घरफिचर्ससारांशबाजार... असा तसा

बाजार… असा तसा

Subscribe

कोरोना लॉकडाऊनमुळे गेले अनेक महिने हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद होते, त्यामुळे तेथे काम करणारे छोटे मोठे कामगार आणि स्वतःची टपरी चालवणारी दिल्लीतील बाबाच्या ढाब्यासारखी अनेक दुकाने बंद होती. याचा परिणाम अर्थात केवळ त्यांच्यावर नाही तर जे भाजीपाला आणि इतर दूध किंवा वस्तू ज्या शेतकरी विक्रेत्यांकडून घेतात त्यांच्यावरसुद्धा झाला होता. शहरातल्या गरिबांची दिवाळी ही अशी आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात तर दिवाळी हा सण म्हणजे खरीपाची पिके हातात येऊन उत्पन्न आले की साजरा करायचा सण. शिवाय रब्बीची पेरणी झालेली. त्यामुळे सर्वत्र शेते बहरून आलेली असतात. पण गेली काही वर्षे आधी दुष्काळ आणि नंतर अवकाळी यांचे सावट या सणावर असते. हे वर्षही वेगळे नाहीये. कोरोनाच्या काळात सारं काही ठप्प असतानाही शेतकरी कष्ट करत होता. निसर्ग दंगा करतो आणि बाजारातही त्याच्या कष्टाला किंमत नाही.

मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे वा अन्य कोणतेही शहर असो दिवाळीनिमित्त बाजारपेठा गच्च भरलेल्या दिसतात. बाजारातून, दुकानातून, रस्त्यांवरून उत्साह ओसंडून वाहतोय. सभोवताली काय नसते? म्हणजे माणसं, गर्दी, पदार्थ, सुगंध, रोषणाई आणि बरंच काही. सण-उत्सव सुरू झाला की घराघरातून होणारी लगबग बाजारपेठेतून सुरू होते. कोरोनामुळे बाजारपेठेत शुकशुकाट असेल असा अंदाज वर्तवणार्‍या ‘अर्थतज्ज्ञांना’ ही या गर्दीने डोके खाजवायला भाग पाडले. कोरोनाचं सावट जरी दिवाळीवर असलं तरीही लोक बिनधास्तपणे बाहेर येताय, बाहेर पडताय, आणि मनसोक्त खरेदी पण करताय. एक मात्र जाणवतंय. दिवाळीत फटाक्यांचा दणदणाट यंदा काहीसा कमी दिसतोय. मुख्यमंत्र्यांपासून जिल्हाधिकार्‍यांपर्यंत सगळ्यांनीच फटाके मर्यादित प्रमाणात वाजवण्याचं आवाहन केलंय. फटाक्यांचा धूर कोरोनाला आमंत्रण देणारा असल्याने लोकंही मर्यादित प्रमाणात फटाके वाजवताना दिसताहेत. त्यामुळे बच्चे कंपनींचा मूड मात्र काहीसा खराब झालाय. दुसरीकडे भरपूर सुट्या मिळाल्याने आनंदही गगनात मावत नाही. इतकंच नाही की, आता तर सुट्ट्यांचे अप्रूप संपल्यात जमा आहे. मग दिवाळी वेगळी ती काय? तर खरेदी, फराळ आणि रोषणाई. फटाके तर सरकार बंदच करतंय.
नाशिकच्या गोदाघाटावर संध्याकाळी एका खेळणी विक्रेत्या महिलेला मी भेटली.

काय काकू कसं चाललंय?
काही नाही बाई. आहे ते बरे आहे.
कसा आहे धंदापाणी?
कशाचं काय बाई? धंदा उरला कुठ? ही करोनाची ब्याद आली पाह्य तसा धंदाच नाही.
मग दिवाळीचे काय काकू?

- Advertisement -

कशाची दिवाळी ताई. गरिबाला लई परेशानी आहे बघ. हे धंदा पाणी झाला तर दिवाळी नाहीतर कशाचे काय?
खरे तर टीव्हीतल्या दिवाळीच्या नयनरम्य जाहिराती बघून तसं साजरे करायची सवय झालेल्या मध्यम व उच्च मध्यमवर्गाला अशा गरिबांची, वंचितांची, उपेक्षितांची दिवाळी माहीत असायला हवी. दिवाळीच्या ऑफरला आनंद मानून खरेदी म्हणजे ऑनलाइन खरेदी करणारा एक वर्ग ज्याच्या घरात रोशनाई आहे, प्रकाश आहे, उत्सव आहे, आनंदसुद्धा आहे. पण दुसरीकडे काही समूह आणि आपलेच बांधव यापासून दूर आहेत. मोठमोठ्या इ कॉमर्स कंपन्या जिथे उंची पेहराव, नवीन दागिने यांची जाहिरात करत आहेत आणि आपल्यासमोर आपल्या संकृतीच्या नव्या जाणिवा खुबीने उभी करत आहे, मग ते ड्रायव्हर दिलेल्या मोबाईलची जाहिरात असो अथवा मोलकरणीला दिलेल्या भेटीची. त्यातून एक ग्राहकाच्या संस्कृतीच्या जाणिवा हेरून आपल्याला खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीची दिवाळी तशी निराळी आहे. गेले काही महिने सारे जग एका आपत्तीतून जात होते. त्यामुळे भीती, द्वेष, भय, दु:ख, वेदना, व्यथा आणि विवंचना प्रत्येकाने अनुभवल्या. लॉकडाऊन सुरु झालं, तशी सगळीकडे स्मशान शांतता अनुभवायला मिळाली. सगळं स्तब्ध झालं. अगदी लहानमुलांच्या खेळातल्या पुतळ्यासारखं. शहर ठप्प झाली. गावांना भरती आली. शहरातल्या असुरक्षिततेला सोडून माणसांनी स्वतच्या मुळांकडे धाव घेतली. काही चालत गेले दूरदूरवर. अनेकांनी गड्या आपला गाव बरा असं ठरवून कायम गावात राहायचा निर्धार केला. शहरातले ओस पडलेले रस्ते जीवघेणे भासत होते तेव्हा मात्र गावं जिवंत झाली होती.

- Advertisement -

मग शहर आणि खेड्यातली कुणाकुणाची दिवाळी कशी असते? कशी असेल?

या वर्षी लॉकडाऊन झाला तसे उद्योग व्यवसाय ठप्प झाले. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. विशेषतः असंघटित कामगारांच्या जीवनावर त्याचा भयंकर परिणाम झाला. रोजंदारीवर बांधकामासाठी जाणारे मजूर, बाजार समितीत ओझी उचलणारे हमाल, कारखान्यातील मजूर, रस्त्यांची कामे करणारे मजूर आणि छोटे मोठे टपरी, गाडा असणारे लोक यांना सगळ्यांना कमाईला मुकावे लागले. मग उत्पन्न नाही. सगळी माणसे घरात बसून त्यात खाणारे आणि कमवणारे यांचे गणित व्यस्त झालं. केवळ गरीब मजूर नाही तर खासगी आस्थापनामध्ये काम करणारे उच्चशिक्षित नोकरदारांच्यासुद्धा नोकर्‍या गेल्या.त्यामुळे आर्थिक पातळीवरचा संघर्ष बघता यावेळची दिवाळी कशी असेल?

दिवाळी हा सण महत्वाचा मानला जातो. कुणी कुठेही असो पण दिवाळी आली की, सगळे घरी जमतात. गरीबसुद्धा आनंदाने या सणाला गोडधोड करतात. खरेदी करतात. वर्षभर काही कमाई बाजूला ठेवून सगळेजण आपापल्या पद्धतीने आनंद साजरा करतात. पण आजूबाजूला कोण कशी साजरी करत आहे हे बघायला हवं.

नाशिकच्या गोदा घाटावर लहान मुलांची खेळणी विकणारी एक महिला विक्रेती सध्या धंदा नाही म्हणून चिंतेत होती. लोक लहान मुलांना घराबाहेर आणत नाही आणि आता गाड्यावरच्या खेळण्या घेत पण नाही, त्यामुळे कमाई नाही. या दिवाळीला काही मजा नाही. ना नातवांना कपडे ना भरपूर खरेदी. एवढं करून दुसरी लाट आली तर आहे तो धंदा बंद होईल याची तिला भीती.

एका उद्यानाबाहेर खाद्यपदार्थ विकणारी एक विधवा महिला गेले अनेक महिने धुण्याभांड्याची कामे करून उदरनिर्वाह करते आहे. तिचा स्वत:चा हक्काचा व्यवसाय उद्याने सुरू झाल्याशिवाय सुरू होणार नाही. त्यामुळे आपल्याला दिवाळीत हात आखडता घेऊन खर्च करायला लागेल.याची जाणीव तिला आहे, म्हणून ती जास्तीची कामे घेते आहे.

एका ठिकाणी एका रस्त्यावर बसून आपला उदरनिर्वाह करणारे हातविक्रेते सर्वात जास्त गंभीर परिस्थितीचा सामना करत होते. लॉकडाऊन झाले तेव्हापासून सर्वात आधी त्यांचे उत्पन्न बंद झाले. बाजार बंद पडल्याचा परिणाम इतका भयानक होता की, दिवसाकाठी 200 रुपये मिळवून उपजीविका करणारे असे विक्रेते मग दारोदारी फिरून विक्री करायला लागले. दिवाळी आली की, दारोदारी रांगोळी, पण त्या हातगाडीवर घेऊन विकाणारे अनेक जण आता अनेक इमारती आणि सदनिकामध्ये त्यांना प्रवेश बंदी असल्याने आता पूर्वीसारखी विक्री होत नाही असे सांगतात.

भारतात बाजारात सातत्याने मागणी टिकवून धरण्यात येथील सण-उत्सव मोठी भूमिका बजावतात. दसरा, दिवाळी, पाडवा असे काही मुहूर्त साधून मोठी उलाढाल होत असते. शिवाय दिवाळीनंतर विवाहसोहळे सुरू होतात. यावर्षी तर मार्च ते जुलै हा विवाह सोहळ्यांचा काळ लॉकडाऊन असल्याने वाया गेला. शिवाय छोटेखानी विवाह खूप झाले तरीही तशी खरेदी झाली नाही. त्यामुळे कापडबाजार आणि त्यावर उपजीविका असणारे छोटे मोठे विणकर, टेलर यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता. अनेक विणकरांकडे गेल्याच वर्षीचा माल विक्रीअभावी पडून आहे. त्यामुळे साहजिक घरगुती टेलरिंग करणार्‍या महिलांना काम मिळत नव्हते. अर्थात याच दरम्यान मास्कची निर्मिती करून अनेकींनी कमाई केली. त्यामुळे बाजारात विविध नक्षीची, पद्धतीची नवनवीन मास्क आपल्याला बघायला मिळाली.

जेव्हा कार्यालये, वाहतूक आणि परिवहन बंद झाले तेव्हा रिक्षा चालकांच्या रिक्षादेखील उभ्या होत्या. त्यामुळे अनेक महिने हे रिक्षावाले विनाकमाई घरात बसून होते. अनेकांनी पर्याय म्हणून भाजीपाला विक्री, फळ विक्री सुरू केली. परंतु आजही लोक जास्त बाहेर पडत नसल्याने आणि रिक्षात प्रवास करत नसल्याने उत्पन्न पूर्वीसारखे नाही.

अनेक कार्यालयांबाहेर, महाविद्यालयाबाहेर चहा, वडापावचे गाडे, नाश्त्याचे गाडे उभे असतात. पण सध्या तेथे वर्दळ नसल्याने विक्री नाही. परिणामी शाळेच्या बाहेर गोळ्या विकून कमाई करणारी महिला असो अथवा चहा टपरीवाला यांची दिवाळी ही काटकसरीची असणार आहे. अजूनही महाविद्यालये आणि काही कार्यालये सुरू नसल्याने मेस किंवा खानावळ चालकांना उत्पन्नासाठी इतर पर्याय शोधावे लागत आहेत. खानावळ चालवणारी एक महिला यावर्षी दिवाळी फराळ विकून कमाईसाठी पर्याय शोधते आहे. विशेषतः घरून काम करून कमाई करणार्‍या महिलांनी त्यात मूलभूत बदल करून आर्थिक कमाईसाठी प्रयत्न केल्याचे दिसते ही आनंदाची बाब आहे.

गेले अनेक महिने हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद होते त्यामुळे तेथे काम करणारे छोटे मोठे कामगार आणि स्वतःची टपरी चालवणारी दिल्लीतील बाबाच्या ढाब्यासारखी अनेक दुकाने बंद होती. याचा परिणाम अर्थात केवळ त्यांच्यावर नाही तर जे भाजीपाला आणि इतर दूध किंवा वस्तू ज्या शेतकरी विक्रेत्यांकडून घेतात त्यांच्यावरसुद्धा झाला होता.

शहरातल्या गरिबांची दिवाळी ही अशी आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात तर दिवाळी हा सण म्हणजे खरीपाची पिके हातात येऊन उत्पन्न आले की साजरा करायचा सण. शिवाय रब्बीची पेरणी झालेली. त्यामुळे सर्वत्र शेते बहरून आलेली असतात. पण गेली काही वर्षे आधी दुष्काळ आणि नंतर अवकाळी यांचे सावट या सणावर असते. हे वर्षही वेगळे नाहीये. कोरोनाच्या काळात सारं काही ठप्प असतानाही शेतकरी कष्ट करत होता. पण निसर्ग दंगा करतो आणि बाजारातही त्याच्या कष्टाला किंमत नाही.

एकसामान्य शेतकरी. यावर्षी सोयाबीन निघाले की त्या पैशातून पुढील नियोजन करतो. कापूस विकून पैसे आले की, त्यात घराला रंग देऊ. मुलांना कपडे घेऊ आणि बरंच काही नियोजन केलेला. पण अचानक पाऊस आला आणि होत्याच नव्हतं झालं. आता शेतातली मातीसुद्धा उरली नाही. उत्पन्न शून्यावर. कर्जाचा डोंगर. अशा अवस्थेत दिवाळी साजरी करायची तर परत उसनवारी करावी लागते.

यावर्षी कांद्याचा बाजारभाव चांगला होता. त्यामुळे उत्त्पन्न होईल याची आशा कांदाउत्पादक शेतकर्‍यांना होती, पण अवकाळी पावसाने उत्पन्नात घट केली. आता उरलेले थोडे फार पीक काढून त्यात वर्ष काढायला लागेल. तरीही दिवाळीच्या सणाला खर्च कसा करायचा हा प्रश्न उरतोच.

शेतीत मजुरी करणार्‍यांना आता रोजगारासाठी इतर पर्याय शोधावे लागतील. मग बांधकाम, रस्त्याची कामे किंवा रोजगार हमी याशिवाय पर्याय नाही. शेतकरी आणि शेतमजूर यांनादेखील यावेळी दिवाळी संघर्षाची आहे.

खरे तर करोना ही केवळ आरोग्य आणीबाणी नव्हती तर त्याचे अनेक आर्थिक-सामाजिक परिणाम आपण अनुभवले. यामुळे आरोग्य व्यवस्थेपेक्षा भयावह उपजीविकेचा प्रश्न आहे हे अधोरेखित झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाले. जगभरातील अर्थव्यवस्था संकटाचा सामना करत आहे. त्यात भारतासारख्या विशेषत: अधिकाधिक उपजीविका असंघटित क्षेत्रात असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये हा गरीब मग तो शहरातील असो अथवा गावातील त्याला समस्यांना सामोरे जावे लागतेच.

एकीकडे आंतरराष्ट्रीय श्रम संघटना अडीच कोटी लोकांच्या नोकर्‍या कमी होतील असे सांगत आहे तर जवळपास भारतात 4 कोटी नागरिक थेट दारिद्य्ररेषेखाली जाणार असल्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आर्थिक विषमता देखील वाढीस लागू शकते. आज अनेक दुकानांत मागणी नसणे ही मोठी अडचण आहे. मग रोजगार उपलब्ध नसल्याने मागणीत वाढ होत नाही. परिणामी पुन्हा रोजगार कमी आणि मागणीत घट हे दुष्टचक्र चालू राहते. जेथे मान्यवर. बिबा यांसारख्या मोठ्या ब्रंडने उत्पादनात घट केली आहे तिथे समान्य विक्रेते काय करणार? पूर्वीसारखी गर्दी नाही हे एकच उत्तर सध्या त्यांच्याकडे आहे.

अर्थात यांत एक क्षेत्र फायद्यात आहे ते म्हणजे मोबाईल, लॅपटॉप आणि वाशिंग मशीन यांची विक्री करणारे विक्रेते. सध्या ऑनलाईन प्रणालीचा वापर करून शिक्षण, कार्यालयीन कामकाज चालू असल्याने यात सातत्याने वाढ होते आहे. त्यामुळे डिजीटल व्यवस्थेला पूरक उत्पादनाची मागणी वाढली आहे.

अर्थात सण आले की, ते नवी आशा घेऊन येतात. त्यामुळे सध्या संसर्ग कमी झाल्याने लवकरच स्थिती पूर्वपदावर येईल आणि बाजारात या निमित्ताने मागणी वाढेल अशी आशा आहे. त्यासाठीच अनेक अर्थतज्ञ छोट्या व मध्यम व्यापारी व विक्रेत्यांकडून यावर्षीची दिवाळी आणि इतर खरेदी करा, असे सातत्याने सांगत आहेत. त्यामुळे स्वत:ची काळजी घेऊन फुललेल्या बाजारपेठेत खरेदीसाठी आपण जाऊ शकतो. ही दिवाळी भयाचा अंधार दूर करून नवी उमेद देईल अशी आशा करूया.

– हर्षाली घुगे, (लेखिका सामाजिक अभ्यासक आहे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -