घरफिचर्ससारांशडेस्टिनेशन वेडिंगचे फॅड !

डेस्टिनेशन वेडिंगचे फॅड !

Subscribe

ब्रिटन आणि रशियामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली तर भारतातही लस पुढील महिन्यात येणार आहे. यामुळे कोरोनाचं सावटं निवळत असल्याचं सध्या चित्र आहे. परिणामी कोरोनाची भीतीही कमी झाली आहे. यामुळेच सरकारने लॉकडाऊनमुळे रखडलेली लग्ने 50 पाहुण्यांच्या उपस्थित उरकायची सवलत दिली. काहीजणांनी वेळेचे भान दाखवत अशी लग्नही केली. पण काही हौशानौशांनी लग्न करायचं तर ते दणक्यातच असं ठरवत थेट गावं गाठली. काहीजणांनी गावच्या मोकळ्या मैदानात मंडप उभे करून 50 नाही तर शंभरहून अधिक नातलगांच्या उपस्थितीत दोनाचे चार हात केले. डेस्टिनेशन वेडिंगचे हे फॅड जीवघेणे ठरू शकते.

सण मग तो छोटा असो की मोठा तो दणक्यात साजरा करण्यात आम्ही भारतीय जराही मागे राहत नाही. त्यासाठी वेळ पडली तर ऊसनवार पैसे घेऊनही आम्ही सण साजरे करतो. पण कोरोनामुळे हे अख्खे वर्षच नाही तर सगळे सण उत्सव बासनात गुंडाळावे लागले आहेत. त्यात लग्नसराईचाही समावेश आहेच. पण जसजशी कोरोनाची दहशत निवळू लागली तशी सण उत्सवासाठी माणसं एकत्र यायला लागली आहेत. त्यातच लॉकडाऊनमुळे ज्यांची लग्ने रखडली त्यांनी गावाकडची वाट धरली असून तेथे दणक्यात लग्न साजरी होत आहेत. डेस्टिनेशन वेडिंग असं त्याला गोंडस नाव देण्यात आलं आहे. सोशल डिस्टन्सिंग तेथे नावालाही नसून डोळ्यावर गॉगल लावावा तसे मास्क गळ्यात तर कधी खिशात घालून उघड्या तोंडांनी लग्नाचे बार उडवले जात आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा येथे पुरता फज्जा उडत असून क्षणभराच्या आनंदासाठी माणसं कोरोनालाच आलिंगन देताना दिसत आहेत.

हे संपूर्ण वर्ष कोरोनाचं आहे हे एव्हाना स्पष्ट झालं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन टप्याटप्याने शिथिल करत नियमावली जाहीर केली आणि त्याबरोबरच नागरिकांना सावधगिरीचा सल्लाही दिला. सुरुवातीला कोरोनाबाधित आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू बघून नागरिकांमध्येही भीती वातावरणही होते. पण आताचे चित्र बदललेले आहे. ब्रिटन आणि रशियामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली तर भारतातही लस पुढील महिन्यात येणार आहे. यामुळे कोरोनाचं सावटं निवळत असल्याचं सध्या चित्र आहे. परिणामी कोरोनाची भीतीही कमी झाली आहे. यामुळेच सरकारने लॉकडाऊनमुळे रखडलेली लग्ने 50 पाहुण्यांच्या उपस्थित उरकायची सवलत दिली. काहीजणांनी वेळेचे भान दाखवत लग्नही केली. पण काही हौशानौशांनी लग्न करायचं तर ते दणक्यातच असं ठरवत थेट गावं गाठली.

- Advertisement -

काहीजणांनी गावच्या मोकळ्या मैदानात मंडप उभे करून 50 नाही तर शंभरहून अधिक नातलगांच्या उपस्थितीत दोनाचे चार हात केले. तर काही श्रीमंतांनी पोलिसांची व गाववाल्यांची नजर चुकवत थेट गावाबाहेरील रिसोर्ट गाठत तिथे शेकडोंच्या उपस्थितीत लग्नाचे बार उडवले. पण तिथे ना पोलीस फिरकले ना कोणताही सरकारी अधिकारी. ना एकाच्याही तोंडावर मास्क ना सोशल डिस्टन्सिंग. किती हा बेजबाबदारपणा? एकीकडे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार अथक प्रयत्न करत आहे. कारण कोरोना हा केवळ आरोग्याशी संबंधित नाही तर राज्याबरोबरच देशाच्याही आर्थिक व्यवस्थेशी त्याचा संबंध आहे. यामुळे कोरोना महामारीला इतकं गृहीत धरणं योग्य नाही. कोरोनातून बरे होणार्‍यांचा आकडाही वाढत असला तरी जाणार्‍यांच्या आकड्यातही चढ उतार आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लग्नाच्या नावाखाली आपण सरकारची नाही तर कोरोनाची फसवणूक करतोय असा समज ज्यांनी करून घेतला आहे त्यांनी वेळीच त्यातून बाहेर यायला हवे.

लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस असला तरी आताचे दिवस माणसं गोळा करून लग्न करणार्‍यांचे नाहीतच. तर संसर्ग टाळण्यासाठी साधेपणाने व कमी माणसांच्या सोबतीने साजरे करण्याचे आहेत.

- Advertisement -

कोरोना रुग्ण बरे होत असल्याने ज्या देशांनी चुका केल्या त्या आपण करता कामा नये. कारण याच बेफीकीरीने तिथे कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे. फार दूर न जाता आपल्या दिल्लीचचं बघा. तिथे दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट उसळली. गणपती व दिवाळीच्या कालावधीत जगाबरोबरच देशभरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले. कोरोनावर अनेक औषधेही बाजारात आली. त्यामुळे साहजिकच मृत्यूदर कमी झाला. तर कोरोनातून बरे होणार्‍यांचा आकडाही वाढला. त्यामुळे कोरोना गेल्याचाच नागरिकांचा समज झाला. त्यानंतर युरोपियन आणि दिल्लीकरांनी जणू कोरोना गेल्याच्याच थाटात वावरायला सुरुवात केली. विनामास्क लोक शहरभर फिरायला लागले. सोशल डिस्टन्सिंगचा नागरिकांना विसर पडला. कोरोनाच्या भीतीने संपूर्ण वर्ष सुतकाप्रमाणे घालवल्याने वैतागलेल्या नागरिकांनी कोरोना गेल्याच्या अविर्भावात वावर वाढवला. शुभेच्छा देण्यासाठी दिवाळीत एकमेकांच्या घरी गेली. शेकडो हजारोंच्या संख्येत लग्नाचे बार उडवले. तिथेच घोळ झाला. माणसं माणसांच्या थेट संपर्कात आली आणि कोरोनाने डाव साधला. दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली. जे चित्र मार्च एप्रिलमध्ये होतं. तेच दिल्लीत उभं राहिलं. पुन्हा कोविड रुग्णालये रुग्णांनी भरून गेली. बेड मिळेनासे झाले. व्हेंटिलेटरची कमतरता असल्याने रुग्णालयांनी रुग्णांना घरीच उपचार करण्याचे सल्ले दिले. पण व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने अनेक दिल्लीकर जीव गुदमरून मृत्यूमुखी पडले.

याच चुका आता महाराष्ट्रही करताना दिसतोय. निमित्त आहे दिवाळसण आणि लग्न. दिवाळी तर झाली. पण लग्नाचे मुहूर्त सुरू झाले आहेत. पण खरंच ज्या कोरोनाला घाबरून आपण जवळजवळ आठ महिने घरात बंद होतो त्याला गृहित धरून लग्नसमारंभ गर्दीत साजरे करणे गरजेचे आहे का? शहरात पोलिसांचा लग्नातील गर्दीवर वॉच आहे म्हणून दणक्यात लग्न करण्याची हौस भागवण्यासाठी गावं गाठणे योग्य आहे का, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. त्यातही शहरातील मंडळींनी कारण आपण सुशिक्षित आहोत. कोरोना काय हे तुमच्या आमच्यासारख्या मुंबईकरांनी जवळून बघितलं, अनुभवलं. जी मुंबई ना कधी दहशतवादी हल्ल्यांमुळे थांबली ना कधी पुराने, ती फक्त कोरोनाने थांबली. यावरूनच कोरोनाच्या ताकदीपुढे आपण किती तकलादू आहोत हे कळायला हवं. क्षणभराच्या आनंदासाठी आपण अनेकजणांचे जीव धोक्यात घालत आहोत. हे मुंबई व पुणेकरांनाच नाही तर सर्वच हौशी नागरिकांना कळायला हवं. आपला आजचा संयमच कोरोनाला रोखणार आहे. लशीचे आंतरराष्ट्रीय राजकारण अजून किती महिने चालेल हे सांगता येत नाही. तोपर्यंत तरी लग्न व इतर सोहळे सावधानता बाळगत साजरे करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. हे विसरता कामा नये.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -