घरफिचर्ससारांशतर बदल हमखास घडेल

तर बदल हमखास घडेल

Subscribe

शहरात फेरफटका मारत असताना रस्त्यावरचा मधोमध भागातील एखादा खड्डा नागरिकांसाठी किती धोकादायक आहे. हे सोशल मीडिया वरती ज्यावेळी वायरल होते त्यावेळी नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका दखल घेऊन तो खड्डा बुजवण्याचे काम करतात. एवढेच नाही तर ज्यावेळी शहरात किंवा गावात एखाद्या पाईपलाईनमधून प्रचंड प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत असते. त्याही वेळी सोशल मीडिया कामी आलेला दिसतो. म्हणजेच आपली नजर एखादी समस्या सोडवण्यासाठी सक्रिय असेल तर बदल हा हमखास घडून आल्याशिवाय राहत नाही. &...................

आमचा नेता पावरफुल.. एकच ध्यास, गावाचा विकास.. जनामनातला तरुण तडफदार उमेदवार अबक यांनाच प्रचंड मतांनी विजयी करा…ताई, बाई, अक्का विचार करा पक्का, आणि आमच्या निवडणूक निशाणी वरच मारा शिक्का.. सध्या या काही घोषणासह महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहे. प्रत्येक जण आपापल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. सत्तेचे केंद्र हे दिल्ली नसून, गाव आहे. या संत तुकडोजी महाराजांच्या उक्तीनुसार यावर्षी सर्वाधिक युवकांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवला. फक्त सहभागच नोंदवला नाही तर अनेक युवा तरुण-तरुणींनी आपली उमेदवारी सुद्धा दाखल केली. 25 ते 30 या वयोगटातील युवक युवतींचे यावर्षी सर्वाधिक अर्ज उमेदवारीसाठी आलेले निवडणूक आयोगाने जाहीर केले. म्हणजेच सध्या युवक राजकारणाकडे सुद्धा करियर म्हणून पहात आहे. आणि आपली उमेदवारी जाहीर झाल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपला प्रचार हा वेगळ्या वाटेने करत आहेत. ती वेगळी वाट म्हणजे सोशल मीडियाद्वारे… आजपर्यंत आपण पाहिले की, देश पातळीवरील राजकारणात म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकीसाठी, तसेच विधान परिषद, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी होणार्‍या निवडणुकीत सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका पार पाडत असे.पण त्याचे जाळे आता ग्रामीण भागात सुद्धा विस्तारलेले दिसते. एकूणच काय तर ज्या ठिकाणी युवक आहेत त्या ठिकाणी सोशल मीडिया हा त्यांचं प्रभावी शस्त्र आहे. आणि याचा पुरेपूर फायदा हे युवक घेत आहेत.
यापूर्वी आपण पाहिले की, प्रचार म्हटले की उमेदवार स्वतः मतदारांच्या घरी जाऊन भेटी घेत असत, गावातल्या चावडीवर किंवा पारावर छोटेखानी सभा होत असे, तिथे गप्पांचा फड रंगत असे, कोणत्या उमेदवाराचे काम चांगले, कोण निवडून येणार, या सर्व गोष्टींचे अंदाज लावले जात असत. पण आता या सर्वांची जागा सोशल मीडियाने घेतली आहे. आजही अंदाज लावले जातात सर्व गोष्टी होतात पण डिजिटल तंत्रज्ञानाने. पूर्वी एखाद्या गावाची ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की, त्या गावापुरती मर्यादित असायची, खूप झाले तर शेजारच्या गावांना माहिती होत असे. पण आता फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर सोशल मीडियाच्या अ‍ॅपमार्फत ग्रामपंचायतची निवडणूक ही ग्लोबल झाली आहेत. आपापल्या पॅनलच्या उमेदवाराचे फोटो, त्यांचा जाहीरनामा, एखादे गाणे सोबत जोडून छोटासा व्हिडिओ उमेदवार मतदारांनापर्यंत सोशल मीडियाद्वारे पोहोचवत आहेत. ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे.
कोरोना काळातील लॉकडाऊननंतर ग्रामीण भागातील अनेक लोक कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कामासाठी आपले गाव सोडून औरंगाबाद, पुणे, मुंबई किंवा इतर राज्यांमध्ये गेले आहेत. या सर्व मतदारांसोबत संपर्क साधण्यासाठी हा डिजिटल मीडिया अत्यंत उपयुक्त ठरतोय. मल्टी मेसेजेस, ऑडिओ व्हिडिओ कॉल, तसेच भ्रमणध्वनीद्वारे फेसबुक झूम मीटिंग एकूणच प्रत्यक्ष संवाद साधण्याचं काम उमेदवार करत आहेत. ‘व्हिलेज टू ग्लोबल’ ग्रामपंचायतीचा प्रवास आपण ज्यावेळी पाहतो, त्यावेळी लक्षात येते की, काही लोकांनी जो सोशल मीडिया निष्क्रिय ठरवला होता. त्याच सोशल मीडियाला सक्रिय ठेवण्याचे काम युवावर्ग करत आहे. काही ठिकाणी गाव कसा असावा इथपासून ते आजची गावाची स्थिती आहे, त्यापेक्षाही चांगली बनविण्यासाठी युवकांनी गावकर्‍यांना व निवडून येणार्‍या सदस्यांना ‘फाईव्ह इयर प्लॅन ’, डिजिटल रोडमॅप तयार करून दिला आहे.
सध्या मी हिंगोली जिल्ह्यात आहे. या भागातील गावांमध्ये मी भेटी दिल्या व ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार असलेल्या माझ्या काही मित्रांना भेटलो. त्यावेळी प्रत्येकांनी सोशल मीडियावरील प्रचाराला जास्तीत जास्त पसंती दिली. त्याचे आणखी एक कारण म्हणजे, सोशल मीडियाद्वारे होणार्‍या प्रचाराला कोणत्याही प्रकारचा खर्च लागत नाही. आणि लागलाच तर थोड्याबहुत प्रमाणात. सोबतच आपण ज्या काळाची भाषा बोलतो ती लोकांपर्यंत आपल्या मनाप्रमाणे पोचवता येते. आपल्या आवाजातील एखादी छोटीशी ऑडिओ क्लिपसुद्धा आपल्या विजयासाठी महत्त्वाची असते. आणि विरोधकांवर आपल्या प्रभावापेक्षाही दबाव निर्माण करता येतो. असेही काही उमेदवारांचे म्हणणे आहे. जग बदलत आहे तर जगासोबत चालले पाहिजे. आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. हे ओळखून प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे.
अनेक लोक आहेत जे सोशल मीडियाचा चांगला वापर करतात. पाठीमागच्या काही वर्षांचा मागोवा घेतला असता आपल्या लक्षात येते की, अनेकांच्या अडचणी याद्वारे सोडवल्या जातात. शहरात फेरफटका मारत असताना रस्त्यावरचा मधोमध भागातील एखादा खड्डा नागरिकांसाठी किती धोकादायक आहे. हे सोशल मीडिया वरती ज्यावेळी वायरल होते त्यावेळी नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका दखल घेऊन तो खड्डा बुजवण्याचे काम करतात. एवढेच नाही तर ज्यावेळी शहरात किंवा गावात एखाद्या पाईपलाईनमधून प्रचंड प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत असते. त्याही वेळी सोशल मीडिया कामी आलेला दिसतो. म्हणजेच आपली नजर एखादी समस्या सोडवण्यासाठी सक्रिय असेल तर बदल हा हमखास घडून आल्याशिवाय राहत नाही. गाव, तालुका, जिल्हा, विभाग, राज्य देश या सर्वच पातळ्यांवर आज युवकांना विकासात्मक बदल घडवून आणण्याची संधी आहे. अर्थात त्या संधीचा फायदा अनेक युवक राजकीय क्षेत्रात पदार्पण करून घेत आहेत. जिथे जातीचे आणि धर्माचे राजकारण व्हायचे तिथे युवक सर्वधर्मसमभाव जोपासत आहे. हे त्यांच्या सोशल अ‍ॅक्टिविटी वरून दिसून येते. अनेक गावांमध्ये महापुरुषांना आजपर्यंत विशिष्ट जात, धर्म, पंथ यामध्ये अडकून ठेवले होते, तिथे युवकांनी प्रत्येक महापुरुषांची जयंती साजरी करून फेसबुक व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवून आपली मानवतेची संस्कृती जगाला दाखवून दिली आहे, देत आहेत.
अखेर प्रचार म्हटले किंवा बदल घडवून आणायचा म्हटले की हेवेदावे आलेच.. पण या सर्वांना बाजूला ठेवून यावर्षीची ग्रामपंचायत निवडणूक खिलाडूवृत्तीने होत असल्याचे दिसते. एक व्यक्ती, एक मत, एक मत, एक मूल्य ह्या गोष्टीची जाणीव आज लोकांना करून देण्याचे काम होत आहे. लोकशाहीमध्ये मताची किंमत जर मतदारांना कळली तर गावासह देशाचा विकास नक्कीच होईल.
कारण सध्याचा जो मास मीडिया आणि सोशल मीडिया आहे. तो खेड्यापाड्यातील प्रत्येकांच्या दारापर्यंत एवढेच नाही तर शेवटच्या माणसांपर्यंत पोचला आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे त्याची ही एक चांगली बाजू आहे. आणि याच गोष्टीचा फायदा आज ग्रामीण भागातील तरुण करून घेत आहेत. आशा करूयात आजच्या या ग्रामपंचायत निवडणुकीमधून देशाचा नवा नेता तयार होऊ शकेल. जो देशाचे उज्ज्वल भविष्य असेल.


धम्मपाल जाधव
लेखक युवा विषयाचे भाष्यकार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -