घरफिचर्ससारांशउज्ज्वल उद्योग परंपरा

उज्ज्वल उद्योग परंपरा

Subscribe

नव्याने विकसित झालेल्या सेवा उद्योगांमध्ये महाराष्ट्र मागे राहिलेला नाही. आज मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये या इंडस्ट्रीजचाच बोलबाला असल्याचे दिसून येते. बड्या शहरांमध्ये उत्पादन इंडस्ट्रीज आता राहिली नसली तरी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राच्या आधाराने विकसित झालेल्या सेवा इंडस्ट्रीजने आज अनेकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. मग त्या संधी प्रत्यक्षात बड्या मल्टीनॅशनल कंपन्यांमधील असतील अथवा व्यक्ती केंद्रित असतील. या सेवा इंडस्ट्रीजमध्ये हाऊस किपिंग, सुरक्षा रक्षकांपासून ते हॉटेल इंडस्ट्रीजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. आज महाराष्ट्रात सुमारे ३५ टक्क्यांपर्यंत सेवा इंडस्ट्रीज फोफावली आहे. त्यातून रोजगार निर्मिती होत आहे.

महाराष्ट्र वेगळे राज्य झाल्यास त्याचा विकास खुंटेल अशी आवई संयुक्त महाराष्ट्रच्या विरोधात असलेल्यांनी त्या काळात ठोकली होती. मात्र, महाराष्ट्राने ती खोटी ठरवली. औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे, असे अभिमानाने सांगण्यात येते आणि हे एका अर्थाने खरेही आहे. कारण महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या ९ टक्के असली, तरी देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनाच्या २७ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. देशातील एकूण उत्पादक भांडवलाच्या २३ टक्के, उत्पादन-मूल्याच्या २७ टक्के आणि एकूण मालाच्या २४ टक्के वाटा महाराष्ट्र राज्याचा आहे. कारखान्यातील एकूण रोजगारीत हाच हिस्सा १९.९ टक्के आहे. महाराष्ट्रातील प्रमुख उद्योग म्हणजे कापड, रसायने व रासायनिक पदार्थांचे उत्पादन, औषधे, सर्वसाधारण आणि विद्युत अभियांत्रिकी, वाहतूक व वाहतुकीची उपकरणे, साखर कारखाने, तेलशुद्धी कारखाने, प्लास्टिक, मुद्रणालये, काच, साबण, इलेक्ट्रॉनिकी हे आहेत. याशिवाय खाद्य वस्तू व रबरी वस्तू हे दोन उद्योग महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे आहेत.

कापडगिरण्यांचा उद्योग महाराष्ट्रामध्ये फार पूर्वीपासून असून एकंदर उद्योगामध्ये त्याचे स्थान पहिले होते. मात्र, त्याबरोबरच अलीकडच्या काळात या उद्योगापेक्षा सर्वसाधारण उद्योग, विद्युत, स्थापत्य, माहिती-तंत्रज्ञान, रसायने व परिवहन आणि परिवहनाची साधन-सामुग्री या उद्योगांचा राज्यातील एकूण उद्योगांमध्ये वाटा वाढत आहे. १९६८ मध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण चाती व माग ही अनुक्रमे २६.३ टक्के व ३७.५ टक्के एवढी होती. १ ऑक्टोबर १९७१ रोजी राज्यातील एकूण कापडगिरण्यांची संख्या १०८ होती, त्या गिरण्यांत ४७,६८,४८० चाती व ७७,६५५ माग एवढी क्षमता होती. वरील गिरण्यांपैकी निम्म्यांहून अधिक गिरण्या एकट्या मुंबई शहरात, तर उर्वरित गिरण्या राज्यातील इतर भागांत आहेत. कापड उद्योगात २,३९,२५१ कामगार असून १,८८,१२० मुंबई शहरात व उर्वरित राज्याच्या इतर भागात आहेत. महाराष्ट्र हे सूत गिरण्यांचे माहेरघर मानले जात होते. आज जरी सूतगिरण्या महाराष्ट्रात फारशा राहिल्या नसल्या तरी ते महाराष्ट्राचे वैभव होते. त्याचा आढावा घ्यावाच लागेल.

- Advertisement -

मुंबईमध्ये मोटारगाड्या, स्कूटर, ट्रक, बस व इतर वाहने यांच्या उत्पादनाचे मोठे कारखाने आहेत. या उद्योगाबरोबरच उद्योगास आवश्यक अशा सुट्या भागांच्या उत्पादनाचेही बरेच कारखाने या भागात विकसित झाले आहेत. वर्षाकाठी मोटारी ७,२००, स्कूटर व तीनचाकी वाहने ४०,००० आणि इतर वाहने (जीप, ट्रक व ट्रॅक्टर) ४२,५४० असे उत्पादन होत असते. सायकलनिर्मिती-उद्योगानेही मोठी मजल मारली असून वर्षाकाठी २,३०,००० सायकलींची उत्पादनक्षमता या उद्योगाने गाठली आहे.

महाराष्ट्रातील नाव घेण्यासारखा एक उद्योग म्हणजे साखर कारखाने. साखर उत्पादनक्षेत्रात महाराष्ट्राने भरीव प्रगती केली आहे. महाराष्ट्रात एकूण १९६ साखर कारखाने असून त्यातील २३ खासगी तर १७३ सहकारी साखर कारखाने आहेत. महाराष्ट्राच्याऔद्योगिक विकासातील ही अतिशय वैशिष्ठ्यपूर्ण गोष्ट आहे. सबंध देशात उत्पादन केल्या जाणार्‍या १६.२६ कोटी लिटर मद्यार्कापैकी महाराष्ट्र राज्यातील ११ आसवन्यांमधून ५,२८,४०,००० लिटर मद्यार्क तयार होतो. अशा आणखी सात आसवन्या उभारण्यात येत असून, त्यांमुळे मद्यार्काचे उत्पादन ३१० कोटी लिटरने वाढेल अशी अपेक्षा आहे. राज्यात कागदउद्योगाला कारखाना उभारावयास लागणारी परवाना पद्धत रद्द करण्यात आली आहे. १९६७ मध्ये कारखाना कायद्यानुसार, राज्यात तीन कागद लगदा कारखाने, १८ कागद कारखाने व १८ पेपरबोर्डचे कारखाने होते. मुंबई, पुणे विभागांत सुपर फॉस्फेटच्या उत्पादनाचे चार कारखाने असून तृतीय योजना कालावधीत ट्रॉम्बे येथे युरिया व नायट्रोफॉस्फेटच्या एका कारखान्यास सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

छोट्या, कुटीर, कृषी व मध्यम उद्योगांचा विकास, ही सर्वस्वी राज्य सरकारची जबाबदारी आहे. औद्योगिक प्रगतीबाबत जो असमान विकास दृष्टीस पडतो, तो सावरण्याकरिता अशा धंद्यांचा उपयोग होतो. ग्रामीण उत्पन्नात पूरक उत्पन्न मिळविण्यासाठीही स्थानिक क्षेत्रातील साधनसामुग्रीवर चालणार्‍या लघुउद्योगांच्या व मध्यम उद्योगांच्या वाढीस उत्तेजन देण्याचे कार्य राज्य सरकार करते. औद्योगिक वसाहती स्थापून त्यात लघुउद्योगातील कारखानदारांना गाळे, वीज, पाणी, कच्चा माल, अंतर्गत व परदेशी बाजारपेठा उपलब्ध करून देणे, करांमध्ये सवलती देणे व कर्जाबाबत हमी घेणे, तांत्रिक शिक्षण व सल्ला यांची सोय करणे, यंत्रसामुग्री मिळविण्याकरिता आर्थिक साहाय्य देणे तसेच विविध वित्त महामंडळांमार्फत आणि लघुउद्योग विकास महामंडळातर्फे लघुउद्योगांना वित्तव्यवस्थेची तरतूद करणे, पुरवठा व विक्रीच्या सोयी उपलब्ध करून देणे, निवडक भाग भांडवलात प्रत्यक्ष सहभागी होणे इ. विविध प्रकारांनी औद्योगिक विकासास राज्य सरकार हातभार लावीत आहे.

विजेची साधने, चामड्याच्या वस्तू, रासायनिक द्रव्ये, प्लास्टिकच्या वस्तू, रंगसामुग्री, तयार कपडे, रासायनिक उद्योगांची यंत्र-सामुग्री, ऑईल इंजिन्स, विजेचे पंप, केबल, रोहित्रे व शेतीची अवजारे तयार करण्यात येतात. या उद्योगधंद्यांतील एकूण गुंतवणूक सु. ३४० कोटी रुपये होती व त्यांचे अंदाजे उत्पादन ७८५ कोटी रुपयांचे होते. त्याचप्रमाणे हातमाग, हिमरू आणि पैठणी, कांबळी, शाली, धाबळ्या, बिदरी काम, बिडी, चर्मोद्योग, बांबूकाम ह्या महाराष्ट्रातील प्रमुख परंपरागत उद्योगांच्या विकासाकडेही राज्य सरकारने विशेष लक्ष पुरविले आहे. महाराष्ट्र राज्य तुलनात्मकदृष्टीने इतर राज्यांच्या मानाने जरी औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असले, तरी आर्थिक विकास एकूण गरजेच्या मानाने अपुराच आहे. औद्योगिक क्षेत्रात उपलब्ध होणारी रोजगारी शेतीवर अतिरिक्त असलेली लोकसंख्या सामावून घेण्यास पुरेशी नाही. कृषिक्षेत्रात व सेवाक्षेत्रात उत्पन्न वाढविण्याची या दृष्टीने निःसंशय जरूरी आहे. महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक प्रगती ही मुख्यत्वेकरून राज्यातील विशिष्ट भागा पुरतीच म्हणजे मुंबई, पुणे व त्यांच्या परिसरापुरतीच मर्यादित आहे. एकूण औद्योगिक रोजगारी पैकी ३० टक्के रोजगारी व कारखान्यांतील रोजगारी पैकी ६० टक्के रोजगारी मोठी शहरे आणि त्यांच्या परिसरातच आहे हे मान्य करावेच लागेल.

नव्याने विकसित झालेल्या सेवा इंडस्ट्रीजमध्ये महाराष्ट्र मागे राहिलेला नाही. आज मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये या इंडस्ट्रीजचाच बोलबाला असल्याचे दिसून येते. बड्या शहरांमध्ये उत्पादन इंडस्ट्रीज आता राहिली नसली तरी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राच्या आधाराने विकसित झालेल्या सेवा इंडस्ट्रीजने आज अनेकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. मग त्या संधी प्रत्यक्षात बड्या मल्टीनॅशनल कंपन्यांमधील असतील अथवा एक व्यक्ती केंद्रीत आहेत. या सेवा इंडस्ट्रीजमध्ये हाऊस किपिंग, सुरक्षा रक्षकांपासून ते हॉटेल इंडस्ट्रीजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. आज महाराष्ट्रात सुमारे ३५ टक्क्यांपर्यंत सेवा इंडस्ट्रीज फोफावली आहे. त्यातून रोजगार निर्मिती होत आहे. माहिती-तंत्रज्ञान असो की, आर्टिफिशियल इंटलिजन्स या आधुनिक काळातील इंडस्ट्रीज महाराष्ट्रात आपले बस्तान मांडत आहेत. माहिती-तंत्रज्ञानाबाबत महाराष्ट्र आंध्र प्रदेश, कर्नाटक यांच्याबरोबरीत आहे. आर्टिफिशियल इंटलिजन्स या इंडस्ट्रीजचा विकास होतोय, पण त्यासाठीही महाराष्ट्राने आवश्यक त्या परवानग्या आणि पायघड्या घालण्यास प्रारंभ केला आहे. भविष्याच्यादृष्टीने या दोन इंडस्ट्रीज रोजगाराच्या दिशेने खूप सार्‍या संधी उपलब्ध करून देणार आहेत.

महाराष्ट्राचा येणारा काळ उज्ज्वल आहे. कारण देशात येणार्‍या मल्टीनॅशनल कंपन्यांची पहिली पसंती ही महाराष्ट्राला आहे. मुंबई, पुण्याच्याजवळ निर्माण झालेले आयटी पार्क, मर्सिडिजपासून ते सॅमसंग पर्यंतचे कारखाने हे केवळ महाराष्ट्राच्या आर्थिक उन्नतीत भर घालत नाहीत तर राज्यात व्यवसायासाठी समयोजक वातावरण आहे हेही दाखवून देतात. आतापर्यंत सर्व राज्य सरकारांची धोरणे ही या उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणारीच आहेत. महाराष्ट्रात त्याबाबत राजकारण होत नाही, ही केवळ राज्यासाठी नव्हेतर देशासाठी कौतुकास्पद बाब आहे.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -