घरफिचर्ससारांशदुखर्‍या भावनांचा बाजार !

दुखर्‍या भावनांचा बाजार !

Subscribe

‘नटरंग’मध्ये गुणवंतराव कागलकर पांडबाला म्हणतो, एवढं बारीक बघितल्यावर बाईला बी दाढी मिश्या दिसत्यात...बदलत्या काळात आपण खूपच बारीक सारीक पाहू लागलो आहोत. त्यामुळे नव्वदच्या दशकापासून सामाजिक आणि जमातवादी संतुलन राखणार्‍या व्यक्तिरेखा हिंदी पडद्यावर दिसू लागल्या.. उगाच जमातवाद्यांच्या भावना दुखावून थेटरातला पडदा फाडला जाऊ नये, हे त्यातलं उद्दिष्ट होतं. ‘छपाक’ प्रदर्शित झाल्यावर अशाच काही गोष्टी पुढे आल्या आहेत.

हिंदी चित्रपटांतील ज्येष्ठ पटकथालेखक गीतकार आणि कथाकार जावेद अख्तर यांनी हिंदी पडद्यावर गाजलेल्या ‘शोले’ चित्रपटाच्या आठवणी काही वर्षांपूर्वी जागवल्या होत्या. ते म्हणाले, शोलेमध्ये एक प्रसंग होता, ज्यात वीरु म्हणजेच धर्मेंद्र रामगडच्या एका जुन्या मंदिरात शंकराच्या मूर्तीमागे लपून बसंती म्हणजेच हेमामालिनीला शंकर भगवान बोलत असल्याचे दाखवून फसवण्याचा प्रयत्न करतो. हा प्रसंग आज चित्रीत करता येईल का…आज तसं झालं तर सेन्सॉरविरोधात येथील अनेक संस्था संघटना आंदोलने करतील. ‘शोले’ आजच्या काळात प्रदर्शित झाला असता तर अनेकांच्या अस्मिता दुखावल्याची ओरड झाली असती.

आजच्या सोशल मीडियामुळे प्रत्येक सिनेमा आला की, अशाच पद्धतीने अभिव्यक्त होण्याची स्पर्धा सुरू आहे. या अभिव्यक्तीत अभिनिवेष आहे. उन्मादही आहे. त्यामुळे आजच्या तुलनेत 70 आणि 80 च्या दशकातला प्रेक्षक सुज्ञच म्हणायला हवा. असंच एक आज कमालीचं वादग्रस्त ठरेल असे गाणं 80 च्या दशकात आलेल्या सोहनी महेवालमध्येही होतं.

- Advertisement -

बोल दो मिठे बोल सोणिये…भेद दिलों के खोल सोणिये…या गाण्यात महिवाल झालेला सन्नी पूनमला म्हणतो.

जी करता है इस मिट्टी से तेरे जैसा बुत एक बनाऊं
सजदे उसके कर कर के मैं आज मुसलमां से काफिर हो जाऊं
अरे सोणिये….

- Advertisement -

आता या गाण्यात महिवाल चक्क तिच्या पुतळ्यासमोर सजदे करण्याचे सुचवत आहे. त्याचा परिणाम म्हणून त्याला काफिर होणंही मंजूर आहे. आज या ओळी लिहिल्या जातील का, ‘छपाक’च्या निमित्ताने पुन्हा अशाच पद्धतीने जमातवादी प्रवृत्ती सोशल मीडियावर अभिव्यक्त झाल्या आहेत. जेएनयू नंतर दीपिकाच्या छपाकच्या विरोधात अजय देवगणच्या तान्हाजी..ला उभं केलं जात आहे. इथंही देशद्रोह आणि देशभक्ती अशा दोन्ही बाजू जमातवादी सोयीनं मांडल्या जात आहेत. छपाकमधील व्हीलन हा विशिष्ट धर्माचा असताना त्याला जाणीवपूर्वक दुसर्‍या धर्माचे दाखवण्यात आल्याची ओरड अतिउत्साहींनी केली आहे. मात्र, चित्रपटातील व्हिलनच्या व्यक्तिरेखेच्या नावातून त्याचे व्हीलनपण सिद्ध करण्याचा हा प्रयत्न त्याने केलेल्या अ‍ॅसिड फेकण्याच्या कृतीपेक्षा जास्त महत्त्वाचा असल्याचा कांगावा यामागे आहे.
त्याच्या अ‍ॅसिड फेकण्याच्या कृतीपेक्षा त्याचा धर्म अधोरेखित करण्याचा हिडीस प्रयत्न समाजमाध्यमांवर केला जात आहे. मात्र या चित्रपटात असे काहीही नाही. खलनायकाचे नाव, त्याची वस्ती, त्याचं घर, त्याचा पेहराव, भाषा हा वादाचा विषय होईल, याची कल्पना मेघना गुलजारलाही नसावी…तिचं चुकलंच, तिने चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी एक डिस्क्लेमर दाखवायला हवा होता…की या चित्रपटातील नायक, नायिका आणि खलनायकांना विशिष्ट धर्म आहे. मात्र ती माणसं आहेत. त्यांच्या जमातवादाशी चित्रपटाचा आणि त्याच्या निर्माते दिग्दर्शकांचा काहीएक संबंध नाही, असे पुढल्या वेळेस मेघना किंवा ‘मुल्क’ आणि ‘आर्टिकल 15’ बनवणारा अनुभव सिन्हाही अशी काळजी घेईल, असा आशावाद आहे.

जुन्या जमान्यातल्या ‘पाकिजा’मध्येही असंच एक आजच्या काळात वादग्रस्त ठरेल असं गाणं होतंच..चलो दिलदार चलो चाँद के पार चलो….

हम नशे में हैं संभालो हमें तुम
हम नशे में हैं संभालो हमें तुम
हम हैं तैय्यार चलो…

1972 मध्ये आलेला ‘पाकिजा’ या गाण्यामुळे आज थेटरातून नक्कीच उतरवला गेला असता. जमातवाद्यांच्या धर्मात मदिरेचं समर्थन होऊच कसं शकतं, तेही नायिकेकडून असा प्रश्न आता विचारला गेला असता. 80 च्या दशकापर्यंत स्थिती बरी होती. त्यावेळी व्यक्त होण्यासाठी पुरेशी साधनं नव्हती, मोबाईल नव्हता, इंटरनेटही नव्हतं. त्यामुळे आपल्या अती संवेदनशील झालेल्या भावना कशा आणि कुठं दुखावल्या गेल्या हे ताबडतोड समजत नव्हतं. मात्र आज अशा दुखावलेल्या भावना फेसबुकच्या चव्हाट्यावर मांडून त्याचा त्याहीपेक्षा जमातवादी भावनांची लक्तरे काढून निषेध करण्याचा प्रकार त्या काळात एवढा प्रगत झालेला नव्हता. मात्र आताच्या काळात आपण खूपच प्रगत झालेलो आहोतच. कुणी सेलिब्रिटी सोशल मीडियावर काही बोलला की, ताबडतोब हातात भिंग घेऊन त्यात आपल्या भावना दुखावणारं आढळतं का नाही, हे पाहून आपण अस्वस्थ होतो. दहा वर्षांपूर्वी आलेल्या अतुल कुलकर्णीच्या ‘नटरंग’मध्ये त्यातला गुणवंतराव कागलकर पांडबाला म्हणतो, एवढं बारीक बघितल्यावर बाईला बी दाढी मिश्या दिसत्यात…बदलत्या काळात आपण खूपच बारीक सारीक पाहू लागलो आहोत. त्यामुळे नव्वदच्या दशकापासून सामाजिक आणि जमातवादी संतुलन राखणार्‍या व्यक्तिरेखा हिंदी पडद्यावर दिसू लागल्या.. उगाच जमातवाद्यांच्या भावना दुखावून थेटरातला पडदा फाडला जाऊ नये, हे त्यातलं उद्दिष्ट होतं. जॉन मॅथ्यूच्या ‘सरफरोश’मधला एसीपी राठोडसोबत काम करणारा इन्स्पेक्टर सलीम, ‘लगान’मध्ये भुवनसोबत क्रिकेटच्या मैदानावर इंग्रजांशी लढा देणारा कचरा आणि इस्माईल त्यामुळेच महत्त्वाचे असतात. आपल्या जमातवादी भावनांचं संतुलन आपली राष्ट्रीय एकात्मता राखण्यासाठी पडद्यावरही त्यामुळेच आवश्यक असतं. त्यामुळेच निरज पांडे दहशतवादाचा विषय घेऊन ‘ए वेनस्डे’ बनवतो तेव्हा त्यातल्या मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या कॉमन मॅनचं नाव अखेरपर्यंत तो आपल्याला सांगत नाही.

आपल्या जाणीव आणि आपल्या अस्मिता आपल्यात जन्माआधीपासूनच मुरलेल्या असतात. कुठल्याही कलाकृतीत आपल्या जाणिवांना पोषक असलेले घटक नकळत शोधले जातात. मनमोहन देसाई नावाच्या मोठ्या दिग्दर्शकाला ही कला माहीत झाली होती. त्यामुळेच ‘अमर अकबर अँथनी’मध्ये हॉस्पिटलमध्ये आजारी आईला रक्तदान करताना तीनही वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे भाऊ एकाच बाटलीतून आई असलेल्या निरुपा रॉयला रक्त देतात. ही एकच बाटली तिघांच्या आयव्हीला जोडलेली असते. मात्र ही बाटली खाटेपासून उंच का लटकवलेली असते. असं उलटं रक्तदान होतं का, असले प्रश्न त्यावेळच्या मूर्ख प्रेक्षकांना पडले नव्हते, त्या तुलनेत आपण आजचे प्रेक्षक खूपच सूज्ञ आणि हुश्शार झालेलो आहोत. त्यावेळी चित्रपटाचा प्रेक्षक फक्त प्रेक्षक होता. तो, राष्ट्रवादी, राष्ट्रद्रोही, पुरोगामी, प्रतिगामी, धर्मवादी, अधर्मी नव्हता. तो आस्तिक किंवा नास्तिक असल्यानेही चित्रपटांना फरक पडत नव्हता. समाजमाध्यमांनी आपल्याला आज अभिव्यक्त होण्यासाठी माध्यम उपलब्ध करून दिले, मात्र आपले माणूसपण या अभिव्यक्तीच्या गर्दीत हरवले आहे. ते आपले आपणच शोधायला हवे…सिनेमाचा सूज्ञ प्रेक्षक होणं ही खूप पुढची बाब आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -