घरफिचर्ससारांशकोरोनामुळे तुटले प्रेमाचे धागे !

कोरोनामुळे तुटले प्रेमाचे धागे !

Subscribe

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात बर्‍याच उच्चशिक्षित तरुणींनी केवळ भावी पतीचा जॉब गेल्याने लग्नास नकार दिला. यामुळे हल्लीच्या पिढीचा लग्नसंस्थेवरचा विश्वासच उडाला असून लॉकडाऊनमुळे तर त्याला अधिकच बळ मिळालं आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने जशी तरुणांची होणारी लग्न मोडली तसेच अनेक संसारही मोडले. नोकरी गेल्यामुळे काहीजणींनी नवरा आपल्याला पोसू शकत नाही, या कारणाने दहा किंवा त्याहून कमी अधिक वर्षांचे संसार मोडले. यामुळे एकीकडे नोकरी गेल्याचा धक्का पुरुषमंडळी पचवत असतानाच आपली जीवनसाथी अर्ध्या वाटेवर सोडून गेली, याचा दुसरा धक्का त्यांना बसत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या या काळात मनोविकार जडणार्‍यांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचेच प्रमाण अधिक आहे. कोरोनामुळे जसा अनेकांचा मृत्यू होत आहे तसेच प्रेमाचे धागेही तुटत आहेत.

नौकरी है तो छोकरी है, असं बोललं जातं. सध्याच्या घडीला तरी हेच त्रिवार सत्य असल्याचा अनुभव अनेक तरुणांना आला आहे. कारण कोरोना आणि नंतर लॉकडाऊनमुळे भावी नवर्‍याची नोकरी गेल्याने अनेक वधूंनी लग्नासचं नकार दिला. यामुळे भावी जीवनसाथी बरोबर आयुष्य घालवण्याचं अनेक तरुणांच स्वप्न भंग झालं आहे. तर ज्याला नोकरीच नाही तो माझा सांभाळ काय करणार, असा काही तरुणींचा थेट प्रश्न आहे. व्यावहारिक दृष्टीकोनातून पाहता तरुणींचा हा निर्णय योग्य असला तरी संबंधित तरुणाला भविष्यात कधीच नोकरी मिळणार नाही असा गैरसमज करून लग्नास नकार देणे म्हणजे समोरच्या व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण करण्याचाच प्रयत्न आहे, असा आरोप तरुणांकडून होत आहे. तर याच नाण्याची दुसरी बाजू मात्र अंधारातच आहे. ज्यात भावी पत्नीची लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली असतानाही तिची साथ न सोडता काही तरुणांनी लग्नगाठी बांधल्या आहेत.

बघायला गेलं तर दोन्ही घटनांचा थेट संबंध नोकर्‍यांबरोबर आहे. म्हणजेच पोटापाण्याबरोबर आहे. पैशाअडक्याबरोबर आहे. जो जगण्यासाठी आवश्यकच आहे. पण जेव्हा स्त्री-पुरुष समानतेचा विषय निघतो तेव्हा मात्र आजही घर चालवण्यासाठी पुरुषाचं अर्थाजन करणं गरजेचं समजलं जातं. यामुळे आज कोरोना व लॉकडाऊनच्या काळातही उच्चशिक्षित तरुणींनी केवळ भावी पतीचा जॉब गेल्याने लग्नास नकार देणं नातेसंबंधातील पोकळपणाचं दाखवतो. यामुळे हल्लीच्या पिढीचा लग्नसंस्थेवरचा विश्वासचं उडाला असून लॉकडाऊनमुळे तर त्याला अधिकच बळ मिळालं आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने जशी तरुणांची होणारी लग्न मोडली तसेच अनेक संसारही मोडले. त्यामागची कारणे विविध असली तरी एक कारण मात्र समान होतं. ते होतं घरातील कर्त्या पुरुषाची नोकरी जाणं. याच कारणामुळे बर्‍याच जणींनी नवरा आपल्याला पोसू शकत नाही, याच कारणाने दहा किंवा त्याहून कमी अधिक वर्षांचे संसार मोडले. यामुळे एकीकडे नोकरी गेल्याचा धक्का पुरुषमंडळी पचवत असतानाच आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत राहण्याच्या आणाभाका घेणारी सोबतीन कठीण काळात अर्ध्या वाटेवर सोडून गेली. यामुळे अनेक पुरुषांना नैराश्याने ग्रासले. त्यामुळे लॉकडाऊनच्या या काळात मनोविकार जडणार्‍यांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचेच प्रमाण अधिक आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे नोकरीच्या मुद्द्यावरून लग्न मोडणार्‍या भावी वधूंमध्ये शहरी तरुणींची संख्या अधिक आहे. तर ग्रामीण भागातील तरुणींनी मात्र लॉकडाऊनमुळे बेकार झालेल्या तरुणाबरोबर संसाराचा गाडा हाकण्यासही सुरुवात केली आहे. यावर बोलताना समाजसेविका आशा सुपे यांनी अगदी मार्मिक प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिलांचे राहणीमान हे साधे असते. यामुळे त्यांचा खर्चही शहरी स्त्रियांच्या तुलनेत कमी असतो. तसेच राहणीमानही साधे आणि गरजाही कमी. घरातील खर्चाचा भार हा ग्रामीण भागात आजही पुरुषचं उचलतात. त्यामुळे या महिलांचा पैशाबरोबर तसा थेट संबंध नाही. परिणामी घर चालवणं हे पतीचे काम आणि तो जे काही कमावून आणेल त्यातच घर चालवणं हे त्या घरच्या बाईचं काम हा अलिखित पण ठरलेला नियम आहे. यामुळे येथील महिलांच्या गरजा व अपेक्षाही माफक असतात. यामुळे संसार कमी खर्चात करणं ग्रामीण महिलांसाठी कठीण नसतं. पण त्या तुलनेत शहरातलं जीवनमान हे खर्चिक तर आहेच पण तेथे महागाईदेखील आहेच. यामुळे घर चालवण्यासाठी पती-पत्नी दोघांनीही नोकरी करणे गरजेचे आहे. यामुळेच जेव्हा लॉकडाऊनमुळे भावी पतीची नोकरी गेली तेव्हा बर्‍याचजणींनी लग्नास नकार दिल्याचे सुपे यांनी सांगितले.

सुपे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर या प्रकरणात केवळ नोकरी व पैशांसाठी जर आजची पिढी जुळणारी किंवा जुळलेली नाती तोडत असेल तर ही खरं तर गंभीर गोष्ट आहे. कारण नोकरी गेल्याने एखाद्याला नकार देणे ही संबंधित व्यक्तीची मानसिक कुचेष्टा तर आहेच, पण त्याच्यातील आत्मविश्वास संपवण्याचाच प्रयत्न आहे. कारण आजच्या स्पर्धात्मक युगात तरुण पिढीसमोर मोठं आव्हान आहे. मुलंमुली समसमान शिक्षण घेत आहेत. अशा वातावरणात नोकरी मिळवण्यापासून ती टिकवण्याचे आव्हान दोघांनाही असतेच. यामुळे खरं तर नोकरीत एकमेकांना येणार्‍या अडचणी दोघांनी समजून सोडवायला हव्यात. नोकरी गेल्याने त्याला डावलणे किंवा तो पैसा कमावत नाही म्हणून त्याला सोडून देणे हे विश्वासू नातं तर नक्कीच नाही. हे जरी खरं असलं तरी मुलांनीही अशावेळी स्वत:ला स्ट्राँग करायला हवं. तिचं नकार देणं जीवाला लागणारं असलं तरी त्यासाठी जीव नक्कीच देऊ नये किंवा जीव टांगणीलाही लावू नये. कारण फक्त नोकरीसाठी तुम्हांला डावलणारी व्यक्ती कधीच तुमची होऊ शकत नाही. जिला तुमच्या कर्तृत्वावर विश्वासच नसेल अशा व्यक्तीसाठी स्वत:ला नैराश्याच्या गर्तेत ढकलून देणं हे कधीच योग्य नाही. उलट आयुष्याच्या नव्या वळणावर नवी सुरुवात करावी. तिथे चाचपडत बसू नये. होतं त्यापेक्षाही काहीतरी उत्तम तुमची वाट पाहात असल्याचं समजावं आणि नवीन वाट धरावी.

- Advertisement -

तर दुसरीकडे तरुणींनीही समोरच्या व्यक्तीच्या जागेवर स्वत:ला ठेवून बघावे. ज्याच्याबरोबर आपण आयुष्य घालवण्याचे स्वप्न रंगवली त्याला कठीण काळात एकट सोडून जाणं प्रॅक्टिकलीदेखील किती योग्य आहे याचा विचार करावा. अशावेळी मुलीच्या घरातल्यांनी मुलीला सकारात्मक विचार करायला लावावा. प्रत्येकवेळी त्यांचा विचार त्यांनी करावा असे म्हणून दुर्लक्ष करू नये. काही घरात मुलामुलींना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असतेच. पण बर्‍याचवेळा मुलं गोंधळतात. प्रॅक्टिकल व प्रत्यक्ष यात अडकतात आणि गोंधळून भलताच निर्णय घेतात. त्यातही नोकरी गेल्याने मुलीकडून रिजेक्ट झालेली मुलं आतूनच कोसळतात. व्यक्त होणं जमत नसल्याने निराशेच्या गर्तेत जातात. तर मुली मात्र प्रॅक्टिकली विचार करत असल्याने त्यांना यातून निघण्यास फारसा त्रास होत नसला तरी त्याही निराश होतात. पण त्यांनीही टोकाचा निर्णय घेण्याआधी समोरच्याचा विचार नक्की करायला हवा. आपण उच्चशिक्षित शिक्षणाने होतो पण त्याच शिक्षणामुळे विचारही प्रगल्भ व्हायला हवेत. म्हणजे नातेसंबंध व व्यवहार यात महत्वाचे कोण हे ओळखण्यात घोळ होत नाही.

लॉकडाऊन हे आज एक निमित्त आहे. पण कोणत्याही कंपनीतील कर्मचार्‍यांवर कधीही कॉस्ट कटिंगचा बडगा येऊ शकतो. यामुळे कुठलाही निर्णय घेताना दोन्ही बाजूंचा विचार करायला हवा. एकीकडे समानतेच्या गप्पा मारताना आपल्याकडूनच समोरच्या मुलावर अन्याय तर होत नाही ना याचाही मुलींनी विचार करायला हवा. जर त्याची नोकरी गेली असेल तर आज ना उद्या दुसरी मिळेल. किंवा आपण करू काहीतरी एवढे बोलून त्याची हिंमत वाढवायला हवी. जेणेकरून त्या आत्मविश्वासाच्या बळावर तो पुन्हा उभा राहील. कारण आजही आपला समाजात कितीही सुशिक्षित कुटुंब असू देत नवरा मुलगा काय काम करतो या प्रश्नाला महत्व देतो. मुलगी काय करते हा प्रश्न नंतर विचारला जातो. यावरूनच आपली मानसिकता आजही पुरुषसत्ताकच आहे हे लक्षात येते. आपल्या आयुष्यातील पुरुषाला आपण कठीण प्रसंगात भक्कम साथ दिली तरच आपल्यातील संबंध अधिक घट्ट होतील आणि लग्नसंस्था टिकेल.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -