घरफिचर्ससारांशतुम आशा, विश्वास हमारे, तुम धरती, आकाश हमारे...

तुम आशा, विश्वास हमारे, तुम धरती, आकाश हमारे…

Subscribe

नुकताच माझा एक मित्र करोनाशी यशस्वी लढा देऊन घरी परतला. आमच्या मित्रमंडळींनी त्याच्या घरी परतण्याचा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकला. सगळ्यांनी त्याचं ग्रुपवर स्वागत केलं. आमच्या एका रसिक मित्राने त्याचं स्वागत करताना खास दोन ओळी टाईप केल्या – तुम आशा, विश्वास हमारे, तुम धरती, आकाश हमारे.

करोनाशी यशस्वी झुंज दिल्यानंतर घरी परतणार्‍या कुणासाठी कुणी ‘तुम आशा, विश्वास हमारे, तुम धरती, आकाश हमारे’ हे शब्द व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकत असेल तर कुणालाही कौतुक वाटणं साहजिक होतं. आज वर्तमानपत्राचं कोणतंही पान उघडलं किंवा कोणतंही चॅनेल लावलं की समोर येणार्‍या भीतीदायक आकड्यांनी नुसती छाती दडपून जाते. आता कोणता आकडा समोर येईल या प्रश्नाने मन नुसतं कावरंबावरं होतं. वर्तमानपत्रं आणि चॅनेलवरचे हे आकडे वर्तमानाबद्दलची भीती आणि भविष्यकाळाबद्दलची निराशा मनात नोंदवून जातात. काहीतरी आशादायक चित्र दिसेल म्हणून काही पहावं तर ते अधिक निराशेची काजळी मनात पसरवून जातं.

- Advertisement -

…आणि चारही बाजूंनी निराशा अशी सुसाट घोंगावत असताना कुणीतरी आपल्या माहितीतला, आपल्या रोजच्या उठण्याबसण्यातला असा आपला कुणी करोनाला हरवून घरी येतो तेव्हा खरोखरच कुणाला ‘तुम आशा, विश्वास हमारे, तुम धरती, आकाश हमारे’ ही गाण्याची ओळ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकावीशी वाटत असेल तर त्यातला गहनगहिरा अर्थ आपण समजून घ्यायलाच हवा!

‘सुबह’ या सिनेमातलं हे गाणं जेव्हा लता मंगेशकरांच्या आवाजात प्रथमच जेव्हा कानावर पडलं तेव्हाही त्या गाण्याने आमच्या एका पिढीला आशेचं देणं आणि दिलासा दिला होता. कुणाच्याही मनात येतील, कुणालाही सुचू शकतील असे गाण्याच्या मुखड्यातले ते साधेसरळ आणि सोपेसोज्वळ शब्द होते…‘तुम आशा, विश्वास हमारे, तुम धरती, आकाश हमारे’…आशा, विश्वास, धरती, प्रकाश…चारच शब्द, पण लतादिदींच्या आवाजात समोर, अवतीभोवती आशेचं नितांतसुंदर वातावरण उभं करून जातात. काळवंडलेल्या मानावरची काजळी सुरांच्या एका फुंकरीत दूर करून जातात, मनाला उभारी देऊन जातात. निराशेचा पडदा दूर करून आशेची पालवी दाखवून जातात.

- Advertisement -

कुणी लिहिले आहेत हे शब्द?…साक्षात पंडित नरेंद्र शर्मांनी!…आणि कुणी संगीत दिलं आहे या गाण्याला तर पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी!

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, पंडित नरेंद्र शर्मा…आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर…प्रतिभेचा असा त्रिकोन साधल्यानंतर जे गाणं जन्माला येणार होतं त्या गाण्याने तुमच्याआमच्या जीवनाला नवा दृष्टीकोन दिला नसता तरच नवल होतं, त्या गाण्याने जगण्याची समजूत काढली नसती तरच नवल होतं, जगण्याची समजूत वाढवली नसती तरच नवल होतं.

लतादिदींच्या बहराच्या काळातलं ते गाणं. त्या गाण्यासाठी फिल्मी जगतातले नेहमीचे फिल्मी शब्द लिहिणारे घिसेपिटे गीतकार बोलवले गेले नव्हते. शब्दांची केवळ यांत्रिक मांडणी करणारे गीतकार या गाण्यासाठी नको होते ही या गाण्याची प्रमुख मागणी होती. त्यानुसारच पंडित नरेंद्र शर्मांना निमंत्रण धाडलं गेलं होतं…आणि त्यांनीही या गाण्यासाठी सहजसुलभ शब्दांत जीवनाचा अर्थ उलगडून दाखवला होता.

खरंतर आपला भाऊ हृदयनाथ यांच्या संगीताचं, त्यांच्या रचनांचं लतादिदींना नेहमीच अप्रुप वाटत आलं. त्याचं कारण होतं ते हृदयनाथांच्या संगीतरचनेतलं जातिवंत वेगळेपण, जे वेगळेपण ऐकताना प्रत्येकालाच ते जाणवल्याशिवाय राहिलं नाही. नरेंद्र शर्मांनी लिहिलेल्या ‘तुम आशा, विश्वास हमारे, तुम धरती, आकाश हमारे’ या अगदी साध्यासोप्या शब्दांना त्यांनी तितकीच साधीसोपी चाल लावली. साधीसोपी मांडणी केली, पण साध्या शब्दांना सुरांच्या सोबत नेताना अर्थाची फक्त पालखी वाहण्याचं काम केलं नाही तर सुरांनी त्या शब्दांना अनन्यसाधारण उंची मिळवून दिली.

आजच्या करोनाच्या काळात सगळीकडे निराशेने थैमान घातलेलं असताना, जगाच्या पाठीवर जिकडेतिकडे निराशेचं थारोळं पसरलेलं असताना कुणाला तरी नेमकं हेच गाणं, नेमके याच गाण्याचे शब्द सुचावेत हा निव्वळ योगायोग नव्हता तर तो आजच्या भयाण काळात गहिवरून येण्याचा आवेग होता. फार कमी लोकांना तो आवेग समजला असावा, म्हणूनच त्याला तितक्या लाइक्स मिळाल्या नसाव्यात. पण ज्याला आजच्या काळाच्या पार्श्वभूमीवर त्या गाण्याचा, त्यातल्या शब्दांचा, त्यातल्या अन्वयार्थाचा थांग लागला असेल त्याच्या मनावर या गाण्याचे खोल परिणाम करून गेले असतील, अगदी निश्चित परिणाम करुन गेले असतील!

शेवटी गाणं, त्यातले शब्द, त्यातल्या भावभावना माणसाच्या जगण्याशी, त्यातल्या भल्याबुर्‍या घटनांशी कधी कळतनकळत तर कधी थेट प्रत्यक्षात नातेसंबंध सांगत असतात. ‘तुम आशा, विश्वास हमारे, तुम धरती, आकाश हमारे’ या गाण्याने माझ्या मनात त्याच नातेसंबंधांच्या जोरावर तेव्हा काही साद घातली होती, आजच्या भयाण काळातही हाक दिली होती.
माझा तो मित्र, ज्याने करोनाशी लढा दिला आहे त्याला आजच्या काळात मला लागलीच भेटणं शक्य नाही, पण पुढे कधीतरी हे गाणं त्याला नक्की ऐकवणार आहे…जमल्यास त्याला त्याचा मला लागलेला आजच्या काळातला अर्थही सांगणार आहे…न जाणो, कदाचित तोही मला त्याला लागलेला अर्थ समजावून सांगेल…‘तुम आशा, विश्वास हमारे, तुम धरती, आकाश हमारे’ या गाण्याचा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -