Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश सिनेमा परिपूर्ण बनविणार्‍या लोकांचा सिनेमा

सिनेमा परिपूर्ण बनविणार्‍या लोकांचा सिनेमा

‘रामप्रसाद की तेहरवी’ या चित्रपटात रामप्रसादच्या प्रत्येक मुलाचे आपल्या पालकाबद्दल एक मत आहे. मोठ्या मुलासोबत सगळं शेयर केलं जातं, सगळ्यात लहान म्हणजे लाडका, तीन नंबरचा सर्वात लकी आणि मधल्याला वाटतं की, तो टाईमपास म्हणून जन्माला आला. बहिणीला वाटतं बापाने आपलं वाटोळं केलं, सर्व सुनांना वाटतं की, आपल्याच नवर्‍यावर ताण आलाय आणि या सगळ्यात मोठ्या नातवाचे हार्मोन्स जागृत होतायत.. एका सिनेमात अशा छोट्याछोट्या तब्बल 15 कथा घडताना दिसतात. सिनेमाच्या नावात जरी तेहरवी असलं तरी हा एक उत्तम विनोदी सिनेमा आहे.

Related Story

- Advertisement -

क्रिकेटच्या सामन्यात कुठलाही एक खेळाडू सामना जिंकून देऊ शकत नाही, त्यासाठी टीममधील प्रत्येकाला आपापलं योगदान द्यावं लागतं, कधीकधी एखादा मॅन ऑफ द मॅच असतो, पण त्यातही संपूर्ण टीमचं योगदान नसेल तर सामना जिंकता येऊ शकत नाही. सिनेमा चालतो तो नायकाच्या चेहर्‍यावर पण सिनेमा परिपूर्ण बनतो तो सिनेमातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या कलाकारांच्या अभिनयानं.. असे अनेक सिनेमे आहेत ज्यात हिरो किंवा हिरोईन कोण हे माहिती नाही, पण त्या सिनेमातील छोट्या पात्राने केलेली भूमिका सिनेमापेक्षा हिट ठरली, उदाहरणार्थ रन सिनेमा किती लोकांनी पूर्ण पाहिला? माहिती नाही… पण त्या सिनेमातील विजयराजचा कौआ बिर्याणीवाला सीन अनेकांना पाठ आहे. सिनेमात छोट्या मोठ्या भूमिका करून सिनेमाला पूर्ण करणार्‍या या कलाकारांना आधी तेवढी फेम मिळत नव्हती पण गेल्या काही काळात हे चित्रं बदलत आहे, नावं माहिती नसली तरी चेहरे लक्षात राहतायत, म्हणून अशाच काही कलाकारांचे नवनवीन प्रयोग पाहायला मिळताय, थिएटरची पार्श्वभूमी असलेल्या कलाकारांची कलाकृती क्वचितच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळते.

सीमा पहावा लिखित दिग्दर्शित ‘रामप्रसाद की तेहरवी’ ही त्याच मोजक्या उत्तम कलाकृतींपैकी एक आहे. या सिनेमाची खासियत आहे की, यात कुठलाही मोठा नायक नाही, यात केवळ कलाकार आहेत आणि दिग्दर्शकाने प्रत्येक कलाकाराला त्याच्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलाय, इथे कोणीही कुणावर भारी पडत नाही किंवा भारी पडण्याचा प्रयत्न करत नाही, प्रत्येक जण येतो आणि आपली भूमिका निभावून नेतो. सिनेमात 4 किंवा 8 पात्रं असतील तर हे काम तेवढं अवघड नसतं, पण या सिनेमात तब्बल 30 पात्रं होती आणि प्रत्येक पात्राला त्याच्या विविध छटा होत्या, असं असतानाही प्रत्येकाला त्याची वेगळी स्पेस देणं हे दिग्दर्शकाचं कौशल्य आहे. आपल्या अभिनयाने सिनेमाला खास बनविणार्‍या, शेकडो सिनेमात काम करूनही योग्य फेम न मिळालेल्या या सिनेमातील पात्रांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न लेखात करणार आहे.

- Advertisement -

रामप्रसाद की तेहरवी हा अभिनेत्री सीमा पाहावा यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. सीमा यांचा डायरेक्टरीयल डेब्यू असणार्‍या सिनेमाचं पूर्वीच नाव पिंडदान असं होतं. रामप्रसाद की तेहरवी सिनेमात काम करणार्‍या कलाकारांआधी हा सिनेमा लिहिणार्‍या आणि दिग्दर्शित करणार्‍या सीमा पाहावा यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. गेल्या काही काळात शुभ मंगल सावधान, बरेली की बर्फी आणि आंखो देखी सारख्या सिनेमातून हे नाव तरुणाईला माहिती झालंय, पण दूरदर्शनच्या हम लोग आणि त्या आधीही अनेक लोकप्रिय नाटकांच्या माध्यमातून सीमा पाहावा हे नाव चर्चेत होतं. सीमा यांचं कामाप्रती समर्पण एका उदाहरणावरून समजून घ्या की, एकदा एका नाटकात सीमा यांना जेव्हा नाटकात जेवण बनविण्याचा सीन करायचा होता, तेव्हा यांनी खरोखर जेवण बनवलं होतं आणि नाटक पाहायला आलेल्या प्रेक्षकांना ते जेवण खाऊदेखील घातलं होतं. कामाबद्दलच त्यांचं हेच डिटेलिंग तुम्हाला सिनेमात पाहायला मिळेल, लखनऊची एक कोठी, त्या कोठीत अनेक खोल्या, घरात जास्त पाहुणे आल्यावर त्याच खोल्यामध्ये गोधड्या आणि गाद्या.. सर्व बायका किचनमध्ये कधी हसताना तर कधी टिंगल करताना, मुलं घराच्या वरच्या खोलीत कॅरम खेळणार, घरातली पुरुष मंडळी छतावर दारू-सिगारेट पिणार.. अशा छोट्याछोट्या गोष्टी ज्या सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात घडतात त्या या सिनेमात दिसतात, ज्यामुळे सिनेमाची कथा अपील होते. सिनेमाची कास्टिंग हे एक अवघड काम होतं, पण त्यातही सिमा यांनी उत्तम काम केलंय, म्हणजे नसिरुद्दीन शाह आणि सुप्रिया पाठकच्या तरुणपणातील दृश्य चित्रित करताना नसिरच्या जागी परंब्रता चॅटर्जी आणि सुप्रियाच्या जागी तिचीच मुलगी असलेल्या सना कपूरला दाखवलंय आणि हे दोघेही त्या भूमिकेत एकदम फिट बसलेत. प्रत्येक सिनेमात छोटे मोठे असे अनेक कलाकार असतात, पण मग फक्त या सिनेमात काम करणार्‍या कलाकारांबद्दल का लिहावं ? याला कारण आहे, इतर सिनेमाचा चेहरा असलेल्या नायक-खलनायकाबद्दल आपण लिहीत असतो. या सिनेमाचा चेहरा ही संपूर्ण स्टारकास्ट आहे म्हणून या सर्वांची आणि त्यांच्या भूमिकांची नावं घेणं हे क्रमप्राप्त आहे.

रामप्रसाद की तेहरवी सिनेमात रामप्रसादच्या भूमिकेत नसिरुद्दीन शाह यांचा स्पेशल अपिरियन्स आहे. त्यांची पत्नी म्हणजे अम्माच्या भूमिकेत सुप्रिया पाठक कपूर आहे, ज्यांना एकूण 6 अपत्य , ज्यात 4 मुलं आणि 2 मुली आहेत, चार मुलांची भूमिका मनोज पहावा (गजराज ), निनाद कामत(मनोज), विनय पाठक (पंकज ), परंब्रता चॅटर्जी (निशांत ) यांनी केली आहे, तर अनुभा फतेहपुरा (राणी) आणि सारिका सिंग (धानी ) यांनी मुलीची भूमिका निभावली आहे. चारही मुलांच्या बायकांच्या भूमिकेत दीपिका अमीन (सुषमा), कोंकणा सेन शर्मा (सीमा ), सादिया सिद्दीकी (प्रतिभा )आणि दिव्या जगदाळे(सुलेखा ) या आहेत. अम्मा याना नातवंडंदेखील आहेत, ज्यांची भूमिका विक्रांत मेसी, सावन टंक यांनी केलीय. आता हे तर झालं रामप्रसादच छोटं कुटुंब पण या शिवाय सिनेमात रामप्रसादचा साला म्हणजे पोरांचे मामाजी पण आहेत. ज्यांची भूमिका विनीत कुमारने केलीये आणि मामीची भूमिका यामिनी दासने केली आहे. या सगळ्या कलाकारांना त्यांच्या पात्रांच्या वेगळ्या छटा आहेत, ज्या अतिशय सूक्ष्मपणे सीमा यांनी जिवंत केल्यात. जसं की, रामप्रसादच्या प्रत्येक मुलाचे आपल्या पालकाबद्दल एक मत आहे.

- Advertisement -

मोठ्या मुलासोबत सगळं शेयर केलं जातं, सगळ्यात लहान म्हणजे लाडका, तीन नंबरचा सर्वात लकी आणि मधल्याला वाटतं की, तो टाईमपास म्हणून जन्माला आला. बहिणीला वाटतं बापाने आपलं वाटोळं केलं, सर्व सुनांना वाटतं की, आपल्याच नवर्‍यावर ताण आलाय आणि या सगळ्यात मोठ्या नातवाचे हार्मोन्स जागृत होतायत.. एका सिनेमात अशा छोट्याछोट्या तब्बल 15 कथा घडताना दिसतात. सिनेमाच्या नावात जरी तेहरवी असलं तरी हा एक उत्तम विनोदी सिनेमा आहे, यात जे विनोद आहेत ते देखील उस्फूर्तपणे घडतात, अगदी अंत्यसंस्काराच्या वेळी घडणार्‍या विनोदातही उस्फूर्तता दिसते. सिनेमात बिजेंद्र काला यांनी फुफाजीची भूमिका केलीय. अंत्यसंस्काराला सगळ्यात आधी येणारा, अंत्यसंस्काराच्या लाकडाच्या भावात कमी जास्त करणारा आणि तेराव्याच्या कचोरीत मसाला जास्त टाकायला लावणारा… टिपिकल फुफाजी जो आपल्याला प्रत्येक कार्यक्रमात दिसतो तशीच भूमिका बिजेंद्र काला यांनी केलीये, त्यांच्यासोबतच श्रीकांत वर्मानेसुद्धा धानीच्या नवर्‍याची म्हणजे मोठ्या फुफाजीची भूमिका केलीये. प्रत्येक घरात एक वयस्क व्यक्ती असते जिला सगळ्या विधी माहिती असतात किंवा जिला विचारल्याशिवाय काम होत नाही, रामप्रसादच्या परिवारातही अशा दोन व्यक्ती आहेत एक म्हणजे मोठा भाऊ ताऊजी ( राजेंद्र गुप्ता) आणि दुसरी म्हणजे मोठी बहीण बुआजी, ज्यांचं पात्र साकारलं आहे पुष्पा जोशी या सिनियर अभिनेत्रीने. या शिवाय एक पंजाबी शेजारीणसुद्धा आहे, शिला आंटी म्हणून जिची भूमिका अलका कौशलने साकारली आहे.

बॉलिवूडमध्ये असे शेकडो कलाकार आहेत ज्यांनी अनेक सिनेमात काम केलंय आणि प्रत्येक सिनेमात चांगलं काम केलंय, पण तरीही त्यांच नाव आपल्याला आठवत नाही. काहींना मात्र आपण नावानिशी ओळखतो आता प्रत्येकाच्याच नशिबी ते ग्लॅमर लाभतं असं नाही, पण म्हणून त्यांचं काम लहान होत नाही, रामप्रसाद की तेहरवी हा अशाच कलाकारांचा सिनेमा आहे. म्हणून यातील पात्रांचा परिचय करून द्यायचा म्हटलं की, त्यांनी केलेल्या भूमिका सांगाव्या लागतील, उदाहरणार्थ सुप्रिया पाठक म्हणजे कोण ? तर ती खिचडी मधली हंसा…. रामलीलामधली खडूस म्हातारी अशी त्यांची ओळख, मनोज पाहावाने तर शेकडो सिनेमात काम केलंय पण ओळख काय तर रेडीमधला सलमानचा काका, वॉन्टेडमधला घर मालक, मुल्कमधला काका म्हणून हे नाव लक्षात राहत. मनोज, सुप्रिया, बिजेंद्र, विनय पाठक, कोंकणा सेन यांना किमान लोकं नावानिशी ओळखतील ही पण यात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांची नाव लोकांना आठवत नाहीत.

निनाद कामत …आता हे नाव किती लोकांना लक्षात आहे माहीत नाही , पण लगे रहो मुन्नाभाईमधला वकील आपल्याला लक्षात असेल, बॉलिवूडमधील एक उमदा व्हॉइसओव्हर आर्टिस्ट म्हणून निनादला ओळखलं जातं. अमिताभच्या अनेक अ‍ॅड्सला प्रादेशिक भाषेत निनाद आवाज देतो, अव्हेंजर सीरिजच्या हिंदी सिनेमात त्याने थॅनॉसचा आवाज दिलाय, निनाद एक गायकसुद्धा आहे आणि सिनेमातील एक अधुरा काम हे गाणं त्याने 3 आवाजात गायलं आहे. मिर्झापूरनंतर बबलू पंडितमुळे विक्रांत मेसीदेखील हिट झालाय, पण या सिनेमात कुठलीही स्टार ट्रीटमेंट त्याला दिलेली नाही, एव्हाना पहिल्यांदा विक्रांत सिनेमात कुठे दिसतो? हेसुद्धा तुम्ही ओळखू शकणार नाही. तुम्ही रेड सिनेमा पाहिलाय का ? असो तो पाहिला नसेल तरी फेविक्विकची एक जाहिरात नक्की पाहिली असेल, ज्यात गॉगल घातलेली डॅशिंग कचरेवाली आजी दाखवलीये, सिनेमात ती आजीसुद्धा आहे आणि तिने तितकंच उत्तम काम केलंय. पुष्पा जोशी वयाच्या 85 व्या वर्षी डेब्यूट केलेल्या या आजीबाईंचा बहुधा हा शेवटचा सिनेमा होता. याशिवाय सिनेमात राजेंद्र गुप्ता म्हणजे चिडियाघरवाले बाबूजी आहेत, त्यांचं अप्रूप वाटणारं इंग्लिशसुद्धा आहे.

काही कथा लेखक मनात जे सुचेल ते लिहितो, रंगवतो तर काही कथा आपल्या भोवताली घडत असतात. रामप्रसाद की तेहरवी ही आपल्या भोवती घडणारी कथा आहे, जी कधी ना कधी आपण सर्वांनीच अनुभवली आहे…उदा. मृत्यू झाल्यानंतर विचारपूस करायला येणार्‍या प्रत्येकाचा सेम प्रश्न आणि त्याच सेम उत्तर, सिनेमात हेच दृश्य पाहून आपल्याला हसायला येतं, कारण आपण हे सर्व आधी पाहिलंय. असं म्हणतात की सामान्य आणि साधा सिनेमा बनवणं हे सर्वात अवघड काम आहे, मोठे सेट्स लावून कथेत अनेक ट्विस्ट आणून सिनेमे बनवणं फार अवघड नाही, पण साधी कथा घेऊन त्याची साधी मांडणी करून ती कथा प्रेक्षकांना अपील करणं कठीण आहे. अंत्यसंस्कार ते तेरावा असा केवळ 13 दिवसांचा प्रवास दाखवणारा हा सिनेमा तुम्हाला याच साधेपणाशी भेट घालवून देतो, नात्यांमध्ये सॉरी आणि धन्यवाद म्हणायला शिकवतो, एकाही सुराला बेसुरा सोडणं म्हणजे सुरांचा अपमान आहे हे सांगतो. आंखो देखी सिनेमानंतर पहिल्यांदाच पुन्हा असा सिनेमा पाहायला मिळालाय, सर्वांना आवडेल असा हा सिनेमा आहे. आपण नेहमी पाहत असणार्‍या अनेक सिनेमांना खास बनवून त्यांना खर्‍या अर्थाने पूर्ण करणार्‍या लोकांचा हा सिनेमा आहे, हा अभिनेत्यांचा सिनेमा नाही तर पात्रांचा सिनेमा आहे आणि पात्रं जगणार्‍यांचा सिनेमा आहे, म्हणून एकदा पाहण्यास काहीही हरकत नाही.

-अनिकेत म्हस्के

- Advertisement -