नारद आणि नारायण !

संजय राऊत. वर्षभरापूर्वीपर्यंत या नामाला विशेषण लाग त असे. पण महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जे नाट्यपूर्ण सत्तांतर झाले, त्यानंतर विशेषणांची गरज संपली. आता या नावामागे पत्रकार, संपादक, खासदार, शिवसेना नेते अशा बिरुदांची गरज उरलेली नाही. हा झाला वर्षभरातल्या घडामोडींचा दृश्य परिणाम. अर्थात हे एकाएकी होत नसतं. त्याला या माणसाची बर्‍यापैकी दीर्घ म्हणावी अशी वाटचाल कारणीभूत आहे. संजय राऊत हे मूलत: पत्रकार. इंडियन एक्स्प्रेस वृत्त समूहातल्या ‘लोकप्रभा’ साप्ताहिकातून पत्रकारितेची सुरुवात केलेले आणि आता पंचवीस वर्षांहून अधिक काळ ‘सामना’च्या कार्यकारी संपादकपदाची धुरा सांभाळणारे. काही वर्षांपूर्वी ‘जॅक ऑफ ऑल, बट मास्टर ऑफ नन’ अशी पत्रकाराची व्याख्या केली जात असे.

या व्याखेत काळाच्या ओघात गरजेनुसार थोडा बदल झाला आणि बट् नंतर मास्टर ऑफ वन ची जोड लाभली. काही माणसं मास्टर ऑफ ऑल बनण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी कष्ट करण्याची तयारी लागते. त्याचवेळी भाग्य आणि प्रतिभेची जोडही लागते. त्याच्या एकत्रित परिणामातून येणारी प्रत्येक शक्ती आपल्यासोबत काही दुर्गुणही घेऊन येते. दैवाचे प्रत्येक वरदान आपल्यासोबत एक शाप घेऊन येते आणि प्रत्येक शापाची पाठराखण म्हणून एकेक वरही येत असतो. यातूनच एक गुंतागुंत निर्माण होते. संजय राऊत हे या गुंतागुंतीचं प्रतिक! गेल्या वर्षभरातल्या राजकीय घडामोडींनी या नावाला वलय दिलं. अर्थात जसे चाहते निर्माण केले, तसेच नाकं मुरडणार्‍यांचीही मोठी फौज तयार झाली. आज साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या या माणसाचं अवलोकन करताना केवळ गेल्या एका वर्षाची मर्यादा ठेवता येत नाही. त्यासाठी ढोबळ मानाने का होईना, त्यांचा सारा प्रवास लक्षात घ्यावा लागेल.

पत्रकारितेपुरतं बघायचं तर संजय राऊत हे नाव लोकप्रभापासूनच कमी-अधिक प्रमाणात लक्षवेधी बनलं. त्याकाळी म्हणजे १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात ते साप्ताहिकाच्या गरजांना साजेसं चटपटीत लिखाण करायचे. नेमका त्या काळात मुंबईमध्ये गँगवॉरला ऊत आला होता. परिणामी हा विषय राऊत यांच्या तत्कालिन लिखाणाचा केंद्र बिंदू बनला. गँगवॉरसारख्या संवेदनशील विषयावर ते बिनधास्त लिहायचे. अल्पावधीतच म्हणजे १९९० च्या दशकाच्या पूर्वार्धात ते ‘सामना’चे कार्यकारी संपादक झाले. त्यांच्या या नियुक्तीला एक पृष्ठभूमी आहे. त्यापूर्वीचे ‘सामना’कार्यकारी संपादक हे शिवसेनेच्या विचाराचे नव्हते. मी तेव्हा ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये होतो. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना समाजवादी पत्रकारांचं विलक्षण वावडं होतं. शिवतीर्थावरील भाषणातून ते नावानिशी माझ्या काही सहकार्‍यांचा उद्धार करायचे. ‘म.टा.’तल्या वार्ताहरांपैकी ते फक्त माझ्याशी बोलायचे. कधी-मधी प्रत्यक्ष भेटीत भरभरून बोलायचे. मला एकप्रकारे अव्यक्त अभय होते. तेव्हा अशाच एका भेटीत मी ‘मातोश्री’वर बाळासाहेबांना एक प्रश्न विचारला होता.

वर्षानुवर्षे तुमच्या विचारांचं सोनं उभा महाराष्ट्र लुटतोय; पण तरीही तुम्हाला ‘सामना’ या मुखपत्रासाठी तुमच्या विचाराचा संपादक मिळाला नाही. त्यांनी ‘सामना’तील नेमणूक हे बाळासाहेबांनी दिलेलं कृतीशील उत्तर होतं. कारण राऊत हे निरपवादपणे बाळासाहेबांवर प्रेम करायचे. रस्त्यावर उतरुन राडा करण्याचा पिंड नसला, तरी मनाने कडवे शिवसैनिक तशात बाळासाहेबांचा सहवास आणि त्यांनी केलेलं पुत्रवत प्रेम यातून अधिकच कडवा झालेला शिवसैनिक म्हणजे संजय राऊत. ‘सामना’ची जबाबदारी हे शिवधनुष्य होते. बाळासाहेबांची विचार करण्याची पद्धत आणि ठाकरी भाषा राऊत यांनी आत्मसात केली. संजय राऊत यांच्या भाषेवर किंवा एकूणच पत्रकारितेवर एका पंचकाचा प्रभाव जाणवतो. प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, दत्तू बांदेकर, माधव गडकरी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्रकारितेतलं निके सत्व टिपून त्यांच्या शाईत राऊत यांनी स्वत:चा टाक बुडवला. राऊत यांच्या शैलीबद्दल मत-मतांतरं असू शकतात, आणि अटितटी. पण त्यांच्या पत्रकारितेला आधुनिकतेची डूब आहे. त्यांनी स्वत:ची छाप पाडली. प्रभाव निर्माण केला. माझ्या माहिती वा समजुतीनुसार बाळासाहेबांनी अनेकदा राऊत यांना राजकारणात सक्रिय होण्यास सांगितले होते. संसदीय किंवा कृतीशील राजकारणापासून अलूफ होते. शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक असतानाही राजकारण त्यांना खुणावत नव्हतं.

राजकारणाच्या गटारात उतरायला त्यांचं मन राजी नव्हतं. विरोधाभास असा, की जेव्हा त्यांनी संसदीय राजकारणात उतरण्याचा आणि शिवसेनेत सक्रिय होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ही भूमिकाही त्यांनी समरसून पार पाडली. तोवर आपल्या पक्षाची विचारधारा वा वैचारिक मांडणी कशी रेटायची, याचा वस्तुपाठ म्हणून त्यांच्या संपादकीय कारकिर्दीकडे पाहिलं जाऊ लागलं होतं. आजमितीस तर खपाचा आकडा काहीही असला, म्हणजे खपाच्या शर्यतीत ‘सामना’ वजा करता येत नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य काही भाजपा नेते आम्ही ‘सामना’ वाचत नाही, असं सांगत असले, तरी प्रत्यक्षात ‘सामना’ची दखल घेणं हे ना राजकीय नेत्यांना चुकलंय, ना इलेक्ट्रॉनिक माध्यमांना चुकलंय. ही राऊत यांची कमाई आहे. बरं, यापूर्वीही प्रितीश नंदी, डॉ. भारतकुमार राऊत यांच्यासारख्या इंग्रजी पत्रकारितेत ठसा उमटविलेल्या पत्रकारांना शिवसेनेनं राज्यसभेची खासदारकी दिली होतीच की! भारतकुमार राऊत यांच्यामुळे राष्ट्रीय वाहिन्यांवर शिवसेनेची भूमिका इंग्रजीतून मांडणारा प्रवक्ता शिवसेनेला मिळाला.

पण ते राजकारणासाठी पत्रकारितेची वस्त्रे उतरवून ठेवू शकले नाहीत. उलटपक्षी संजय राऊत यांनी राजकारणाचा रंग लावून घेतल्यावर शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणावरही ठसा उमटवला. त्यांची पक्षातील भूमिका लक्षणीय बनली. परिणामी त्यांनी अनेकांचा रोषही ओढवून घेतला. वानगीदाखल सांगायचं तर राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा राज समर्थकांनी सर्वाधिक राग संजय राऊत यांच्यावर काढला होता. विशेष म्हणजे, हेच राऊत राज यांच्या गोटात गेले असते, तर तसे होणे हवेहवेसे वाटणार्‍यांची संख्याही कमी नव्हती. कृष्णकुंजवर शिष्टाईसाठी गेलेल्या राऊत यांची खाली उभी असलेली गाडी राज समर्थकांनी उलटून टाकली होती. तेव्हापासून आजवरचे अनेक प्रसंग पाहिले की वाटतं की रोषाचे धनी राऊत यांनी व्हायचे, अशी पक्षाची धोरणात्मक योजना आहे की काय? मुख्य म्हणजे स्वत: राऊत यांनीही ते जणू स्वीकारुन टाकले आहे!

एकाच वेळी ‘सामना’ची दैनंदिन जबाबदारी पार पाडणं, शिवसेनेच्या राजकारणात सक्रिय राहणं, दिल्लीतील संसदीय राजकारणातही अस्तित्व लक्षवेधी बनवणं या सगळ्यासाठी लागणारा वेळ या माणसाकडे येतो कुठून? कधी कधी वाटतं त्यांना प्रचंड आस्था असलेल्या शरद पवारांनीच त्यांना हे अधिक वेळ मिळणारं घड्याळ दिलं आहे की काय? आणखी एक विशेष म्हणजे निशाचर असणं हे मोठ्या, यशस्वी राजकारण्यांचं एक लक्षण मानलं जातं. रात्री-अपरात्री होणार्‍या बैठका, खलबतं यापासून राऊत दूर असतात. याबाबतीत चंद्रापेक्षा त्यांची सुर्याशी अधिक सलगी आहे. पूर्वोत्तर राज्यात भल्या पहाटे सूर्यकिरणं भारताच्या भूमीवर अवतरतात. साधारण तेव्हाच या माणसाचा दिवस सुरू होतो. कामाचा प्रचंड उरक आणि आवाका असल्यामुळे दिवस संपतोही वेळेत. आताशा इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचा दिवस यांच्या दारात सुरू होतो. सत्तांतर नाट्याच्या काळात सुरू झालेला तो परिपाठ आजही कमी-अधिक प्रमाणात कायम आहे.

या प्रभावाच्या संदर्भात एक गोष्ट नमूद करायलाच हवी. ती अशी, की देशभरातल्या राजकारणाचं पत्रकारितेनं दिलेलं भान या माणसानं राजकारणात मोठ्या खुबीनं वापरलं. चांगलं हिंदी बोलता येत असल्यानं इंग्रजीवर प्रभुत्व नसल्याची पडती बाजू यथास्थित झाकली. अर्थात गेल्या वर्षभरात इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर झळकण्याचं व्यसनच जणू त्यांना लागलंय. आपल्याला मिळणारं महत्व, रोजच्या रोज राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी असणं कोणाला आवणार नाही? पण संजय राऊत हे एका परीने या आत्ममग्न, स्वप्रतिमेच्या जाळ्यात अडकू लागले आहेत. शिवाजी महाराजांच्या तलवारीपासून काढ्याच्या उपयुक्ततेपर्यंत कुठल्याही विषयावर सारख्याच अधिकारवाणीनं बोलण्याची त्यांची हौस वरचेवर वादांना जन्म देतेय. व्यक्तिश: त्यांना त्याची फिकीर नाही. म्हणून तर कंगना रानौतशी झालेलं वाक्युद्ध असो, की डॉक्टर कंपाऊंडरची मल्लिनाथी असो, त्यातून निर्माण झालेल्या वादांकडे त्यांनी फारसं गांभीर्याने पाहिलेलं नाही. नीती, लोकाचार आदींनी करकचून टाकलेलं जीवन बहुदा त्यांना मानवत नसावे!

अर्थात या सगळ्या संपादकीय आणि राजकीय व्यापातून हा माणूस स्वत:साठी वेळ काढू शकतो. नित्यनेमानं मॉर्निंग वॉक घेऊ शकतो. दोस्तांचा घट जमवू शकतो. हार्मोनियम वाजवण्यासारखा छंद जोपासू शकतो. कुटुंबाला वेळ देऊ शकतो. सिनेमे काढू शकतो. अनेक छुप्या शत्रूंना अंगावर घेऊ शकतो आणि अनेक वर्षे राजकीयदृष्ठ्या अस्पृश्य राहिलेल्या शिवसेनेतूनही राष्ट्रीय राजकारणात मित्र जोडू शकतो. द्वारकानाथ संझगिरीसारखे माझे अनेक मित्र मैत्रीबाबत संजय राऊत मिसाल असल्याचं सांगतात. शद्बाला जागणं म्हणजे काय, हे सांगतात ज्यांची अनेक उदाहरणं देतात. हे सारं ज्या माणसानं कमावलं तो आदर्श वा परिपूर्ण आहे का? उत्तर नकारार्थी आहे. कारण तसं कोणीच नसतं. पण आपली बलस्थानं मर्यादाचं भान ठेवून वापरणारी माणसं यशस्वी होतात. संजय राऊत त्यापैकीच एक. त्यांना रवी शास्त्रीसारखं मर्यादांचं भान आहे, सुनील गावसकरसारखं वादग्रस्ततेचं आकर्षण आहे आणि स्व-प्रतिमेवर विलक्षण प्रेम आहे. मर्यादांचं म्हणाल तर संजय राऊत हे काही लोकनेते नव्हेत. सभांचा फड मारणारे अमोघ वक्ते नव्हेत. लोकांमधून थेट निवडून येण्याची वा कुठल्याही दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करण्याचं बाळासाहेबांसारखं सामर्थ्यही नाही. तरीही हा माणूस आज शिवसेनेचा महत्वाचा चेहरा आहे. त्याची वाणी आणि लेखणी लोकव्यवहारावर प्रभाव टाकत राहिली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतराचं जे अभूतपूर्व नाठ्य महाराष्ट्रानं अनुभवलं त्यात संजय राऊत दुहेरी भूमिकेत दिसले. नारायण… नारायण… म्हणत कळ फिरवणार्‍या नारदाच्या आणि कार्य सिद्धीला नेण्यात वाट्टेल ते, पडेल ते काम करणार्‍या नारायण हा पुलंनी रेखाटलेल्या व्यक्तिचित्राच्याही भाजपाला अडगळीत टाकून शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची अतर्क्य मोट बांधण्यातला प्रमुख शिलेदार ही राऊत यांची प्रतिमा उभ्या महाराष्ट्राच्या मनावर ठसली. गमतीचा भाग असा, की नारद हे आद्य पत्रकार मानले जातात आणि आधुनिक काळात मॅनेजमेंटमध्ये ‘नारायण’ मुख्य भूमिकेत असतो. या निमित्तानं जे पॉलिटिकल वॉर देशानं पाहिलं त्याचं सारथ्य संजय राऊत यांनी केलं. गँगवॉरपासून आपली छाप पाडायला सुरुवात केलेल्या या पत्रकारानं पॉलिटिकल वॉरमध्येही प्रभावी भूमिका निभावली. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर शरद पवार आणि प्रमोद महाजन यांचा अपवाद वगळता अशा पद्धतीनं राष्ट्रीय पातळीवर नेटवर्किंग उभं करण्यात अलीकडच्या काळात दोनच नेते यशस्वी झाले. नितीन गडकरी आणि संजय राऊत. गडकरी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. राऊत यांच्याकडे असं मोठं पद नसतानाही त्यांनी प्रभावी क्षेत्र निर्माण केलंय.

जमेच्या अशा अनेक बाजूंसोबत संजय राऊत यांनी काही दोष आपल्या ताळेबंदात खर्ची टाकलेत. त्यांची आक्रमकता निडर आहे. नंगेपणाच्या जातकुळीतली. नंगे को खुदा भी डरता है, या उक्तीनुसार सहसा कोणी त्यांना अंगावर घ्यायला धजावत नाही. तितका आक्रमक प्रतिवाद करत नाही. अशा कर्तृत्ववान माणसांच्या जीवनाच्या भोवती विकारांचे वेष्टन असते. आशा-आकांक्षा, मोह, क्रोध, दंभ आदींचे आवरण त्यांना वेढून टाकते. त्यामुळेच राजकीय उलथापालथीत रमी लावताना जोकरची महत्वाची भूमिका निभावणार्‍याला आपणच उभारलेला पत्त्यांचा बंगला आपणच कधीही मोडू शकतो, अशा अहंकाराची बाधा होऊ शकते. मग कर्तृत्व शक्तीला विकारांची तांब चढते. आपल्या बाबतीत असा ग्रह होतो आहे का, याची संजय राऊत पर्वा करत नाहीत. आचार्य अत्रे ज्या शैलीत विरोधकांवर तुटून पडायचे, ती शैली राऊत यांनाही जवळची वाटते. जो आपल्या बरोबर नाही, तो आपल्या विरुद्ध आहे, असा समज करून घ्यायचा आणि जो विरोधात आहे त्याला साधनशुद्धीच्या विवेकाचा यत्किंचितही फायदा न देता त्याचे वस्त्रहरण करायचे हा थाट दीर्घकाळ समाजाला पचेक का, याचा विचार ते करतात असं जाणवत नाही. यातून सिद्ध होणारं शस्त्र दुधारी असतं.

‘जो मेरी तेगे दोदम थी, अब मेरी जंजीर है।
शोख बेपरवा है कितना, खालिके तकदीर भी ॥

(जी माझी दुधारी तलवार होती, ती आज माझी बंडी आहे. भाग्यविधाता किती द्वाड आणि बेपर्वा आहे!)
याचं भान या कर्तृत्ववान माणसाला लाभो, या सदिच्छेसह वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…

चंद्रशेखर कुलकर्णी
(लेखक जेष्ठ पत्रकार आहेत)