घरफिचर्ससारांशछोडो कल की बाते...

छोडो कल की बाते…

Subscribe

‘छोडो कल की बाते, कल की बात पुरानी, नये दौर में लिखेंगे मिल कर नयी कहानी, हम हिंदुस्तानी...हम हिंदुस्तानी. हे ‘हम हिंदुस्तानी’ सिनेमामधलं मनात हलचल मचवणार्‍या मुकेशदांच्या आवाजातलं गाणं. हल्लीच्या काळात मुकेशदांचा आवाज हा तसा दैवदुर्मीळच. स्पष्ट, खणखणीत, अनुनासिक वाटला आणि तसा तो असला तरी ऐकताना कानमनात गोडवा निर्माण करणारा, पंचामृतासारखा पवित्रपावन.

26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हे भारतमातेला सलाम करण्याचे विशेष दोन दिवस. एक प्रजासत्ताक दिन. दुसरा स्वातंत्र्य दिन. या दोन्ही दिवशी आपल्या अवतीभोवतीच्या सोसायट्यांमधून, शाळांमधून, कार्यालयांमधून देशाभिमानाचा अंगार फुलून येतो आणि ठिकठिकाणी डौलाने तिरंगा फडकतो. या बहुतेक ठिकाणी स्पीकर्स लावण्यात येतात आणि त्यावर देशभक्तीपर गाण्यांचा जल्लोष सुरू असतो…मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती; जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती हैं बसेरा, वो भारत देश हैं मेरा; ऐ मेरे वतन के लागो, जरा आँख में भर लो पानी; कर चले हम फिदा जानो तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो, अशी या दिवशीची वर्षानुवर्ष वाजणारी गाणी आपल्या कानांवर हटकून पडतात. हे दोन दिवस खरंच त्या देशप्रेमाच्या गाण्यांचे असतात. ती गाणी ऐकून खरोखरच देशाच्या धरतीचा उर भरून येतो. या सुजलाम सुफलाम धरतीवरच्या सुपुत्रासाठी हे दोन दिवस म्हणजे सोहळा असतो, ज्या सोहळ्यांचा ही गाणी म्हणजे पंचप्राण असतात.

वर्षानुवर्ष ही गाणी वाजत असताना यातलं एक गाणं का कोण जाणे जरा जास्तच लक्ष वेधून घेत असतं आणि ते असतं –

- Advertisement -

छोडो कल की बाते, कल की बात पुरानी,
नये दौर में लिखेंगे मिल कर नयी कहानी,
हम हिंदुस्तानी…हम हिंदुस्तानी.

हम हिंदुस्तानी सिनेमामधलं. मनात हलचल मचवणार्‍या मुकेशदांच्या आवाजातलं. हल्लीच्या काळात मुकेशदांचा आवाज हा तसा दैवदुर्मीळच. स्पष्ट, खणखणीत, अनुनासिक वाटला आणि तसा तो असला तरी ऐकताना कानमनात गोडवा निर्माण करणारा, पंचामृतासारखा पवित्रपावन.

- Advertisement -

देशभक्तीपर गाणी त्याच एका विशिष्ट काळात खोर्‍याने झाली. तो काळ नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यप्राप्तीचा होता, त्यामुळे देशातलं वातावरण देशप्रेमाने भारलेलं होतं हे त्यामागचं एक कारण होतंच. पण जी देशभक्तीपर गाणी होत होती त्यासाठी जेव्हा पुरुष गायकांची निवड केली जात होती त्यात बहुतेक वेळा ती गाणी गाण्यासाठी खड्या आवाजाच्या गायकांची निवड केली जात होती. साहजिकच या देशभक्तीपर गाण्यांची बर्‍याचदा महंमद रफी आणि महेंद्र कपूर यांच्यात वाटणी केली जायची. मुकेशदांच्या हळव्याहळदिव्या आवाजावर शक्यतो फुलीच मारली जायची. होठों पे सच्चाई रहती हैं, जहाँ दिल में सफाई रहती हेैं, हम उस देश के वासी हैं, जिस देश में गंगा बहती हैं, असं एखादं गाणं त्यांच्याकडे यायचं, पण ते अभावानेच.

या अशाच काळात संगीतकार उषा खन्नांकडे हम हिंदुस्तानी या सिनेमाच्या संगीताची जबाबदारी आली. ती स्वीकारताना गीतकार प्रेम धवन यांनी लिहिलेले शब्द त्यांच्यासमोर आले ते, छोडो कल की बाते, कल की बात पुरानी, नये दौर में लिखेंगे मिल कर नयी कहानी, हम हिदुस्तानी, हम हिंदुस्तानी.

सगळ्या जुन्यापुराण्या गोष्टी आता आपण मागे ठेवूया. काल काय झालं, कोणत्या गुलामगिरीत, पारतंत्र्यात आपण कसे पिचलो ते आपण विसरून जाऊया आणि हे जे नवं पर्व सुरू झालं आहे त्यात आपण सगळे हिंदुस्थानी एकत्र येऊन या देशाच्या उज्ज्वल भविष्याची नवी कहाणी लिहूया. उद्याच्या नवनिर्माणासाठी आवाहन करणार्‍या त्या गाण्यातल्या या मुखड्याचा साधासोपा आशय संगीतकार उषा खन्नांना खूप भावला. तो आशय समजून घेतल्यावर मग त्यांना त्या गाण्याच्या मुखड्याला चाल लावायला वेळ लागला नाही आणि मुखड्याची चाल छान सुचल्यामुळे त्याच्या अंतर्‍यालाही मुखड्याला साजेशी चाल त्यांना लगेच सुचली. ते देशभक्तीपर गाणं असलं तरी त्या गाण्याची चाल तशी खड्या आवाजात गावी अशी नव्हती हे उषा खन्नांना लगोलग उमगलं. त्यांना त्यासाठी मुकेशदांचा आवाज म्हणूनच योग्य वाटला…आणि खरोखरच मुकेशदांनीही आपल्या करूणकोमल आवाजातून त्या गाण्याला संपूर्ण न्याय दिला. किंबहुना, ते गाणं छान सजवलं, भारताच्या कानाकोपर्‍यात प्रत्येक भारतीयाच्या मनात खोलवर पोहोचवलं. त्या गाण्याचं रेकार्डिंग संपल्यावर एका वादकाने मुकेशदांना खास सांगितलं की देशभक्तीपर गाणं म्हटलं की नेहमीचा ठरलेला फॉर्म असतो, ठरलेले आवाज असतात; पण तुमच्या गळ्यातून निघालेल्या या गाण्याचा फॉर्म वेगळा होता आणि आवाजही वेगळा होता, आज मी तुमच्यासोबत एका वेगळ्या गाण्यासाठी साथ केली.

त्या वादकाचं ते म्हणणं आजही खरंच वाटतंय. कारण आज स्वातंत्र्यदिनाला किंवा प्रजासत्ताक दिनाला जेव्हा अनेक देशभक्तीपर गाणी वाजत असतात तेव्हा हे गाणं त्यामधून आपल्या सुरांची वेगळीच वाट चोखाळतं. मुकेशदांच्या आवाजात अंतर्‍यातले शब्द देशाभिमानाची ज्योत प्रज्वलित करतात. कारण त्या अंतर्‍याचे प्रेम धवननी लिहिलेले शब्दही तसेच असतात –

आज पुरानी जंजीरों को तोड चुके हैं,
क्या देखू उस मंझिल को जो छोड चुके हैं.
चाँद के दर पे जा पहुँचा है आज जमाना,
नये जगत से हम भी नाता जोड चुके हैं
नया खून हैं, नयी उमंगे, अब हैं नयी जवानी,
हम हिंदुस्तानी…हम हिंदुस्तानी.

आज हे गाणं कानावर पडल्यानंतर आणि त्या गाण्याने आमचं मन संपूर्णपणे मंतरून, भारावून टाकल्यानंतर आजचं शंकर महादेवन वगैरे मंडळींनी गायलेलं ‘सब से आगे होगे हिंदुस्तानी’ हे गाणं आमच्या कानावर पडतं. पण मुकेशदांच्या गाण्यातला ‘हिंदुस्तानी’ आमच्या अंगावर जो शहारा आणतो तो शंकर महादेवनच्या आवाजातला ‘हिंदुस्तानी’ आणू शकत नाही. शंकर महादेवनने ‘सुनो गौर से दुनियावालो, बुरी नजर ना हम पे डालो’ असं कितीही जोशात म्हणत ते गाणं गायलं तरी तो जोश मुकेशदांच्या गाण्यासमोर एक निव्वळ प्रोफेशनल जोश वाटतो. देशभक्तीचा तो आव आणल्यासारखा वाटतो. मुकेशदांचा ‘हिंदुस्तानी’ मात्र देशभक्तीचा अस्सल भक्तीभाव वाटतो. बदलत्या काळात प्रेमाची पध्दत बदलली आहे असं म्हणतात; पण देशप्रेमाचीही पध्दत बदलली आहे ती अशी!…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -