घरफिचर्ससारांशड्रग्ज - बॉलीवूडचे छंदी फंदी कनेक्शन

ड्रग्ज – बॉलीवूडचे छंदी फंदी कनेक्शन

Subscribe

कवडीमोलाने मिळणारी अमली द्रव्यं लाखोंच्या भावाने विकून भारतात दहशतवादी कारवाया करणार्‍या आय.एस.आय आणि अंडरवर्ल्डच्या कारवायांत खंड पडलेला नाही. अशातच ‘ड्रग्ज’ च्या विळख्यात अडकलेली बॉलीवूड त्यांचे उघड होत चाललेले कनेक्शन रोज चव्हाट्यावर येऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर ड्रग्जचा उदय त्याचा प्रसार - सेवन आणि नशेचा विळखा याचा घेतलेला मागोवा.

भारताच्या नैऋत्येला पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणचा काही भाग ‘गोल्डन क्रेसन्ट’ म्हणून गेल्या अनेक दशकांपासून ओळखला जातो. तेथील अनेकांचे अफूची शेती आणि व्यापार हेच उपजीविकेचे साधन आहे. तेथील पठाणांनात ते जमिनीतून उगवणारं सोनंच वाटतं. या भागात अफूचं अमाप पीक निघतं. पूर्वी या गोल्डन क्रेसन्ट भागातून मली पदार्थांची तस्करी पूर्व युरोपीय देशांत होत होती. इराण-इराकच्या युद्धाच्या भडक्यात रशियाने अफगाणिस्तानात आपले सैन्य घुसवल्याने काही काळ हा ‘बाल्कन रूट’ खंडीत झाला. मात्र,अल्पावधीतच पंजाब, राजस्थान, गुजरात मार्गे अमली पदार्थ तस्करी मुंबईत होऊ लागली आणि त्याचा जगभर पुढे प्रवास सुरू झाला. नायजेरिया, इथिओपीया, केनिया, सोमालिया, टान्झानिया, घाना अशा अनेक अफ्रिकन देशांतूनही अमली पदार्थाची तस्करी जगभर होतच असते. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशात वैद्यकीय उपयोगासाठी अफूच्या उत्पादनाला तत्कालीन सरकारांनी दिलेल्या परवानगीचा काही शेतकर्यांनी गैरफायदा घेतला. वैद्यकीय उपयोगापेक्षा उत्पादकांनी अफू विक्रीत अधिक रस घेतल्याने ड्रग्जचा फैलाव वाढतच होता. हेरॉईनची तस्करी परदेशात होऊ लागली. गुजरात महाराष्ट्र, दिल्लीतील काही बंद पडलेल्या औषध कंपन्यांचा ताबा अंडरवल्डने घेतवला आणि तेथे ‘अ‍ॅन्ड्रॅक्स’च्या गोळ्यांची निर्मिती होऊ लागली. आंध्र प्रदेश, कर्नाटकमधून ‘भांग’ मुंबईत येऊ लागला. 1990 च्या दशकाच्या मध्यापर्यंत मुंबई अमली पदार्थ तस्करीचा ‘ट्रान्झिट पॉईंट’ म्हणून ओळखला जात होता. पाकिस्तान-अफगाण बॉर्डरवरून येणारी ‘ब्राऊन शूगर’युरोप – अमेरिकेत जात होती.

अशातच पूर्वीचा ब्रह्मदेश (आताचा म्यानमार), लावोस, थायलंड ज्याला ‘गोल्डन ट्रॅन्गल’ म्हणून ओळखले जाते. येथूनही जगभर ड्रग्जचा पुरवठा होतच होता. गांजा, अफू, हशीश, हेरॉईन, मॅट्रेक्स, ब्राऊन शूगर, कोकेन, एल.एस.डी अशी अनेक नावे धारण करत अमली पदार्थाचा भस्मासूर अनेक पिढ्या बरबाद करत होता.

- Advertisement -

* ड्रग्ज तस्करीत भाईचे बस्तान *
अंडरवर्ल्डमध्ये वरचष्मा मिळविण्याच्या लालसेने करीमलाला आणि दाऊदने चार दशकांपूर्वी या धंद्यात पाय रोवले. त्यानंतर इक्बाल मिर्ची, पिलू खानने त्यावर कळस चढवला. कमी श्रम आणि प्रचंड कमाई असलेला हा धंदा ड्रग्ज माफियांचा आलेख उंचावत गेला. केवळ भारतातील अंडरवर्ल्डच या ड्रग्जच्या धंद्यात उतरले नव्हते तर जगभर सर्वत्र तेव्हा हीच परिस्थिती होती. इजिप्त, तुर्कस्तानला तेव्हा ड्रग्ज माफियांनी हैराण केले होते. पेरू, पनामा, कोलंबिया, कंबोडियासारख्या देशांतील सरकारे ड्रग्ज माफियांच्या तालावर नाचत असल्याचे तत्कालीन राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. ड्रग्ज तस्करीसाठी तेव्हा अंडरवर्ल्डला करीमलालाची मनधरणी करावी लागत होती. लालाची पठाण गँग तेव्हा फॉर्मात होती. दाऊदने करीमलालाची करंगळी पकडून या धंद्यात आपली पाळेमुळे रुजवली. सोन्या चांदीच्या तस्करी बरोबरच ड्रग्जचे धंदे फैलावले. मुंबईतून दुबईत तेथून पाकिस्तानात त्याने आपला जम बसवला. मक्बूल भट्टी, अब्दूल वहाव सारख्या पाकिस्तानी तस्करांना टक्कर देऊन आपले बस्तान बसवले.

पाकिस्तानी गुप्तचर संस्था (आय.एस.आय) इंटरसर्व्हिसेस इंटलिजन्स ते दाऊदला आपला मोहरा बनविले. त्यांच्याच सरहद्दीवरीर अफूची कुरणे दाऊदला बहाल केली. दाऊदने अफूपासून उच्चप्रतीचे हेरॉईन तयार केले. आपल्या सिडींकेट मार्फत राजस्थान- गुजरात बॉर्डरवर पाठवले. पंजाब मधील दहशतवादामुळे काही काळ बंद झालेला पंजाब रूट ओपन केला. कोचीन चेन्नईचा सागरी मार्ग अवलंबला. कच्छच्या बॉर्डरचा माल अहमदाबादला ाला की अब्दुल लतीफची गँग सही सलामत नियोजित अड्ड्यांवर माल पोहचवत होती. आय. एस. आय. ने एल टी. टी. ई. ला देखील हाताशी धरले. भारतातील दक्षिणेकडील राज्यातील अफू स्वस्त दराने खरेदी केला. त्यातून आय. एस. आय. ने करोडो रुपये कमावले. पुढे हेच पैसे 1993 च्या मुंबईतील बॉम्बस्फोटासाठी वापरले.

- Advertisement -

* नशेचा फैलाव आणि सांकेतिक भाषा *
अमली पदार्थाच्या तस्करी साठीचे सिडींकेट, गँगचे जाळे 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट कटासाठी स्फोटके- शस्त्रांच्या लॉडींगसाठी आय. एस. आय. ने खुबीने वापरले. देशाचे अर्थकारण विस्कटून टाकले. अमली पदार्थ, शस्त्रे, स्फोटके, बनावट नोटा आणि अंडरवर्ल्ड यांची यूती दर्शवणारी, पुरावे स्पष्ट करणारी अनेक प्रकरणे नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या दप्तरी सीलबंद आहेत. ड्रग्जच्या तस्करीचा पैसाच जगभरात दहशतवादासाठी वापरला जातोय हे वारंवार स्पष्ट होत आहे. गुप्तचर यंत्रणांचेही याबाबत दुमत नाही. तरीही सत्तेवर सरकाक कुठलेही असले तरी तपास यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा ड्रग्जचा प्रवास रोखण्यात सातत्याने अपयशी ठरत आहेत. गेल्या काही वर्षात ड्रग्ज तस्करीचे स्वरूप बदलत गेलंय. ड्रग्जचे नव नवीन प्रकार आणि ब्रँड विकसित झाले. नव श्रीमंत ग्राहक तयार झाले. शाळा- कॉलेजात फैलाव झाला. बॉलीवूडही ड्रग्जने पोखरले गेले. माफिया आणि फंटरांची सांकेतिक भाषा सुरू झाली. व्हॉट्सअ‍ॅप चॅटींगला पेव फुटले. ड्रग माफियांचे पाश आणखीन घट्ट झाले. कॅप्टन कूकला आटा भेजो, ‘सुझी’ है क्या? काजल की डिब्बी मिल सकती है क्या? मगी मे कुछ नया फ्लेवर आया है क्या? कुछ खट्टा-मिठ्ठा दे दो! ग्रीन टी भी चलेगा! अशा नाना अनेक सांकेतिक शब्दांचा वापर करून कापसाच्या पळवाटेतून सुटण्याचा मार्ग शोधण्यात आला. पाचशे टक्के नफा असलेला जगभरातील हा एकमेव धंदा होता आणि आहे. अंडरवर्ल्डमध्ये दाऊदच्या पावलावर पाऊल ठेऊन अनेक गँगस्टर टोळ्याही ड्रग्जच्या नफ्याला स्वतःपासून दूर ठेवू शकल्या नाहीत. गँगस्टर टोळ्यांना शरीराच्या कोणत्याही भागात ड्रग्ज दडवून ने आण करणारे कॅरीपरही बेकारीमुळे सहज उपलब्ध झाले. मंबईत येणार्या काही विदेशी पर्यटकांकडूनही ड्रग्जची तस्करी सुरू झाली. ‘कोक’ या स्टायलिश नावाने प्रसिद्ध झालेले ‘कोकेन’ हे स्टेटस सिम्बॉल झाले.

कोलंबिया, पनामा, पेरू, उरुग्वे आदी थंड हवामानाच्या देशांत कोकाच्या पानापासून तयार होणारे ‘कोकेन’ वीस वर्षांपूर्वी फरदीन खान या बॉलीवूड अ‍ॅक्टरच्या ड्रग्ज सेवन प्रकरणांतून फेमस झाले. भारतातच मॅन्ड्रेक्स, चरस, व्हाईट हेरॉईनचे ुत्पादन होऊ लागले. दिल्ली, मणिपूर, त्रिपुरा, गोवा, तामिळनाडू, कोलकाता येथे एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस ड्रग्जची वाढती मागणी सुरू झाली. शिक्षणासाठी भारतात येणारे कृष्णवर्णीय विद्यार्थीही ड्रग्जच्या ने-आण आणि सेवनात अडकले. काही कॉलेजचे कॅण्टीन, कोनाडे, हॉस्टेलचे जीने, गच्ची, रेल्वे स्टेशनांचे ब्रीज येथे ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांची लक्षणे दिसत होती. पोलिसांची धडक मोहीम सुरू होतीच.ड्रग्जच्याआहारी गेलेल्यांना नशेतून परावृत्त करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था कार्यरत होत्या. मात्र, ड्रग्ज व्यापार आणि सेवन नियंत्रणात असला तरी आतही तो मुळासकट उपटून टाकण्यात अपयशच पदरी पडले आहे.

* बॉलीवूड कनेक्शन *

अंडरवर्ल्डमधील दाऊद-करीमलाला-हाजीमस्तान आणि युसूफ या चौकडीमुळे फार पूर्वीपासूनच ड्रग्जचे जाळे बॉलीवूडमध्ये पसरले होते. संजूबाबाच्या कारनाम्यांमुळे तीन दशकांपूर्वी आम पब्लिकला पण ड्रग्जची भानगड समजली, असे बोलले जाते. मात्र, जाणकार सांगतात की, बॉलीवूडच्या नट-नट्यांची व्यसनं, त्यांची चटक, छंदफंद फार पूर्वीपासूनच सुरू आहेत. पूर्वी समाज त्यांच्यातील कलावंत पहायचा. त्यांचे छंद, व्यसन अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कानाडोळा केले जात होते.

शूटिंगनंतर फिल्मी गोतावळ्याच्या प्रायव्हेट पार्ट्या तेथील उत्तररात्रीपर्यंतची धुंदी तेव्हाही होती, आजही सुरूच आहे. सगळी दुःख मद्यात बुडवू पाहणारा गुरूदत्त, ट्रॅजेदी क्वीन मीनाकुमारी, सैगल यांचा स्वरसूर, राज कपूर यांची होळी पार्टी यामध्येही नशा होती. पण आजच्यासारखी ‘अमली’ नव्हती. ‘येहभर’ने काढलेल्या धुरांच्या कहाण्या तेव्हा चवीने ऐकवल्या जात होत्या. पुढे पुढे तर दम मारो दमच्या हिप्पी संस्कृतीने सिल्व्हर स्क्रीनचा पडदा व्यापून टाकला. महेश भट, परवीन बाबी यांची सामाजिक मानसिक अस्वस्थता ड्रग्जने उघड केली. काहींनी व्हिस्की स्कॉच बरोबर ड्रग्जची चवही थोडीफार घेतली पण ते हैशी कलावंतच ठरले. काही जण त्या नशेतच वाहून गेले. संजय दत्त, फरदीन खान, आदित्य पांचोली किंवा काही बड्या घरची मंडळी नशेमध्ये बिनधास्त जगली.

दिल्लीतल्या फिल्म इंन्स्टिट्यूटमध्ये ड्रग्जचा शिरकाव झाला. कलावंत-तंत्रज्ञ बनणारी काही तरुण पिढी त्याच्या अधीन गेली. काहींच्या दाढ्या वाढल्या, केसांच्या ‘वेण्या’ घालण्यात आल्या. मोठाले झब्बे असा पेहराव करणारी ही बॉलिवूडची दरवाजे ठोठावणारी मंडळी धुरांड्याच्या गर्तेत अडकू लागली. दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्याशाळेतही या गुंगीचची लागण झाली. हल्ली टीव्ही सीरियलमध्ये रोजंदारी शोधणारे प्रशिक्षित नट यामध्ये राष्ट्रीय फिल्म इन्स्टिट्यूट-नाट्य शाळेचे प्रशिक्षण आणि नशा हा एक समान दुवा दिसतोय.

स्टगलर ते स्टार असा प्रवास करणार्‍या अनेक नट-नट्यांच्या प्रतिभेला नशेशिवाय बहर फुटत नाही ही देखील एक वस्तूस्थिती आहे. अनेक जण नशेच्या आहारी जाण्याच्या अनेक ‘कहाण्या’ सांगतात. मात्र त्या बॉलिवूडच्या घरघरच्या कहाण्या सारख्याच असतात. कोणाला कारकिर्दीच्या अस्वस्थ टप्प्यात मिळालेली ती ‘टीप’ असते. तर काहींना मिळालेले यश टिकवण्यासाठीचा तो ‘आधार’ असतो. बॉलिवूडमध्ये धडपडणार्‍यांना रोज नवनवीन, टपोरी-टवटवीत स्वप्ने पाहण्यासाठी ‘नशे’चे टेकू लागतात. काही ‘स्टार्स’ना भाई लोकांच्या ‘फोन’ची टेन्शन असतात. काही जणांच्या दिवसभराच्या मेहनती अ‍ॅक्टिंगनंतर श्रमपरिहाराच्या कल्पना वेगळ्याच असतात. रात्रभर डिस्कोमध्ये थरथरायचे असते. नाचायला एक्स्ट्रा पॉवर ‘ड्रग्ज’मधून मिळवायची अशीच दीक्षा त्यांना सीनियरकडून मिळालेली असते. रोज नवे जोडीदार-उन्मादक वातावरण मिळणारी सुवर्णसंधी आणि लैंगिक सुख अनुभवायचे असेल तर ‘ड्रग्ज’ जवळ हवेच. थकवा-तणाव दूर करण्यासाठी नव्हे तर अधिक तणाव-थकवा सहन करण्यासाठी उच्च प्रतीचे ड्रग्ज लागणारे आणि खुल्लमखुल्ला त्याचे समर्थन करणार्‍यांचीही बॉलिवूडमध्ये कमतरता नाही.

विद्यार्थ्यांनाही ड्रग्जचा विळखा
मेडीकल स्टोअर्स, पानाच्या गाद्या, चहाच्या टपर्‍या, वॉईन शॉपचे गल्ले यावरही सध्या विशिष्ट प्रकारचे अंमली पदार्थ अलीकडे सर्रासपणे उपलब्ध होत असल्याने नशाधीन विद्यार्थी-तरुणांची संख्या वाढीस लागल्याचे या संदर्भातील विविध अहवालात म्हटले आहे. कॉलेजच्या आवारातील कॅन्टीन, कोनाडे, मैदानांचे कठडे, मुतार्‍या, हॉस्टेल आदी ठिकाणी छुप्या रितीने अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन होते. परराज्यातील अनेक तरुण सध्या शिक्षणासाठी मुंबईत वास्तव्यास आहेत. झेरॉक्स इंक, कफ सिरप दवा बाजारातले काही नवे सिरप म्हणून ‘ड्रग्ज’चे सेवन होत आहे. दोन ब्रेडच्या स्लाईसमध्ये तसेच दोन बिस्किटांच्या मध्ये ठेवून या नशेचे सेवन केले जाते. तर काही ‘ड्रग्ज’ फ्रुटीसारख्या पॅकमध्ये मिसळून घेतले जाते, असे या क्षेत्रातील खबरे सांगतात.

अपुरी पोलीस कारवाई
भारतात मोठ्या प्रमाणावर परदेशातून उच्च प्रतीच्या अंमली पदार्थांची तस्करी होते. देशाच्या सीमेवर तैनात असलेले बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे प्रयत्नही ड्रग्जची तस्करी रोखण्यात अपुरे पडत आहेत. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे जगभरातून तेथील तपास यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांकडून ‘टीप’ येत असताता. तरीही त्यांच्या कारवाया तोकड्याच आहेत. देशातील प्रत्येक राज्यात स्वतंत्र अंमली पदार्थ तस्करी विरोधी पथक कार्यरत आहे. मुंबईतील अंमली पदार्थ तस्करी विरोधी पथकाच्या धाडी पडत असताताच. त्यांच्या धाडीत ‘ड्रग्ज’ जप्त होते. कॅरीपर, विक्री करणारे, सेवन करणारे गजाआड होतात. मात्र, गेल्या दहा वर्षात बॉलिवूडमध्ये ड्रग्जचे मोठ्या प्रमाणावर सर्रास सेवन होत असल्याचे उघड झाल्यानंतरही नट-नट्यांवर कारवाई झाल्याचे दाखले अत्यल्प आहेत.

चित्रपटसृष्टीतील आघाडीची नटी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंगना रानावत हिने ‘ड्रग्ज’चे सेवन आणि पुरवठादार यांचे कनेक्शन उघड केल्यानंतरही देशातील कोणत्याही तपास यंत्रणांनी दखल घेतल्याचे दिसत नाही. पंजाबमधील एका राजकीय नेत्याने एका चित्रपट नेत्याच्या पार्टीतील नशाबाज कलाकारांची व्हिडिओ क्लीप देऊन तक्रार करूनही नारकोटिक्सह कंट्रोल ब्युरोने त्याकडे कानाडोळा केला.

मुंबई विमानतळावरील एअर इंटेलिजन्स युनिट आणि डायरेक्टर रेव्हेन्यू इंटेलिजन्स (डि.आर.आय.) ने गेल्या दहा वर्षांत अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध ठोस कारवाई केली आहे. मात्र, यातूनही बॉलिवूड-राजकीय धेंडे सुटल्याचे सांगितले जाते.
सुशांत सिंग मृत्यूचा तपास करणार्‍या इडीच्या तपासात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्या मोबाईल (सी.डी.आर.) कॉल रेकॉर्डमध्ये काही संशयास्पद रकमेचे व्यवहार इडी अधिकार्‍यांना आढळले. ते व्यवहार चौकशीत ‘ड्रग्ज’च्या खरेदीचे असल्याने इडीने नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोला पत्राद्वारे कळवल्यानंतर एनसीबीच्या तपासाला वेग आला. यामध्ये सुमारे १५ जणांना अटक झाल्यानंतर आता बॉलिवूड तारका दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकूल प्रीत सिंह, करिश्मा प्रकाश यांना एनसीबीने समन्स पाठवून त्यांची चौकशी सुरू केली आहे. एनसीबीने बॉलिवूला लागलेली ‘ड्रग्ज’ची कीड आता पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याची अपेक्षा जनतेकडून होत आहे. केवळ बॉलिवूड नव्हे तर राजकीय आणि इतर क्षेत्रातील नशेबाज आणि त्यांचा व्यापार करणारे सिंडीकेट उद्ध्वस्त व्हायला पाहिजे. केंद्र सरकारनेही या कारवाईसाठी तपास यंत्रणांना मोकळीक द्यायला हवी. तपासात राजकीय हस्तक्षेप होऊ नये. त्यांचे राजकारण केले जाऊ नये हीच जनतेची अपेक्षा असते. येणार्‍या काळात तपास यंत्रणा कणखर बनतात की तपास ‘मॅनेज’ केला जातोय हे कळेलच.

– प्रसाद नेरूरकर

-(लेखक अंडरवर्ल्ड आणि दहशतवादाचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -