घरफिचर्ससारांशमानवी मूल्यांचा जमा-खर्च

मानवी मूल्यांचा जमा-खर्च

Subscribe

या वर्षभरात काय मिळवले आणि काय गमावले याचा लेखाजोगा मांडताना मानवीमूल्यांना मध्यभागी ठेवावे लागले. या कठीण काळात शहरात अनेक लोकांनी आपल्या हातातील नोकर्‍या गमावल्या. हातावर पोट असणार्‍या अनेक लोकांना कित्येक दिवस काम नव्हतं. अशा लोकांचे जथ्थेच्या जथ्थे गावाकडे जीव मुठीत घेऊन पळताना दिसले. तिथे गावाकड्या लोकांना वाटा अडवल्या होत्या. आपली माणसे परकी झाली होती. प्रत्येकजण आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात दुसर्‍याच्या जीवाचा विचारच करत नव्हता. कोरोनाच्या या आपत्कालीन स्थितीत मानवी मूल्ये अशी भयानक आणि भयंकररित्या पायदळी तुडवली गेली. त्यामुळे या मानवी मूल्यांचा जमा-खर्च लक्षात घ्यावाच लागेल.

काल कोणी गंमतीने म्हणाले की, या वर्षाचा लेखजोगा मांडायचा असेल तर कसा मांडला जाईल, त्यावर दुसरा कोणी म्हणाला त्यात काय विशेष या वर्षाची गणती करताना जानेवारी, फेब्रुवारी आणि नंतर कोरोना, कोरोना आणि कोरोना, वर्ष संपलं. वर्ष संपत आलं तरी कोरोना विषाणूने घातलेला वैश्विक गोंधळ अजून संपत नाहीय. कोरोनाची लस येणार, लस येणार अशा अफवा (? ) उठत आहेत, पण आमचा अंतूबर्वा म्हणतो तसं पुरावा काय ! , ते असो पण वर्षभर कोरोनाच्या विषाणूने घातलेला गोंधळ बघता या वर्षाचा लेखाजोगा मांडायचा कसा हा प्रश्न माझ्यासमोर आहे.

दिवाळीनंतर लोकांनी खरेदीसाठी केलेली झुंबड बघता आता यापुढे कोरोनाला घेऊनच पुढील मार्ग आक्रमत जाणे आहे हे मनोमन नक्की केलं, आता वर्षअखेर आली आणि ब्रिटनमधून नवा कोरोना विषाणू आला आहे याबाबत मतांतरे होताना दिसत आहेत. याचा अर्थ कोरोना अजूनही लोकांच्या मनात भीती घालून आहे. याची सुटका कधी होणार याकडे नागरिक डोळे लावून बसले आहेत. कधी एकदा तोंडावर लावलेला मास्क काढतो आणि मोकळा श्वास घेतो असे सगळ्यांनाच वाटू लागले आहे.

- Advertisement -

या वर्षभरात काय मिळवले आणि काय गमावले याचा लेखाजोगा मांडताना मानवीमूल्यांना मध्यभागी ठेवावे लागले. या कठीण काळात शहरात अनेक लोकांनी आपल्या हातातील नोकर्‍या गमावल्या. हातावर पोट असणार्‍या अनेक लोकांना कित्येक दिवस काम नव्हतं. अशा लोकांचे जथ्थेच्या जथ्थे गावाकडे जीव मुठीत घेऊन पळताना दिसले. अर्थात वाटेत गाड्या नाहीत तरी मिळेल त्या वाटेने नव्हे तर आडवाटेने ही माणसं गावाकडे जाताना दिसत होती. प्रसंगी उपाशी असतील कुठे कोणी दिलं तर खाल्लं असेल पण तरीही मनावर ओरखडे होतेच. हा सर्व जमाखर्च मांडणे आलेच.

गावी पोचल्यावर बघतात तर काय, गावात जायच्या वाटेवर कार्यकर्ते उभे. गावात यायला बंदी. गावात जायचे आणि यायचे सर्वच रस्ते बंद. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माझ्या चुलतीचे अचानक निधन झाले. सकाळी फोन आला. गावी जायचे म्हटले तर त्यावेळी चौदा दिवस बाहेर विलगीकरण होऊन रहावे लागणार. आता नको चार दिवसांनी जाऊ. निदान अंत्यदर्शन नाही तर दिवसकार्याला तरी जाऊ या विचाराने मुंबईत राहिलो. चार दिवसांनी गावी काकांना आणि चुलतभावांना भेटून येण्यासाठी कोणाची गाडी कोकणात जाणार का म्हणून चौकशी केली. गाड्या मिळणार होत्या पण पुढे काय ?

- Advertisement -

आम्ही इथून निघणार हे गावी समजले तसे गावावरून फोन आला, तुम्ही जर ( कोणीही मुंबईकर ) कोणी इकडे आलात तर गाववाले चुलतीच्या कार्याला येणार नाहीत, एवढेच नव्हे तर कार्याला भटजीदेखील येणार नाही. आता झाली पंचाईत. दिवसकार्य नीट पार पडायचे असतील तर आम्ही गावी जाणे टाळणे योग्य होते. अर्थात, गावच्या लोकांना मुंबईहून येणार्‍या चाकरमान्यांपेक्षा गावातला शेजार महत्वाचा वाटणे यात गैर काहीच नाही.

पण वाईट तेव्हा वाटलं जेव्हा लोक वाईट प्रसंगी माणुसकी गुंडाळून ठेवत होते. या कोरोनाच्या काळात अनेक अनुभव मिळत होते. जशा नाण्याला दोन बाजू तशा या काळालादेखील दोन बाजू होत्या आणि आहेत. मानवीमूल्यांचा विचार करता ही गोष्ट किती गैर वाटते. त्याकाळी मुंबईहून येणारा प्रत्येक चाकरमानी हा कोरोनावाहक वाटतं होता का? की तो तसाच असतो. गावातली एक म्हातारी आजारी होती, तिच्या आजाराची तीव्रता बघून म्हातारी काही फार दिवसाची सोबती नाही हे दिसलं, म्हातारीला शेवटचं बघू, त्यासाठी विलगीकरणासाठी चौदा दिवस राहावे लागले तरी चालेल असं मत करून मुंबईवरून तिचा मुलगा, सून, नातवंडे गावी आली, ज्या घरात म्हातारी होती तिथेच विलगीकरणासाठी राहिली.

ज्यादिवशी हे चाकरमानी गावी पोचले, त्यादिवशीच म्हातारी गेली. आता झाली पंचाईत ! म्हातारीला घेऊन कसं जाणार? मुंबईकर घरात उतरले म्हणून गाववाले म्हातारीच्या घराकडे फिरकायला तयार नव्हते, आता पुढील कार्य करणार कसं? पुढाकार घेणार कोण? माणसं नसतील तर पुढील वाट काय? शेवटी तपासायला आलेल्या डॉक्टरांनी पर्याय म्हणून अ‍ॅम्ब्युलन्स मागवली आणि म्हातारीला स्मशानापर्यंत नेलं. माणूस जेव्हा अशा अडचणीत सापडतो तेव्हा मानवीमूल्यांची झालेली र्‍हास प्रकर्षाने इथे दिसून येते. त्यादिवशी झालेला प्रकार ते चाकरमानी विसरू शकतील का ? , एक गाववाले म्हणून त्यांनी त्या कठीणकाळात दिलेली वागणुकीचे समर्थन कसे करता येईल ?

इथे ग्रामसंस्कृती आणि शहरीसंस्कृती असा ढोबळ असा फरक करायचा नाही. फक्त या संस्कृतीतून किंवा उद्भवलेल्या परिस्थितीत मानवीमूल्ये किती जिवंत राहतील हा प्रश्न मनात राहतील, स्थळपरत्वे ही कारणे बदलत राहतात. तरी परिणाम एकच. या कोरोना विषाणूने माणसांना जवळ केलं की, त्यांच्यातील सोशल डीस्टन्सिंग पाळता पाळता त्यांच्यात तयार झालेली मानवी संस्कृती ही कुठे बघायला मिळाली तर कुठे बघायला मिळालीच नाही. एकदा हा कोरोना काळ संपला की, या काळात जपली गेलेली मूल्ये पुढील काळ कसा असेल किंवा माणूस हा आत्मकेंद्रित होईल का हे तो काळ ठरवेल.

या काळात काम करणारे डॉक्टर असतील, नर्स असतील किंवा काही समाजसेवी संस्था असतील किंवा आमचे पोलीसबांधव असतील त्यांची नोंद तर कोविडयोद्धा म्हणून केलेली आहेच, पण बाकीच्या नागरिकांचे काय, जेव्हा जमाखर्च मांडतो तेव्हा कुठली तरी बाजू ही जास्त होतेच त्यावरून त्या पत्रकाचा नफा किंवा तोटा ठरत असतो. या काळात ज्यांनी ज्यांनी या महामारीचे शिवधनुष्य उचललं त्यांनी सामाजिक भान राखलेच आहे.

बिल्डिंगमध्ये काम करणारे वॉचमेन असतील, झाडूवाले असतील, त्यांनी गावी न जाता तिथल्या रहिवाशांवर विश्वास ठेऊन इथेच राहणे पसंत केले. कोणी तरूण मुलांच्या गटाने त्या काळात इमारतीत काम करणार्‍या पहारेकर्‍यांना विरंगुळा म्हणून इमारतीत स्वस्त का होईना, पण इंटरनेटची सुविधा घेऊन दिली. कधी इमारतीत पूर्वी न दिसणारे कट्टे दिसू लागले. त्या कट्ट्यावर वर्क फ्रोम होमने कंटाळलेले आयटीवाले असतील किंवा मुलांना शिकवायला पीपीटी बनवणारे शिक्षक, बँकेचे कर्मचारी तोंडाला मास्क लावून गप्पा मारताना दिसू लागले.

सांस्कृतिकदृष्ठ्या या वर्षाचा विचार करता साहित्य संस्कृती कुठे खुंटली असं दिसलं नाही. अनेक नामवंत संस्थांनी आपले कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेतले. अनेक कवी-लेखक मित्र फेसबुकसारख्या माध्यमातून लाईव्ह दिसू लागले. अनेक वर्तमानपत्र, मासिके, साप्ताहिके ऑनलाईन वाचता येऊ लागली. यामुळे उद्याच्या काळात मुद्रित साहित्याचे भवितव्य काय हा प्रश्न उभा राहिला आहे. उद्याच्या काळात ऑनलाईन संमेलने ही आर्थिकदृष्ठ्या परवडणारी ठरतील आणि अनेक लोकांपर्यंत पोचणारे मध्यम म्हणून याकडे बघितलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राजकीयदृष्ठ्या या काळाचा फायदा सर्वांनी घेतला. श्रेय आणि अश्रेयाची भाषा सर्व स्थरावर केली जात आहे. या काळाचे वेगळे पडसाद सर्व घटकांवर राजकीय स्थरावर पडले गेल्याची मोठी शक्यता याकाळात नोंदवली गेली जात आहे. त्यामुळे काळ किती पुढे जात आहे याची नोंद ठेवली आहे कोणी? सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक व पर्यायाने आर्थिक गणिते मोठ्याप्रमाणात चुकली. या काळात एक समाजस्थर कोंड्याचा मांडा करत होता. तिथे दुसरा स्थर गरम गरम मांडा फुंकून फुंकून खात होता, ही विषमतेची दरी कोरोना काळाने जास्तच गडद केली.

या काळाने नोकरीधंदा बुडल्याने जीवाच्या आकांताने पायपीट करणारे लोक बघितला. त्याचवेळी त्या रस्त्यावर या धावणार्‍या लोकांना धीर देणारे, त्यांच्यासाठी जेवणाखानाची सोय करणारे नागरिक बघितले. पोरांच्या दुधासाठी हात पसरणारे स्वाभिमान विकणारे आईवडील बघितले. हा काळ सोसण्यापेक्षा, शिकवण्याचा जास्त होता. मानवीमूल्यांची र्‍हास युद्धकाळात जास्त होते असं म्हणतात, पण हा काळ युद्धकाळापेक्षा देखील भयानक होता, तरी आशेची काही किरणे या काळात या जमिनीवर फाकली हे मात्र तेवढेच खरे.

एक दोन म्हणता म्हणता तब्बल नऊ महिने लोटले तरी महामारीचा काळ संपत नाही. या काळात अनेकांनी आपली जीवाभावाची माणसे गमावली. कित्येकजण नोकरी गमावून बसले, कित्येकजणांना या मंदीत संधी दिसली. ज्यांच्याकडे जमीनजुमला होता त्यांनी पुन्हा नांगर हाती घेऊन आधुनिक शेतीची, चाकोरीच्या बाहेरच्या स्थानिक व्यापाराची संधी आत्मसात केली. हा सगळा बदल पुढील काळात महत्वाचे बदल करू शकेल, काळाच्या पाण्यावर काय बुडेल नी काय तरेल हे आताच कसे सांगावे. तरी मानवीमूल्यांची एक ज्योत या काळात अखंड तेवत राहिली हे काय कमी आहे. गोव्याच्या शंकर रामाणी यांच्या शब्दात सांगायचे तर

दिवे लागले रे दिवे लागले
तमाच्या तळाशी दिवे लागले
दिठीच्या दिशा खोल तेजाळताना
कुणी जागले रे ? कुणी जागले ?

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -