा करणार्‍या राऊतांनाच सोमवारी सकाळी हे सांगायला भाग पाडलं की संध्याकाळी अमित शहा आणि उध्दव ठाकरे हे युतीबाबत घोषणा करतील. हे संजय राऊतांना मनस्ताप देणारं होतं, हे त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होतं. या युतीमध्ये कोण जिंकलं आणि कोण हरलं याचा अभ्यास प्रत्येकजण आपल्या पद्धतीने करत राहतील. शिवसेनेला सत्ता हवी आहे. त्यासाठी भाजप हवी आहे आणि भाजप नेते मातोश्रीवर येण्यासाठी दबाव टाकू शकणारे राऊतांसारखे नेते हवे आहेत.

sanjay raut will help third generation of thackeray family
संजय राऊत ठाकरे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीच्या कामी येणार?

संजय राऊत यांची भूमिका गेल्या तीस वर्षात मातोश्रीचा अतिशय विश्वासू माणूस अशी राहिली आहे. विशेष म्हणजे बाळासाहेबांप्रमाणे उद्धव यांचे ते डोळे आणि कान बनले. राऊत यांची खासदारकीची तिसरी टर्म संपेल त्या वेळेला ते ६४ वर्षाचे असतील आणि कदाचित शिवसेनेची सूत्र पूर्णपणे आदित्य ठाकरे यांच्या हाती गेलेली असतील. दोन पिढ्यांच्या कामी आलेला हा ‘संजय’ तिसर्‍या पिढीच्या कामी येणार की नाही हे येणारा काळच ठरवेल…!



लेखक राजेश कोचरेकर हे जेष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -